शक्तीसाधनांचा पुरेपूर वापर व्हावा

मानवी श्रमावर निसर्गाने काही मर्यादा घातलेल्या आहेत. या मानवी शक्तीनंतर मानवनिर्मित शक्तीसाधनांचा वापर सुरू होतो आणि त्यातून मानवाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. कमी वेळेत जास्त आणि जास्त चांगले काम मानवाला करता येते व मानवी कौशल्ये वाढण्यासदेखील त्याने मदत होते. शक्तीसाधनांचा योग्य त्यावेळी आणि योग्य त्या ठिकाणी मोठे शेतकरी उपयोग करतात. मध्यम शेतकर्‍यांमध्ये हे प्रमाण कमी तर लहान शेतकर्‍यांमध्ये हे प्रमाण फारच कमी दिसून येते. एकूणच शेतीमध्ये मानवी श्रम, विविध शक्तीसाधने, आदाने यांचा योग्य तो समन्वय साधला तर शेती विकासासाठी त्याची मदत होते. सर्वच शक्तीसाधनांचा पर्याप्त किंवा पुरेपूर वापर होणे ही काळाची गरज आहे.

–प्रा. डॉ. कृष्णा शहाणे

शेती, उद्योग, सेवा क्षेत्र हे तीन घटक भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे आहेत. त्यात शेती क्षेत्राने फार मोठी अर्थव्यवस्था व्यापलेली आहे, परंतु नानाविध समस्यांनी शेती आणि शेतकरी यांना ग्रासलेले आहे. या समस्या कमी होणे काळाची गरज आहे. यातीलच एक महत्त्वाची व शेती विकासावर दूरगामी परिणाम करणारी समस्या म्हणजे शेतीमध्ये शक्तीसाधनांचा केला जाणारा अपुरा वापर होय. शक्तीसाधनांचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास शेती विकासाला निश्चितच चालना मिळेल.

कुठल्याही क्षेत्राच्या विकासासाठी सर्वप्रथम महत्त्वाचे ठरतात ते मानवी श्रम आणि बुद्धिमत्ता होय. या दोन्हींचा वापर शेतीमध्ये पुरेपूर करणे महत्त्वाचे आहे. मानव यांचा वापर शेतीमध्ये करतोच, पण त्याचा वेग वाढणे महत्त्वाचे आहे. शक्तीसाधनांमध्ये मानवी आणि नैसर्गिक असे दोन प्रकार पडतात. शक्तीसाधनांमध्ये असणार्‍या शक्तीचा वापर करून मानव शेती विकास साध्य करू शकतो.

नैसर्गिक शक्तीसाधनांमध्ये सूर्यप्रकाश, हवा, पाणी, खनिज तेल, खनिजे, नैसर्गिक वायू, जमीन व हवामानाची खास परिस्थिती यांचा समावेश होतो. त्यांचा वापर शेती विकासासाठी करता येतो. विद्युत शक्ती, पवन ऊर्जा, जलविद्युत, दगडी कोळसा, रॉकेल, पेट्रोल, डिझेल, वंगण, ऑईल व इतर शक्तीसाधनांचा आवश्यकतेनुसार शेतीमध्ये वापर करणे महत्त्वाचे आहे, तर मानवनिर्मित शक्तीसाधनांमध्ये विविध शेती आदानांचा समावेश होतो. त्यात नांगर, बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक, कार, इतर वाहतुकीची साधने, विविध यंत्रे, खते, शेतघरे, इमारती यांचा समावेश होतो.

मानवनिर्मित शक्तीसाधनांचा वापर केला जात असताना महत्त्वाची अडचण येते ती आर्थिक स्वरूपाची होय. आर्थिक स्वरूप चांगले असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या अतिशय कमी आहे, तर मोठ्या प्रमाणावरील शेतकरी आर्थिकदृष्ठ्या गरीब आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर व मोठ्या खर्चाच्या शक्तीसाधनांचा वापर करता येत नाही. मानवी श्रमावर निसर्गाने काही मर्यादा घातलेल्या आहेत. या मानवी शक्तीनंतर मानवनिर्मित शक्तीसाधनांचा वापर सुरू होतो आणि त्यातून मानवाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. कमी वेळेत जास्त आणि जास्त चांगले काम मानवाला करता येते व मानवी कौशल्ये वाढण्यासदेखील त्याने मदत होते.

शक्तीसाधनांचा योग्य त्यावेळी आणि योग्य त्या ठिकाणी मोठे शेतकरी उपयोग करतात. मध्यम शेतकर्‍यांमध्ये हे प्रमाण कमी तर लहान शेतकर्‍यांमध्ये हे प्रमाण फारच कमी दिसून येते. एकूणच शेतीमध्ये मानवी श्रम, विविध शक्तीसाधने, आदाने यांचा योग्य तो समन्वय साधला तर शेती विकासासाठी त्याची मदत होते. सर्वच शक्तीसाधनांचा पर्याप्त किंवा पुरेपूर वापर होणे काळाची गरज आहे. अनेक नैसर्गिक शक्तीसाधने परमेश्वराने उदारहस्ते देणगी म्हणून दिली आहेत. त्याचा शेतीच्या आणि देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे.