घरफिचर्ससारांशसत्तापिपासू भाजप!

सत्तापिपासू भाजप!

Subscribe

राज्यातील मंदिरे खुली करण्यावरून राज्यपाल व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सामना रंगला. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत राज्यपालांना आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिले. राज्यपालपद हे घटनानिर्मित आहे. ते संविधानाच्या पायावर उभे असून त्याचा गाभा धर्मनिरपेक्षता आहे. मात्र काळी टोपी आणि सफेद धोतर घालणार्‍या कोश्यारी यांनी ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणे म्हणजे भाजपने महाराष्ट्रात सत्ता गमावली या वेदनेचे मूळ आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या दुखणार्‍या पोटावर लेप लावण्याचा हा प्रकार झाला. वाईट हे आहे की, भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही कळा याव्यात हे जरा गंभीर आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे. राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते कोश्यारी यांनी दाखवून दिले आहे.

सध्या राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कधी पडणार? यासाठी भाजपचे नेते, भक्त देव पाण्यात बुडवून बसले आहेत. कोणी म्हणतो बिहार निवडणुकीचे निकाल लागले की महाराष्ट्रात सरकार कोसळणार. कोणी म्हणतायत आधी राष्ट्रपती राजवट जाहीर केली जाईल आणि नंतर भाजपचे सरकार सत्तेवर येईल. तयारी झाली आहे म्हणे… गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश विरोधकांकडून हिसकावून घेतल्यावर राजस्थानसुद्धा भाजपला ताब्यात घ्यायचे होते. सचिन पायलटला गळाला लावले होते, पण सत्तेचा मासा लागायच्या आधीच अशोक गेहलोत यांना भाजपचा सत्तापिपासूपणा लक्षात आला आणि त्यांचा गेम फसला. मात्र आज ना उद्या ते पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आटापिटा करणार. आता मोदी-शहा यांच्या भाजपला वेध लागलेत ते बिहार निवडणुकीचे.

जनता दल संयुक्तचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या साथीने ते पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी आतुर झालेत. एनडीएत आता फक्त नितीश कुमारांचा जनता दल शिल्लक राहिला असून भाजपने शिवसेना, अकाली दलसह सहयोगी पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. सत्तेसाठी आपल्या सहयोगी प्रादेशिक पक्षांना वापरून फेकून द्यायचे ही कुटनीती वापरणार्‍या भाजपचा हा खेळ आता फक्त नितीश कुमारांना बघायचा बाकी आहे. बिहार निवडणुकीत तो त्यांना नक्की दिसेल. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवानला आपल्या बाजूला वळवून लोक जनशक्ती पार्टीला नितीश कुमार यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला लावण्याची फूस भाजपची आहे, हे न ओळ्खण्याइतकी बिहारची जनता दूधखुळी नाही. बिहारच्या कणाकणात राजकारण आहे. पाटण्याचा पानवाला राजकीय अभ्यासकांना जमणार नाही, असे राजकीय पदर सहज उलगडून दाखवू शकतो.

- Advertisement -

चिराग यांची लोकजनशक्ती नितीश कुमार यांचे उमेदवार पाडण्यासाठी उभे केले जातील आणि पडद्यामागची ताकद असेल ती भाजपची. जसे महाराष्ट्रात केले तसाच हा प्रकार. आपल्याच मित्रपक्षाचे शिवसेनेचे उमेदवार पडून कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायची नाही, हा त्यामागचा डाव. शिवसेनेची ताकद खच्ची करून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान व्हायला निघालेल्या देवेंद्र फडणवीस यांना आपल्या हाती सत्ता नाही, हे अजून पचलेले नाही. याच सत्तापिपासू वृत्तीने आज महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची खुर्ची खिळखिळी करण्याचे खेळ सुरू असून या खेळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर आहेत, राष्ट्रपती राजवटीचा बागुलबुवा आहे, बदनामी करण्यासाठी भाजपचा आयटी सेल आहे, भाजप भक्तगण आहेत, भंपक अर्णव गोस्वामी आहे तसेच नटमोगरी कंगना रनौत आहे आणि सर्वांच्या वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आहेत.

राज्यातील मंदिरे खुली करण्यावरून राज्यपाल व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सामना रंगला. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत राज्यपालांना आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिले. राज्यपालपद हे घटनानिर्मित आहे. ते संविधानाच्या पायावर उभे असून त्याचा गाभा धर्मनिरपेक्षता आहे. मात्र काळी टोपी आणि सफेद धोतर घालणार्‍या कोश्यारी यांनी ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणे म्हणजे भाजपने महाराष्ट्रात सत्ता गमावली या वेदनेचे मूळ आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या दुखणार्‍या पोटावर लेप लावण्याचा हा प्रकार झाला. वाईट हे आहे की, भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही कळा याव्यात हे जरा गंभीर आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे.

- Advertisement -

राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते कोश्यारी यांनी दाखवून दिले आहे. कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजपचे नेते असतीलही; पण आज ते महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याचे राज्यपाल आहेत याचा त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतोय. महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात हे समजण्यासारखे आहे; पण त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा? हा खरा प्रश्न आहे. मंदिरे उघडा म्हणून भाजप आंदोलन करत असताना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारे पत्र पाठवणे हे सारे ठरवून होते. राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाले आहेत. मग प्रार्थनास्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असा सवाल राज्यपालांनी विचारला.

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम आहे, असे पंतप्रधान मोदी सांगतात व त्यांच्या मार्गदर्शनाची पर्वा न करता भाजपवाले व त्यांचे राज्यपाल मंदिरे उघडा, गर्दी झाली तरी हरकत नाही, असा धोषा लावतात हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. रेस्टॉरंट उघडले ते नियमांचे कोटेकोरपणे पालन करून. देवांना बंद करून ठेवायला कुणाला आनंद वाटत नाही; पण एकदा मंदिरात प्रचंड गर्दीचे लोंढे आले की कोरोना संक्रमणाचे लोंढे वाढतील यावर देशाचे आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. मंदिरे उघडण्यावरून महाराष्ट्र सरकारला विचारणा करणारे राज्यपाल कोश्यारी गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तोच सवाल का करीत नाहीत? हे असले सवाल-जवाब फक्त महाराष्ट्रातच सुरू आहेत. कारण येथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत. मुंबईस पाकिस्तान ‘बाबर सेना’ म्हणणार्‍या एका नटीचे आगत-स्वागत करताना राजभवनात हिंदुत्व ओशाळून पडले याची चिंता राज्यपालांनी बाळगली नाही, हे का? इतकेच कशाला, भाजपची कायम तळी उचलणार्‍या रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत घाणेरडे हल्ले करतात हा मुख्यमंत्री या लोकनियुक्त संस्थेचा अपमान आहे, असे वाटून कोश्यारी यांनी त्यांची कानउघाडणी केली असती तर राज्यपालांची उंची, सन्मान वाढला असता. पण तसे काही झाल्याचे दिसले नाही. गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे, हेच यातून दिसले.

‘महाराष्ट्रात डिसेंबर महिना सुरू होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू होईल’, असे भाकीत करून प्रकाश आंबेडकर यांनी सनसनाटी निर्माण केली आहे. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय कोणत्या आधारावर होणार आहे, याचा तर्कही प्रकाश आंबेडकर यांनी लावला आहे. केंद्र विरुद्ध महाराष्ट्र सरकार या संघर्षातून राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागेल, असे आंबेडकर यांना वाटते आहे. विशेष म्हणजे राज्यात कोरोनाचा संसर्ग जोरात असताना आंबेडकरांना सलून आणि मंदिरे सुरु करायची होती. त्यासाठी त्यांनी आंदोलने केली आणि त्यांच्यापासून स्फूरण घेत मग भाजपने मंदिरे सुरू करण्यासाठी टाळ वाजवायला सुरुवात केली. आंबडेकर यांची भूमिका, त्यांचे तर्क, निवडणुकांमधील त्यांच्या आघाड्या हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील भल्याभल्या लोकांना चकित करणारी आहे. ते असो किंवा ओवेसी यांना भाजपची बी टीम असल्याचा आरोप का केला जातो? याचे उत्तर या अशा अनाकलनीय वागण्यात आहे.

महराष्ट्रात सत्तेचा घास थोडक्यात हिरावला गेल्याने फडणवीस ठाकरे सरकारच्या पहिल्या दिवसापासून अस्वस्थ आहेत. तीन पक्षांचे ठाकरे सरकार आम्ही नाही पाडणार, हे सरकार स्वतःच पडेल, असा दैवी साक्षात्कार फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांना वेळोवेळी होत असतो. आपण सत्तेत नाही, हे अजूनही त्यांच्या पचनी पडलेले नाही, ही पोटदुखी आहे. या दुखीमुळेच राष्ट्रपती राजवटीच्या पुड्या आंबेडकर यांच्या तोंडून सोडत, दिल्लीहून यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत ठाकरे सरकार अस्थिर करण्याचा डाव रचला जातो. बरे झाले, सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणा, अशी याचिका करणार्‍यांना फटकारले. पण, सत्तापिपासू भाजप शांत बसणार नाही. ते ठाकरे सरकार पाडण्याची एकही संधी सोडणार नाहीत, हे निश्चित. सत्तेशिवाय त्यांचा जीव कासावीस होतोय हेच खरे!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -