Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश ’फुलराणी’अविस्मरणीय प्रेमकहाणी

’फुलराणी’अविस्मरणीय प्रेमकहाणी

Subscribe

दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी आजच्या काळातील फुलराणी अतिशय भव्य रीतीने प्रेक्षकांसमोर आणली आहे. ती अल्लड, अवखळ असली तरी हुशार आहे. आपल्याकडे जे आहे त्याची लाज न बाळगता स्वतःला सिद्ध करण्याची तिची धडपड तिला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. प्रत्येकामध्ये एक फुलराणी असतेच. त्याचा शोध ज्याचा त्याने घ्यायला हवा, म्हणूनच ही फुलराणी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करीत भावते.

-आशिष निनगुरकर

मूळ नाटक, पुस्तक किंवा त्यावरून तयार झालेला सुप्रसिद्ध चित्रपट, इतर कलाकृती या आता जन्माला येत आहेत. आपल्याला माहीत आहे ती पु. लं. ची फुलराणी…भक्ती बर्वे. अविस्मरणीय, अजरामर नाट्यकलाकृती. आम्ही त्या ‘फुलराणी’वर मनापासून प्रेम केले. त्यातील संवाद खळाळून हसवणारे, खुसखुशीत तसेच टचकन डोळे भरून आणणारे. भक्ती बर्वे यांनी भूमिकेचे सोने केले. आजही कुणी नवोदित त्यातले स्वगत करून दाखवते. आजही शाळा, कॉलेजच्या स्नेहसंमेलनात ती फुलराणी आपल्याला भेटते. तेव्हा त्या कलाकृतीची लोकप्रियता पुन्हा पुन्हा सिद्ध होते. हा सगळा इतिहास मनात ठेवून ‘फुलराणीला’ गेलो. ब्युटी काँटेस्टने चित्रपटाची सुरुवात. विक्रम राजाध्यक्षच्या अ‍ॅकॅडमीने सातत्याने पाच वर्षे मिळवलेले यश, त्यामुळे त्याचा झालेला सत्कार, अचानक समोर आलेली कोळीवाड्याची ब्यूटी क्वीन, मित्राने त्याला दिलेले चॅलेंज, त्या अनुषंगाने होणारा चित्रपटाचा प्रवास अप्रतिम. त्यात आपण गुंतत जातो. खरंतर चित्रपटाची कथा तशी परिचित. त्याचे होणारे सादरीकरण गुंतवून ठेवणारे.

- Advertisement -

विश्वास जोशी दिग्दर्शित फुलराणी ही शेवंता (प्रियदर्शिनी इंदलकर) नावाच्या एका तरुण, बिनधास्त मुलीची कथा आहे, जी फुलांचे दुकान चालवते आणि ग्लॅमरच्या दुनियेत स्वतःची ओळख मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असते. अशातच ग्रूमिंग ट्रेनर विक्रमची (सुबोध भावे) नजर शेवंतावर जाते. मग पुढे प्रिटी प्रिन्सेस स्पर्धा जिंकण्यासाठी कोणत्याही मुलीला तयार करून तिला मी जिंकवेल, अशी विक्रम त्याच्या पत्रकार मित्रासोबत (सुशांत शेलार) पैज लावतो. मग विक्रम शेवंताला या स्पर्धेसाठी तयार करण्याचा प्रयत्न करतो. शेवंतासुद्धा तिच्या नेहमीच्या चौकटीतून बाहेर येऊन ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करीत असते. शेवंता ते ब्यूटी क्वीन असा खाचखळग्यांचा प्रवास, प्रेम, मैत्री अशा अनेक भावना या सिनेमात दिसतात. एकूणच फुलराणी तुमच्या आमच्यातला सामान्य माणूस ठरवलं तर यशाचं शिखर गाठू शकतो याची प्रेरणादायी गोष्ट आपल्याला सांगतो.

फुलराणी सिनेमाची मुख्य ताकद आहे ती म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शनीने तिच्या अभिनयाने चार चाँद लावले आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सोज्वळ रूपात दिसणार्‍या प्रियदर्शनीचा रावडी अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल. सुबोध भावेसुद्धा ग्रूमिंग ट्रेलर विक्रमची भूमिका उत्तमपणे वठवतो. याशिवाय दिवंगत विक्रम गोखले यांचा अभिनय पाहणं सुखद भावना आहे. भक्ती बर्वे यांनी रंगभूमीवर अजरामर केलेली फुलराणी सिनेमात भेटायला आलीय. जास्त अपेक्षा न ठेवता तुम्ही हा सिनेमा पाहिलात तर तुमचं नक्कीच मनोरंजन होईल. अभिनयात सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करून फुलराणीची शान वाढवण्याचा प्रयत्न केलाय, तरीही काहीतरी मिसिंग वाटतं. एकूणच विश्वास जोशी दिग्दर्शित प्रियदर्शनी-सुबोधची फुलराणी एकदा पाहण्यासारखी नक्कीच आहे यात शंका नाही.

- Advertisement -

खरंतर सगळ्यांना परिचित असणारी सुप्रसिद्ध कथा, त्यावर आधारित निघालेले चित्रपट, नाटक, तेही प्रसिद्ध, अगदी मराठीतले अजरामर नाटक पु. ल. देशपांडे यांचे ती फुलराणी, भक्ती बर्वेची अप्रतिम भूमिका, या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा तोच विषय घेऊन सादर करणे हे फार मोठे चॅलेंज सुबोध भावे आणि टीमने घेतले. हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच पण त्याने ते लीलया पेललंय. चित्रपट बघताना तो कुठेही आधारित वाटत नाही. भाषांतर, रूपांतर करताना त्याला दिलेला आपला टच भन्नाट आहे. चित्रपटाचे संवाद अफलातून. प्रियदर्शनीने साकारलेली फुलराणी अप्रतिम. कोळीवाडा ते ब्यूटी क्वीनचा प्रवास तिने समजून घेऊन केलाय. विक्रम गोखले यांची भूमिका नेहमीप्रमाणेच लक्षवेधक, आपल्या मनात राहणारी. मिलिंद शिंदे, सुशांत शेलार, गौरव घाटणेकर, अश्विनी कुलकर्णी सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिका समरस होऊन केल्यात. सायली संजीव आपल्या छोट्याशा भूमिकेतही ठसा उमटवून जाते.

कुठेही चित्रपट जराही घसरत नाही. संयमित विनोद आणि सादरीकरण. भडकपणा कुठेही नाही. चित्रपटात व्हिलन, हाणामार्‍या, उगाचच छळवणूक वगैरे काहीच नाही. तरी चित्रपट कुठेही सेकंदभरसुध्दा कंटाळवाणा होत नाही. संयत संगीत, हिरवे हिरवे गार गालिचे कवितेचे सुरेख गाणे केलंय. इतर गाणीही छान आहेत. त्यांचे सादरीकरणही चांगले आहे. दिग्दर्शक विश्वास जोशींनी टाकलेला विश्वास सिध्द करीत प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिका समरस होऊन निभावल्या आहेत. उत्तम लोकेशन, लक्षवेधक सेट्स या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. ‘कुछ खास है हम सभी में’, फक्त या खासची जाणीव आपल्याला होणं गरजेचं असतं.

आपल्यातील अल्लड, अवखळपणा जपत स्वत:चा वेगळा रुबाब घेऊन येणार्‍या फुलवालीला आपल्यातली फुलराणी कशी गवसते हे दाखवणारा विश्वास जोशी दिग्दर्शित फुलराणी हा चित्रपट उत्तम सजला आहे. प्रियदर्शनी इंदलकर आणि सुबोध भावे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटातून शेवंता तांडेलचा फुलराणीपर्यंतचा अनोखा प्रवास पाहायला मिळणार आहे. बालकवींची हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, ही अजरामर कविता या चित्रपटातून गीतरुपाने आपल्या भेटीला आली आहे. गीते बालकवी, गुरू ठाकूर, मंदार चोळकर यांची असून संगीत निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांचे आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचं आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, शरयू दाते यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

फिनक्राफ्ट मीडिया, अमृता फिल्म्स आणि थर्ड एस एंटरटेन्मेंटने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री. ए. राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरू ठाकूर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, तर संकलन गुरू पाटील आणि महेश किल्लेकर यांचे आहे. या चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओचे आहे.मराठी चित्रपटात वेगवेगळे सुंदर विषय येत आहेत. ताकदीचे कलाकार आहेत. मराठी चित्रपट लक्षवेधक ठरत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. फुलराणी बघताना पु. ल. यांची ती फुलराणी आठवली नाही. प्रत्येक स्वतंत्र कलाकृती आपले वेगळेपण घेऊन येते. तुलना न करता वेगळेपण स्वीकारून तिला पाहणे गरजेचे आहे.

पुरणपोळी, उकडीचे मोदक अशी काही खास पक्वान्न असतात. त्यातील घटक पदार्थ सारखेच असतात. प्रमाणही साधारण सारखेच असते, पण प्रत्येक गृहिणीच्या हातची चव वेगळी असते, वेगळी खासियत असते. हा चित्रपटही तसाच आहे.‘फुलराणी अविस्मरणीय प्रेमकहाणी’ चित्रपटात पदार्पणातच प्रियदर्शिनी इंदलकरच्या अभिनयाने मने जिंकली आहेत. फुलराणीचा दुसरा भाग येणार असून त्याचे कुतूहल आहेच. फुलराणी पाहण्यासाठी चित्रपटगृहात नक्की जा. कथा परिचित पण आपलं असं खास वेगळेपण घेऊन आलेली आहे. निखळ कौटुंबिक मनोरंजन करणारा हा चित्रपट सगळ्या कुटुंबाने एकत्रित पाहावा असाच आहे.

- Advertisment -