Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश फोन बिचारा साधा भोळा

फोन बिचारा साधा भोळा

Subscribe

फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!
साधा भोळा तो फोनुकला.
कानास कुणी लाविला!
त्याचा शोध कुणी लाविला!

तो असा कानास लावताना,
कुणी त्या कानास कान लाविला?
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

- Advertisement -

पुर्वी तशा व्हायच्या चुगल्या,
डायलवरी करून उंगल्या.
आठवून पहा काळात मागल्या
किती त्या क्रॉस लाइनी लागल्या!
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

फोन बिचारा साधा भोळा,
पुढे न तो साधा राहिला.
नाळ तुटावी जशी जमिनीपासून,
लॅन्डशी त्याची तुटोनी लाइन,
न कळे तो स्मार्ट कधी जाहला!
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

- Advertisement -

प्रेमपक्ष्यांसाठी तो होता संदेश,
पुढार्‍यांसाठी तो होता आदेश,
गुलबक्ष्यांची त्याच्यावर कुजबुज,
भामट्यांची त्याच्या आतून कुचकुच.
ह्या कानाचे न त्या कानाला कळता,
कधी तोही कटात सामील झाला.
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

फळकुटावरून तो हातात आला,
हातातुनी आता तो खिशात गेला.
निजतानाही तो उशास दिसला.
बघता बघता दशदिशांत घुसला.
आता तो चराचरांत व्यापला.
आता त्याचा प्लॅन कितीचा,
जो तो विचारू लागला,
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

आता त्यावर चॅटिंग होते,
ती करताना फायटिंग होते,
फंडिंग होते, थ्रिएटनिंग होते,
कधी पगारी ट्रोलिंग होते,
पोलिटिकल मीटिंग होते,
इतिहासातल्या सत्याचा तर
इथे रोज होतो चोळामोळा.
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

सारे शांत शांत तरी उठते वादळ,
जिवंत कुणी तरी मरण व्हायरल,
फॉरवर्ड्सची तर अगणित टोटल,
कुप्रसिध्दाला सुप्रसिध्द टायटल,
आता तो झाला
समाजमाध्यमी चाळा,
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

वाढदिवसाचा तर तो खुला मंच,
फक्त एक टच देई पुष्पगुच्छ टंच,
लाळघोट्या शुभेच्छांचा कचकचीत संच,
मरणकळांच्या आधी येतो येथे
भावपूर्ण श्रध्दांजलीचा उमाळा,
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

ह्यातून मुलांचे होते कोवळे शिक्षण,
व्हिडिओमधून कधी होते औक्षण,
लाइव्ह प्रवचन, लाइव्ह भाषण,
समाज जागा असल्याचे हे लक्षण,
तरी शाळेत कोरडा फळा.
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

आता नकोसे डिलिट होती,
न झाले तर ब्लॉकही करती,
लॉक लावती, फोन कट करती,
रिंग होऊनीही न फोन उचलती.
कटकय्यांना कटवण्याचा
हा मार्ग वेगळा,
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

कुणी त्यास लावी कडीकुलूप,
कुणास वाटे तो फुलप्रूफ,
कुणाची पापे त्यात गुडूप,
करूनसवरून कुणी चिडीचूप,
एकलकोंड्यांना मात्र त्याचा
फार लागला लळा,
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

आपलाच आपल्याला अ‍ॅक्सेस,
वाटते खरे असे कुणाकुणास,
काय शिरेल वावदुक व्हायरस,
कुणाकुणाला हा गर्विष्ठ भास,
परवा त्यांना लागला वास
की हवेत फवारला आहे पेगॅसस,
आत जराही बोलू नका,
चला पटकन मूग गिळा,
फोन बिचारा साधा भोळा,
त्याचा शोध कुणी लाविला!

- Advertisment -