गरज सकारात्मक विचारांची….

तुमच्या आणि माझ्यातलं नातं हरवत चाललं आहे. मी आणि माझाच अशी व्यक्तिकेंद्री प्रवृत्ती पाहायला मिळते. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागणार आहे. निदान या नववर्षाच्या आगमनापासून तरी आपण एकमेकांना समजून घेऊ जेणेकरून नात्यांमधला गोडवा टिकून राहील. जे सामाजिक दुही माजवण्यासाठी विष पेरत आहेत त्यांना उत्तर म्हणून आपली संस्कृती कोणती हे लक्षात आणून देणे आपलं कर्तव्य आहे. जो सोशल मीडिया आपल्या हातात आहे त्याद्वारे आपण थोड्याबहुत प्रमाणात बदल घडवून आणू शकतो. गरज आहे आपल्या सकारात्मक विचारांची....

सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण नववर्षाचे स्वागत केले आहे. पाठीमागच्या दोन वर्षांपासून आपल्या भोवती असणारा कोरोनाचा विळखा आणि त्यातच आता नव्याने आलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणून ओमायक्रॉन याचादेखील सामना आपल्याला करावा लागत आहे. सरत्या वर्षात काय कमावलं काय गमावलं या सगळ्या गोष्टींचा हिशोब लावणं शक्य नाही. जर याचा हिशोब करायला गेलो तर हातात मात्र शून्य येईल हे नक्की. लॉकडाऊनच्या पूर्वी उभे केलेले अनेकांचे व्यवसाय बंद पडले, वेगवेगळ्या क्षेत्रातील हजारो तरुणांचे रोजगार गेले, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते वय वाढल्यामुळे त्यांच्या हातातून परीक्षा गेल्या. शासकीय नोकर्‍या नाहीत म्हणून छोटा-मोठा उद्योग करावा असे अनेकांना वाटते, पण भांडवल नाही. जे हातावर पोट घेऊन आहेत त्यांना रोज काम मिळाले तरच कुटुंबाचा खर्च भागवू शकतो त्यांचे हाल सांगायलाच नकोत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा तर प्रत्येक वेळी हिरमोड झालेला पाहायला मिळतो. जी लहान मुलं आहेत ऑनलाइन क्लासमुळे कंटाळली आहेत. सतत घरीच बसून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताचे दरडोई उत्पन्न नेहमीपेक्षा खाली आले, जीडीपीमध्ये ही घसरण होत आहे. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपल्याला सामना करावा लागतोय किंवा समस्या म्हणून त्या आपल्या समोर उभ्या राहिल्या. त्यात सुरुवातीच्या काळात लस मिळाली नाही. लस घेतल्यानंतरही ती परिणामकारक आहे किंवा नाही यामध्येच अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी सरकारची बदलणारी धोरणे आणि यात सापडलेला सामान्य नागरिक यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच झाली आहे. या सगळ्यांचा हिशोब नव्या वर्षात करणार तरी कसा….

तरीसुद्धा आपण उभे आहोत हे काय कमी नाही. हातातून वाळू निसटून जावी आणि हातात काहीच शिल्लक राहू नये अशी अवस्था आजच्या युवकांची झाली आहे. वाटले होते सरकार यावर काही उपाय करेल. पण तसे करेल ते सरकार कसले…नुकतेच विधिमंडळ आणि संसदेचे अधिवेशन पार पडले पण युवकांना घेऊन कोणत्याच प्रकारे चर्चा झाली नाही ही शोकांतिका…. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील विद्यार्थी ज्यांना एम फिलचे संशोधन करण्यासाठी बार्टी या संस्थेची फेलोशिप मिळाली होती, त्यांची मागणी अशी आहे की यूजीसीच्या धर्तीवर पीएचडीसाठी देखील ही फेलोशिप मिळावी. भर पावसात सामाजिक न्यायमंत्र्यांच्या गावात त्यांचे उपोषण सुरू आहे. पण त्याची विधिमंडळात कोणत्याच लोकप्रतिनिधीने दखल घेतली नाही. आजचा काळ किती सोकावला आहे हेच याचे उदाहरण. ‘जो सत्य बोलतो तो देशद्रोही ठरतो, जो हक्क मागतो तो सुद्धा.. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का..? याचीच वाट आम्ही बघत आहोत असे म्हणत उपोषण सुरूच आहे. दखल घेवो अथवा न घेवो आम्ही लढा सुरू ठेवू… ही जिद्द त्यांच्या मनात आहे. हेच शेतकर्‍यांच्या बाबतीतसुद्धा पाहायला मिळते. रब्बी आणि खरीप हंगामात घेतलेले पीक हाताशी आले नाही, सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे. सगळ्यांच्याच अस्ताव्यस्त जगण्याला उपाय शोधण्याऐवजी त्यावर लॉकडाऊनचा मारा केला जातोय. प्रसारमाध्यमांनी यांचे प्रश्न मांडण्याऐवजी भारत 2014 रोजी स्वातंत्र्य झाला याच्याच बातम्या दाखवून आपला टीआरपी वाढवून घेतला. इथे अवस्था हीच झाली आहे पावसाने झोडपले, राजाने मारले दाद कुणाकडे मागायची….?

एकूणच काय तर माणूस माणसापासून दुरावत चालला आहे हेच आजचा काळ बोलतोय. हातात आलेल्या मोबाईल मुळे वेगल्या ट्रेंडकडे धावणारे काही लोक आहेत. तर काही लोक प्रेक्षक म्हणून आनंद घेत आहेत. पण प्रेक्षकांची गॅलरीसुद्धा इथे सुरक्षित नाही. या आठवड्यात औरंगाबाद येथे जीवन विकास ग्रंथालयाच्या एका कार्यक्रमात मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. कैलास अंभुरे सर यांनी अत्यंत महत्त्वाचे चिंतनशील मत व्यक्त केले. ते असे म्हणाले की, ‘आजचा काळ हा अत्यंत संभ्रमाच्या काळ आहे, इथे एकीकडे सोशल मीडियाचे थैमान असलेले दिसते…तर कोविडने पावणेदोन वर्षांपासून भीतीचे वातावरण निर्माण केले आहे, भीतीयुक्त काळामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्या जगण्याचा संकोच होत आहे. आपल्या आजूबाजूला कुणाला शिंक आली किंवा ठसका जरी लागला तर आपण त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहायला लागतो. माणसामाणसांमध्ये अविश्वास निर्माण व्हावा, माणुसकीचं नातं अतिशय दुर्मिळ व्हावं असा हा काळ आहे… आणि याच काळात आम्ही आणि आमच्या पिढ्या सुद्धा जगात आहेत ही विचार करण्यासारखी बाब आहे.. आपण मनसोक्तपणे कुठेतरी फिरत असताना, नैसर्गिक हालचाली करत असताना अचानक समोर एक फलक दिसतो.. त्यावर लिहिलेले असते की आपण सीसीटीव्हीच्या नजरेत आहात. त्यावेळी आपलं वर्तन बदलायला लागतं. हे बदलणारं वर्तन आपल्या नैसर्गिक जगण्याचा संकोच दाखवतं. आज सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीला तात्काळ व्यक्त होण्याच्या नादात प्रतिक्रियावादी बनवलं आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप पाहत असताना आपण स्क्रोल करत असतो. यामुळे आजच्या काळात दोन वर्ग निर्माण झालेत एक स्क्रोलवादी आणि एक ट्रोलवादी…. यामुळे लाईक कमेंट शेअरच्या नादात आम्ही माणुसकी विसरत चाललो आहोत हेही तितकंच खरं आहे….’ सरांचं हे मत विचार करण्यासारखं आहे. खरंच जीवन जगत असताना आपण कोणत्या पद्धतीने जगत आहोत..? हा प्रश्न आपल्याला पडत नाही हीच सर्वात मोठी शोकांतिका….

या सगळ्यांचा नेमका परिपाक आहे तरी काय.. तुमच्या आणि माझ्यातलं नातं हरवत चाललं आहे. मी आणि माझाच अशी व्यक्तिकेंद्री प्रवृत्ती पाहायला मिळते. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागणार आहे. निदान या नववर्षाच्या आगमनापासून तरी आपण एकमेकांना समजून घेऊ जेणेकरून नात्यांमधला गोडवा टिकून राहील. जे सामाजिक दुही माजवण्यासाठी विष पेरत आहेत त्यांना उत्तर म्हणून आपली संस्कृती कोणती हे लक्षात आणून देणे आपलं कर्तव्य आहे. जो सोशल मीडिया आपल्या हातात आहे त्याद्वारे आपण थोड्याबहुत प्रमाणात बदल घडवून आणू शकतो. गरज आहे आपल्या सकारात्मक विचारांची….सोशल मीडियावर रोज एक नवा ट्रेंड पाहायला मिळतो जो अल्पशा काळासाठी टिकतो. एखादा ट्रेंड खूप काही शिकवून जातो पण काही ट्रेंड असेही पाहायला मिळाले ज्याने अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले. या चालू वर्षात आपण याच सर्व सामाजिक आणि अवतीभवतीच्या ट्रेंडवरती बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. एकमेकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपायसुद्धा आपण सुचवू शकता. तूर्तास तरी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊयात आणि स्वागत करूया आपल्या उज्वल भविष्याचे…. चलो तो फिर इस्तकबाल करते है आनेवाले साल का…

– लेखक, धम्मपाल जाधव