आजच्या संगीताला न पडणारे प्रश्न

संगीत करताना आणि ऐकताना आज कुणालाही गाण्यातला हा साधेपणा मंजूर नसतो. आजच्या जगात मॉल असतो, मल्टिपल स्क्रिन असतात, मॉलमधली हायफाय रेस्टॉरन्ट्स असतात, एकावर एक काहीतरी फ्री असतं, एकूणात काय तर आजच्या जगात चंगळ असते, आजचं जग चंगळवादी असतं. ह्याच चंगळवादाचं पॅकेज आजच्या संगीतात दिसतं. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ गाणारे रवींद्र साठे एकदा म्हणाले होते, ‘आज सगळे धावताहेत, पळताहेत, त्यांना नेमक्या कोणत्या ठिकाणी आपल्याला भोज्या करायचा आहे हे माहीत नाही, पण तरीही ते पळताहेत.’

आशा भोसलेंचं ‘जानम समझा करो’ आणि ‘शरारा शरारा’ ही गाणी गल्लीबोळात वाजत-गाजत होती तेव्हाची गोष्ट. आशा भोसले एक-दोन ठिकाणी त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम करून आल्या होत्या. आज संगीताचे कसे नवनवे ट्रेन्ड्स आले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपला हा कार्यक्रम किती यशस्वी झाला हे बहुधा त्यांना सांगायचं असावं. आपल्या त्या कार्यक्रमात आपल्या जुन्या गाण्यांबरोबरच आपल्या ह्या दोन नव्याकोर्‍या गाण्यांनाही रसिक प्रेक्षकांचा किती भरभरून प्रतिसाद मिळतो आहे हे सांगताना त्या पटकन म्हणून गेल्या, ‘माझ्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी गर्दी केली, भरभरून दाद दिली, ‘जानम समझा करो’ आणि ‘शरारा शरारा’ ही गाणी लोकांना खूप आवडल्याचं मला दिसलं. पण विशेष गोष्ट सांगायला हवी की माझ्या ह्या गाण्याला दाद देणार्‍यांमध्ये मला आजच्या तरूण पिढीचा जास्त भरणा दिसला ह्याचं मला जास्त समाधान वाटलं.’

आशाताईंचं गाणं तोपर्यंत संगीताच्या आकाशात तळपत असलं तरी एव्हाना नवनव्या गायकगायिकांचं तारकादळ त्याच आकाशात दाखल झालं होतं. हे गायकगायिका संगीताचे नवे ताळेबंद मांडत होते, इथल्या मातीतल्या संगीताच्या जुन्या चौकटी मोडत होते…आणि विशेष म्हणजे त्याला इथली नौजवान पिढी फर्माइशी करून, शिट्ट्या मारून, टाळ्या वाजवून दाद देत होती. ही दाद जुन्या चौकटी मोडण्याला होती. नवं संगीत त्याचा स्वत:चा लहेजा घेऊन आलं होतं. त्याच्या मागे तरूणांचं पाशवी म्हणा किंवा लाघवी, पण बहुमत होतं. पण तरीही त्या बहुमताला झुगारून आपल्या ‘जानम समझा करो’ आणि ‘शरारा शरारा’ ह्या गाण्यांना खासकरून तरूण पिढीने डोक्यावर घेतलं असा आशाताईंच्या त्या म्हणण्याचा सूर होता.

‘जानम समझा करो’ आणि ‘शरारा शरारा’ ही गाणी आज बरीच मागे पडलेली असली तरी त्या काळातली तरूण पिढी आणि आजच्या काळातली तरूण पिढी ह्यात फारसा फरक पडलेला नाही. आजच्या संगीतातल्या वळणावळणांच्या रस्त्यावर ‘जानम समझा करो’ आणि ‘शरारा शरारा’ही गाणीही कोणत्या तरी एका वळणावर मागच्या मागे दिसेनाशी झालेली आहेत. त्यात आशाताईंचा दोष नाही किंवा आशाताईंच्या गाण्यातलाही कोणता दोष नाही. दोष असलाच तर तो मागच्या आणि पुढच्या पिढीतल्या प्रचंड वेगाने मागे पडलेल्या अंतराचा आहे, गाण्याकडे, संगीताकडे पहायचा जो दृष्टीकोन असतो त्यात पडलेल्या आमूलाग्र फरकाचा आहे. लता-आशाच्या गाण्यांचं बोट पकडून मोठ्या झालेल्या, लता-आशाच्या गाण्यांनी आपलं भावविश्व, जाणिवा समृध्द केलेल्या आजच्या आईवडिलांच्या संगीताबद्दलच्या अभिरूचीला त्यांची इंग्रजी माध्यमात शिकलीसवरलेली मुलं नावं ठेवू लागलेली आहेत. कोणे एके काळी गाजलेल्या ऑर्केस्ट्रांतून क्लॅरिओनेट वाजवणार्‍या एका वादक कलाकाराला त्याच्या काळातल्या गाण्यांच्या ऑर्केस्ट्रेशनबद्दल त्याच्या पोटचा मुलगाच हसतो तेव्हा बोलण्यासारखं काही शिल्लकच राहिलेलं नसतं. ‘व्हाय धिस कोलावेरी’सारखं गाणं तुमची पिढी करू शकत नाही, त्या गाण्यातल्या ‘डिलेड इफेक्ट’सारखी (Delayed effect) गोष्ट तर तुमच्या काळात नव्हतीच, पण त्यातली गंमतही तुम्हाला कळणार नाही, असं जेव्हा त्या वादकाचा मुलगा नाही म्हटलं तरी कुत्सितपणेच म्हणतो तेव्हा त्याच्या वडिलांच्या काळातल्या संगीताबद्दलचं त्याचं आकलन तर कळतंच, पण मूल्यमापनही कळतं आणि त्याची अभिरूचीही कळते.

प्रश्न आहे मग आजच्या पिढीचं संगीत नेमकं काय आहे आणि ते तसं का आहे?…

कोणत्याही कलाप्रकाराच्या कलाकृतीत त्या त्या काळातल्या वातावरणाचं प्रतिबिंंब दिसतं तसं आजच्या संगीतकलेतही ते अपरिहार्यपणे दिसतं. आज विज्ञानात नवे नवे शोध लागताहेत, लागलेल्या शोधात नवं संशोधन होत आहे. आज हातात असलेला मोबाईल नुसता मोबाइल नसतो. तो फक्त कॉल करण्यासाठी आणि पलिकडून आलेले कॉल स्वीकारण्यासाठी नसतो. तो फोटो काढण्यासाठी असतो, सेल्फी काढण्यासाठी असतो, नुसता व्हॉट्सअ‍ॅप पहाण्यासाठी नसतो तर फेसबुक चाळण्यासाठीही असतो. आज हे सगळं भान बाळगणार्‍या, सगळी व्यवधानं सांभाळणार्‍या पिढीच्या जीवनाचा वेग तुफान वाढलेला आहे. टेक्नॉलॉजीने तिचं जीवन 247 व्यापून टाकलेलं आहे. अशा वेळी ह्या पिढीच्या संगीतातही टेक्नॉलॉजीचं आरपार प्रतिबिंब दिसल्यावाचून रहात नाही. खरं सांगायचं तर त्यांचं आजचं संगीतच मुळात ‘टेक्नॉलॉजिकल’ झालं आहे.

आजच्या संगीताला शेंड्यापासून बुडख्यापर्यंत टेक्नॉलॉजीचा आधार लागतो. त्याशिवाय ते आकार घेऊ शकत नाही. ह्या आधाराची काठी काढून घेतली तर हे संगीत पंगू होण्याची शक्यता आहे. ह्या अशा अवस्थेत आजच्या पिढीचा मेलडीशी छत्तीसचा आकडा असतो. म्हणून तर गेल्या पिढीतले असले तरी आजच्या पिढीशीही सूर जुळवून असणारे अशोक पत्कींसारखे संगीतकारही आजच्या संगीतातून मेलडी हद्दपार होत असल्याची तक्रार आपल्या प्रत्येक मुलाखतीतून आळवत असतात. आजच्या संगीतातली आणखी एक गंमत अशी की त्यांच्या गाण्याचं आणि कारूण्याचं तर पराकोटीचं वाकडं. गाण्याच्या चालीत जरा जरी करूण, हळवा सूर लागला तर त्यांचे कान कासावीस होतात. समजा, चूकून जर असा करूण सूर लागला तर ‘गाना सेंटी हो रहा हैं’ असा कंठशोष ही मंडळी करतात. हळवीहळदिवी, दर्ददिवाणी गाणी त्यांच्या बॅडबुकमध्ये असतात.

आपल्या दर्ददिवाण्या आवाजाने एक काळ गाजवणारा मुकेश नावाचा एक गायक आजच्या जमान्यात जन्माला आला नाही ते बरं झालं, नाहीतर तो आजच्या संगीताच्या मैदानात पॅव्हेलियनमधून निघण्याआधीच बाद झाला असता. ह्या संदर्भात, अजय-अतुलने संगीत दिलेल्या ‘खेळ मांडला’ ह्या गाण्याचा आपल्याला सन्माननीय अपवाद करता येईल, ते गाणं खरंच काळजाला स्पर्श करतं, पण अजय-अतुलचं संगीत म्हटलं की ओघाने येणारं ‘ग्रँजर’ म्हणजे भव्यदिव्यता त्यांना टाळता येत नाही. त्यांच्या गाण्यातली धुमधमाल तर ग्रँजर घेऊन येतेच, पण त्यांच्या गाण्यातली शांतताही ग्रँजर घेऊन येते. ‘मन उधाण वार्‍याचे’ ह्या साध्या शब्दांनाही त्यांना चवीपुरतं का होईना ग्रँजर लागतंच. अशा साध्या शब्दातली अनेक भावगीतं मागच्या काळात श्रीनिवास खळेंपासून सुधीर फडकेंपर्यंत आणि दत्ता डावजेकरांपासून यशवंत देवांपर्यंत कित्येक संगीतकारांनी केली आहेत, पण त्या बिचार्‍यांनी मोजकीच वाद्यं वापरून खोर्‍याने अशी भावगीतं अजरामर करून दाखवली.

संगीत करताना आणि ऐकताना आज कुणालाही गाण्यातला हा साधेपणा मंजूर नसतो. आजच्या जगात मॉल असतो, मल्टिपल स्क्रिन असतात, मॉलमधली हायफाय रेस्टॉरन्ट्स असतात, एकावर एक काहीतरी फ्री असतं, एकूणात काय तर आजच्या जगात चंगळ असते, आजचं जग चंगळवादी असतं. ह्याच चंगळवादाचं पॅकेज आजच्या संगीतात दिसतं. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ गाणारे रवींद्र साठे एकदा म्हणाले होते, ‘आज सगळे धावताहेत, पळताहेत, त्यांना नेमक्या कोणत्या ठिकाणी आपल्याला भोज्या करायचा आहे हे माहीत नाही, पण तरीही ते पळताहेत.’ आजचं संगीत हे असं धावतं-पळतं आहे. शायर इंदौरींसारख्या शायरानेही काही काळ हिंदी सिनेमाच्या संगीताच्या प्रांतात काही काळ मुशाफिरी केली, पण नंतर निष्कर्षाप्रत येताना त्यांनी ‘हे ढिंगाचिका संगीत आहे, त्यात आपल्याला काही जमणार नाही आणि आपण काही रमणार नाही’ असा शेरा मारला आणि त्या संगीतातून त्यांनी ऐच्छिक निवृत्ती पत्करली. पुन्हा त्या वाटेला ते बोलावणं आल्यावरही गेले नाहीत. श्रेया घोषालची एक मुलाखत वाचनात आली. त्यात तिने सरळ म्हटलं, ‘मला मागच्या पिढीतल्या संगीतातल्या लोकांचा खरंच खूप हेवा वाटतो. त्यांची गाणी, त्यांचं संगीत कधीच इन्स्टंट नव्हतं. त्यांचा काळ रिहर्सल्सचा होता. तेव्हा पुरेसा वेळ घेऊन संगीत केलं जायचं.’ ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की श्रेया घोषाल ही आजच्या काळातली गायिका तर आहेच, पण आजची आघाडीची आणि आजच्या पिढीची गायिका आहे.

आजच्या संगीतातली आणखी एक अजब गोष्ट आहे ती अशी की मागच्या काळातल्या संगीताप्रमाणे त्यांचं संगीत काळाच्या कसोटीवर फारसं टिकणारं नसतं, पण त्यांचं संगीत टिकलं नाही तरी त्यांना ते चालणारं असतं. गाणं करताना, ते रेकॉर्ड करताना तो एक क्षण फक्त त्यांना साजरा करायचा असतो, ते टिकेल-न टिकेल ह्याच्याशी त्यांचं फार काही देणं-घेणं नसतं. त्यांनी जन्माला घातलेल्या गाण्याच्या भवितव्याबद्दल त्यांनाच काही विचारलं तर ‘छोडो यार, हू केअर्स?’ या पंथातले ते असतात. मागणी तसा पुरवठा हा संगीताच्या बाजारपेठेतला नियम मागच्या काळात होता तसाच तो आजही मागच्या पानावरून पुढे चालू आहे. पण आजची मागणी अंमलात येताना ‘चट मंगनी, पट ब्याह’ असा आणखी एक उप-नियम आज पाळला जातो आहे, त्यातच आजच्या संगीताचा वेग लक्षात यावा.

वास्तविक त्या एका काळात गजानन वाटवेंचा जमाना जाऊन श्रीनिवास खळे, सुधीर फडके, यशवंत देव वगैरे संगीतकारांचा जमाना आला, त्यांचाही जाऊन श्रीधर फडके, अशोक पत्कींचा आला, पण आधीच्या पिढीकडून आलेली अभिरूची पुढच्या पिढीने जपली. त्याच्या पुढच्या पिढीनेही गाणं ऐकणार्‍यांच्या अभिरूचीला समर्थ वळण लावण्याचा प्रयत्न केला. आज काही अपवाद वगळले तर आजच्या गाण्यातल्या अभिरूचीबाबत आनंदीआनंदच आहे. मागच्या काळातला आघाडीचा एक गायक एकदा म्हणाला, ‘तेव्हा धीरगंभीर सुरांची, गंभीर आशय असलेली गाणी सातत्याने लोकांसमोर यायची, वर्षांतून एखादंच धडामधुडूम संगीत असलेलं आयटम साँग याायचं, आता धडामधुडूम आयटम साँगचं तर बारमाही पीक असतं.’ हा गायक थेट नसला तरी आडून आडून, आजच्या काळातली चंगळवादी वृत्ती, आजच्या पिढीला दररोज हवी असणारी ‘नाचो’ संस्कृती ह्या अशा प्रकारच्या गीतसंगीताला कारणीभूत असल्याचं सुचवत होता. त्या गायकाचं ते म्हणणं चुकीचं नव्हतं. ‘आवाज वाढव डीजे तुला आयची शपथ आहे’ ह्या शब्द आणि सूरतालाच्या बाबतीतही बेंगरूळ असणार्‍या गाण्यालाही जर कुठल्याशा चॅनेलवरच्या कुठल्याशा रिअ‍ॅलिटी शोमध्ये वन्समोअर मिळत असेल तर पुढल्या काळात ही आवड कोणत्या मुक्कामाला पोहोचणार आहे ह्याचा सहज अंदाज येतो.

अशा पद्धतीच्या गाण्याचा ठेका हा मसालाकांडपाच्या यंत्राच्या ठेक्यापेक्षा फार वेगळा नसतो. बरं, असं सगीत करणार्‍या, ते गाणार्‍या मंडळींना ह्याबाबत तुम्ही प्रश्न करा, ते तुमच्यासमोर आजच्या ट्रेन्डचा मुद्दा उपस्थित करतील. आज जो ट्रेन्ड चालू आहे त्याप्रमाणे गाणं करावं लागतं असं ठोकळेबाज उत्तर देतील. पण अशा मंडळींना एक प्रश्न विचारावासा वाटतो की संगीतातले हे ट्रेन्ड आणतं कोण? तुम्हीच ना? असा ट्रेन्ड आणावा म्हणून लोक तुमच्याकडे कसलं शिष्टमंडळ घेऊन जात नाहीत की तुमच्या घरावर कसले मोर्चे काढत नाहीत. तुम्हीच हे ट्रेन्ड आणता, ते लोकांवर थोपवता. गाणं ऐकणार्‍याच्या कानामनात अभिरूचीचा अंकूर रूजायला इथूनच सुरूवात होते. कल्याणजी-आनंदजींनी ‘त्रिदेव’ सिनेमात ‘ओये ओये’ हे गाणं केलं तेव्हा त्यांना हाच प्रश्न केला. पण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देण्यापेक्षा कल्याणजींचा मुलगा विजू शाहने दिलं, कारण ते गाणं त्याने केलं होतं.

‘र्‍हिदम यू गॉना गेट मी’ ह्या अमेरिकन गाण्यावरून त्याने ते बेतलं होतं. संगीत करताना नवनवे प्रयोग करून पहायला हवेत, संगीत तिथल्या तिथे राहिलं तर त्यात साचलेपण येईल असं त्याचं म्हणणं होतं. आजच्या मंडळींचंही त्याच्यापेक्षा काही वेगळं मत नाही. त्यांनाही संगीतात असेच प्रयोग करायचेत, फक्त हे प्रयोग करत असताना त्यांच्याकडून नको नको ते प्रयोग होत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही की ते त्याकडे लक्षपूर्वक लक्ष देत नाहीत हा खरा प्रश्न आहे. संगीतकारांनी फक्त संगीत करायचं नसतं तर गाणं ऐकवून ऐकवून गाणं ऐकणार्‍यांचे कानही तयार करायचे असतात. आज असं कान तयार करणारं संगीत होतं आहे का, हा प्रश्न ज्याचा त्याने विचारायचा आहे!…आणि त्याला लागूनच एक प्रश्न असा की आजचे गायक आणि आजचे संगीतकारच परीक्षक असणार्‍या आजच्या चकचकीत रिअ‍ॅलिटी शोज्मध्ये ऐशी ते नव्वद टक्के गाणी ही मागच्या संगीताच्या त्या सुवर्णकाळातली गाणीच नवी पिढी का सादर करते? प्रश्नातच उत्तर आहे हे सांगणे न लगे. पण आजच्या संगीताला असे प्रश्न पडत नसतात.