-संतोष खामगांवकर
परेश मोकाशी आज एक यशस्वी लेखक-दिग्दर्शक आहेत, पण कधीकाळी त्यांना इतरांप्रमाणेच रूपेरी पडद्यावर हिरो म्हणून चमकायचं होतं. कॉलेजमध्ये असतानाच अभिनयाचं आकर्षण निर्माण झालं होतं. म्हणून त्यांनी पुण्यात थिएटर अॅकॅडमीमध्ये काम सुरू केलं. तिथे त्यांना बॅकस्टेज काम, काही छोट्या भूमिका मिळायला लागल्या आणि हळूहळू अभिनय हे प्रकरण जरा गंभीरपणे करण्याची जाणीव झाली. काही काळातच मोकाशींना काही नाटकांत प्रमुख भूमिका मिळाल्या. काही टीव्ही मालिकांमध्येही त्यांची वर्णी लागली.
पण या सगळ्या धडपडीत मोकाशींना आत्मबोध झाला की आपल्याला तेवढा चांगला अभिनय जमत नाही. या क्षेत्रात येणार्या अनेकांना छोट्या मोठ्या संधी मिळतात, पण त्यापलीकडे मात्र ते जाऊ शकत नाहीत. मग पुढे फ्रस्ट्रेशन येतं. स्वतःबद्दलचं हे कटू सत्य त्यांनी वेळीच स्वीकारलं आणि अभिनयाला पूर्णविराम दिला, मात्र अभिनय करीत असताना त्यांनी काही नाटकांचंही लिखाण केलं होतं. म्हणूनच अभिनयाची कास सोडली तरी आपल्याला लेखन-दिग्दर्शनामध्ये गती आहे हे मोकाशींना कळलं होतं.
त्याच दरम्यान मोकाशींचा ‘पृथ्वी थिएटर्स’च्या संजना कपूर यांच्या ग्रुपसोबत संबंध आला. परेश मोकाशींनी त्यांच्या सहकार्याने १९९९ सालच्या ‘पृथ्वी आंतरराष्ट्रीय महोत्सवा’त परेश मोकाशी लिखित ‘संगीत डेबूच्या मुली’ हे नाटक दर्शकांसमोर आणलं. समीक्षकांनी व इतर नाट्यकर्मींनी ते उचलून धरलं. हा मोकाशींसाठी टर्निंग पॉईंट ठरला. या नाटकाचे महाराष्ट्रभर दीड-दोनशे प्रयोग झाले. त्यामुळे मोकाशींचा आत्मविश्वास वाढला.
पुढे मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, मंगळावरचे वेडे, संगीत लग्नकल्लोळ, समुद्र अशी नाटकं त्यांनी व्यावसायिकरित्या यशस्वी केली, ज्यातून त्यांना चांगले पैसे मिळाले. अशातच एक दिवस करिअरला वेगळी कलाटणी देणारी घटना घडली. बापू वाटवे लिखित ‘दादासाहेब फाळके’ यांचं चरित्र त्यांच्या वाचनात आलं. ते वाचता वाचताच मोकाशींना कळलं की हे नाटकाच्या फॉर्ममध्ये करता येणार नाही. मग थेट चित्रपटच का करू नये? असा एका विचार चमकून गेला आणि म्हणता म्हणता चित्रपटाची कथा लिहून झाली.
परेश मोकाशींनी चित्रपटाचं कुठलंही तांत्रिक प्रशिक्षण घेतलं नव्हतं, पण ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ बनवायचा ध्यास परेश मोकाशींसाठी पुरेसा होता. नाटकाचा अनुभव आणि चित्रपटांचा फक्त व्यासंग याच्या बळावर मोकाशींनी स्वतःच निर्मितीचं धनुष्य हाती घेतलं. पुढे काय होईल माहीत नसतानाही, २००८ साली मराठी चित्रपटांना काही उठाव नसतानाही त्यांचा लोणावळ्याचा बंगला गहाण ठेवून त्यांनी ‘हरिश्चंद्राच्या फॅक्टरी’साठी पैसे उभे केले. अर्थातच या धाडसात त्यांच्या घरच्यांनीही साथ दिली होती ही एक जमेची बाजू होती.
आपल्याला माहीतच आहे ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ झळकला आणि त्याला अमाप यश मिळालं. प्रेक्षकांकडून-समीक्षकांकडून कौतुक झालं. तेव्हापासून एलिझाबेथ एकादशी, चि. व चि. सौ. का., वाळवी असे काही निवडक चित्रपटच परेश मोकाशींनी दिले. विषयाच्या गांभीर्याला धक्का न लावता कमालीच्या विनोदबुद्धीने केलेली त्याची हाताळणी एवढ्याच एका फॉर्म्युल्यावर मोकाशींनी हमखास व्यावसायिक यशाचा ट्रेंड सेट केला आहे.
आता यंदा ‘नाच गं घुमा’ घेऊन परेश मोकाशी येत्या मे महिन्यात येणार आहेत. त्यातील मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत ही नावंच ‘नाच गं घुमा’ नेमका काय व कसा असेल याची कल्पना देऊन जातात. त्यामुळे यशाचा परेश मोकाशी फॉर्म्युला पुन्हा यशाचं शिखर गाठेल का हे आपल्याला येत्या काही महिन्यांत पाहायला मिळेलच.