-रवी शास्त्री
नमस्कार विज्ञानाची उत्पत्ती आणि सायन्स ह्या शब्दांची उत्पत्ती वेगळ्या पद्धतीने झाली. विज्ञानामध्ये चिंतन हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला एखाद्याचे नाव आठवत नसल्यास आपण दोन मिनिटं डोळे बंद करून त्या व्यक्तीचे नाव आठवण्यास व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणतो. काही क्षणात आपल्याला नाव आठवते म्हणजेच चिंतन हा शब्द आपण त्यासाठी म्हणू शकतो.
म्हणजेच आपल्याला पडलेले प्रश्न आणि त्याची शोधलेली उत्तरे यांची सांगड १० ते १३ व्या शतकामध्ये पश्चिम युरोपमध्ये घातली गेली आणि नैसर्गिक तत्त्वज्ञान अशी संकल्पना उदयास आली. मात्र सोळाव्या शतकात झालेल्या वैज्ञानिक क्रांतीमध्ये ही संकल्पना बदलून नैसर्गिक विज्ञान ही संकल्पना उदयास आली.
ज्ञान निर्मिती ते विज्ञान अशा पद्धतीने विज्ञानाची अनेक संस्थापक आणि व्यावसायिक रूपे एकोणिसाव्या शतकात आकार घेऊ लागली. लॅटिन भाषेतील Scientia (सायनशिया) या शब्दावरून सायन्स हा शब्द तयार झाला. विज्ञानाची निर्मिती होण्यास माणसाची जिज्ञासू वृत्ती कारणीभूत होते. कधीकधी एखादी गरजदेखील मनुष्याच्या मनामध्ये अचानक संकल्पना रुजवू शकते. अगदी साधे उदाहरण जर द्यायचे झाल्यास कलहरी आदिवासी लोकांचे द्यावेसे वाटते.
काही वेळेस तेथे पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष असते, मात्र त्यांना एवढे माहीत असते की पाण्याचा साठा कोठे आहे हे तेथील माकडांना माहीत आहे. मग हे लोक माकडांना दिसेल अशा ठिकाणी एक छोटेसे म्हणजेच आपला हात जाईल एवढे खोपटे तयार करतात. हे करताना तेथील माकडे बघत आहेत याची खबरदारी घेतात आणि असा पदार्थ त्यामध्ये लपवतात की जेणेकरून माकड जिज्ञासेने येऊन त्या खोपटातील पदार्थ मुठीने काढायचा प्रयत्न करतील.
मात्र मूठ अडकल्यामुळे हात निघत नाही आणि पदार्थ सोडावा वाटत नाही. याचाच फायदा घेत हे आदिवासी लोक त्या माकडाला पकडून त्याला खूप तहान लागेल असा पदार्थ खाऊ घालतात. त्याला जेव्हा सोडले जाते तेव्हा तो बरोबर पाणीसाठा जेथे आहे तिथे पळत जातो आणि आदिवासी लोक त्याच्या मागे पळतात व त्यांना पाण्याच्या साठ्याचा शोध लागतो.
हे कसे घडले? तर गरजेतून नैसर्गिक विज्ञानाची निर्मिती असे यास म्हणता येईल. वस्तुनिष्ठ सत्याचा शोध घेणे हे विज्ञानाचे वैशिष्ठ्य आहे. प्रमाणसिद्ध विज्ञानम ही विज्ञानासाठी लावलेली उक्ती आहे. विज्ञानाला अभिप्रेत असलेले सत्य हे व्यक्तिगत स्वरूपाचे नसते, तर ते वैचारिक स्वरूपाचे असते. वैज्ञानिक सत्य हे वास्तवतेवर आधारित असते.
प्रयोगातूनच विज्ञान सिद्ध होते आणि त्यातूनच प्रगतीचा स्रोत सुरू होतो. जगाविषयी कुतूहल आणि समस्या सोडवण्याच्या इच्छेने प्रेरित शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे विज्ञानातील नवीन ज्ञान हे विकसित होते. मात्र त्याचा व्यावहारिक वापर होण्यास नक्की मदत झाली पाहिजे अन्यथा नुसते संशोधन करणे योग्य ठरणार नाही.
मागे मी काही विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्रामध्ये घेऊन गेलो होतो. तिथे पुली (एक यांत्रिक उपकरण) ही संकल्पना दाखवली. यातून सोप्या पद्धतीने बल कसे निर्माण होते हे प्रयोगातून दाखवले. एका विद्यार्थ्याने आपल्या निरीक्षण शक्तीतून त्याचे व्यवस्थित मॉडेल तयार केले आणि जड सामान एका मजल्यावरून दुसर्या मजल्यावर सहजतेने नेण्याचा प्रयोग यशस्वी केला.
आणखीन एक उदाहरण आठवते ते म्हणजे आसाम येथे हत्ती भरपूर आहेत. रेल्वे लाईनवर येत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. तिथल्या एका वनकर्मचार्याने असा अभ्यास केला. रेल्वेच्या हॉर्नला हत्ती घाबरत नाहीत. तो तसाच उभा राहतो. परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढते. मग संशोधनाअंती त्याच्या लक्षात आले, की हत्ती हे मधमाशांच्या आवाजाला घाबरतात. त्याने रेल्वे ट्रॅकवर मधमाशांच्या आवाजाच्या ऑडिओ क्लिप्स लावल्या.
रेल्वे येत असताना हा आवाज झाल्यास हत्ती बाजूला होत. परिणामी अपघातांची संख्या खूपच कमी झाली. हा विज्ञानाचा व्यवहारातील उपयोग नव्हे काय? विज्ञानाच्या आधारेच आपण आपले जीवन सुकर करू लागलो आहोत. वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र तसेच अंतराळ संशोधन या सर्वांच्या अनेक उपशाखांमध्ये आता अधिक संंशोधन होत आहे. मात्र यासाठी मूलभूत संशोधन अर्थात ग्रासरूट इनोवेशनची गरज आहे. मग ग्रास रूट इनोवेशन म्हणजे काय हे पुढील लेखात पाहूया.