घरफिचर्ससारांशलोकसंख्या नियंत्रणाची लोकचळवळ!

लोकसंख्या नियंत्रणाची लोकचळवळ!

Subscribe

मानव समाज आपलं दैनंदिन जीवन जगताना अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्यातील बहुतांश समस्यांची जननी ही भरमसाठ लोकसंख्यावाढ आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती व्हायला हवी. त्यात सगळ्यांनीच सहभागी व्हायला हवे. एका बाजूने भरमसाठ वाढत चाललेली लोकसंख्या नियंत्रित करायला हवी, तर दुसर्‍या बाजूने कौशल्यगुण संपादन केलेल्या पिढ्या तयार करायला हव्यात, जेणेकरून येणार्‍या तंत्रज्ञानाधिष्ठित युगात प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. म्हणजे प्रत्येक जण आपलं जीवन किमान सुखकर व आनंददायी नक्कीच जगू शकेल. लोकसंख्येत भारत चीनला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. आता या वाढत्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणाची चळवळ उभी राहणे आत्यंतिक गरजेचे आहे.

– अमोल पाटील

‘कुटुंब लहान सुख महान’ लोकसंख्या वाढ नियंत्रण जनजागृतीसाठी निघालेल्या प्रभात फेर्‍यांमधील हे घोषवाक्य. अशी प्रभात फेरी आपली सदसदविवेकबुद्धी जागृत ठेवून अनुभवलेल्या व्यक्तीच्या स्मरणात नक्कीच असेल. मुळात ही एक घोषणा असली तरी त्यात बोध मात्र फार मोठा आहे. प्रथमदर्शनी साध्या आणि सहज वाटणार्‍या गोष्टीतच मोठमोठ्या समस्यांची उकल लपलेली असते तसेच या घोषणेबाबत म्हणावे लागेल. आज आपल्या अवतीभोवती ज्या समस्यांना, आव्हानांना आपल्याला रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तोंड द्यावे लागत असते त्यातील बहुतांश समस्यांचे मूळ हे भरमसाठ वाढत चाललेल्या लोकसंख्येत आहे. सर्व समस्यांच्या मुळात जाऊन त्यांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की यापैकी बहुतांश समस्यांची जननी ही भरमसाठ वाढत चाललेली लोकसंख्या आहे. अगदी पूर्वीच्या काळचा जर आपण अभ्यास केला तर इथल्या समृद्धीसाठी ज्या काही कारणीभूत बाबी असतील त्यामध्ये मर्यादित लोकसंख्या हे एक कारण नक्कीच अग्रगण्य आहे. आपल्या अवतीभोवतीच्या कुटुंबांकडे जर आपण सहज नजर फिरवली तर जे कुटुंब लहान आहे ते सुखासमाधानाने नांदताना आपल्या पाहण्यात येईल, तर नेमकं याच्या उलट साध्या गरजांसाठीही मोठ्या कुटुंबाची वणवण होत असल्याचे आपल्या लक्षात येईल. या सर्वांचे मूळ माणसाच्या अज्ञान आणि अंधश्रद्धेत आहे.

- Advertisement -

बेरोजगारी, महागाई अशा भीषण समस्या आणि आरोग्य, दळणवळण अशा मूलभूत सोयीसुविधांवरील ताण या आणि अशा कितीतरी बाबी आज लोकसंख्यावाढीमुळे आपल्यासमोर आ वासून उभ्या आहेत. हे वास्तव समाजातील कुणीही अभ्यासू व्यक्ती मान्य करेल. एका बाजूने भरमसाठ लोकसंख्येची वाढ होत आहे, तर दुसर्‍या बाजूने माणसाच्या अगदी दैनंदिन जीवनापासून ते अगदी सर्वच क्षेत्रांतील प्रत्येक कामात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा परिणाम असा झाला की समाजातील एक मोठा तरुणवर्ग आज कामापासून वंचित होत आहे आणि हीच बेरोजगारीची मोठी समस्या म्हणून आपल्यासमोर उभी राहिली आहे. कदाचित ही सुरुवात आहे. येणार्‍या काळात जर अशीच परिस्थिती राहिली तर आणखी गंभीर परिणाम होतील. काळाची ही पावले अचूक हेरून या भीषण वास्तवापासून स्वत:सह अखिल मानव समाजाला वाचवण्यासाठी लोकसंख्या वाढ नियंत्रणाबद्दल जागृती निर्माण होण्याची खरोखर गरज निर्माण झाली आहे. जगाच्या पाठीवर आज कितीतरी असे प्रगत देश आहेत की ज्यांच्या प्रगत असण्यामध्ये तेथील मर्यादित लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. आपल्याकडे नेमकी याउलट परिस्थिती आहे. आज आपला देश या भरमसाठ वाढत चाललेल्या लोकसंख्या वाढीमुळे अनेक नवनव्या आव्हानांना तोंड देत आहे. याचा विचार समाजातील प्रत्येक सुज्ञ व सुजाण घटकाने प्राथमिकतेने करण्याची गरज आहे. यावर चिकित्सक विचार करून समस्या निवारणाच्या दृष्टीने पावले पडतील तेव्हा आपली वाटचाल समृद्धीकडे सुरू झाली असे म्हणावे लागेल.

आज आपल्या अवतीभोवती नजर फिरवली तर अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांसाठीही प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या बाबतीत तर अक्षरश: माणूस हवालदिल होत आहे. प्रत्येक क्षेत्रात बाजारीकरण घुसू पाहत आहे किंबहुना काही अंशी घुसलेले आहे. आज प्रत्येक गोष्ट पैशांवर येऊन थांबली आहे. या परिस्थितीत हव्या त्या मार्गाने पैसे कमवा आणि आपल्या व आपल्या पुढील पिढ्यांच्या भविष्याची सोय करून घ्या हे असले मानव समाजासाठीचे अत्यंत घातक पायंडे समाजात मूळ धरत आहेत. माणसाची माणसांच्याच लेखी शून्य किंमत झाली आहे. सर्वात अनमोल असलेला माणसाचा जीव कवडीमोल झाला आहे. हे सारे दुष्टचक्र आणखी कुणी आपल्यावर लादले नाही तर ते आपल्याच विचारांची, आपल्याच कर्माची मिळालेली देणगी आहे. हे बदलायचे असेल तर आजपर्यंत ज्या दिशेने आपण विचार आणि कर्म करीत राहिलो नेमकं त्यात बदल करीत नवीन विधायक व परिवर्तनवादी विचारांची जोपासना करण्याची गरज आहे. ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. निसर्गाचा घटक म्हणून निसर्गाचे सौंदर्य आबाधित ठेवणे आपले काम आहे. समाजाचे जीवनमान अधिकाधिक प्रगतशील करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे.

- Advertisement -

एका बाजूला गावं ओसाड पडत चालली आहेत आणि शहरं बकाल होत चालली आहेत. ही आज आपल्या पदरात आपणच टाकून घेतलेली फार मोठी व विदारक समस्या आहे. शहरी लोकसंख्येत प्रतिदिन होत चाललेली वाढ चिंतनाचा विषय आहे. यामुळे मूलभूत सोयीसुविधांवर पडत चाललेला ताण आणि त्यातून बारगळत चाललेल्या सोयीसुविधा पाहायला मिळतात. कुठल्याही गोष्टीची एक मर्यादा असते. एखाद्या पेल्यामध्ये तिथपर्यंतच आपण पाणी भरू शकतो किंवा तो पेला ते पाणी सहन करू शकतो जिथपर्यंत त्याची क्षमता आहे. त्याची क्षमता संपली आणि आपण त्यात त्याच्या क्षमतेबाहेर पाणी भरण्याचा प्रयत्न केला तर ते अतिरिक्त पाणी स्वत:मध्ये सामावून घेण्यास तो पेला समर्थ ठरू शकत नाही. हेच तत्त्व दुसर्‍या उदाहरणाद्वारे समजून घ्यायचे तर एखाद्या फुग्यात एका मर्यादेपर्यंत हवा भरली तरच तो फुगा सर्वांसाठी एक सौंदर्य वस्तू ठरू शकतो, पण त्याच फुग्यात जर प्रमाणाबाहेर हवा भरली तर तो फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही. शहरांत आज बेसुमार लोकसंख्येचे एकत्रिकरण होत आहे. त्यामुळे मूलभूत सोयीसुविधांवर तणाव निर्माण होत आहे. शहरे बकाल होत आहेत. गावं स्वयंपूर्ण आणि शहरं समृद्ध हवी असतील तर आपल्याला या लोकसंख्येच्या व्यस्त प्रमाणाबाबत विचार करून तशी धोरणं राबवण्याची वेळ खरोखर आली आहे.

मानव समाज आपल्या दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्यातील बहुतांश समस्यांची जननी भरमसाठ लोकसंख्या वाढ आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती व्हायला हवी. त्यात सगळ्यांनीच सहभागी व्हायला हवे. एका बाजूने भरमसाठ वाढत चाललेली लोकसंख्या नियंत्रित करायला हवी, तर दुसर्‍या बाजूने कौशल्यगुण संपादन केलेल्या पिढ्या तयार करायला हव्यात, जेणेकरून येणार्‍या तंत्रज्ञानाधिष्ठित युगात प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. म्हणजे प्रत्येक जण आपलं जीवन किमान सुखकर व आनंददायी नक्कीच जगू शकेल. यासाठी एक संवेदनशील समाज म्हणून प्रत्येकाने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. एखादा विषय जेव्हा एक लोकचळवळ म्हणून पुढे येतो तेव्हा तो विषय लोक स्वत: स्वत:च्या सर्वांगीण विकासासाठी अंगीकृत करून स्वत:चं जीवनमान उंचावत असतात. स्वयंस्फूर्त जनजागृतीचं काम प्रत्येक लोकहितकारी मुद्यासंदर्भात व्हायला हवे. ज्या दिवशी तसे घडायला सुरुवात होईल तो दिवस मानवी समाजाच्या मंगलमय व सर्वसुखकारी पर्वाचा आरंभ दिवस असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -