घरफिचर्ससारांशकॅमेरा आणि कॅमेरे!

कॅमेरा आणि कॅमेरे!

Subscribe

कॅमेरावाला आला, कॅमेरावाला आला, अशी एकच हाकाटी पक्षकार्यालयाबाहेर सुरू झाली…तरी कॅमेरावाला त्यांच्या कार्यालयापासून तसा साडेपाचशे पावलं लांब होता. पण कार्यकर्त्यांची नजर घारीसारखी, त्या नजरेतून कॅमेरावाला कसा काय सुटणार! आता खरं सांगायला हरकत नाही, पण अशा घारीची खरी नजर असते ती कॅमेरावाल्यापेक्षा त्याच्या कॅमेर्‍यावर. कुणी दबक्या आवाजात त्याबद्दल, चोराची नजर गाठोड्यावर असंही म्हणेल, पण ते दबक्या आवाजातच.

कॅमेरावाल्यापेक्षा कॅमेरा महत्वाचा, ह्या वाक्यालाही आणखी एक वेगळा पैलू आहे. तो असा की आजच्या काळात कॅमेर्‍या-कॅमेर्‍यातही वर्गकलह आहे. म्हणजे एक कॅमेरा कागदी तर दुसरा संगमरवरी दांडुकधारी. एक कॅमेरा लिहिणार्‍यांचा तर दुसरा बडबडणार्‍यांचा. एक फोटूवाल्यांचा तर दुसरा व्हिडिओवाल्यांचा. एक अग्रलेखवाल्यांचा तर दुसरा ब्रेकिंगवाल्यांचा.
…तर असाच ब्रेकिंगवाल्यांचा एक कॅमेरा एका मोठ्या ब्रेकिंगवाल्याबरोबर येताना साहेबांच्या निकटवर्तियांना दिसला. निकटवर्तियांनी ती ब्रेकिंग आतल्या अ‍ॅन्टिचेंबरमध्ये पोहोचवली. अ‍ॅन्टिचेंबरमधल्या साहेबांनी लगोलग काही कागदपत्रं ड्रॉवरमध्ये टाकली आणि ड्रॉवरला लावलेली किल्ली गर्रकन फिरवली. साहेबांच्या गोल गोल फिरणार्‍या, झुलणार्‍या, डुलणार्‍या खुर्चीने मग आधी एक पोज् घेतली…आणि नंतर त्या खुर्चीवर विसावलेल्या साहेबांनी आपल्या खुर्चीला मॅच होईल अशी दुसरी पोज् घेतली. ते करताना छान शाम्पू-कंडिशनिंग केलेल्या केसांमधून पक्षाच्या रंगाचा कंगवा अलगद, पण चपळतेने फिरवून घेतला. आपल्या गरम इस्त्रीच्या सदर्‍याला, सदर्‍यावरच्या जाकिटाला चुण्या पडल्या नसल्याचं एका कटाक्षात बघून घेतलं आणि कॅमेरा आत शिरताच फायलीत गढून दाखवण्याचं टायमिंग साधलं.

- Advertisement -

कॅमेर्‍याने कार्यालयाच्या अतंरंगात शिरून साहेबांच्या अ‍ॅन्टिचेंबरच्या स्वर्गसुखात पाऊल टाकलं तरी साहेबांनी फायलीत गढून जाण्याचं बेअरिंग सोडलं नाही. ब्रेकिंगवाल्यांचा कॅमेरा असला म्हणून काय झालं, जनतेच्या प्रश्नांपुढे असले शंभर कॅमेरे मी ओवाळून टाकतो अशा भूमिकेत ते जे शिरले ते बाहेरच पडायला तयार नव्हते.

त्यांच्या ह्या भूमिकेचा कॅमेर्‍यावर तात्काळ परिणाम झाला. साहेब ह्या भूमिकेतून कधी बाहेर पडतील ह्याची वाट न पाहता कॅमेर्‍याने तोपर्यंत आपला वेळ सत्कारणी लावण्याचं ठरवलं. त्याने फायलीत निष्कारण गढलेल्या साहेबांच्या कृतीशील छब्या इशान्येपासून वायव्येपर्यंत घ्यायला सुरुवात केली. कॅमेर्‍याची आपल्याला काही पडलेली नसल्याचा तो त्यांचा अभिनय इतका बेमालुम वठला की कॅमेरा आणि कॅमेर्‍यावाल्याच्या सारथ्याला शेवटी साहेबांना जनसामान्यांमध्ये आणावं लागलं. साहेब, आम्हाला बाइट देता का? तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला देत, आमच्या कॅमेर्‍याकडे बघत जरा आमच्याशी बोलता का? अशी कॅमेरावाल्यांना विनवणी करावी लागली. पण तोपर्यंत कॅमेर्‍यामध्ये साहेबांच्या बर्‍याच छब्या गोळा होण्याचा साहेबांचा हेतू साध्य झाला होता. तोपर्यंत एक डोळा फायलीत दंग झालेल्या साहेबांचा दुसरा डोळा कॅमेर्‍यात गोळा झालेल्या आपल्या छबिदार छब्यांची मोजदाद ठेवत होता.

- Advertisement -

पेपरवाल्यांच्या कागदी कॅमेर्‍याचा साहेबांना म्हणूनच मोह नव्हता, पण ब्रेकिंगवाल्यांच्या ह्या कॅमेर्‍याचा अँगल लक्षात ठेवूनच साहेबांनी आपल्या हपिसाचं इंटिरियर करून घेतलं होतं. हपिसाचा कानाकोपरा फोटोजेनिक करून घेतला होता. टीव्हीवर दिसणार्‍या तुमच्या हपिसाच्या व्हिज्युअल्समधूनही जनतेमध्ये तुमची युनिक इमेज उभी राहिली पाहिजे असा साहेबांच्या वासरात लंगड्या राइट हॅन्डने साहेबांना सल्ला दिला होता.

साहेबांच्या ह्याच राइट हॅन्डने साहेबांना एकदा क्रिकेटचा सामना बघायला नेलं. साहेब तेव्हा क्रिकेटच्या सामन्यालासुद्धा सदर्‍यावर जाकिट घालून गेले आणि तिथेही सदर्‍याला चुणी पडणार नाही अशा बेताने बसले. साहेबांनी तिथे पाहिलं तर फलंदाजाने साधा तटवलेला चेंडूसुद्धा क्षेत्ररक्षक कोलांटी उडी मारूनच अडवत होता. फलंदाज तिथे धाव घ्यायचाही प्रयत्न करत नव्हता. पण तरीही क्षेत्ररक्षक कोलांटी उडी मारूनच चेंडू अडवत होता. कुणी उगाचच जिवाच्या आकांताने अनाठायी झेप घेत होतं. साहेबांनी हे बघून बघून घेतलं आणि आपल्या राइट हॅन्डच्या कानात म्हटलं, जिथे एकही धाव निघण्याची शक्यता नाही, दस्तुरखुद्द फलंदाजही धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही तिथे हे सगळे खेळाडू अशा कोलांटी उड्या मारून चेंडू का अडवताहेत?

साहेबांच्या प्रश्नावर राइट हॅन्ड फिसकन् हसला. राइड हॅन्डच्या अशा हसण्याने साहेब शरमले. ह्या माहितीच्या युगात आपल्याकडली माहिती कमी असल्याचं त्यांना जाणवलं आणि ते पार ओशाळले.
मग राइट हॅन्ड स्वत:हूनच म्हणाला, मैदानाच्या कानाकोपर्‍यात ते अर्ध्या चड्डीतले लोक तुम्हाला दिसताहेत? काय घेऊन उभे आहेत ते लोक?
साहेब म्हणाले, कॅमेरे घेऊन उभे आहेत ते लोक?
मग आता कळलं ते साध्या साध्या गोष्टीला असे कोलांटी उडी का मारताहेत? कॅमेरासमोर अशी ओव्हरअ‍ॅक्टिंग केल्याशिवाय सगळे कॅमेरे नाही आपल्यावर रोखले जात! राइट हॅन्ड म्हणाला.
साहेबांना असा राइट हॅन्ड आपल्या ताफ्यात आणि ताब्यात आहे ह्याचा खूप अभिमान वाटला. आपल्या सदर्‍याला पडणार्‍या चुणीची यत्किंचितही फिकीर न करता त्यांनी राइट हॅन्डला टाळी दिली.
अच्छा म्हणजे कोलांटी उडी मारली तरच सगळे कॅमेरे आपल्यावर एकवटतात?…आणि इतर वेळी कधीतरी असा एखादाच कॅमेरा आपल्यावर रोखला जातो?…साहेबांनी निरागसपणे राइट हॅन्डला विचारलं.
राइट हॅन्ड पुन्हा फिसकन् हसला आणि त्याने होकारार्थी मान हलवली.
साहेबांनी मग राइट हॅन्डला जवळ ओढत त्याच्या कानाशी जात म्हटलं, मग आपण कधी कोलांटी उडी मारायची?…कुणाला सांगू नको, पण मला दुसर्‍या पक्षाची ऑफर आली आहे. सगळे कॅमेरे आपल्यावर रोखले जातील?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -