Homeफिचर्ससारांशक्यू स्टारचा चक्रव्यूह आणि नैतिकतेची ऐशीतैशी!

क्यू स्टारचा चक्रव्यूह आणि नैतिकतेची ऐशीतैशी!

Subscribe

‘क्यू-स्टार’ ही भौतिकशास्त्रात वापरली जाणारी काल्पनिक संकल्पना आहे. ‘ग्रे होल’ असेही ‘क्यू-स्टार’ला म्हटले जाते. ‘क्यू-स्टार’ हा जड न्यूट्रॉन तार्‍याचा प्रकार आहे, ज्यामध्ये पदार्थाची अशी विलक्षण ‘कॉम्पॅक्ट’ अवस्था असते. विशेष म्हणजे हा असा तारा असतो की ज्यात एखाद्या ब्लॅक होलप्रमाणेच प्रकाश एकदा आतमध्ये गेला की प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर पडू शकत नाही. ‘क्यू स्टार’ ही संकल्पना म्हणजे एकदा मानवी सभ्यता यात गुरफटली की प्रकाशाप्रमाणेच मानवजातीला या ‘क्यू-स्टार’ चक्रव्यूहातून बाहेर पडण्याला मार्ग नाही आणि यामुळेच याला नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विरोध होत आहे.

-प्रा. किरणकुमार जोहरे

‘क्यू स्टार’ (Q star) हे ओपन एआयचे (OpenAI) अपत्य आहे. मानवाप्रमाणे किंबहुना मानवांपेक्षा चांगले, वेगवान आणि दर्जेदार तसेच अखंडित काम करीत निर्णय घेणारी व विविध प्रकारची कामे करणारी तसेच रोबोट व कोबोटसारखी यंत्रे किंवा यंत्रमानव बनविण्यासाठीच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण, जोखमीचे व मोठे किंवा राक्षसी तसेच आत्मघातकी पाऊल! अशी अनेक विशेषणे ‘क्यू स्टार’ला लावता येतील.

‘क्यू स्टार’ आणि ‘टेक्नॉलॉजी त्सुनामी’ : ‘टेक्नॉलॉजी’ ही एखाद्या संस्थेत नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी त्सुनामी आणू शकते. ‘ओपन एआय’ हे त्याचे एक ठळक उदाहरणच आहे. खरंतर माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, मात्र माहितीचा सुयोग्य वापर करीत कृती करणे आणि अडचणी सोडवत मार्ग काढणे ही गोष्ट ज्ञान किंवा इंटेलिजन्स म्हणता येईल, मात्र केवळ ज्ञानी किंवा इंटेलिजंट असून भागत नाही, तर कोणतीही कृती करताना तसेच निर्णय घेताना ज्ञानाला विवेक आणि नैतिकतेची जोड अपरिहार्य असते. हाच विचार आज पुन्हा पुन्हा सांगावासा वाटतो. कारण तंत्रज्ञान हे एक दुधारी हत्यार आहे. ‘क्यू स्टार’मुळे आलेल्या तंत्रज्ञान त्सुनामीने पुन्हा एकदा हेच अधोरेखीत होत आहे.

स्टोरी, ड्रामा आणि भूकंप! : पृथ्वीवरील हा प्रोजेक्ट ‘क्यू स्टार’च्या ‘स्टोरी’नंतर ड्रामा आणि विध्वंसक ‘भूकंप’देखील म्हणावा लागेल. चॅटजीपीटी तयार करणार्‍या ओपन एआय या कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली आणि तेथूनच हे कथानक पुढे सरकले, मात्र याआधीच १८ नोव्हेंबर २०२३ रोजी चॅटजीपीटीची मूळ कंपनी ‘ओपन एआय’चे ३८ वर्षीय सहसंस्थापक सॅम ऑल्टमन यांची कंपनीतून तडकाफडकी हकालपट्टी झाली. हा या संस्थेतील ‘भूकंप’ होता.

त्यावेळी सॅम ऑल्टमन व्यतिरिक्त कंपनीच्या सहसंस्थापकांमध्ये ग्रेग ब्रॉकमन, मशीन लर्निंग तज्ज्ञ इल्या सुत्स्केव्हर, जॉन शुल्मन, वोज्शिच झारेम्बा आणि टेस्लाचा मालक एलॉन मस्क हे एकत्र होते. एलॉन मस्क आता कंपनीच्या बोर्डाचा भाग नाही. २०१८मध्ये ‘ओपन एआय’मध्ये रुजू झाल्यानंतर त्याच्याकडे सुपरकंप्युटिंग स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग (रणनीती) आणि आर अँड डी असे संशोधन व्यवस्थापन व दिशादर्शन ही जबाबदारी होती.

कोणत्याही विषयावरील प्रश्नांची उत्तरे सक्षमपणे देणार्‍या या चॅटबॉटचे लाँचिंग ही मानवी सभ्यतेसाठी एक अद्भुत निर्मिती मानली गेली. मॉडेल एक्स टेस्ला कार तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ३५ वर्षीय भारतीय वंशाच्या मीरा मुराती यांची नियुक्तीदेखील एक ‘ड्रामा’ किंवा नाट्यमय घटना ठरली हे विशेष.

‘ओपन एआय’ संचालकांच्या मते ज्या कंपनीने चॅटजीपीटी तयार केली आहे, तिला पुढे नेण्याच्या ऑल्टमनच्या क्षमतेवर आता बोर्डाला विश्वास राहिलेला नाही हे कारण दिले गेले, पण खरी मेख वेगळीच होती. असे का घडले असा प्रश्न जर तुम्हाला पडला नसेल तर जगातील घडामोडींपासून लांब आपल्याच दुनियेत व वास्तव विश्वापासून दूर तुम्ही रममाण आहात असे समजायला हरकत नाही. कारण प्रोजेक्ट ‘क्यू स्टार’च्या भूकंपाचे हादरे तुम्हाला जाणवायचे बाकी आहेत.

एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाईट हेतू असलेल्या लोकांकडून गैरवापर होऊ शकतो. आम्ही एक लहान गट आहोत, कृत्रिम बुद्धिमत्तेला नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील विविध देशांतील सरकारांसह सर्वांना एकत्र यावे लागेल, अशी भूमिका नवनियुक्त ओपन एआय सीईओ मीरा मुराती यांनी प्रसारमाध्यमांपुढे मुलाखतीत मांडली. यातून त्यांनी सॅम ऑल्टमन यांचा प्रोजेक्ट ‘क्यू स्टार’ मानवजातीला नष्ट करेल हा धोका सूचित केला आहे. प्रोजेक्ट ‘क्यू स्टार’च्या ‘स्टोरी’त अवघ्या १५ वर्षाच्या प्रवासातील मीरा मुराती यांची ही बाजी नैतिकतेचा तात्पुरता विजय म्हणावा का? सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांचा मिलाफ असलेल्या प्रजननक्षम यंत्रांची भावी दुनिया भयंकर आहे. माणुसकीचा ‘प्रकाश’ यात दम तोडणार हे वास्तव स्वीकारावे लागेल असे वाटते.

‘क्यू स्टार’ची मूळ संकल्पना नेमकी काय आहे? : खरंतर ‘क्यू-स्टार’ ही भौतिकशास्त्रात वापरली जाणारी काल्पनिक संकल्पना आहे. ‘ग्रे होल’ असेही ‘क्यू-स्टार’ला म्हटले जाते. ‘क्यू-स्टार’ हा जड न्यूट्रॉन तार्‍याचा प्रकार आहे, ज्यामध्ये पदार्थाची अशी विलक्षण ‘कॉम्पॅक्ट’ अवस्था असते. विशेष म्हणजे हा असा तारा असतो की ज्यात एखाद्या ब्लॅक होलप्रमाणेच प्रकाश एकदा आतमध्ये गेला की प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर पडू शकत नाही. ‘क्यू स्टार’ ही संकल्पना म्हणजे एकदा मानवी सभ्यता यात गुरफटली की प्रकाशाप्रमाणेच मानवजातीला या ‘क्यू-स्टार’ चक्रव्यूहातून बाहेर पडण्याला मार्ग नाही आणि यामुळेच याला नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विरोध होत आहे.

काय आहे प्रोजेक्ट ‘क्यू स्टार’? : ‘क्यू स्टार’ हे लाँच न झालेले ‘जीपीटी’चे सर्वात अद्ययावत व्हर्जन आहे. ‘क्यू स्टार’ हे सामान्य आर्टिफिशियल इंटेलिजन्सपेक्षा किंवा चॅटजीपीटीपेक्षा वेगळे कसे आहे? सर्वांना हा प्रश्न पडणे सहाजिक आहे. ‘क्यू स्टार’ एवढे भयानक आहे की त्याची निर्मिती करणार्‍या व्यक्तीला म्हणजे सीईओ सॅम ऑल्टमन यांना भस्मासुराची निर्मिती केली आणि हा माणूस मानवजातीला यंत्रांचा गुलाम बनविणारा सैतान आहे, असा काहीसा सूर आळवत ‘मॉरल ग्राऊंड’वर हद्दपार केले गेले. सॅम ऑल्टमन मागील वर्षी एआय आधारित चॅटबॉट, चॅटजीपीटी या गोष्टींमुळे प्रकाशझोतात आले होते.

‘चॅटजीपीटी’चे अद्ययावत व्हर्जन म्हणजे ‘क्यू स्टार’ होय. ‘क्यू स्टार’ ही तार्किक म्हणजे लॉजिकल आणि गणितीय तर्कांच्या आधारे काम करणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी स्वयंचलित यंत्रणा किंवा प्रकल्प आहे. ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’चा (एजीआय) वापर यात करण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयला ऑपरेट करण्यासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यक असतो, मात्र एजीआय सर्व कार्य स्वत: करते. ‘ओपन एआय’च्या ‘क्यू स्टार’ प्रोजेक्टमध्ये ‘एजीआय’चा वापर करण्यात आला आहे. परिणामी मानवी हस्तक्षेपाशिवाय परस्पर निर्णय घेत हवी ती कृती करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य हे ‘क्यू स्टार’ या आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीमचा भाग आहे.

लवकरच ‘क्यू स्टार’ची ही एक अजस्त्र अशी ‘एआय त्सुनामी’ तुमच्याही दिशेने येणार आहे याची जाणीव कदाचित तुम्हाला होईल तेव्हा ‘भूकंप’ होत तुमच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल. हे कसे झाले याचे विश्लेषण करीत अवाक् व्हावे की काय करावे, असे प्रश्नांचे चक्रीवादळ डोळे दिपवून टाकेल. जीवनाचा एक अध्याय संपत आल्याची जाणीव तरी होईल का नाही याचे उत्तर काळच देईल. जगाच्या पडद्यावर दिसणार्‍या नाट्यमय कथानकाच्या ‘आखिर क्यू’, या प्रश्नाचे आखिर उत्तर आहे – ‘क्यू स्टार.’!

-(लेखक विज्ञान व तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)