घरफिचर्ससारांशपल पल का शायर साहिर लुधियानवी

पल पल का शायर साहिर लुधियानवी

Subscribe

साहिर लुधियानवी यांनी लिहिलेली बरीच गाणी आजही ऐकली जातात. एकांतात व्यक्ती त्यांची आठवण नेहमीच काढतो. मैं पल दो पल का शायर हूँ असो, कभी कभी मेरे दिल में असो किंवा मेरे दिल में आज क्या है, साहिर यांचं गाणं एकांताचं बनलंय असं वाटतं, पण हेच साहिर कधी कधी जीवनाला आधार देतात आणि आशावाददेखील जागवतात. जेव्हा १९४७ साली देशात धार्मिक दंगली घडत होत्या, तेव्हा त्याचाच संदर्भ घेऊन १९५९ साली ‘धूल के फुल’ सिनेमासाठी साहिर यांनी लिहिलं, तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा, वास्तविकता मांडणारा गीतकार म्हणून त्यांचे रसिकांच्या हृदयात स्थान आहे.

सत्य सांगण्याच्या दोन पद्धती असतात. काही लोक गोड शब्दांचा वापर करून सत्याशी गाठ घालून देतात, तर काही जण थेट बोलून आपल्याला आरसा दाखवतात. त्यांचे शब्द असे असतात की कुणीतरी आपल्याला जबरदस्तीने ओढत आरशासमोर आणून उभं केलंय. ते असं काहीतरी दाखवतात हे माहिती असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची आपली इच्छा असते. असं सत्य जे स्वीकारण्याची हिंमत आपल्यात नसते. आपल्या लेखणीतून सिनेमातील गाण्यांचा वापर करीत अशाच सत्याशी अवगत करणारा हिंदी सिनेमातील पहिला गीतकार म्हणजे अब्दुल हई ज्यांना आपण साहिर लुधियानवी या नावाने ओळखतो. भारताच्या इतिहासातील पहिला गीतकार ज्याने गीतकार या पदाला ग्लॅमर आणून दिलं, असा गीतकार ज्याला लिहिलेल्या गाण्यांसाठी रॉयल्टी मिळायची, असा गीतकार जो गाणं लिहिण्यासाठी लता मंगेशकरांपेक्षा एक रुपया अधिकचं पेमेंट मागायचा, ज्याने लिहिलेली गाणी अजरामर झाली, ज्याला आयुष्यात सगळं काही मिळालं, पण प्रेम मिळालं नाही.

स्वत:च्या जीवनाची कथा एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी असलेल्या साहिर लुधियानवी यांचं अपूर्ण प्रेम, त्यांचा संघर्ष आणि व्यवस्थेविरुद्धचा रोष हेच त्यांच्या गाण्यातून दिसतं. त्यांचे शब्द ना केवळ एका पिढीसाठी उपयोगाचे ठरतात, तर त्यांच्या शब्दातून प्रेरणा घेत एक नवीन गीतकार येतो आणि तो त्यांनीच लिहिलेल्या एका गाण्यावरून प्रेरणा घेत लिहितो, करवट से सोयी हकीकत की दुनिया, दिवानी हुई तबियत की दुनिया, ख्वाहिश में लिपटी ज़रूरत की दुनिया, इंसान के सपनो की नियत की दुनिया, ओ री दुनिया, पीयूष मिश्रासारख्या गीतकाराला अस्वस्थतेचा गीतकार बनविणार्‍या, गुलजार, जावेद अख्तरसारख्यांसाठी प्रेरणा असणार्‍या साहिर लुधियानवीचं जीवन हेच एक असं गीत होतं, ज्यात विविध रसांचा समावेश होता. त्यांच्या आयुष्यात आलेलं प्रेम, विरह, मानवता, तत्त्वज्ञान, दुःख, निराशा आणि प्रश्न प्रत्येक भावना त्यांच्या गाण्यात आली आणि म्हणूनच ती गाणी अजरामर झाली.

- Advertisement -

साहिर लुधियानवी यांचं वैयक्तिक जीवन त्यांच्या फिल्मी जीवनातील कामात सातत्याने दिसत आलं. जमीनदाराच्या घरात जन्म होऊनही त्यांच्या वाटेला संघर्ष आला. त्यांचं नावदेखील वडिलांनी शेजार्‍याला शिव्या देता याव्यात म्हणून शेजार्‍याच्या नावावर ठेवल्याचा एक किस्सा कुठं तरी वाचण्यात आला होता. वडिलांनी एकूण १२ लग्ने केली आणि यांची आई म्हणजे ११ वी बायको. साहिर यांच्या आईला वडील त्रास द्यायचे म्हणून ते आईसोबत मामाकडे येऊन राहू लागले. आईला झालेला त्रास आणि तिने सहन केलेल्या हालअपेष्टा त्यांच्या गीतातूनदेखील समोर आल्या. आई कशी असते आणि तिने कसं असलं पाहिजे यावर त्यांनी १९७८ साली ‘त्रिशूल’ सिनेमात गाणं लिहिलं होतं, तू मेरे साथ रहेगा मुन्ने नावाचं, ज्यात ओळी होत्या, मैं तुझे रहम के साये में न पलने दूंगी, जिंदगानी की कड़ी धूप में जलने दूंगी, ताकि तप-तप के तू फौलाद बने, माँ की औलाद बने.

आईने मुलाचा सांभाळ कसा केला पाहिजे, या प्रश्नाचं पारंपरिक उत्तर न देता त्यांनी त्यातही स्वत:चं वेगळेपण जपलं आणि ते गाणं सर्वांच्या लक्षात राहिलं. आयुष्यात जे त्यांना मिळालं, त्यांनी जे अनुभवलं तेच गाण्यातून दिसलं, म्हणून जेव्हा त्यांना जगाबद्दल, दुनियेबद्दल लिहिण्याची वेळ आली, तेव्हा ‘प्यासा’ सिनेमासाठी साहिर लिहितात की, यहाँ इक खिलौना है इसां की हस्ती, ये बस्ती हैं मुर्दा परस्तों की बस्ती, यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. साहिर लुधियानवी केवळ एकाच प्रकारचे गीतकार नव्हते. त्यांची लिहिण्याची रेंज पाहायची असेल तर दिलीप कुमारसाहेबांचा नया दौर सिनेमा बघा. यातली गाणी साहिर यांनी लिहिलीत आणि या एकाच सिनेमात त्यांच्या लिहिण्यात असलेलं वैविध्य तुम्हाला लक्षात येईल.

- Advertisement -

प्रेमावर उड़े जब जब जुल्फें तेरी, कवारियों का दिल मचले, त्यांनीच लिहिलं तर समाजात राहत असताना एकीचं महत्त्व सांगणारं साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जायेगा मिल कर बोझ उठानासारखं गाणंदेखील त्यांनी लिहिलं. साहिर देवधर्म या सगळ्या गोष्टी नाकारणारे व्यक्ती होते, पण याच सिनेमात त्यांनी आना है तो आ राह में कुछ फेर नहीं है, भगवान के घर देर है अंधेर नहीं है यासारखं गाणं ओपी नय्यर साहेबांसोबत मिळून लिहिलं. ते एक सच्चे देशप्रेमी होते. त्यांनी लिहिलेलं याच सिनेमातील एक गाणं आजही कुठे ना कुठे नक्की ऐकायला मिळतं. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का, इस देश का यारों होय, इस देश का यारों क्या कहना, ये देश है दुनिया का गहना. नया दौर हा सिनेमा अनेक अर्थांसाठी खास होता, पण माझ्यासाठी साहिर लुधियानवी यांना एक परिपूर्ण गीतकार बनवणारा हा सिनेमा आहे.

साहिर लुधियानवी यांनी लिहिलेली बरीच गाणी आजही ऐकली जातात. एकांतात व्यक्ती त्यांची आठवण नेहमीच काढतो. कभी कभी मेरे दिल में असो किंवा मेरे दिल में आज क्या है, साहिर यांचं गाणं एकांताचं बनलंय असं वाटतं, पण हेच साहिर कधी कधी जीवनाला आधार देतात आणि आशावाददेखील जागवतात, जो त्यांचा मूळ स्वभाव नव्हता. म्हणूनच ते लिहितात, वो सुबह कभी तो आयेगी, इन काली सदियों के सर से, जब रात का आंचल ढलकेगा, जब अम्बर झूम के नाचेगा, जब धरती नग़मे गाएगी. समाजात जे घडतं तेच लिहिलं पाहिजे असं ते म्हणतात. जेव्हा १९४७ साली देशात धार्मिक दंगली घडत होत्या, तेव्हा त्याचाच संदर्भ घेऊन १९५९ साली ‘धूल के फुल’ सिनेमासाठी साहिर यांनी लिहिलं, तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है इन्सान बनेगा. वास्तविकता मांडणारा गीतकार हा उल्लेख जो मी सुरुवातीला त्यांच्याबाबत केला होता हे त्याचंच उदाहरण.

अमृता प्रीतम आणि त्यांचं नातं अनेकांना माहितीये. त्या एका अपुर्‍या प्रेमकहाणीने अनेक प्रेमवीरांना आवाज दिला. कारण साहिर लुधियानवी यांनी लिहिलेले अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं, जाने वो कौनसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला आणि जो वादा किया वो निभाना पडेगा, अशी सगळीच गाणी भारदस्त बनलीत. यात फ़क्त संगीतकारांची कमाल नव्हती, तर यात वेगळेपण होतं ते गीतकाराचं. हा पहिला गीतकार होता ज्याने संगीतकारांना आधी लिहिलेल्या गाण्यांना चाल लावायला सांगितली. संगीत बनवून मग त्यावर शब्द लिहिणारे गीतकार असताना साहिर यांनी आपली वेगळी ओळख जपली. म्हणूनच तर ते पल दो पल के शायर न राहता पल पल का शायर बनले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -