घरफिचर्ससारांशजागतिकीकरणानंतरचा भारतीय सिनेमा

जागतिकीकरणानंतरचा भारतीय सिनेमा

Subscribe

जागतिकीकरणाने प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण केली, या स्पर्धेत जे टिकले तेच आजही कायम आहेत. कधीकाळी ज्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये तिकीट मिळविण्यासाठी मारामारी व्हायची आता तिचं थिएटर शेवटच्या घटका मोजतायत, कारणही तसंच आहे. ज्या प्रेक्षकांना सिंगल स्क्रीन थिएटरमधला पंखा, घामाने ओल्या होऊन पुन्हा सुकलेल्या खुर्च्या, स्वस्तात मिळणारा समोसा आवडायचा त्यांना आता मल्टिप्लेक्सचा अडीचशे रुपयांचा पॉपकॉर्न आवडू लागलाय. आता त्यात त्यांची चूक आहे असं नाही, पण ज्यांना पडद्यावर नायिकेला जकुझीमध्ये अंघोळ करताना, वेस्टर्न ब्रेकफास्ट करताना पाहायचं आहे त्यांना ते सगळं तशा खुर्च्यांवर बसून बघणं कसं आवडेल?

जगातील कुठल्याही क्रांतीचे परिणाम कधीच एकांगी नसतात, जसे चांगले तसे वाईट परिणामदेखील पाहायला मिळतात. भारताने जागतिकीकरण स्वीकारलं म्हणा किंवा स्वीकारावं लागलं म्हणा … पण त्याचे परिणाम त्यावेळेच्या प्रत्येक क्षेत्रावर झाले, काही तत्कालीन होते तर काही दूरगामी, पण एकही क्षेत्र त्यापासून सुटले नाही. मनोरंजनाच्या क्षेत्रात तर नवी क्रांती जन्माला आली होती. दूरदर्शन पाहण्याची सवय झालेल्या प्रेक्षकाला स्टार टीव्ही, झी टीव्ही, एम टीव्हीसारखे अनेक ऑप्शन उपलब्ध झाले होते. मल्टिप्लेक्स कल्चर हळूहळू मिडल क्लास नावाच्या नव्याने जन्माला आलेल्या प्रजातीला भुरळ घालू लागले होते. एकाच वेळी थिएटरमध्ये 4 सिनेमे सुरू असल्याने तिथंही ऑप्शन आलंच होतं. मजूर शब्दाची व्याख्या आणि रूप पूर्णतः बदललं होतं. कोळसा खाणीत, मिलमध्ये काम करणार्‍या मजुराला, शर्ट टाय घालून खुर्चीवर बसवण्यात आलं.

मजुरी आणि काम तेवढंच ठेवून हे कॉर्पोरेट कल्चर निर्माण झालं, सामान्य माणसालाही या कल्चरमध्ये आपली पिळवणूक होतीये हे कळत नव्हतं. तो त्याच्या आयुष्यात खूश होता. सगळं काही स्वप्नवत होतं, अशा स्वप्नात राहणार्‍या मिडल क्लासला ना त्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार्‍या काला पथ्थरच्या विजयची गरज होती, ना मिल बंद पडली म्हणून मालकांविरुद्व बंद करणार्‍या एखाद्या नायकाची …ज्यांना आपल्यावर अन्याय होतोय, हेच माहिती नव्हतं त्यांना त्या नायकांची गरज तरी काय ? म्हणून हिंदी सिनेमातदेखील बदल झाला. नव्वदीपर्यंत सामान्य माणसांचा असलेला सिनेमा नंतरही सामान्य माणसांचाच राहिला, पण त्यात येत राहिली सगळी असामान्य पात्रं. कारण त्या सामान्य प्रेक्षकाला हवं होतं सगळं काही लार्जर दॅन लाईफ.

- Advertisement -

नव्वदीनंतर हेच सर्व आपल्याला पाहायला मिळू लागलं. आपल्याकडे पैसा आला की, आपल्या आवडी निवडी बदलतात. प्रायॉरिटीज बदलतात, जागतिकीकरणानंतर हेच झालं. दिवसातून एकदा तोंड धुणार्‍या तरुणाला आता फेस वॉश कळलं, गोर्‍या होण्याच्या क्रीम कळू लागल्या आणि त्यानुसार त्याचे हिरोजसुद्धा बदलले. गोरे, मिश्या नसलेले, अंगावर केस नसलेले, मुलीला आपल्या स्टाईलने घायाळ करणारे, दोन बाईकवर पाय ठेऊन प्रपोज करायला जाणारे हिरोज त्याला आपले वाटायले लागले आणि तिथून जन्म झाला स्टारच्या ब्रँड होण्याला, सलमान, शाहरुख, आमिर, अजय, अक्षय ही तीच काही नावं ज्यांचा ब्रँड बनला आणि विकला.

अनेकवेळा सिनेमा तुम्हाला भोवतालच्या सत्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, रोजची दुःख, ताणतणाव पुन्हा पडद्यावर पाहायला कोणाला आवडेल ? नव्वदीच्या काळात हेच झालं. बाबरी मस्जिद , हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण, अंडरवर्ल्ड, बॉम्बस्फोट अशा एक ना अनेक घटनांमुळे सामान्य माणसाला त्रास होत होता, यापासूनच त्याला दूर ठेवण्यासाठी स्वप्न दाखविण्यात आलं. असं स्वप्न जे तो स्वतः बघत होता, त्याला नायक दाखवला, जो समाज बदलायला जन्म घेतो, पण त्या नायकाचं वेगळे पण होतं, तो एखाद्या झोपडीत जन्म घेतलेला नव्हता ना खाणीत काम करत वाढलेला…मिडल क्लाससारख्या हुशार लोकांच्या समस्या समजण्यासाठी त्या नायकाचं स्वतः हुशार असणं गरजेचं होतं, म्हणून तो परदेशात शिकलेला असायचा, तो तिकडून इकडे समाज सुधरविण्यासाठी यायचा, भारतीय संस्कृती आणि संस्कार याबद्दल बोलायचा आणि तेच तर प्रेक्षकांना हवं होतं.

- Advertisement -

या नायकाचा मुख्य उद्देश केवळ समाज सुधारणा नव्हता, तर सोबतच नायिकेला आपल्या प्रेमात पाडून तिच्यासोबत संसार थाटायचं स्वप्न तो सोबत घेऊन यायचा. नव्वदीतल्या बर्‍याच सिनेमांत तुम्हाला हीच गोष्ट जाणवेल, इथं नायकाचा संघर्ष केवळ नायिकेला आणि तिच्या घरच्यांना पटवून शेवटी लग्न करणं हाच होता. म्हणून तर याच काळात शाहरुख रोमँटिक हिरो म्हणून, सलमान टपोरी आणि सिंगल पोरांचा नायक म्हणून, अजय दिलजल्या आशिकांचा नायक म्हणून जन्माला आला. जागितिकीकरणानंतर सिनेमांच्या केवळ कथेत आणि नायकामध्ये बदल झाला नाही तर एकूणच तंत्रात आणि सादरीकरणातसुद्धा आमूलाग्र बदल घडले. अलिशान हवेलीत राहणारा हिरोनंतर फ्लॅटमध्ये आला, कबुतरांच्या जागी तो नायिकेला मोबाईलने मेसेज करू लागला. बजेट वाढलं तेव्हा स्वित्झर्लंड जाऊन इटली, अमेरिका, फ्रान्स आणि असे अनेक देश चित्रीकरणासाठी खुले झाले. सिनेमातलं एक गाणंसुद्धा वेगवेगळ्या देशात शूट करण्यात येऊ लागलं, जे जे मिडल क्लासला रियल लाईफमध्ये शक्य नव्हतं ते ते त्याला पडद्यावर दाखविण्यात येऊ लागलं. सिनेमा समाजाचा आरसा होता आणि आहेसुद्धा फक्त फरक हा झालाय की, आधी त्या आरशात आपण दिसायचो आणि आता आपल्याला जे हवंय ते दिसतंय.

जागतिकीकरणाने प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण केली, या स्पर्धेत जे टिकले तेच आजही कायम आहेत. कधीकाळी ज्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये तिकीट मिळविण्यासाठी मारामारी व्हायची आता तिचं थिएटर शेवटच्या घटका मोजतायत, कारणही तसंच आहे. ज्या प्रेक्षकांना सिंगल स्क्रीन थिएटरमधला पंखा, घामाने ओल्या होऊन पुन्हा सुकलेल्या खुर्च्या, स्वस्तात मिळणारा समोसा आवडायचा त्यांना आता मल्टिप्लेक्सचा अडीचशे रुपयांचा पॉपकॉर्न आवडू लागलाय. आता त्यात त्यांची चूक आहे असं नाही, पण ज्यांना पडद्यावर नायिकेला जकुझीमध्ये अंघोळ करताना, वेस्टर्न ब्रेकफास्ट करताना पाहायचं आहे त्यांना ते सगळं तशा खुर्च्यांवर बसून बघणं कसं आवडेल? आणि जसं मी आधीही सांगितलं की, पैसा आला की लाइफस्टाइल चेंज होते, ती चेंज झाली आणि जे चेंज झाले नाही त्यांना व्यवसाय बंद करावा लागला. 1991 पासून ते 2015 अशा 25 वर्षांचा एक टप्पा जवळपास सारखा होता. याकाळात येणार्‍या सिनेमांमध्ये फार आमूलाग्र असे बदल झाले नाहीत.

समांतर सिनेमा किंवा नवनवीन प्रयोग मात्र होत राहिले. पण 2015 नंतर या व्याख्या बर्‍याच बदलल्या. विशेषतः ओटीटी माध्यमांच्या आगमनानंतर संपूर्ण इंडस्ट्रीचे रूप पालटू लागलंय. 25 वर्ष गाजत राहिलेला फॉर्म्युला लोकांना खटकू लागला. ज्यांनी एक काळ गाजवला, ज्यांनी आपली इमेज टिकविण्यासाठी खासगी आयुष्यात बदल केले त्याच कलाकारांचे सिनेमे आता प्रेक्षकांनी नाकारले होते. लोकांचं मनोरंजन करणं अवघड काम आहे. एक फॉर्म्युला कधीपर्यंत चालेल सांगता येत नाही आणि तेच घडलं. इंडस्ट्रीत काही नवीन चेहरे जन्माला आले जे आधीही होतेच, पण त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. इंडियाला प्रेक्षक कंटाळला आणि मुंबई, दिल्लीच्या कथा आता बाकीकडे जन्म घेऊ लागल्या. ग्रामीण भारताकडे वळलेल्या इंडस्ट्रीला आता त्याच भारताचे चेहरे हवे होते आणि ज्यांना मुंबई किंवा परदेशातील चेहरे दाखविले त्यांना तसं बनविणं शक्य नव्हतं. म्हणून इंडस्ट्रीला मिळाला आयुष्मान खुराणा, विकी कौशल, राजकुमार राव, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि असे बरेच कलाकार जे सिनेमात आधी केवळ 5 /10 मिनिटांच्या सीन्स पुरते मर्यादित होते.

हिंदी सिनेमा असो किंवा भारतीय प्रादेशिक सिनेमा यांचा नेहमीच एक प्रेक्षकवर्ग राहिलाय ज्यांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केलंय. जागतिकीकरणाच्या नंतर 25 वर्षे हिंदी सिनेमा प्रेक्षकांना स्वप्नातलं विश्व दाखविण्यात मग्न होता (अपवाद वगळता ), पण आता तो पुन्हा जमिनीवर येऊ लागलाय. जागतिकीकरणानंतर सामान्यांच्या समस्येत बदल झालेला नाहीये. केवळ स्वरूप बदललं आहे. मिल मजुरांची जागा आता आयटी सेक्टरमधल्या बेकारांनी घेतलीये, जॉब जाईल या भीतीने बॉसच्या शिव्या खाणार्‍या मजुरांमध्येही बंड ठासून भरलाय. भारतात कंटेंटची कमी कधीच नव्हती म्हणून आता केवळ तो कंटेंट घेऊन त्याचं सादरीकरण होणं गरजेचं आहे. मनोरंजनाची व्हॅल्यू जपत सोन्याच्या खाणीत काम करणार्‍या मजुरांचं जीवन दाखविणारे केजीएफसारखे सिनेमे अजून बनू शकतात.

खाजगीकरणाच्या जाळ्यात अडकलेल्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार, अजूनही न संपलेल्या जातीव्यवस्थेवर भाष्य करणारे, सर्वांचा फेव्हरेट असूनही कायम वरवरचे चित्रण केलेल्या भारतीय राजकारणावर भाष्य करणारे, बेरोजगारीची टांगती तलवार असतानाही त्याची जाणीव नसताना आपल्या भावना आणि अस्मिता यांच्या युद्धात कुणाच्या तरी हातची बाहुली म्हणून काम करणार्‍या युवकांच्या जीवनावर भाष्य करणारे, स्त्री अत्याचार, सबलीकरण अशा एक ना अनेक विषयांवर भाष्य करणारे सिनेमे बनू शकतात. गेल्या काही वर्षात असे प्रयोग वाढले आहेत. जी सकारात्मक बाब आहे. वेबसीरिजच्या नव्या माध्यमाचा पुरेपूर वापरदेखील सुरू झालाय. पहिली 2 वर्षे केवळ क्राईम थ्रिलरमध्ये अडकलेल्या सिरीज आता वेगवेगळे विषय हाताळू लागल्या आहेत. जागतिकीकरणानंतर स्वप्न दाखविणार्‍या सिनेमा नावाच्या आरशात पुन्हा एकदा सामान्य माणसाला आपली प्रतिमा दिसेल इतकीच अपेक्षा आहे.a

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -