तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा…!

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेठी वाढल्या आहेत म्हणजे नक्की काय होतंय. यात राजकारण आहेच. त्याहीपेक्षा दबावनीती आणि गोष्टी आपल्या बाजूने वळविण्यासाठी टाकलेले डावपेच अधिक आहेत. एकमेकांची साथ तर कोणालाच सोडायची नाही. परंतु, एकमेकांची साथ कायम ठेऊनही प्रत्येकाला नवा घरोबा करायचा आहे किंवा नवा भिडू शोधायचा आहे. हा प्रकार म्हणजे एकासोबत संसार करत असताना गरज पडल्यास असावे म्हणून दुसर्‍यावर डोळा ठेवण्यासारखे आहे. एकूणच सध्या राज्यात जे काही सोयीचे राजकीय डावपेच सुरू आहेत, त्याला तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू सत्तेच्या माळा, असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललंय तेच सर्वसामान्य माणसाला कळेनासं झालंय. शिवसैनिकांना भाजपचे कार्यकर्ते डोळ्यासमोर नको असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतात. आता पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार, अशा चर्चा रंगतात तोच शिवसेना भवनासमोर शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडतात. आरोप प्रत्यारोपाचे खेळ रंगतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेबरोबर पाच वर्षे सत्तेत राहायचे आहे आणि त्यासाठी एकमेकांच्या सोबतीने निवडणुकांना सुद्धा सामोरे जायचे आहे. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेसची सोबत त्यांना नको आहे. सत्तेत काँग्रेस हवी, पण निवडणुकीत नको. याचवेळी देशपातळीवर तिसरी आघाडी करताना शरद पवार हे काँग्रेस वगळून नवा राष्ट्रमंच उभारू पाहत आहे. कारण राहुल गांधी यांचे नेतृत्व मानायला ते तयार नाहीत. पंधरा वीस प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन ते सत्तेच्या माळा गुंफायला पुढे सरकतात, पण त्यांना काँग्रेस नको. आता तुम्हाला आम्ही नको तर आम्हाला तरी काय गरज पडलीय तुमच्या मागून फरफटत येण्याची. जाऊ दे. आम्ही स्वबळावर लढतो… काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप असा काही अभिनय कम भाषण करतात की जणू उद्याच निवडणुका आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार भेट, शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यामधील प्रदीर्घ चर्चा. त्याआधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची भेट. आता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड गुप्तगू. याचदरम्यान खासदार संजय राऊत म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप आणि देशाचे सर्वोच्च नेते. या सगळ्या गोष्टी नेमक्या सांगतात तरी काय? हे काय चालले आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेठी वाढल्या आहेत म्हणजे नक्की काय होतय. यात राजकारण आहेच. त्याहीपेक्षा दबावनीती आणि गोष्टी आपल्या बाजूने वळविण्यासाठी टाकलेले डावपेच अधिक आहेत. एकमेकांची साथ तर कोणालाच सोडायची नाही. परंतु, एकमेकांची साथ कायम ठेऊनही प्रत्येकाला नवा घरोबा करायचा आहे किंवा नवा भिडू शोधायचा आहे. हा प्रकार म्हणजे एकासोबत संसार करत असताना गरज पडल्यास असावे म्हणून दुसर्‍यावर डोळा ठेवण्यासारखे आहे.

म्हणजे असे की, महाराष्ट्र भाजपला सत्तेत यायचे आहे. त्यासाठी भाजपचे नेते जंग जंग पछाडत आहेत. फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगणार : सकाळी उठल्यावर कळले की महविकास आघाडी सरकार कोसळलेले असेल. हे आताच नाही तर हे सरकार आल्यापासूनच भाजप नेत्यांना आपण सत्तेत नाही हे सहन झालेले नाही. महाविकास आघाडी सरकार म्हणजे नैसर्गिक सरकार नाही. खरे सत्तेचे वारसदार आम्हीच आहोत, असे सतत सांगत आपण किती सत्तेसाठी अस्वस्थ आहोत, हे ते दाखवून देत आहेत. परंतु, दिल्लीश्वरांच्या मनात हे सरकार पडावे असे दिसत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. सध्या स्थानिक नेतृत्वाचा फुगा आवश्यकतेपेक्षा जास्त फुगू द्यायचा नाही. परिणामी देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न एका विशिष्ट टोकाला जाऊन तोकडे पडतात. शिवसेना हा नैसर्गिक मित्र, पण या मित्राच्या अपेक्षा पाहता त्याला सांभाळणे महाराष्ट्र भाजपला आताच्या काळात काहीसे कठीण. मुख्य म्हणजे शिवसेनेला सुद्धा आता भाजपच्या सावलीत राहून आपले अस्तित्व गमावू द्यायचे नाही.

महाविकास आघाडी सरकारचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले. या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. परंतु, याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र बैठक झाली. अर्थातच या बैठकीची चर्चा झाली. या भेटीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात अद्यापही ‘विशेष ओलावा’ आहे का, असा सवाल निर्माण झाला. पण ही नुसती राजकीय भेट होती का आणखी काही गोष्टी सोप्या करायच्या होत्या, ठाऊक नाही. दुसर्‍या बाजूला विचार करता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार टीकावे ही दिल्लीश्वरांचीच इच्छा आहे. कारण महाराष्ट्रात पाच वर्षे कोणीही मुख्यमंत्री राहिले तर तो भविष्यातील पंतप्रधानपदाचा दावेदार राहतो, असे बोलले जाते. दिल्लीश्वरांना आणखी पाच वर्षांची संधी कोणाला द्यायची नाही.

यात बर्‍याच गोष्टी दडलेल्या आहेत. राजकारणाची आवड असलेल्या कोणाही व्यक्तीला त्या सहज ध्यानात येतील. भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत आली. त्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. परंतु, शिवसेनेने आजपर्यंत केव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट व्यक्तीगत टीका करणे टाळले आहे. शिवसेनेने नेहमीच उघडपणे पंतप्रधान मोदी यांचे व्यक्तीगत पातळीवर कौतुकच केले आहे. जसे की शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप आणि देशातील सर्वोच्च नेते आहेत. याचाच अर्थ असा की राजकारणात सर्वच दरवाजे बंद करायचे नसतात. गरज पडलीच तर मागे येण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी काही दरवाजे उघडे ठेवायचे असतात. हा त्यातलाच एक प्रकार आहे’.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन नुकताच पार पडला. या वेळी बोलताना शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जनता पक्षाचे सरकार सत्तेत असताना इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता. काँग्रेसला पाठिंबा देण्याचा. तो शब्द पाळत बाळासाहेबांनी एकही उमेदवार त्या वेळी निवडणुकीत उभा केला नव्हता, असे स्मरण करुन दिले. हे म्हणजे शिवसेना सध्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत आहे. पाच वर्षे एकत्र राहण्याचा शब्द शिवसेनेने दिला आहे. तो शब्द शिवसेना मोडणार नाही, असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. यात महत्वाचे असे की शिवसेना हे भावनेचे राजकारण करणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भावनिक राजकारणाला भावनिकरित्या उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यात भविष्यातील संभाव्य राजकारणाचे सूतोवाच आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर नुकतेच शरद पवार यांना भेटले. या आधी त्यांनी भाजपसाठी रणनीती आखण्याचे काम केले होते. नंतर त्यांनी नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि दक्षिणेकडील काही राजकीय पक्षांसाठी काम केले आहे. मध्यंतरी ते मातोश्रीवर सुद्धा जाऊन आले. नुकतेच ते शरद पवार यांना भेटले आहेत. आता राष्ट्रमंचच्या नावाखाली शरद पवार करत असलेल्या तिसर्‍या आघाडीचा ते प्रयोग करून पाहत आहेत. याआधी किशोर यांनी कधीच शरद पवार यांच्यासाठी काम केले नव्हते.

प्रथमच ते एकत्र येत असून 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते तिसर्‍या आघाडीचा प्रयोग करत असून किशोर यांच्या मते किमान 400 जागांवर भाजपला पराभूत करता येऊ शकते. शरद पवारांचे नेतृत्व आणि पंतप्रधानपदी ममता बॅनर्जी यांचा चेहरा, असे सूत्र असेल तर हे जमू शकेल. मात्र पवार राष्ट्रमंचचा प्रयोग पुढे आणताना तिसरी आघाडीविषयी आता मौन बाळगून आहेत. काँग्रेसला बाहेर ठेवून त्यांना हा प्रयोग करायचा असून त्याला येत्या काही महिन्यांमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय, यावर पवारांचे पुढचे डावपेच असतील. कारण पवार आपले पत्ते लगेच उघडणार नाहीत. ते एकूण अंदाज घेऊनच पुढची पावले टाकतील. कोरोनाची दुसरी लाट योग्य पद्धतीने हाताळल्यामुळे उद्धव ठाकरेंचं देशभरात कौतुक झालं. तर, दुसरीकडे लसीकरण मोहीम, औषधांचा पुरवठा यामुळे नरेंद्र मोदी सरकारवर टीका झाली होती. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला धक्का बसलाय. त्यामुळे, भाजपची भूमिका बदलली आहे. नवीन मित्र जोडा, तोडलेल्या मित्रांना जवळ करा, अशी त्यांची रणनीती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही शिवसेनेला पूर्णपणे न तोडण्याच्या भूमिकेचा असल्याचे दिसत आहे. याचवेळी शिवसेनेचे अनेक नेते ईडी, सीबीआयच्या रडारवर आहेत. या नेत्यांवरील संकट दूर व्हावं म्हणून, भाजपसोबत जुळवून घ्यावं असा एक मतप्रवाह शिवसेना नेत्यांमध्ये आहे.

उत्तर प्रदेशात एकमेकांचे कट्टर विरोधक मायावती आणि अखिलेशही काही काळासाठी एकत्र आले. नरेंद्र मोदींना विरोध करून एनडीएबाहेर पडलेले नितीश कुमार आधी लालू यादव यांच्याबरोबर होते. पण नंतर लगेचच त्यांची साथ सोडून भाजपबरोबर आले. आता ते भाजपसोबतच सत्तेत आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र येताना देशानं याआधीसुद्धा पाहिलं आहे. एकूणच सत्तेसाठी आपली मूळ भूमिका बाजूला ठेवून भाजपसकट देशातील सर्व पक्ष एकत्र येऊ शकतात. तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा…