घरफिचर्ससारांशवेगळा विदर्भ आणि प्रकाशावरचा अंधार!

वेगळा विदर्भ आणि प्रकाशावरचा अंधार!

Subscribe

‘वेगळा विदर्भ आणि प्रकाशावरचा अंधार!’ हे शीर्षक वाचून कुणालादेखील प्रश्न पडेल की याचा काय संबंध आहे, परंतु यांचा संबंध आहे हा उलगडा माझ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिकाला होणे आवश्यक आहे. मानवी मनाचा काळेपणा दिसत नाही पण कोळसा किती काळा हे आपण सहज बोलतो. विज्ञान-तंत्रज्ञान हे मानवी सभ्यता आणि जीवन सुखकर करण्यासाठी आहे. चंद्रपूरचे विजनिर्मिती केंद्र, घराघरातील प्रकाश आणि विदर्भातील अंधार यांचा संबंध जोडतानाच प्रकाशाचा अंधार ही दिसून आला. पण नेशन फर्स्ट या मोहिमे अंतर्गत विदर्भ दौरा केला तेव्हा चकाकणार्‍या प्रगतीच्या प्रकाशाबरोबर विविध रूपातील अंधार दिसू लागला आणि वाटू लागले की, प्रकाशावर किती अंधार आहे.

चंद्रपूर वीज केंद्र हे खरंतर पुणे, मुंबई, नाशिक असे कुठे कुठे आपल्या विद्युत शक्तीने प्रकाश पसरविते. राजकारणाचा भाग सोडला तरी एक गोष्ट समजून घ्यायला हवी की वातावरण बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. अचानक मे महिन्यात रणरणत्या ऊन्हात चंद्रपूरने विद्युत पुरवठा उर्वरित महाराष्ट्राला बंद केला तर काय याची कल्पना न केलेली बरी! पण चंद्रपूर नव्हे तर अख्या विदर्भात कितीतरी लोकांना अंधारात खितपत पडावे लागते हे पाहून धक्का बसला. हवामान अभ्यास करतानाच वाटू लागले की मानवी जगण्याच्या छोट्या छोट्या मूलभूत पूर्ततेसाठी लहान राज्य बनविण्याचा अधिकृत निर्णय योग्य आहे. नाशिकमध्ये जन्मलेला व पुणे ही एक तप कर्मभूमी असलेला असा पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील एक शास्त्रज्ञ थेट विदर्भ हे वेगळे राज्य झाले पाहिजे हे समजून घेतो आहे हे पाहून विदर्भवासी सुखावले, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजून घेतली तर उर्वरित महाराष्ट्रातील लोकांच्या भुवया कदाचित उंचावणे बंद होईल. मीडियामध्ये चंद्रपूर गडचिरोली हे भाग जेवढे नक्सलाईट म्हणून रंगविले जातात तेवढी बिकट परिस्थिती मुळीच नाही तर निसर्गरम्य वनांची रेलचेल मंत्रमुग्ध करणारी आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्हा हा पर्यटनस्थळ म्हणून विकसित का होत नाही? हा मला एक माणूस म्हणून पडलेला प्रश्न आहे.

महाराष्ट्रापासून विदर्भ हे वेगळे राज्य तोडायला नको. महाराष्ट्राचा नकाशा किती छान दिसतो. महाराष्ट्र म्हणजे मोठे राज्य. प्रगतीचा प्रकाश! प्रकाशाचा अभ्यास करताना कितीतरी पैलू एकामागे एक समोर येतात. ३००० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रकाश समजून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दाखले सापडतात, परंतु मानवी मन समजून घेताना विदर्भावरील अन्याय समजणे अवघड वाटते. आज सोलर सेल, डिजिटल कॅमेरा, फायबर ऑप्टिक डाटाकेबलचे नेटवर्क, एलईडी लाईटनिंग, वैद्यकीय क्षेत्रात लेसर सर्जरी अशा कितीतरी स्वरूपात रंगीबेरगी प्रकाशाने देदीप्यमान मानवी जीवन उजळून निघाले आहे. मात्र गेल्या १०० वर्षापासून अंधारात चाचपडत प्रकाशाला समजून घेण्याचा जगभरातील वैज्ञानिकांचा प्रवास महत्वाचा आहे आणि हा प्रवास अद्यापही सुरू आहे. मात्र अगदी जवळच्या विदर्भातील लोकांना समजून घेऊ शकलो नाही तसेच प्रकाश नेमका कसा असतो हे आपल्याला संपूर्णपणे कळले आहे असे आपण आजही म्हणू शकत नाही, म्हणजेच प्रकाशावरील अंधार अद्यापही कायम आहे.

- Advertisement -

प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय उत्सर्जन! मग तो चंद्रपूरला किंवा नाशिकच्या एकलहरे विद्युत केंद्रात बनलेल्या उर्जेवर निर्माण झालेला असो किंवा असो अणुऊर्जा प्रकल्प सुरू करून एका ऊर्जेचे रुपांतर दुसर्‍या ऊर्जेत तयार केलेला. मानवी मनाचा काळेपणा दिसत नाही, पण कोळसा किती काळा हे आपण सहज बोलतो.

आपल्याला दिसणारा प्रकाश इंद्रधनू रंगांची उधळण करत म्हणजे ३८० नॅनो मीटर या तरंगलांबीपासून निळसर प्रकाशापासून सुरू होत, ७०० नॅनो मीटर असा लालसर प्रकाशापर्यंत पोहचणारा स्पेक्ट्रम किंवा वर्णपट होय जे आपले मानवी डोळे पाहू शकतात. प्रकाशाच्या संवेदना आपल्या डोळ्यातील दृष्टीपटल आणि चेतापेशीच्या जाळ्याद्वारे मेंदूपर्यंत पोहचतात. प्रकाशाबाबत किमान सहा थियरीज आहेत. यापैकी प्रामुख्याने प्रकाशाचे लहरी स्वरूप आणि कण स्वरूप असे दुहेरी रूप मानले जाते. प्रकाशाच्या काही गुणधर्मांचा उलगडा प्रकाश कण स्वरूपात आहे, असे गृहीत धरले तर काही गुणधर्म हे प्रकाश म्हणजे लहरी आहेत असे मानून होतो. तलावातील पाण्यात दगड मारल्यानंतर पाण्याच्या पृष्ठभागावर जसे तरंग उमटतात तसे प्रकाश लहरी स्वरूपात पुढे सरकतो अशी क्लासिकल फिजिक्सची थियरी आहे. तर चेंडू फेकावे तसे प्रकाश हे कण स्वरूपात एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी प्रसारित होतात, असे क्वांटम् फिजिक्स ही विज्ञानाची शाखा सांगते.

- Advertisement -

१८६४ मध्ये जेम्स क्लर्क मॅक्सवेल या भौतिकशास्त्रज्ञाने विद्युत बल आणि चुंबकीय बल यांचा अभ्यास करत विद्युत चुंबकीय क्षेत्र म्हणजेच ‘इलेक्टोमॅग्नेटिक फील्ड’ची निर्मिती होते हे सांगितले. १८८० साली हेंड्रीच हर्ड यांनी प्रयोगशाळेत रेडिओ लहरीची निर्मिती करत मानवजातीला एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी एक नवा दिशादर्शक प्रकाश दिला. १८१७ साली बर्जीलियस या शास्त्रज्ञाने सेलेनियमचा शोध लावला. १८८० साली वॉर्नर वोन सिमेन्स यांना सेलेनियमच्या पृष्ठभागावर प्रकाश पडला असता विद्युत धारा (इलेक्ट्रिक करंट) वाहते या गुणधर्माचा उलगडा झाला हा क्रांतिकारक शोध होता. वरीलपैकी कुठल्याही शास्त्रज्ञाला प्रकाशाच्या शोधाबाबत नोबेल पुरस्कार मिळाले नाही. मात्र १०० वर्षांपूर्वी म्हणजे १९२१ साली अल्बर्ट आईनस्टाईनने प्रकाशाचे स्वरूप काय व कसे असते याबाबत केलेल्या संशोधनाला नोबेल पुरस्कार मिळाला. त्याआधी १८९७ साली जे. जे. थॉमसन या भौतिकशास्त्रज्ञाने प्रत्यक्ष प्रयोग करत हवा नसलेल्या (निर्वात पोकळी असलेल्या) काचेच्या नळीत धातूचे पत्रे लावून तयार केलेल्या इलेक्ट्रॉडच्या मदतीने ‘कॅथोड रे’ तयार करत इलेक्ट्रॉन या ऋणभारीत मूलभूत कणांचा शोध लावला होता. त्यानंतर आठ वर्षांनी आइन्स्टाइन यांनी ऊर्जेचे उन्माळे म्हणजेच एनर्जी पॅकेज हे फोटॉनचे कण संकल्पना मांडली आणि फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचे स्पष्टीकरण दिले.

कुठल्याही पद्धतीचा प्रत्यक्ष प्रयोग न करता अशा प्रकारे केवळ गणितीय आकडेमोड करत प्रकाशाचे स्वरूप मांडले आणि चक्का १९२२ चे नोबेल पुरस्कार पटकावले हे विशेष. इतर शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाचा लेख जोखा एकत्र करत आईनस्टाईनने केलेले हे काम म्हणजे आयत्या बिळावर नागोबा अशी टीकादेखील त्याला सहन करावी लागली. आईनस्टाईनने निंदकाचे मनावर घेत मन आणि मेंदूत अंधार दाटू न देता अगदी खुल्या मनाने प्रकाशाचा शोध सुरू ठेवला. ज्ञानदेवाने रचला पाय तुका झालासे कळस या उक्तीप्रमाणे जे जे थॉमसनने शोधला इलेक्ट्रॉन आणि इमॅजिनेशन इज पावर म्हणत कागदावर गणिती आकडेमोड करत प्रकाशाचा शोध घेत अल्बर्ट आईनस्टाईनने घेतला. नोबेल पारितोषिक पटकावले, पण प्रकाश समजण्याची कळस उभारणी अद्याप ही बाकी आहे.

प्रकाशाचा वेग २९,९७,९२,४५८ मीटर प्रती सेकंद इतका आहे. म्हणजेच सुमारे ३ लाख किलोमीटर वेगाने प्रकाश धावतो. प्रकाश एका वर्षात जितके अंतर कापतो त्याला एक प्रकाशवर्ष असे म्हणतात. तर आकाशगंगेतील दूर दूरची अंतरे मोजण्यासाठी ३.२६ वर्षात प्रकाश जितके अंतर कापतो ते म्हणजे एक पार्सेक असे एकक (युनिट) किंवा अंतर मोजण्याची मोजपट्टी आपण वापरतो. मानवी कल्पनांचा आणि चंचल मनाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त आहे की नाही याबाबत कदाचित वाद असू शकतील, मात्र प्रकाशाचे दोहरे रूप नेमके काय आहे हा संपूर्ण उलगडा अद्याप झालेला नाही. प्रकाशाला समजून घेण्यात मानवाला अद्याप पूर्णत्व प्राप्त झालेले नाही आणि प्रकाशावरील अंधार दूर करण्यासाठी संशोधन क्षेत्रातील आव्हाने पेलणे हेच सर्वात मोठे व गरजेचे आहे. प्रकाशाचा अभ्यास करताना विदर्भातील हवामान बदल प्रकर्षांने जाणवला. प्रकाशाचा अंधकार एक दिवस हटेल आणि शिवाजी महाराजांची माता जिथे जन्मली त्या विदर्भ राज्यातदेखील जनतेच्या जीवनात एक दिवस सुवर्ण प्रकाश येईल हा विचार घेऊनच विदर्भ दौर्‍यातून मराठवाडा दौर्‍यासाठी पावले वळली. खरोखर प्रकाशाचा अंधार दूर व्हायला हवा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -