Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश अंतरीची वेदना!

अंतरीची वेदना!

Subscribe

पल्लवी शिंदे-माने यांचा ‘मनस्विनी’ हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. पल्लवी यांचा हा पहिलावहिला काव्यसंग्रह आहे. या कवितासंग्रहाचं वैशिष्ठ्य म्हणजे यात निव्वळ कविता नाहीयेत. तर कवितेबरोबरच काही ललित लेखांचाही यात समावेश आहे. या कवितासंग्रहात एकूण 28 कविता आहेत. तर 14 ललित लेख आहेत. कवितासंग्रहाचे दोन भाग करून पहिल्या भागात कविता आणि दुसर्‍या भागात ललित लेख देण्याचा धाडसी प्रयोग कवयित्रीने केला आहे. त्यामुळे वाचकांना एकाच पुस्तकात कविता आणि ललित लेख वाचण्याचा आगळावेगळा आनंद घेता येणार आहे.

पल्लवी यांच्या या कविता विशिष्ट अशा एखाद्या विषयाला वाहिलेल्या नाहीत. या संमिश्र अशा कविता आहेत. संमिश्र भावभावनांचा हा वानवळा आहे. या कवितासंग्रहात प्रेम कविता आहेत. निसर्ग कविता आहेत. सामाजातील अनिष्ट प्रथांवर ओरखडे काढणार्‍या कविता आहेत. स्त्रियांच्या समस्यांना वाट मोकळी करून देणार्‍याही कविता आहेत. तर, आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन कसं आमूलाग्र बदलून गेलंय यावर भाष्य करणार्‍याही कविता आहेत. थोडक्यात कवयित्रीने आपल्या कविता एकसुरी होणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे.

साध्या सोप्या भाषेतील कविता ही या कवितासंग्रहाची जमेची बाजू आहे. कवयित्रीने आपल्या कवितांमध्ये क्वचित प्रतिमांचा वापर केला आहे. त्यामुळे या कविता थेट मनाला भिडतात. पल्लवी या आपल्या कवितेतून थेट व्यक्त होतात. त्यांची कविता समाजातील व्यंगावर बोट ठेवते. जे आहे ते मांडते. पण कुठेही उपदेशाचे डोस देत नाही. तसेच वाचकांवर समाज क्रांतीची जबाबदारी टाकून मोकळी होत नाही. उलट त्यांची प्रत्येक सामाजिक कविता वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते. इतक्या संवेदनशीलपणे त्यांनी या कविता लिहिल्या आहेत. प्रेम कवितेतून कवयित्री हळवी होते. त्यांच्या प्रेम कविता उत्कट आहेत. तितक्याच त्या मनातील अंतर्विरोध मांडणार्‍या आहेत. निसर्ग कवितांमधून कवयित्री अधिक खुलताना दिसते. निसर्गाचं तरल वर्णन करण्यात कवयित्री यशस्वी ठरली आहे.

- Advertisement -

पल्लवी यांची कविता संवादी आहे. त्यांच्या कवितेत सतत संवाद सुरू असतो. कधी स्वत:शीच तर कधी कुणाला तरी उद्देशून त्यांचा संवाद सुरू असतो. त्यांची ‘आई’ ही कविता त्याचं अप्रतिम उदाहरण आहे. या कवितेत त्या आईशी संवाद साधतात. लग्नानंतर आईला सोडून जातानाचा विरह कवयित्रीने नेमकेपणाने मांडला आहे. हा विरह मांडताना त्या बालपणातही रमताना दिसतात. तसेच आईचा खमकेपणाही त्या अधोरेखित करतात.
खमकेपणाने नेहमीच ठाम उभ्या असणार्‍या.

तुझ्या अस्मानी नितळ रंगात,
तुझ्या डोळ्यातले अश्रू सरमिसळ करत राहतात,
आई, तुझ्या भावनांचा रंग अधिक गडद आहे गं,
माझ्याहीपेक्षा नेहमीच… नेहमीच…!

- Advertisement -

या कवितेतून आईची कणखरता अधोरेखित करतानाच मनातील दोलायमान स्थितीही कवयित्रीने नेमक्या शब्दात पकडली आहे. एकीकडे ‘आई’ या कवितेतून हळूवारपणे व्यक्त होणारी कवयित्री ‘ती वयात येताना’ या कवितेत मात्र समाजातील दांभिकतेवर अत्यंत कठोर शब्दात ओरखडे ओढते. स्त्रीयांकडे बुभुक्षितपणे बघणारा समाज, त्यामुळे स्त्रीयांची होणारी घुसमट, वयात येत असताना कुटुंबापासून सार्वजनिक ठिकाणी स्वत:चं शील जपण्यासाठी स्त्रीची सुरू असलेली धडपड, कुप्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहूनही आत्महत्येचा विचार न करता जगण्याला सामोरे जाणारी स्त्री या कवितेत बघायला मिळते.

‘व्हर्जिनिटी’ नसते फक्त शरीराची,
स्त्री एक उपभोग, एक माल,
अशा खुळचट मानसिकतेतून,
लपेटलेल्या प्रत्येकाच्या मेंदूची,
मनाशी असते कनेक्टेड ‘व्हर्जिनिटी’,
नसते ती फक्त मर्यादित,
शरीराच्या एका भागापुरती,
याची उकल झालीय,
आता चांगलीच तिला,
ती वयात येताना…

स्त्रीयांच्या वेदना सांगूनच कवयित्री थांबली नाही तर माणसाच्या बेगडी स्वभावावर आणि जगण्यावरही कवयित्रीने भाष्य केलं आहे. आयुष्य क्षणभंगूर असतानाही माणूस खोटा का वागतो? आपलं आयुष्य एका मर्यादेनंतर संपणार आहे हे माहीत असूनही माणसं खोटी खोटी का वागतात? हा प्रश्न ‘हे माणसा’ या कवितेतून कवयित्रीला भेडसावतो.

जरी स्वत:ला कितीही रंगवलंस,
अनेक रंगीबेरंगी रंगांनी,
तरीही कोर्‍या करकरीत,
पाटीसारखाच,
सरणावर जातोस अखेर…
हे माणसा!

‘राधा’ या कवितेतून कवयित्री अतिशय हळूवारपणे व्यक्त होते. राधेचं कृष्णावरील अव्यक्त आणि निर्व्याज प्रेम मांडताना राधेची हतबलता आणि हताशताही या कवितेतून अधोरेखित होते. या नात्याला नाव नाहीये, पण प्रीत अमर आहे. निरागस आहे, असं सांगायलाही कवयित्री विसरत नाही. कवयित्री म्हणते,

जगण्यास व्यक्त होण्या, सूर सावळा बिलोरी,
दिसती असंख्य कान्हा, राधेस भास होई,
सांगू कुणास आपुले, नाते अनंत गहिरे,
दिसतात रुक्मिणीच्या, मुखी हताश पहारे

‘कातरवेळ’, ‘आजही’, ‘अपडेट’, ‘वटपौर्णिमा’, ‘पाऊसगाणे’, ‘तुझी याद’, ‘आधुनिक स्त्री’, ‘राधा’ आणि ‘गर्भाशय भाड्याने घेणे आहे’ या कवितांमधून कवयित्री दमदारपणे व्यक्त होते. दु:ख, वेदना, प्रेमाची अनामिक ओढ आणि काही तरी गमावल्याची सल पल्लवी यांच्या कवितेतून सतत दिसून येते. त्यामुळे हा कविता संग्रह वाचल्यानंतर अंतर्मुख व्हायला होतं. पल्लवी शिंदे-माने यांनी पहिल्याच कवितासंग्रहातून साहित्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकलं आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!

— भीमराव गवळी

=कवितासंग्रह : मनस्विनी

=कवयित्री : पल्लवी शिंदे-माने

=प्रकाशक : अष्टगंध

=मूल्य: 150

- Advertisment -