घरफिचर्ससारांशप्रतिक्रिया आत्महत्येनंतरच्या!

प्रतिक्रिया आत्महत्येनंतरच्या!

Subscribe

घटना घडून गेल्यावर अक्कल शिकवणारे खूप दिसताहेत सध्या.. पण एखादी व्यक्ती या टोकाच्या निर्णयापर्यंत जाऊ नये म्हणून त्याआधी हे अक्कल शिकवणारे कुठे असतात? पैसे हरवले हे तिच्या सोबत असणार्‍या, शिकणार्‍या सर्वांना समजले असणार... ती मूळची बीडची.. शिकण्यासाठी नाशिकमध्ये आलेली.. एका साधारण कुटुंबातील.. तिची घरची परिस्थितीही माहीत असणारच सोबत असणार्‍यांना... मग त्यावेळीच कुणी पाठीशी उभे का नाही राहिले खंबीरपणे?

घटना अलिकडचीच. क्लासच्या फीसाठी आई-वडिलांनी दिलेले पैसे हरवले म्हणून 22 वर्षीय तरुणीने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. या तरुणीने गळफास घेत स्वत:चं आयुष्य संपवलं. वाचून मन सुन्न झालं… या घटनेच्या वृत्ताखाली सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडलेला होता.. त्यातीत काही कमेंट्स अशा होत्या… ताई, क्षुल्लक सहा हजार रुपयांसाठी जीव द्यायची गरज होती का? आत्महत्या हा काही पर्याय नव्हता.. प्रकरण काहीतरी गोलमाल आहे, लफडे असणार काही.. कूछ तो गडबड हे दया…..या आणि असल्या असंख्य कमेंट्स…

किती सोप्प असतं अशा कमेंटस् देणं.. काही क्षणात आपण संबंधित व्यक्तीच्या चारित्र्याची चिरफाड करुन टाकतो. आपल्याला कोणताही अधिकार नसतानाही आपण दुसर्‍यावर वाट्टेल तसे व्यक्त होतो. खरं तर, आपण आयुष्यामध्ये जितका संघर्ष करतो, तितकं आपल्याला त्या संघर्षातून शिकायला मिळतं. काहीवेळा अनपेक्षित घटना घडतातही. पण त्या घटनांमधून आपल्याला खचून जायचं नसतं. त्या घटनांमधून आपल्याला शिकायचं असतं. या संघर्षाच्या प्रवासादरम्यान आपल्याकडून काही चूक झाली तर लगेच निराश न होता, नैराश्य न येऊ देता, परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हायचं असतं… हेही तितकेच खरे… पण… मान्य आत्महत्या हा पर्याय नव्हता.. मान्य की हे अगदी टोकाचे पाऊल उचलायची गरज नव्हतीच मुळी… मान्य.. सर्व मुद्दे मान्य.. पण तिच्या ठिकाणी उभे राहून कधी विचार करून बघायला हवा आपणही एकदा… घटना घडून गेल्यावर अक्कल शिकवणारे खूप दिसताहेत सध्या.. पण एखादी व्यक्ती या टोकाच्या निर्णयापर्यंत जावू नये म्हणून त्याआधी हे अक्कल शिकवणारे कुठे असतात? पैसे हरवले हे तिच्या सोबत असणार्‍या, शिकणार्‍या सर्वांना समजले असणार… ती मूळची बीडची.. शिकण्यासाठी नाशिकमध्ये आलेली.. एका साधारण कुटुंबातील.. तिची घरची परिस्थितीही माहीत असणारच सोबत असणार्‍यांना… मग त्यावेळीच कुणी पाठीशी उभे का नाही राहिले खंबीरपणे? खरं तर ही रक्कम तिच्यासाठी क्षुल्लक नव्हतीच… आणि ती क्षुल्लक वाटणार्‍यांनी निदान तिला मग मदत करायला हवी होती.. किमान तिला त्यावेळी योग्य मानसिक आधार मिळाला असता तरी या पातळीपर्यंत गेलीही नसती ती कदाचित..

- Advertisement -

फक्त सहा हजार रुपये…!! खरं तर त्या सहा हजार रुपयांकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन, घरची परिस्थिती ठरवत असतो की ते फक्त आहेत की जास्त.. मित्राच्या वाढदिवसाला संपूर्ण केक त्याच्या तोंडाला फासून हॉटेलात पार्टी करून बाहेर फोर व्हीलर जवळ सिगारेट फुकत असणार्‍या मंडळींना ते नक्काच क्षुल्लक वाटतील.. बापाचे क्रेडिट कार्ड फक्त स्वाइप करून ‘आनंदोत्सव’ साजरा करणार्‍यांनाही याचे खरे मूल्य समजणे फारच अवघड.. पण तिच्या बाबतीत हे असे असेलच का…? की सहा हजार रुपये म्हणजे तिच्यासाठी असतील शंभर रुपयांच्या तब्बल साठ नोटा… की मग सहा हजार रुपये म्हणजे बापाच्या रोजंदारीचे पंधरा वीस दिवस असतील तिच्यासाठी.. की आईच्या मंगळसूत्रातले कमी होत जाणारे मनी म्हणजे असतील सहा हजार रुपये.. की अगदीच सहा हजार रुपये म्हणजे तिच्यासाठी असेल आजीच्या उपचारासाठी अजून विलंब…? काही सांगता येणार नाही तिच्या मनातली एक्झॅट घालमेल काय होती ते…?

असं नसू शकतं का, की तिला जाणीव असेल या सर्व गोष्टींची.. बापाने कष्टाने कमावलेल्या एक एक रूपयासाठी त्याने हसतहसत गाळलेल्या प्रत्येक घामाच्या थेंबाचा हिशोब असेल तिच्याकडे.. आईने पोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणासाठी लुगड्याच्या पदरात बांधून ठेवलेल्या हर एक ठोकल्यांचाही ताळमेळ असेल तिच्या डोक्यात गरगरत.. असेही तर असू शकते ना.. मग..? का आपण होत चाललोय एवढे निष्ठुर.. का मदत करणारे हात कमी आणि व्हिडिओ शूटिंग करणारे हात जास्त होत जातायत दिवसेंदिवस…? का आपल्या सिंधुताई स्वर्गवासी झाल्यावर त्यांचे विचार मनात ठेवून त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करण्याऐवजी फक्त त्यांचे फोटो सर्रास स्टेटसला ठेवणारे लोक वाढताहेत फक्त… कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आपल्या सर्वांनाही आणि ही खरं तर काळाची गरज आहे… कुणीतरी आपुलकीने अ‍ॅप्रोच झाले तर घटना घडायची नक्कीच टाळता येऊ शकते..आत्महत्येचे समर्थन होऊच शकत नाही. हा मार्ग चुकीचाच आहे. परंतु, कुणी संपवून घेतल्यानंतर हवे तसे रिअ‍ॅक्ट होणे टाळायला पाहिजे. घटना घडण्याआधीच आपण त्या व्यक्तीला समजून घेत तिला आधार देऊ शकतो.. बघा…. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या आसपासच्या अशा व्यक्तींना समजून घेऊया …. खर्‍या अर्थाने माणुसकी जपुया…!!

- Advertisement -

–अमोल जगताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -