घरफिचर्ससारांशअत्याचारांनंतरचं भांडवल !

अत्याचारांनंतरचं भांडवल !

Subscribe

आपल्या सरकारची, आपल्या समाजाची आणि आपल्या वैयक्तिक मानसिकतेची सगळ्यात मोठी व्यथा ही आहे की, महिलेवर अत्याचार झाल्याशिवाय किंवा एखाद्या बाईला मृत्यू आल्याशिवाय तिच्या आयुष्याच्या, तिच्या जगण्याच्या बिकट प्रश्नांवर, तिच्या संघर्षाकडे लक्ष दिले जात नाही. त्यातही अत्याचार झाल्यानंतर आधी तिचा धर्म, जात, वंश, कुळ सगळं शोधून त्याचं भांडवल करायला घेतलं जातं. या सगळ्यामध्ये पुन्हा तिची जात आणि समाजाचे निकष मोठे होतात आणि तिचं बाईपण, तिचं माणूस असणं मागे पडतं.

महाराष्ट्रामध्ये 2020 मध्ये 2061 बलात्काराच्या नोंदी होत्या. एन.सी.बी.आरच्या आकडेवारीनुसार हा आकडा वर्षभरामध्ये नोंद झालेल्या तक्रारींचा आहे. तर 2065 एकूण पीडिता या रिपोर्टमध्ये पहायला मिळतात. मुळात या आकडेवारीवर विश्वास ठेवून, महिलांच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात हा आकडा मोठाच आहे. पण आपण फक्त आकडे पाहत बसतो, खूप झालं तर मेणबत्त्या घेऊन आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो. हे थांबेल की नाही, स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल की नाही हे सगळे मुद्दे आहेतच. त्यासाठी भांडणं पण योग्य आहे, आपापल्या परीने प्रयत्न करणेही योग्य आहे. पण त्या बाईचा वापर करुन, तिच्या प्रतिष्ठेला वारंवार धक्के देत स्वतःच्या नसलेल्या इभ्रतीचे डंके मिरवणे वाईट. एखाद्या पक्षाने साकिनाका येथील स्त्री दलित होती म्हणून हॉस्पिटलबाहेर घोषणाबाजी केली, म्हणून दुसर्‍या पक्षाच्या प्रवक्तीने मीडियासमोर अश्रू काढायचे.

फास्ट ट्रॅक कोर्टात गेलेली केस लवकर निकाली लावावी म्हणून आग्रही राहताना 50 वेळा त्या पीडित महिलेच्या जातीवर, तिच्या कामावर, तिच्या संसारावर चर्चा करुन तिच्या परिवारालाही लाज आणतात. एका साध्या भाजीवाल्या बाईची मुलगी, नवर्‍यापासून वेगळी रहात होती, तिच्या दोन किशोरवयीन मुलींना सांभाळत होती. आर्थिक तडजोड, सामाजिक दडपण, दोन मुलींची जबाबदारी या सगळ्या गोष्टींनी दबावात असणार्‍या तिच्यावर ओढावलेला प्रसंगसुद्धा आसपासच्या चर्चांमधून तिची कशी चूक आहे, ती कशी एकटी बाहेर गेली. एकट्या, नवर्‍याने टाकलेल्या बाईसोबत हे असंच होतं या गोष्टी बोलल्या जातात. या सगळ्यामध्ये कशी बाईची चूक असते, तिच्या वागण्यामुळेच कसे बलात्कार होतात हे दाखवून देण्याच्या मागे लागलेले लोक खरंच बाईचं एक व्यक्ती म्हणून अस्तित्व स्वीकारतात का हा प्रश्न तयार होतो.

- Advertisement -

लहानपणापासून आपल्या घरांमध्ये लहान मुलांना पाणी मागायचं तर आईकडे मागायचं किंवा फार फार तर स्वतः हाताने घ्यायचं असं शिकवलं जातं. वडिलांकडे पाणीसुद्धा मागायचं नाही, कारण ते वडील आहेत. यामुळे त्या घरातलं बालक मुलगी असेल, तर लहानपणापून तिच्या आयुष्यात आलेला पहिला पुरुष आपण तिच्यापासून दूर करतो. ही दरी वाढत जाते, पुढे शाळेत मुलंमुली फरक पावलोपावली जाणवत असतो. तिथे कुठेच सेक्स एज्युकेशन किंवा निदान एकमेकांना माणूस म्हणून समजून घेण्याची प्रक्रिया केली जात नाही. याचे परिणाम पुढे कुतूहलात आणि नंतर वासनेत दिसतात. स्वतःची प्रत्येक प्रकारची भूक भागवण्याचे साधन म्हणजे स्त्री अशा पद्धतीने समाजच काय घरातसुद्धा तिला तशीच वागणूक अगदी सुरुवातीपासून मिळत असते. बायको असेल तर स्वयंपाकघर आणि बेडरुममध्ये महत्वाची, आई असेल तर भावनिक आंदोलनं सांभाळणारी, बापापासून वाचवणारी, भावनिक भूक आणि पोटाची भूक भागवण्यापुरतं महत्व, बहीण, मैत्रिण सगळ्याच त्यांच्या अस्तित्वापलीकडे कशासाठी तरी बनवल्या गेल्या आहेत अशी वागणूक असते. स्त्री ही काहीतरी कर्तव्य बजावण्यासाठी बनवली गेली आहे, तिचे कर्तव्य आहे पुरुष आणि इतर जमातींसाठी काहीतरी करत रहाणं याच मानसिकतेतून होतात बलात्कार. आणि ही मानसिकता आपण ना स्वीकारायला तयार आहोत, ना बदलायला तयार आहोत.

वरच्या जातीच्या माणासाला शिकवण किंवा रुजवण असते की खालच्या जातीचा माणूस हा त्याच्या सेवेसाठी बनवलेला आहे. आपल्याकडच्या अनेक धार्मिक आध्यात्मिक संदर्भांमध्ये स्त्रीला दिलेले दुय्यम स्थान तिला जातीपेक्षाही खाली नेऊन ठेवतात. अपवाद आहेत त्या देवी, जोपर्यंत तिच्या हातून चमत्कार घडत नाहीत तोपर्यंत तिला देवत्व नाही. मग हे चमत्कार आजच्या काळात बदलेले आहेत, नवर्‍यापासून वेगळं होऊन स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य देणारी स्त्री तिच्या भावनिक, सामाजिक वर्तुळामध्ये ठाम मत मांडते हा चमत्कार स्वीकारण्यापेक्षा तिचे महत्व काढून घेऊन तिच्यावर बलात्कार होतो. मग या बलात्काराचे महत्व काढून घेऊन त्याचे भांडवल होते. कोण जास्त मदत करतोपासून कोण जास्त भावनिक होतोपर्यंतच्या स्पर्धा सुरू होतात आणि त्या महिलेचे, त्या महिलेच्या कुटूंबाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात येते.

- Advertisement -

या सगळ्यावर प्रशासकीय वचक असावा, कायदा बळकट असावा म्हणून खूप गोष्टी सुरू केल्या गेल्या. ज्यामध्ये निर्भया पथकापासून पोलीसमित्रपर्यंतच्या गोष्टी आहेत. या सगळ्यांसाठी सुचलेल्या कल्पनांची विशेष दाद द्यायला हवी, कारण कागदोपत्री का होईना या गोष्टी सुरळीत होत्या. साकिनाका घटनेनंतर मुंबईमध्ये रेल्वे स्थानकावर झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात हे आमच्या हद्दीत येत नाही म्हणून सुरुवातीला गुन्हाच नोंदवला गेला नाही. कुठलाही गुन्हा शोधण्याची सुरुवात ही महत्वाची असते हे वेगळं नमुद करण्याची गरच नाही. मग अल्पवयीन बलात्कारित पीडितेने 4 पोलीस ठाणी तिच्या मूलभूत हक्कासाठी फिरायची ही कुठली मानसिकता आहे. इथे परत तिच्यावर ओढावलेल्या प्रसंगाला दुय्यम स्थान देऊन टाळणारी व्यवस्था हीच कागदोपत्री उत्तम नियोजन दाखवणारी असते. का तिथे त्यांनी ज्याच्या हद्दीत आहे त्या पोलिसांना बोलवून घेतलं नाही.

का तिथे त्यांनी आम्ही तक्रार नोंदवतो आणि पुढे पाठवतो म्हटलं नाही. का नाही दिलं गेलं तिला महत्व. स्वतःचं काम वाढणार आहे म्हणून.. ही दरी आपण वाढवलेली आहे. जोपर्यंत ही दरी कमी होणार नाही, बाईकडे व्यक्ती म्हणून पहाण्याचा दृष्टिकोन तयार होणार नाही तोपर्यंत तिच्यावर होणाच्या अत्याचारांवर स्वतःची पोळी भाजून घेणारे कमी होणार नाहीत. तिच्या संघर्षाचं भांडवल करणारे कमी झाले, तिला आधी माणूस म्हणून स्वीकारणारे तयार झाले की तिची ताकद वाढेल. यामध्ये महिलांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या अस्तित्वाचे भांडवल करणार्‍या व्यक्ती या समाजात आहेत, तर त्याची किंमत त्यांनीही केली पाहिजे. मुळातच स्वतःला काय करायचं आहे, याला महत्व द्यायला हवे. आपल्या असण्याची, वागण्याची, वावरण्याची कारणं देण्यास तुम्ही बांधील नाही आहात. मग एखादा कठीण प्रसंग ओढवल्यावर त्याच्या आधारे स्त्रीचे लचके तोडणार्‍या समाजाचा फरक पडणार नाही.

–सई कावळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -