घर फिचर्स सारांश तत्वनिष्ठ शिक्षक : प्राचार्य सोनोपंत दांडेकर

तत्वनिष्ठ शिक्षक : प्राचार्य सोनोपंत दांडेकर

Subscribe

शिक्षक, आचार्य, प्राचार्य कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राचार्य मामासाहेब दांडेकर! महाराष्ट्रातील ज्या काही विभूती प्राचार्य म्हणून नावलौकिक प्राप्त आहेत, जसे की त्यांच्या नावाने महाराष्ट्रातील काही महाविद्यालये ओळखली जायची अशा सर्व प्राचार्यांचे प्रेरणास्थान व आदर्श म्हणजे मामासाहेब दांडेकर! त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक संस्था आज महाराष्ट्रात अग्रगण्य आहेत. त्यात शिक्षण प्रसारक मंडळी ही पुण्यातील संस्था असो की संगमनेरमधील ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था, ही शिक्षण संस्था असो! प्राचार्य दांडेकर यांच्या विचारांचा प्रभाव तत्कालीन शिक्षण संस्थांवर होता, तसाच तो महाराष्ट्राच्या पारमार्थिक जीवनावरही होता.

–अशोक लिंबेकर

साहित्य, तत्वज्ञान, शिक्षण व भक्ती या सर्व क्षेत्रात ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या असाधारण तेजाने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाला नवे वळण दिले असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे मामा म्हणूनच प्रसिद्ध असलेली आधुनिक काळातील एक महान विभूती मामासाहेब दांडेकर होत. ज्या वंदनीय जोग महाराजांनी आळंदी येथे वारकरी पंथाच्या नव्या पर्वाला आरंभ केला, त्या कार्यातील एक महत्वाचा दुवा आणि जोग महाराजांचा लाडका शिष्योत्तम म्हणजे प्राचार्य दांडेकर! आपल्या जीवनकार्यातून सद्शीलतेचा व सहृदयतेचा मापदंड निर्माण करून जीवन कसे असावे? याचे दर्शन त्यांनी आपल्या आचार-विचारातून घडवले. त्यांचे तेजपुंज व्यक्तिमत्व व विचार म्हणजे सत्य, शिव आणि सुंदराचेच प्रतीक! त्याग, गुरुनिष्ठा, विनयशीलता, मानवता, सात्विकता, सदाचार, सहृदयता, औदार्य, दानशूरता, ईश्वरनिष्ठा, राष्ट्रभक्ती, तत्त्वनिष्ठा, निर्भीडता, या सर्व गुणांचा आढळ त्यांच्या व्यक्तिमत्वात सहजरीत्या दिसून येतो.

- Advertisement -

शिक्षक, आचार्य, प्राचार्य कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राचार्य मामासाहेब दांडेकर! महाराष्ट्रातील ज्या काही विभूती प्राचार्य म्हणून नावलौकिक प्राप्त आहेत, जसे की त्यांच्या नावाने महाराष्ट्रातील काही महाविद्यालये ओळखली जायची अशा सर्व प्राचार्यांचे प्रेरणास्थान व आदर्श म्हणजे मामासाहेब दांडेकर! त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक संस्था आज महाराष्ट्रात अग्रगण्य आहेत. त्यात शिक्षण प्रसारक मंडळी ही पुण्यातील संस्था असो की संगमनेरमधील ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था, ही शिक्षण संस्था असो! प्राचार्य दांडेकर यांच्या विचारांचा प्रभाव तत्कालीन शिक्षण संस्थांवर होता, तसाच तो महाराष्ट्राच्या पारमार्थिक जीवनावरही होता.

असे हे महाराष्ट्राचे सुसंस्कृत व्यक्तिमत्व! पुणे येथील प्रसिद्ध अशा एसपी व मुंबई येथील रुईया कॉलेजमध्ये प्राचार्य. उपप्राचार्य म्हणून त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य महत्वाचे आहे. एवढेच नाही तर सध्याच्या पुणे विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा महत्वाचा सहभाग होता. आपली स्वायत्तता धोक्यात येईल म्हणून अनेक प्राचार्य व शैक्षणिक संस्थांचा विद्यापीठाच्या उभारणीला विरोध होता, परंतु मामांनी सर्वार्ंना एकत्र करून विद्यापीठाच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिले. विद्यापीठ स्थापनेचा शुभारंभ त्यांच्या कीर्तनाने झाला. शिक्षण आणि आध्यात्मिक जीवन या त्यांच्या जीवनाच्या व व्यक्तिमत्वाच्या दोन महत्वपूर्ण बाजू. या दोन्ही क्षेत्रात ते अत्यंत निस्पृहवृत्तीने वावरले आणि या दोन्ही क्षेत्रात एक आदर्श त्यांनी निर्माण केला.

- Advertisement -

२० एप्रिल १८९६ मध्ये केळवे माहीम येथील दांडेकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. हा परिवार नंतर पालघरला स्थिरावला. अत्यंत दानशूर व सदाचारी घराण्याचा जन्मजात वारसा लाभल्याने मामांवर जे संस्कार झाले त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाची मूस तयार झाली. ज्ञान, भक्ती आणि आचारसंपन्नता हा मौलिक वारसा त्यांना घरातूनच लाभला. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सुसंस्कारित झाले. लहानपणीच मात्रृछत्र हरपल्याने त्यांचे पालनपोषण त्यांच्या मोठ्या बहिणीने केले. या बहिणीच्या मुली त्यांना मामा म्हणत. हेच मामा पुढे महाराष्ट्राचे लाडके मामा या नामाभिधानाने ओळखले जाऊ लागले. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि ही घटना त्यांच्या जीवनाला महत्वपूर्ण कलाटणी देणारी ठरली. पुण्यात त्यांनी फर्गुसन कॉलेजात बी.ए.तत्वज्ञान या विषयाला प्रवेश घेतला. येथेच त्यांना गुरुदेव रानडे यांच्यासारखे व्यासंगी असे शैक्षणिक गुरू लाभले तर वै. जोग महाराजांसाख्या पारमार्थिक गुरूंचा सहवासही त्यांना पुण्यातच लाभला. या तत्वनिष्ठ गुरूंच्या सहवासात त्यांचे अवघे जीवनच उजळून गेले.

गुरुदेव रानडे यांच्या सहवासाने त्यांच्या मनात तत्वज्ञान या विषयाबद्दल प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली या विषयातच पदव्युत्तर अभ्यास करून त्यांनी ‘ज्ञानेश्वर व प्लेटो’ यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यावर ग्रंथही सिद्ध केला. तसेच मामा सश्रद्ध होते. आस्तिक होते, परंतु देवभोळे नव्हते. कर्मकांड व अंधश्रद्धा यावर त्यांचा विश्वास नव्हता. म्हणूनच त्यांनी ईश्वराबद्दलचे चिंतन आपल्या ‘ईश्वरवाद’ या ग्रंथातून मांडले. तसेच आद्यात्म व भक्तीविषयक लेखनासाठी प्रसिद्ध असणार्‍या ‘प्रसाद’ या नियतकालिकातही त्यांनी मौलिक स्वरूपाचे लेखन केले. त्यांनी केलेले ज्ञानेश्वरीचे चिंतन ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ नावाने प्रसिद्ध आहे. त्यांची ही पारायण प्रत वारकरी पंथात खूप प्रसिद्ध आहे. एक व्यासंगी तत्वचिंतक, आदर्श शिक्षक, नीतीमान प्रशासक, विनयशील शिष्य आणि ख्यातनाम प्रवचनकार, कीर्तनकार म्हणून मामांचे व्यक्तिमत्व सर्वांना सुखावणारे असेच होते.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा प्रत्यय त्यांच्या व्यक्तित्वातून येई. एवढ्या मोठ्या कॉलेजचे ते प्राचार्य होते, पण त्यांनी आपला वेश कधीच बदलला नाही. स्वच्छ पांढरे धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्याला पांढरा फेटा आणि खांद्यावर पंचा असा त्यांचा पोशाख असे. प्राचार्यपद स्वीकारताना त्यांनी ज्या अटी व्यवस्थापनाच्या समोर ठेवल्या त्यात मी माझा पोशाख बदलणार नाही, वारीसाठी सुट्टी लागेल आणि मला जेव्हा निवृत्त व्हावे वाटेल तेव्हा निवृत्ती द्यायची या अटींचा समावेश होता. या अटी मान्य झाल्यानेच त्यांनी प्राचार्यपद स्वीकारले आणि एक आदर्श प्राध्यापक, प्राचार्य म्हणूनही ते ख्यातकीर्त झाले. इंग्रजी, संस्कृत, मराठी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मराठीवर त्यांचे प्रेम होते, पण इतर भाषांचा दुस्वास त्यांनी कधी केला नाही. त्यांचे व्याख्यान ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असे. त्यांच्या अनेक शिष्यांनी याबाबत त्यांचा गौरव केला आहे. उत्तम प्रशासक होण्यासाठी अनेक वेळा कठोर निर्णयही घ्यावे लागतात.

मामा विद्यार्थीप्रिय होते, विद्यार्थ्यांवर ते अतोनात प्रेम करत, परंतु विद्यार्थ्यांचे फाजील लाड ते करत नसत. तसेच हाजी- हाजी करणे हे धोरणही त्यांच्या स्वभावात बसणारे नव्हते. प्रसंगी शासनाच्या निर्णयालाही नाकारण्याला आणि त्यात सुधारणा करायला त्यांनी काही वेळा भाग पाडले होते. म्हणूनच प्राचार्यपदाची शान त्यांनी वाढवली. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सहाय्य केले. महाविद्यालयात तत्वज्ञान मंडळ चालवले. व्याख्यान माला आयोजित केल्या आणि हे कॉलेज नावारूपाला आणले. कोणत्याही शिक्षणसंस्थेच्या विकासासाठी जशी निस्पृह, नीतीमान, ध्येयवादी व्यवस्थापनाची आवश्यकता असते तशीच सदाचारी, व्यासंगी, विद्यार्थीप्रिय अध्यापकांचीही नितांत गरज असते. या दोन्ही चाकांचा जेव्हा सुरम्य मेळ जमतो तेव्हाच त्या संस्था आदर्श गणल्या जातात. मामांच्या कार्याने हे परिमाण या संस्थेला लाभले.

नोकरी करताना मामांनी कधीही आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष केले नाही. कीर्तनासाठी त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. आता लग्न-बारशालाच कीर्तन करायचे राहिले असे ते विनोदाने म्हणत. कीर्तनासाठी त्यांनी कधीही बिदागी घेतली नाही. याबाबात संत तुकारामांचे विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. वारकरी पंथाच्या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. त्यात कोणताही खंड पडला नाही. गुरुवर्य जोग महाराज यांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी त्यांनी भक्कम आधार दिला. या संस्थेचे आणि जोग महाराज यांचे ते महत्वाचे आधारस्तंभ होते. या संस्थेचे पहिले शिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

वारकरी संस्थेतील पहिला तास घेतला तो मामासाहेब दांडेकरांनी. ज्या संस्थेची सुरुवात अशा महान विभूतींच्या कार्यातून झाली त्या संस्थेच्या भविष्याबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज नसते. या संस्थेचा वटवृक्ष पुढे किती बहरला, पल्लवित झाला ते आपण जाणतोच. वै. जोग महाराज यांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना विचारले, ‘सोन्या आता हा माझा ब्रह्मचर्याचा ताईत कुणाला देऊ?’ असे आपल्या गुरूने विचारताच या चोवीस वर्षांच्या ध्येयवादी तरुणाने क्षणाचाही विचार न करता महाराज माझ्या गळ्यात घाला, असे म्हणून आपली सच्ची गुरूनिष्ठा व त्यागबुद्धीचे जे अपूर्व दर्शन घडवले त्यापुढे अवघा महाराष्ट्र नतमस्तक झाला.

अशी थोर परंपरा, महान गुरू व त्यागी शिष्य निर्माण झाले ते या महाराष्ट्राच्या मातीत म्हणूनच ‘महंत राष्ट्र ते महाराष्ट्र’ हे उद्गार सार्थ आहेत. नेवासा येथील ‘पैस’ मंदिराच्या उभारणीत त्यांचे महत्वाचे योगदान होते. या मंदिराचे कलशारोहण त्यांच्याच हस्ते झाले. त्यांनी निर्माण केलेल्या आणि त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या अनेक पवित्र वस्तू आज महाराष्ट्रात उभ्या आहेत. मी ज्या शिक्षणसंस्थेत काम करतो त्या पवित्र ज्ञान मंदिराचे भूमिपूजनही मामांच्या हस्ते झाले होते हाही एक अपूर्व योग! मामासाहेब दांडेकर म्हणजे महाराष्ट्राचे एक पवित्र संस्कारपीठ, भक्तीचे मंगल विचारपीठ आणि त्यागाचे मूर्तिमंत आचारपीठच जणू! अशा या महान विभूतीचे महानिर्वाण ९ जुलै १९६८ रोजी झाले आणि इंद्रायणीच्या तीरावर ते त्या अनंताशी एकरूप झाले.

त्यादिवशी ‘लोकसत्ता’ने अग्रलेखात म्हटले, एकेकाळी महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण करणार्‍या संतांच्या वारकरी पंथाचे एक विद्वान अनुयायी प्रा.श.वा.तथा सोनोपंत दांडेकर यांच्या दु:खद निधनाने आपण एका निखळ आदर्शाला पारखे झालो आहोत. आज विद्वता, चारित्र्य, सेवा, निष्ठा यांची पिसे लावून पुष्कळच डोमकावळे हंसपक्षी म्हणून सवंगपणे आपल्या सार्वजनिक जीवनात मिरवत असताना तर, या जन्मजात राजहंसाचा वियोग विशेषच जाणवत राहील. खरोखरच वारकरी पंथाचे राजहंस म्हणजे मामासाहेब दांडेकर!

- Advertisment -