Saturday, April 17, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश पेशंट आणि आपण

पेशंट आणि आपण

काही लोकांना पेशंट आयसीयूमध्ये आहे हा फरकच कळत नाही. असे लोक आयसीयूमध्ये लोंढेच्या लोंढे घेऊन आत जातात, पेशंटच्या कॉटवर बसून गप्पा सुरू असतात. त्यामुळे बर्‍याच दवाखान्यांनी सिक्युरिटी सिस्टीम बसवली आहे आणि पेशंटला भेटण्याची विशिष्ट वेळ निश्चित केली आहे. त्या वेळेतही एका वेळी एकच व्यक्ती तेही पास घेऊन जाऊ शकेल अशी व्यवस्था सुरू केली आहे. यात त्या पेशंट बरोबरच्या लोकांनाच त्रास होतो. सारखं खाली पास घेऊन या, आलेल्या माणसांना वरती घेऊन जा, परत सोडवायला या, अशा गोष्टी कराव्या लागतात.

Related Story

- Advertisement -

आज मी तुमच्याशी एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे, तो म्हणजे पेशंट आणि त्याला भेटायला येणारे लोक. 17 नोव्हेंबर 2019 ची गोष्ट. दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान माझ्या वडिलांना अस्वस्थ होत आहे हे त्यांच्या स्वतःच्या लक्षात आले आणि भावाने ताबडतोब दवाखान्यात आणले. आणतानाच त्याने मलाही फोन केला होता. मीही लगेच पोहोचले. आजकाल बर्‍याच मोठ्या दवाखान्यात त्या दवाखान्याचे मुख्य डॉक्टर तिथेच वरती रहात असतात. त्यामुळे लगेच योग्य तो उपचार मिळाला. माझे वडील त्याच डॉक्टरांचे पेशंट असल्यामुळे त्यांना वडिलांची आजाराची हिस्ट्री माहीत असल्यामुळे उपचार करणे सोपे गेले. वडिलांना घशाला पॅरेलीसेस झाला आहे असे समजले. वडिलांचे वय शहात्तर वर्षे आहे. त्या दिवसापासून आम्ही सर्व भावंडं, आमचे पार्टनर आणि आमची आई आजारपण आणि आपल्या शहरात कुठले कुठले दवाखाने आहेत, कोणत्या कोणत्या टेस्ट करायच्या असतात याचा रोज नवीन नवीन अभ्यास करतो आहे.

तुम्ही म्हणाल तर आम्ही काय करायचं त्यात? हे तुम्ही आम्हाला का सांगत आहात? तर जवळ जवळ तीन साडेतीन महिने विविध ठिकाणचे पेशंट आणि त्यांना भेटायला आलेले लोक, आमच्या वडिलांना भेटायला आलेले लोक हा अनुभव तुम्हाला सांगावाच असे मला वाटले. कारण आपणही कोणाला ना कोणाला भेटायला जातच असतो तेव्हा ही माहिती कदाचित उपयोगी होईल म्हणून हा प्रपंच. मला विचाराल तर मी म्हणेल की, जेव्हा पेशंट दवाखान्यात असतो तेव्हा खरंतर भेटायलाच जावू नये, पण लोक लाखोंच्या संख्येने येतात. त्यांचा पहिला प्रश्न असतो काय रे / काय गं आम्हाला कळवलं नाही. आता घरच्यांनी पेशंट सांभाळायचे की, गावभर बातम्या देत फिरायचं की फोन करत बसायचे आणि यात गावभर कळवण्यासारखे काय आहे? माणूस आजारी पडला आहे त्याला आधी उपचार मिळू दे यासाठी धावपळ करायची की, यांना कळवायचे? दुसरा प्रकार म्हणजे येताना घरातली सर्व लहान लेकरं जणू काही ट्रिपला चाललो आहे, अशा उत्साहात घेऊन येतात. साधा प्रश्न आहे की, दवाखान्यात लेकरांचं काय काम? दुसरं दवाखाना सर्वच अर्थाने लेकरांसाठी योग्य जागा नाही हे का या लोकांच्या लक्षात येत नसेल. मग नॅचरली प्रचंड एनर्जी असणार्‍या लेकराला शांत बसायला सांगतात.

- Advertisement -

मग पेशंट सोडून त्या लहान मुलांना सांभाळणे हा एक डेंजर जॉब होऊन जातो. बरं लेकरांचं असं असतं की, त्यांना तुम्ही घरून कितीही खाऊ् घालून नेले तरी लोकांच्या घरी पोहोचल्यानंतर किंवा बाहेर गेल्यानंतर लगेच त्यांना प्रचंड भूक लागते, म्हणजे त्यांना त्या मिनिटाला काही दिले नाही तर काही खरं नाही अशी अवस्था ते करून ठेवतात. बरं त्यांना भूक असते ती फक्त त्या पेशंटसाठी आणलेली जी फळं आहेत त्याचीच. बरं भेटायला येणार्‍यानी पेशंटला फळं घेतली तेव्हाच आपल्या बरोबरच्या लेकरांसाठीही घ्यावीत ना आणि त्या लेकराला आस्वस्थ करावं की, घरी गेल्यानंतर तुला भरपेट मिळणार आहे. हे न झालेलं असल्यामुळे पेशंटच्या रूममध्ये घुसल्याबरोबर त्यांना भूक लागते आणि सर्व तमाशा म्हणजे त्यांच्यावर डोळे वटारणे, त्यांना बाहेर बळजबरी घेऊन येऊन दम देणे, वेळप्रसंगी एखादा फटका मारणे असे सर्व दिव्य घडते. बरं हे सर्व करण्याची जबाबदारी त्या स्त्रीवर असते, कारण पुरुष पेशंटचा आजार समजावून घेत असतो त्यामुळे त्याला त्यात व्यत्यय नको असतो. मग पेशंट बरोबरची जी स्त्री असते तिला हे दुःख माहीत असतं, मग ती आपल्याकडचे एक फळ त्या ‘बाळाला’ देते आणि मग पुढे ते फळ खावून जो काही पसारा ते लेकरू घालतं त्यानंतर साफसफाई करणारी मावशी, नर्स ताई, लेकराची आई, काकू, मावशी आणि पेशंटबरोबर असलेली आई, बायको अशा सर्व स्त्रियांचे एकमेकींना रागवत, समजावून घेत एक मस्त गोंधळ तयार होतो. त्यापेक्षा मूल घरीच ठेवावं, अन्याय वाटला तरी चालेल, पण स्त्रियांनी दवाखान्यात येऊ नये. भेटायला आलेल्या पुरुषाकडून पेशंटची माहिती घ्यावी किंवा फोनवर माहिती घ्यावी इ.इ.

दुसरी गंमत म्हणजे त्या पेशंटच्या समोरच, अग बाई / अरे बापरे हे काय झालं? काल तर एकदम चांगले होते! एवढा फिरणारा माणूस हे काय होऊन बसलं! काल तर वाटलं नव्हतं तुम्ही आजारी पडाल असं, पण म्हणजे नेमकं काय झालं आहे? तुम्हाला नेमका काय त्रास होत होता? बरं या सर्व भावना खर्‍या असतात बरं का कोणीही मुद्दाम नाटक करत नाही, पण या भावना बरोबरच्या लोकांसमोर सांगितल्या तर ठीक, डायरेक्ट पेशंट समोर? पेशंटच्या बरोबरच्या व्यक्तीला काय करावं, कस सांगावं, काय काय सांगावं काहीच कळत नाही. खोटं सांगावं तर पेशंट ऐकत आहे. नाही सांगावं तर एवढं आम्ही भेटायला आलो आणि काहीच बोलले नाही अशी प्रतिक्रिया असते. बरं बाहेर चला सांगतो असं सांगितलं तर पेशंटला वाटतं म्हणजे आपल्याला काहीतरी खूप मोठा आजार झाला आहे इ.इ. मला आठवतं माझ्या पार्टनरला फाल्सिपेरम मलेरिया झाला होता तेव्हा आम्ही तीन लोकांनी त्याला कसा त्रास सुरू झाला, तो मुंबईला चालला होता त्या गाडीतच त्याला त्रास कसा झाला, मग लगेच गाडी कशी दवाखान्यात आणली, घरच्यांना कस कळवलं इ.इ. माहिती स्टोरीसारखी पाठ केली होती. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीला पेशंट दाराला असलेल्या काचेतून दाखवायचो आणि मग सर्व स्टोरी रंगवून रंगवून सांगायचो. जेव्हा पेशंटलाच खूप लोकांना भेटायचं असतं तेव्हा खरी कसोटी असते. आमच्या शेजारच्या पेशंटला लोक जितके भेटायला येतील तेवढं त्यांना आवडायचं. आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर ते गप्पा मारायचे आणि रोज रात्री त्यांना ताप चढायचा. तिसर्‍या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की, इथले नियम पाळायचे नसतील, असे लोकांचे अड्डे जमवायचे असतील तर पेशंटला घरी घेऊन जा. मग जरा त्या पेशंटलाही चेक बसला.

- Advertisement -

काही लोकांना पेशंट आयसीयूमध्ये आहे हा फरकच कळत नाही. असे लोक आयसीयूमध्ये लोंढेच्या लोंढे आत जातात, पेशंटच्या कॉटवर बसून गप्पा सुरू असतात. त्यामुळे बर्‍याच दवाखान्यांनी सिक्युरिटी सिस्टीम बसवली आहे आणि पेशंटला भेटण्याची विशिष्ट वेळ निश्चित केली आहे. त्या वेळेतही एका वेळी एकच व्यक्ती तेही पास घेऊन जाऊ शकेल अशी व्यवस्था सुरू केली आहे. यात त्या पेशंट बरोबरच्या लोकांनाच त्रास होतो. सारखं खाली पास घेऊन या, आलेल्या माणसांना वरती घेऊन जा, परत सोडवायला या, चहा विचारा इ.इ. जेव्हा पेशंट घरी घेऊन येतात तेव्हा पेशंटची काळजी हा एक व्याप आणि आल्या गेल्यांना चहा, पाणी आणि जेवण हा एक व्याप होऊन बसतो. बरं घरी भेटायला कधी यावं याचा अनेक लोक काही ताळमेळच ठेवत नाही. घरच्यांनी पेशंटला व्यवस्थित जेऊ घालून, औषध देऊन नुकतंच झोपवलेलं असतं आणि आता बाकीचे जेवायला बसणारच तेवढ्यात पाहुणे येतात.

दुसरे सगळ्यात त्रासदायक लोक म्हणजे जे पेशंटला डायरेक्ट येऊन सांगतात की, आपल्या गावातल्या खालच्या चौकातल्या मामींच्या भावाला असंच झालं होतं, लई इलाज केला पण नाही वाचला. एकतर असं सांगतात किंवा टेन्शन नका घेऊ आठ दिवसात चालायला लागाल. असे दोन्ही लोक त्रासदायक असतात. पहिल्या प्रकारच्या लोकांमुळे जो बरा होणारा व्यक्ती आहे तोही लवकर मरेल आणि दुसर्‍या प्रकारच्या लोकांनी अतिरेकी विश्वास दिल्यामुळे उपचारासंबंधाचे गैरसमज तयार होतात. तिसरा प्रकार म्हणजे लोक असा सल्ला देतात की, मलाही असाच त्रास झाला होता तेव्हा मी या या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली आणि आठ दिवसात मला बरं वाटलं. असं म्हणणार्‍या माणसाची मी माहिती घेतली तेव्हा कळलं की, त्याला घशाला इन्फेक्शन झालं होतं म्हणून काही दिवस त्याला बोलता येईना किंवा काही गिळता येतं नव्हतं, पण तो ज्या व्यक्तीला हा सल्ला देत होता त्याला घशाला पॅरेलीसेस झालेला आहे. सांगणार्‍याचे वय आता 50 वर्षे आहे आणि त्याला आजार दहा वर्षांपूर्वी झाला होता. ज्याला तो हे सांगत होता त्यांचं वय पंच्याहत्तर क्रॉस आहे. अशा सर्व माहितीमुळे पेशंट द्विधा मनस्थितीत जातो याचा लोकांना अंदाजच येत नाही.

घरातले आधीच आजाराने त्रासलेले असतात. दवाखान्यात खर्च होणारा पैसा, सततच्या तपासण्या आणि डबे पोहोचवण्याची धावपळ याने आधीच जेरीस आलेले असतात. त्यात अशा अर्धवट माहितीमुळे पेशंट घरच्यांवर त्या दुसर्‍या डॉक्टरकडे जाऊया का, याचा आग्रह करायला लागतो. माझ्या वडिलांच्या शेजारी असलेल्या पेशंटच्या बाबतीत जेव्हा असं झालं तेव्हा मी कागद पेन घेऊन त्या आजोबांना नेमके काय झाले आहे, जिथे ते अ‍ॅडमिट आहे तो डॉक्टर कसा त्यांच्या आजाराचा तज्ज्ञ आहे, त्याच्या स्वतःच्या मुला-मुलींनी इतरही डॉक्टर यांचा कसा सल्ला घेतलेला आहे आणि त्यांची कशी धावपळ चालू आहे तेव्हा तुम्ही स्वतःच्या मुलांवर विश्वास ठेवा, सगळ्या घटनांकडे सकारात्मकतेने बघा, आजीवर सारखं ओरडू नका. तीच तुमचं सर्व करते आहे आणि तुम्ही सारखा तिचा अपमान करता, ओरडून बोलता त्यामुळे तुम्हालाच त्याचा त्रास होतो, आजार जितका औषधांनी बरा होतो तितकाच तो सकारात्मक भावना ठेवली तर बरा होतो. तुम्हाला जागेच्या अभावी मी हे एका दमात सांगितले, पण त्या आजोबांना मात्र मी रोज थोडं थोडं सांगत होते. त्याचा चांगला परिणाम झाला. मुख्य म्हणजे त्या आजीने मला खूप आशीर्वाद दिले. खरंतर तिला आयुष्यभर अपमान सहन करण्याची सवय झाली होती, पण इथे ती आजोबांचे सर्व अंथरुणात करूनही त्यांच्याकडून तर चांगले शब्द नाहीच, पण घरातलेही तिला गृहीतच धरत होते. मोठ्या आजारात पेशंटचं सर्व काही करणार्‍या व्यक्तीचे वजन कमी होते आणि यात कायम स्त्रियांची संख्या जास्त आहे.

यात ही स्त्री पुरुष विषमता आहे बरं का. दवाखान्यात दाखल असलेल्या पेशंटपैकी 80 टक्के पेशंट हे पुरुष असतात. त्यांना सांभाळणार्‍या स्त्रियाच असतात. यात आई, बायको, बहीण, मुलगी, सून सर्व प्रकारच्या पण स्त्रियाच असतात, पण घरातली बाई आजारी पडली की, लगेच तिच्या माहेरून कोणाला ना कोणाला अर्थात स्त्रीलाच बोलावले जाते. याचा अर्थ पुरुष करत नाही असा माझा दावा नाही. मला असे माझे मित्र माहीत आहे ज्यांनी आईच्या आजारपणात प्रचंड केले आहे, पण अशा पुरुषांची संख्या जास्त नाही.

याचा अर्थ दवाखान्यात किंवा घरी पेशंटला भेटायला येणारे सर्व त्रासच देतात असे नाही बरं का. असे अनेक लोक आहेत की जे अशा वेळी फोन करून सर्व डीटेल्स घेतील, पैसे देतील, डबे पोहोचवतील, शाळेत जाणारी मुलं असतील तर त्यांची व्यवस्था करतील, ती मुलं शाळेतून घरी येण्याच्या वेळेस घरी जावून थांबतील, मुलांना शाळेचा डबा तेवढे दिवस देतील, घरच्यांना आराम करायला घरी जाता यावं यासाठी दिवसा किंवा रात्री गरजेनुसार दवाखान्यात थांबतील, चारचाकी गाडी असेल आणि पेशंटला नियमित तपासण्या करण्यासाठी घेऊन जायचे असेल तर स्वतःची गाडी आणि वेळही देतील. दवाखान्यातून आणलेले कपडे आपल्या मशीनमध्ये किंवा आपल्या घरच्या मावशींकडून धुवून देतील, त्यासाठी मावशीला जास्तीचे पैसे देतील. दवाखान्यात आले की, आजार सोडून बोलतील, वातावरण हलक फुलकं ठेवतील. पेशंटला पुस्तक वाचून दाखवतील. छान गाणी ऐकण्याची व्यवस्था करतील. पेशंटच्या आवडीचे सिनेमे दाखवण्याची व्यवस्था करतील. नुसत्या गप्पा मारायला येऊन बसतील. पेशंटच्या घरी जाताना भाज्या घेऊन जातील, तिथेच गप्पा मारत मारत त्या भाज्या निवडून फ्रीजमध्ये लावून ठेवतील. दळण आणून देतील. औषधे कुठे स्वस्त मिळतील त्याची माहिती देतील. पेशंटला काही वस्तू म्हणजे बेड, वॉकर असे लागणारे असतील तात्पुरते किंवा कायमचे तर अशा वस्तू कुठे भाड्याने किंवा कमी किमतीत विकत मिळतील अशी माहिती पोहोचवतील. अशा माणसांची आज खरी गरज आहे आणि अशा लोकांसारखं आपण वागावं आणि ही संख्या वाढत वाढत न्यावी यासाठी हा प्रपंच.

- Advertisement -