घरफिचर्ससारांशशब्द बापुडे...

शब्द बापुडे…

Subscribe

ते दोन लोक आधी तरातरा तरातरा चालत आले. मग त्यांच्या मागून दहा-बारा लोकांचा घोळका त्यांच्यापासून अंतर ठेवत चालत निघाला. पुढचे दोन लोक आणि मागचे दहा-बारा ह्यांच्यातलं ते अंतर आजच्या काळात असतं तसं सामाजिक अंतर नव्हतं. ते त्यांच्यात नेहमी ठेवत आलेलं ‘विशिष्ट’ अंतर होतं. हे अंतर ते तसं वर्षानुवर्षं एकमेकांपासून आनंदाने ठेवत आले होते. जाणूनबुजून तसं ठेवत होते. असं अंतर ठेवण्यातून आजुबाजूच्यांनीही त्यांच्यापासून तसंच अंतर ठेवावं हा सुचक संदेश सुप्तपणे जात होता.

…तर असं हे अंतर ठेवत ते तरातरा रस्त्याच्या एका टोकाला येऊन थांबले. ते थांबताच मागच्या घोळक्यातल्या लोकांनीही स्वत:ला करकचून ब्रेक लावला. हा ब्रेक ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ असा नव्हताच. पुढे असलेले कुणी अचानक थांबले म्हणून मागचा जनांचा प्रवाहो अपरिहार्यपणे नव्हे तर नाईलाजाने थांबला.

- Advertisement -

आता स्पष्टच सांगायचं तर पुढचे दोन लोक म्हणजे नेतृत्व होतं…आणि मागचे घोळक्यातले समर्थक, अनुयायी, शिष्य…किंवा भालदार, चोपदार, जमादार…किंवा चक्क पंटर.

नेतृत्व थांबल्याबरोबर भराभरा ओबी व्हॅन्स गोळा झाल्या. चॅनेलांच्या वायर्सचं कोंडाळं जमा झालं. भसाभसा चॅनेलचंपू जमा झाले. नेतृत्वासमोर येऊन उभे ठाकले. नेतृत्वानेही त्याला सामोरं जायची तयारी दर्शवली. नेतृत्व व्यवस्थित अभ्यास करून बाहेर पडलं होतं. कोणताही प्रश्न फेका, कशावरही एनी टाइम बोलायची तयारी ठेवून आलं होतं. पण झालं होतं असं की जास्त टीआरपीवाले सब से आगे असणारे एकदोन अजून दाखल झाले नव्हते म्हणून नेतृत्वही वाट पहात उभं होतं.
जास्त टीआरपीवाले, चायभिस्कुटवाले असे सगळेच येऊन गणसंख्या पूर्ण झाल्यावर नेतृत्व बोलायला उभं राहिलं.

- Advertisement -

नेतृत्व म्हणालं, आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही आमच्या जनतेला बांधिल आहोत. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. सत्तेत आणून बसवलेलं आहे. ह्या सत्तेचा पूर्ण वापर आम्ही ह्या जनताजनार्दनाच्या कल्याणासाठी करणार आहोत. जनतेचं कल्याण हे आम्ही आमचं कल्याण समजतो. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करताना आम्ही राजकारण करत नाही. कोणतंही राजकारण करण्याची आमची भूमिका नाही. आणि म्हणूनच ह्यापुढेही आम्ही न्यायाच्या मार्गानेच पुढे जात राहणार आहोत. न्यायाच्या मार्गानेच इथल्या मायबाप जनतेला, इथल्या शोषितांना, इथल्या वंचितांना, इथल्या पीडितांना आम्ही प्रगतीपथावर नेणार आहोत.

बलम, कसम, सनम, मोहब्बत, प्यार, वफा हे शब्द जसे हिंदी सिनेमातल्या गाण्यात प्रत्येक दोन शब्दांमागे पेरलेले असतात तसंच नेतृत्वाच्या ह्या उत्स्फूर्त बाईटमध्ये होतं. जनताजनार्दन, शोषित, वंचित, कल्याण, अन्याय अशा समाजाभिमुख शब्दांची पखरण नेतृत्व वाक्योवाक्यी करत होतं.

नेतृत्वाच्या मागच्या घोळक्याच्या मनात, नेतृत्वाच्या मागे राहिल्यामुळे हे शब्द तसे कायम घोळत राहिले होते. तोंडपाठ झाले होते. साहजिकच, नेतृत्वाच्या मुखातून एखाद्या क्षणी वेगळाच शब्द बाहेर पडल्यावर अख्खा घोळका मनातल्या मनात दचकायचा. एकमेकांकडे हळूच पहायचा.

नेतृत्व पुढे म्हणत राहिलं, जनतेचं आरोग्य, वीज, पाणी, पायाभूत सुविधा, शिक्षण ह्यावरच आम्ही आजवर भर देत आलो आहोत आणि ह्यापुढेही त्यावरच आम्ही आमचं सगळं लक्ष केंद्रित करणार आहोत.

नेतृत्वाच्या शेवटच्या वाक्यावर घोळक्यातल्या सगळ्यांनी वरखाली माना डोलवल्या. तो घोळक्याला घालून दिलेला रिवाज होता. त्या रिवाजानुसार तो सामूहिक होकार यथासांग घडला होता आणि त्या मूक होकाराच्या समेवर येऊन नेतृत्वाचा बाइट थांबला होता.

आता चॅनेलवाल्यांमधली बोलण्याचा वसा घेतलेली माणसं बोलती झाली. ती व्यक्त होताहेत असं म्हणता येत नव्हतं. कारण बोलतं होणं ही त्यांची ड्युटी होती…आणि व्यक्त होणं ही भीती होती.
…पण अन्याय दूर करण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे?
एक चॅनेलवाला अनेक चॅनलवाल्यांच्या वतीने कुजबुजला.
नेतृत्वही बोलणार्‍यांची बोलती बंद करणार्‍यांच्या रसरशीत मुशीत तयार झालेलं होतं. ते म्हणालं, अन्याय दूर करण्यासाठी आणखी दुसरं काय करावं लागतं?…न्याय जवळ करावा लागतो…
टाकलेल्या प्रश्नाला उत्तर फेकलं आणि कुणाकडून पुढचा प्रश्न येण्याच्या आधीच गनिमाच्या हातून सटकावं तसं नेतृत्व तिथून सटकलं. मागून घोळक्यानेही पोबारा केला.
आता बोलण्याच्या ड्युटीवर असणारे मागे उरले. थोड्याच वेळात त्यांनीही त्यांच्या हातातल्या वायरी गुंडाळल्या. तेही तिथून गेले. त्यांच्या ओबी व्हॅन्स हलल्या.
…आणि शब्द बापुडे केवळ वारा…ते मात्र ज्याच्या त्याच्या ब्रेकिंगमध्ये दिसत राहिले, कोरडेपणाने.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -