घरफिचर्ससारांशऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ॥

ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ॥

Subscribe

स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्र विचार करणे, स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष स्वतः लढवणे या बाबी अनुयायांना क्षुल्लक वाटतात. गुरुस्थानी मानलेल्या व्यक्तीचे उदात्तीकरण करणे, ती सर्वगुणसंपन्न आहे असे मानणे, तिच्याशी एकरूप पावणे, या मनाच्या सुप्त प्रक्रिया गुरूला अथवा प्रेषिताला शरण जाताना घडतात. बाबा एक सर्वगुणसंपन्न व्यक्ती आहे, अशी मानसिकता घडते. त्यामुळे त्याच्या सत्संगातून मनातील पराभूत, उदास भाव पळून जाणे, उत्साह व जोम येणे असा अनुभव येतो. त्यामुळे गुरुंवरील श्रद्धा दुणावते. गुरुमुळे आपल्याला समस्यांचे आकलन झाले व योग्य मार्ग दिसला, असे शिष्य मानतो. आपल्या गुरुप्रधान संस्कृतीमधील संस्काराचा हा भाग आहे. अनेकांना तो बाबा बुवांकडे नेतो व तेथे बांधून ठेवतो.

-डॉ. ठकसेन गोराणे


‘मला अजिबात पैसे नकोत ’असा धोशा बाबा सतत लावत असतात. मात्र बुवांचे भक्त, एजंट पूजेसाठी, यज्ञासाठी, समस्या सोडवण्यासाठी, दर्ग्याची फरशी बसवायला किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करायला पैसे मागत असतात. बुवा हजरजबाबी आणि चौकस असतो. त्याचा चाणाक्षपणा वाखाणण्याजोगा असतो. आपल्याकडे येणारी माणसे कुठल्या वृत्तीची आहेत, भक्तांची माहिती कशी मिळवावी, विश्वासू भक्त म्हणून कोण राहू शकेल, दरबार भरल्यावर नूर कसा ठेवावा, स्वतःचे पितळ उघडे पडू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, हे सारे गुण बुवाने विकसित केलेला असतात. त्यातच धार्मिक मानसिकता असलेला अनुयायी वर्ग मोठ्या संख्येने बुवाकडे आकर्षित होतो आणि बुवाचा धंदा भरभराटीला येतो. दुसरे असे की, आपल्या सर्व परंपरेमध्ये गुरूला अपरंपार महत्त्व देण्यात आलेले आहे. हा गुरू जणू परमेश्वराचा अवतारच आहे. अल्लाचा प्रषित आहे, देवाचा पुत्र आहे असं आपल्याला सांगितलं जातं. मग हे अवतारी पुरुष काय करतात? अनुयायांचे, भक्तांचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवण्याचे खोटे खोटे आश्वासन देतात.

- Advertisement -

आपल्या सर्व प्रकारच्या भौतिक गरजा भागवेन, सर्व प्रश्न, समस्यांची उत्तरं बाबा देईल. गुरु देईल,आध्यात्मिक गुरू देईल, म्हणून माणसं त्यांच्याकडे जातात. शिवाय अनुयायांचे प्रारब्ध बदलण्याची शक्तीही गुरुमध्ये आहे, असा विश्वास अनुयायी बाळगून असतात. गुरुमध्ये काही विशेष शक्ती असते. व्हायब्रेशन्स असतात. ते गुरूच्या शरीराच्या बाहेर फेकले जातात त्यामुळे हीच व्हायब्रेशन भक्तांमध्ये, अनुयायांमध्ये अनुकूल बदल घडविण्यासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे भक्तगण बाबाच्या दरबारात नियमितपणे हजेरी लावतात. त्यांचे प्रवचन ऐकतात. कारण गुरुचे प्रवचन, बोलणे ऐकण्यातच आपलं कोटकल्याण आहे अशी भावना अनुयायांच्या मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे ते ह्या भोंदूगिरीच्या आहारी जातात. आहारी गेलेला मनुष्य परत फिरणे, ही बाब अत्यंत अवघड असते. तेच ह्या अनुयायांच्या, भक्तांच्या, शिष्यांच्या, सेवकांच्या बाबतीत घडते.

स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्र विचार करणे, स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष स्वतः लढवणे या बाबी अनुयायांना क्षुल्लक वाटतात. गुरुस्थानी मानलेल्या व्यक्तीचे उदात्तीकरण करणे, ती सर्वगुणसंपन्न आहे असे मानणे, तिच्याशी एकरूप पावणे, या मनाच्या सुप्त प्रक्रिया गुरूला अथवा प्रेषिताला शरण जाताना घडतात. बाबा एक सर्वगुणसंपन्न व्यक्ती आहे, अशी मानसिकता घडते. त्यामुळे त्याच्या सत्संगातून मनातील पराभूत, उदास भाव पळून जाणे, उत्साह व जोम येणे असा अनुभव येतो. त्यामुळे गुरुंवरील श्रद्धा दुणावते. गुरुमुळे आपल्याला समस्यांचे आकलन झाले व योग्य मार्ग दिसला, असे शिष्य मानतो. आपल्या गुरुप्रधान संस्कृतीमधील संस्काराचा हा भाग आहे. अनेकांना तो बाबा बुवांकडे नेतो व तेथे बांधून ठेवतो.

- Advertisement -

घटनेमध्ये नागरिकांचे कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मुख्य सूत्र असते की, पुरावा मागायचा, तो डोळसपणे तपासावयाचा आणि जेवढा पुरावा तेवढाच विश्वास ठेवायचा. दैनंदिन व्यवहारातदेखील ही बाब आपण पाळत असतो किंवा एक विवेकी नागरीक म्हणून पाळावी, अशी आपली अपेक्षा असते. बुवा, बाबा, स्वामी, महाराज, गुरु, प्रेषित यावरील विश्वास हा खरेतर प्रचितीचा भाग नसतो, तो श्रध्देचा मामला असतो. ज्या बाबावर त्याच्या अनुयायांची श्रद्धा असते, त्याला स्वतःचे कल्याण बाबाच्या हातात सुरक्षित आहे याबद्दल शंका नसते.

खरंतर, बुवाबाजीला शरण जाणे ही घातक स्वरूपाची अंधश्रद्धा आहे. जेथे प्रत्यक्ष शोषण असते, त्या ठिकाणी हे विवेचन लोकांना पटते. मात्र बुवाबाजीमुळे आधीच अचिकित्सक असलेले सामाजिक मन आणखी अचिकित्सक बनते. प्रारब्ध नियती, दैव या कल्पना बुवाबाजीच्या वाढत्या प्रभावाने समाजमनाची पकड आणखी घट्ट करतात. आज, अध्यात्माच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुयायी असलेल्या आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता असलेल्या या लोकांनी चालवलेल्या बुवाबाजीला इतर कुठल्याही बुवाबाजी पेक्षा म्हणजे तांत्रिक, मांत्रिक, देवरुषी यांच्या बुवाबाजीपेक्षा कितीतरी जास्त गंभीरपणे घेण्याची गरज आहे. यांच्याबद्दल तुकाराम महाराजांनी पावणे चारशे वर्षांपूर्वी असं म्हटलं होतं…

ऐसें कैसें झाले भोंदू ।कर्म करोनि म्हणती साधु ॥
अंगा लावूनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ॥
दावूनि वैराग्याची कळा।
भोगी विषयांचा सोहळा॥
तुका म्हणे सांगों किती ।
जळो तयांची संगती ॥

त्यामुळे, जे विषयांचा सोहळाच भोगतात अशाच लोकांची, ‘संगती मिळो’, असाच आजचा सामाजिक व्यवहार आहे. म्हणून आपल्याला ‘आध्यात्मिक बुवाबाजी’ ही गोष्ट जरा नीटपणे समजून घेतली पाहिजे. भोंदू-बुवांपासून दूर राहिले पाहिजे.

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेची जाणावा ॥

खरे अध्यात्म हे आहे.

स्वतःवरील विश्वास न गमवता, स्वतःचे प्रश्न काय आहेत, ते कसे सोडवावयाचे, ते कुठपर्यंत सुटू शकतात याचे भान आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद देतो. सर्वमान्य नीतिसंकेतांचे पालन केल्याने,आचरणात कणखरता येते. स्वतःच्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रमाणिकपणे, धैर्याने जगणे यात माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वतः बुवाबाजीपासून दूर राहणे आणि इतरांना त्या मानसिक गुलामगिरीपासून दूर ठेवणे यांतच जीवनाची सार्थकता आहे. विवेकबुद्धीच्या रूपाने प्रत्येकाजवळ एक गुरू असतो. तो स्वतःच्या पायावर उभे राहून जीवन संघर्षाच्या रणधुमाळीत लढण्याची हिंमत व ताकद देतो. तोच डोळस,सजग,समर्थ बनवतो. हा झाला, बुवाबाजीपासून वैयक्तिक मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा विचार…
बुवाबाजी विरोधात संघटितपणे लढण्यासाठी आणि ती लढाई तशीच पुढे चालू ठेवण्यासाठी, कमालीचा संयम,प्रचंड नैतिक धैर्य,जबरदस्त मानसिक बळ लागते. आजमितिला असे बळ समाजात निर्माण करणे, ते जतन करणे, टिकवणे, वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अंधश्रद्धेच्या माध्यमातून सर्वच जाती धर्मात, कमी-अधिक प्रमाणात चालू असलेला ढोंगीपणा उघड करणे, तो सनदशीर मार्गाने मोडून काढणे, यासाठी त्या त्या जातीधर्मातील इच्छूकांनी, विशेषतः युवा वर्गाने धाडसाने पुढे येणे, संघटितपणे हे काम उभे करणे, ते सतत पुढे चालू ठेवणे, अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहे.

महाराष्ट्रात नुकत्याच अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये युवा पिढीतील उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आल्याचे दिसून आले आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलनाचा’ कृतिशील आराखडा बनवून गाव पातळीवर तयार करून, त्याची सामुदायिकपणे अंमलबजावणी करणे, या नव्या पिढीला सहज शक्य आहे. कारण महाराष्ट्रातल्या गावपातळीपासून ते राजधानीच्या शहरापर्यंत भोंदूगिरी करणारे आणि अनेक घातक, अघोरी, अनिष्ट रूढीपरंपरा जोपासणारे आहेत, असेही दिसून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -