– आशिष निनगुरकर
दिग्दर्शक सुकुमारन यांच्या ‘पुष्पा 2 : द रूल’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘पुष्पा : द राइज’ हा सिनेमा जेथे संपतो तेथून पुढे ‘पुष्पा 2 : द रूल’ हा सिनेमा सुरू होतो. पुष्पराज आता मोठ्या प्रमाणावर लाल चंदनाची तस्करी करीत आहे. तो त्याची प्रेमळ पत्नी श्रीवल्ली (रश्मिका मंदाना) आणि त्याची आई (कल्पलता) यांच्यासोबत एका आलिशान बंगल्यात राहतो. तो आता महागडे शर्ट, सोन्याचे दागिने आणि आर्थिक स्थिती चांगली असल्याचे लक्षण म्हणून नखांना लाल नेलपेंट लावताना दिसतो.
चित्तूरचा बहुतेक भाग हा त्याच्या तालावर नाचत असतो. कारण पुष्पराज जे काही पैसे कमावतो ते गावकर्यांनाही वाटत असतो. पुष्पराजच्या आयुष्यात दोन काटे आहेत. एक म्हणजे त्याचा सावत्र भाऊ मोहन राज. हा पुष्पराजला बेकायदेशीर धंदा करीत असल्याची किंवा सार्वजनिकरित्या अपमानित करण्याची एकही संधी सोडत नाही. दुसरा एसपी भंवर सिंग शेकावत (फहाद फासिल) आहे. त्याचा अहंकार सर्वांनी पाहिला आहे. तसेच त्याच्यासोबत भेदभाव होताना दिसले आहे. त्याने काहीही केले तरी त्याला योग्य तो सन्मानही देत नाही, पण प्रत्युत्तर न देता तो बदला घेण्याचे ठरवतो.
पुष्पा 2 : द रूल, सुकुमार यांनी पुष्पा : द राइजमध्ये दुर्लक्षित केलेल्या काही त्रुटी दुरुस्त केल्या आहेत. केवळ स्वत:साठी आणि आपल्या आईच्या आदरासाठी पुष्पराज झटत असतो. त्याच्या लहानपणी झालेला अपघात हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. बेकायदेशीर सिंडिकेट चालवताना पुष्पराज आनंदी असतो, पण जेव्हा पुष्पराज जे काही करीत आहे त्यामागचे कारण कळाल्यावर माहिती समोर येते. तसेच भंवर आणि पुष्कराज यांच्यामधील वाद हे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. चित्रपटात पुढे काय होणार याकडे लक्ष असते.
चित्रपटाची सुरुवात चांगली होते. पूर्वार्धात पहिल्या भागातील अनेक गोष्टींचे कनेक्शन जाणवते. श्रीवल्लीनं पुष्पाला काहीतरी विचारलं आहे आणि त्याने कितीही वाटा उचलला तरी त्याने ते साध्य करावं अशी तुमची इच्छा आहे, पण उत्तरार्धात हा चित्रपट थोडा डळमळीत होतो. आपण आपले डोके चोळायला सुरुवात करतो. विचार करतो की चित्रपटाची कथा भरकटत तर नाही ना, पण शेवटी कथा पटापट पुढे सरकत असल्याचे जाणवते.
तसेच चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याची हिंटही देऊन जाते. अल्लू अर्जुनने पुष्पा या चित्रपटांसाठी गेली पाच वर्षे घालवली आहेत. त्याने या चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसत आहे. त्याचा अभिनय पाहण्यासारखा आहे. पुष्पराजला सांभाळण्यासाठी श्रीवल्ली आहे. श्रीवल्लीला तिच्या पतीचा बचाव करण्यासाठी एक चांगला सीन मिळाला आहे. यात रश्मिकाने कमाल काम केले आहे.
पहली एंट्री पर इतना बवाल नहीं करता जितना दूसरी एंट्री पर करता हैं, हे आम्ही नाही म्हणत, तर हा दस्तुरखुद्द पुष्पाराजचा डायलॉग आहे आणि पुष्पाच्या धडाकेबाज डायलॉगसारखाच हा चित्रपट आहे. पुष्पा फ्लावर नहीं फायर था आणि यावेळी तो फक्त फायर नाही तर वाईल्ड फायर निघालाय. ‘पुष्पा 2 : द रुल’मध्ये एक गोष्ट मोठ्या प्रमाणात आहे, ती म्हणजे एन्टरटेन्मेंट… एन्टरटेन्मेंट… आणि एन्टरटेन्मेंट. जेव्हा पिक्चर संपेल त्यानंतर तुमच्या चेहर्यावर जो आनंद असेल त्याची तोड कशाला नसेल.
‘पुष्पा 2 : द रुल’ एक मास एंटरटेनर आहे. चित्रपट पाहताना तुम्ही लॉजिकबाबत विचारच करीत नाही. चित्रपटात जे जे पुष्पा करतो त्यावर आपला विश्वास बसत जातो. एकापाठोपाठ एक असे कमाल, धमाकेदार सीन्स येतात. काही तर असे सीन्स आहेत की जिथे शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्याशिवाय तुम्ही स्वतःला रोखू शकत नाहीत. पुष्पाचा स्वॅग लय भारीय… मध्ये एक सीन तर असा येतो जिथे पुष्पा सॉरी बोलतो, पण क्षणात मनात विचार येतो की पुष्षा तो झुकता नही… पण पुढे जे घडतं ते धमाल आहे, खळबळ माजवणारं आहे.
सिनेमामध्ये मास आणि क्लास दोन्ही असेल तर सिनेमा नक्की चालतो असं म्हटलं जातं आणि ‘पुष्पा 2 : द रुल’ मास आहे. सुकुमार यांची लेखन आणि दिग्दर्शन दोन्हींची तोड नाही. त्यांनी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आहे. स्वॅग, एंटरटेन्मेंट… यामुळे त्यांचा जो मूळ उद्देश होता तो साध्य झाला. एकापाठोपाठ एक कमालीचे सीन्स आणि डायलॉग्जमुळे पुष्पा इतर चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो. प्रेक्षकांनाही हैराण करतो, खिळवून ठेवतो.
वेळ कसा जातो ते तुम्हाला कळतच नाही. उलट संपल्यानंतर असं वाटतं की आणखी काही वेळ चालला असता तर मजा आली असती. पुष्पा म्हणजे फुल्ल टू पैसा वसूल… थिएटरमध्ये पाहण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. तेव्हा नक्की पाहा. कारण अशा चित्रपटांमुळेच सिनेमा जिवंत आहे.
-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)