घरफिचर्ससारांशविशिष्ट वर्गाचा प्लॅन!

विशिष्ट वर्गाचा प्लॅन!

Subscribe

दिग्दर्शक शशांक घोष याने याआधी ‘खूबसूरत’ आणि ‘वीरे दी वेडिंग’सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. त्याने तमन्ना भाटिया आणि रितेश देशमुख यांना घेऊन ‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा सिनेमा बनवलाय. लग्न आणि घटस्फोट या दोन विषयांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे, जो एका विशिष्ट वर्गाला आवडू शकतो. ज्यांनी ‘वीरे दी वेडिंग’ पाहिलाय, ज्यांना महिलांना दारू पिताना, सिगारेट ओढताना आणि सेक्सबद्दल मोकळेपणाने बोलताना पाहायची सवय झालीय, ज्यांना हे सगळं तितकं ऑकवर्ड वाटत नाही, त्यांच्यासाठी हा सिनेमा वन टाइम वॉच आहे. सिनेमाची कथा सामान्य बॉलिवूड प्रेक्षकांना तितकी कनेक्ट होऊ शकत नाही. एका विशिष्ट वर्गासाठी हा सिनेमा बनवला आहे याचा प्रत्यय सिनेमा पाहताना येतो.

प्रत्येक नवीन प्रयोग यशस्वी होतोच असं नाही आणि प्रत्येक नवीन प्रयोग खराब असतो असंही नाही. अनेक वेळा त्या प्रयोगाची चिकित्सा आपण त्याला मिळणार्‍या प्रतिसादावर करतो, ती करायलाच हवी, पण त्याचवेळी तो प्रयोग नवीन आहे, अयशस्वी ठरला म्हणून तो प्रयोग करणार्‍यांचं कौतुक न करणंदेखील चुकीचं आहे. अशा काळात जिथं हिंदी सिनेमा अजूनही चांगल्या हिटची वाट पाहतोय, असा काळ जिथं हिंदी सिनेमे एकापाठोपाठ फ्लॉप ठरताय, त्या काळात नेटफ्लिक्सने एक प्रयोग केलाय. तो प्रयोग याआधी मेनस्ट्रीम सिनेमात झालाय का? तर हो तो झालाय, पण नेटफ्लिक्सच्या भारतातील इतिहासाच्या बाबतीत हा नवीन प्रयोग आहे. गुन्हेगारी, हिंसा, नवाजुद्दीन, राधिका आपटे याच्या पलीकडे न जाणार्‍या नेटफ्लिक्सने यावेळी रॉमकॉम प्रकारात एण्ट्री केलीय, तीही मेनस्ट्रीम कलाकारांना सोबत घेऊन.

शशांक घोष नावाचा दिग्दर्शक ज्याने याआधी ‘खूबसूरत’ आणि ‘वीरे दी वेडिंग’सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. त्याने तमन्ना भाटिया आणि रितेश देशमुख यांना घेऊन ‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा सिनेमा बनवलाय. लग्न आणि घटस्फोट या दोन विषयांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे, जो एका विशिष्ट वर्गाला आवडू शकतो. ज्यांनी ‘वीरे दी वेडिंग’ पाहिलाय, ज्यांना महिलांना दारू पिताना, सिगारेट ओढताना आणि सेक्सबद्दल मोकळेपणाने बोलताना पाहायची सवय झालीय, ज्यांना हे सगळं तितकं ऑकवर्ड वाटत नाही, त्यांच्यासाठी हा सिनेमा वन टाइम वॉच आहे. सिनेमाची कथा सामान्य बॉलिवूड प्रेक्षकांना तितकी कनेक्ट होऊ शकत नाही. एका विशिष्ट वर्गासाठी हा सिनेमा बनवला आहे याचा प्रत्यय सिनेमा पाहताना येतो.

- Advertisement -

‘प्लॅन ए प्लॅन बी’ कथा आहे दोन ऑपोजिट व्यक्तीरेखांची. एक आहे मॅरेज प्लॅनर आणि दुसरा आहे फॅमिली लॉयर जो डायव्होर्स स्पेशलिस्ट आहे. तमन्ना भाटिया जी सिनेमात निरालीच्या भूमिकेत दिसते, तिचा मुख्य व्यवसाय लोकांचे नाते जुळवून देण्याचा, नवीन जोडप्यांना लग्न करण्यासाठी मदत करण्याचा आणि त्या लग्नाचे नियोजन करून पैसे कमावण्याचा. तिची आईदेखील याच व्यवसायात होती म्हणून आई रिटायर झाल्यावर तिने हा बिजनेस टेकओव्हर केलाय आणि एका शेयरस्पेसमध्ये ऑफिस घेऊन तिथं ती काम करतेय. दुसरं पात्र आहे रितेश देशमुखचं, ज्याने अ‍ॅडव्होकेट कौस्तुभ चौघुलेची भूमिका केलीय. कमी वेळात विवाहित जोडप्यांना घटस्फोट मिळवून देणारा वकील म्हणून तो प्रसिद्ध आहे. लग्न न करण्याचे फायदे आणि लग्न केल्यावर घटस्फोट घेण्याचे फायदे तो आपल्या क्लायंट्सना पटवून देऊन त्यांना डायव्होर्स घ्यायला भाग पाडत असतो. त्याचंही ऑफिस याच शेयरस्पेसमध्ये आहे आणि निरालीच्या बाजूलाच आहे. आता एकमेकांच्या अतिविरुद्ध काम करणार्‍या या दोघांचं पुढे काय होतं? यासाठी सिनेमा पाहावा लागेल.

‘प्लॅन ए प्लॅन बी’च्या बाबतीत आवडलेली एक गोष्ट म्हणजे यातली मुख्य पात्रं. जसं निरालीचं पात्र एका भावनिक तरुणीचं आहे, जिने आपलं पहिलं प्रेम एका अपघातात गमावलंय म्हणून ती लोकांना त्यांचं प्रेम मिळवून देण्याचा प्रयत्न करतेय आणि त्यासाठीच ती मॅरेज प्लॅनर बनलीय. म्हणून तिचा जॉब तिला आणि प्रेक्षकांना दोघांनादेखील कन्व्हिन्स करतो. दुसरं पात्र कौस्तुभ उर्फ कॉस्टीच, तर हा एक आत्मकेंद्री व्यक्ती आहे, ज्याला सगळं काही व्यवस्थित हवं असतं. त्याचीदेखील एक बॅकस्टोरी आहे, ज्यामुळे तो असा बनलाय आणि डायव्होर्स मिळवून देण्याचं काम करतोय. त्याची ती बॅकस्टोरी इथं स्पॉयलर ठरू शकते म्हणून सांगत नाही, पण ती स्टोरीदेखील त्याचा जॉब किंवा प्रोफेशन जस्टीफाय करते. पात्रांवर केलेलं काम आपल्याला दिसतं, पण जितकं काम पात्रांवर केलंय त्याच्या कैकपटीने कमी काम झालंय ते या सिनेमाच्या कथा आणि पटकथेवर. कथा एकाच मार्गाने आणि एकाच वेगाने पुढे सरकते. यात कुठलेच चढउतार नाहीत, ट्विस्ट नाहीत, ज्यामुळे आपण कथेसोबत तितकं कनेक्ट होत नाही. शिवाय याचा क्लायमॅक्सदेखील त्या दर्जाचा बनला नाही. काय होईल हे क्लायमॅक्स यायच्या आधीच आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे ते पाहण्यात तितका इंटरेस्ट उरत नाही.

- Advertisement -

तमन्ना भाटियाचा बबली बाऊंसर सिनेमा येऊन १० दिवसही झाले नव्हते की तिचा हा दुसरा हिंदी सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झालाय. या सिनेमात तिचं पात्र छान आहे, पण ती फक्त सुंदर दिसते म्हणून पात्राच्या ठिकाणी आहे असं वाटतं. कारण जे पात्र तिला देण्यात आलंय त्याला पूर्ण न्याय ती देऊ शकली नाही. एका आरशासमोर तिचा सीन आहे, त्यात मात्र ती उत्तम दिसते. रितेश देशमुख आपल्या पात्राला न्याय देतो. यात त्याच्याकडे कॉमिक रोल नाही, जी त्याची खासियत मानली जाते, पण तरीही तो एका वकिलाच्या भूमिकेत चांगला वाटतो. पूनम धिल्लोनचं पात्रदेखील लक्षात राहील.

जसं आपल्या मुलीला तिचं सेक्स कर ले किसीके साथ म्हणणं सध्या जरी ऑकवर्ड वाटत असलं तरी ते काही काळानंतर नक्कीच कालसुसंगत वाटेल. सिनेमातले बाकी सहकलाकार तितके लक्षात राहत नाहीत, पण बिदिता बागची छोटी भूमिका मात्र स्मरणात राहील अशी आहे. गाणी ऐकायला छान वाटतील, पण सिनेमा संपल्यावर लक्षात राहतील अशी नाही. या सिनेमाबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे ही कथा बहुधा लॉकडाऊन काळात शूट केलेली असावी. कारण शेयर वर्क स्पेस आणि मोजक्या तीन-चार लोकेशन सोडल्या तर हा सिनेमा इतर कुठंही दिसत नाही. बहुतांश वेळ त्याच शेयरस्पेसमध्ये घालवलेला आहे, पण त्यातही सुंदरता टिपली आहे.

मुंबईमध्ये सध्या अशा अनेक कॉमन वर्क प्लेसेस आहेत. हे कल्चर सध्या चांगलंच वाढतंय आणि त्यात असणार्‍या सुविधा पाहणं एखाद्या मध्यमवर्गीय माणसासाठी नवीन असू शकतं. म्हणून त्याला हा सिनेमा पाहताना आपण कुठंतरी वेगळ्या ठिकाणी घडणारी कथा पाहतोय असा फिल येतो. सिनेमाच्या बाबतीत ही गोष्ट बर्‍याच ठिकाणी लागू होते. अनेकदा हा श्रीमंतांचा सिनेमा वाटतो. थोडा हायक्लास लोकांचा ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा अशी लोकं ज्यांच्यासाठी सेक्सवर बोलणं, महिलांनी दारू पिणे नॉर्मल गोष्ट आहे. अनेकदा असं वाटतं की हा सिनेमा किंवा शशांक घोषचा ‘वीरे दी वेडिंग’सारखा सिनेमा थोडा लवकर प्रदर्शित झालाय. कारण यात जे दाखवलंय ते अजूनही आपल्या समाजात फार काही मानलं जातं असं नाही. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ एका वर्गासाठी बनविलेला सिनेमा आहे, जो विशिष्ट वर्गाला नक्कीच आवडेल, पण बाकी हा असा सिनेमा आहे, जो आपल्याकडे केवळ प्लॅन सी नसेल तरच पाहिला जाऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -