घरताज्या घडामोडीपाऊस : आनंदाचे गाणे !

पाऊस : आनंदाचे गाणे !

Subscribe

‘ये रे घना, येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’ खरेच पाऊस मनाला न्हाहू घालतो का? याचे उत्तर व्यक्तीसापेक्षच असते. परंतु पाऊस आनंदाचे गाणे घेऊन अवतरतो. हा काळ नितांत सुंदर, विलीभनीय असतो. पाऊस आवडत नाही असा माणूस विरळाच. पाऊस-पाणी हा द्वंद्व समास म्हणून तर माणसाच्या जीवनात महत्वाचा. पावसाची हूल आणि भूल जीवघेणी असते. पाऊस जसा मनाला न्हाऊ घालतो; तसाच तो अनेकांच्या डोळ्यात पाणीही आणतो. त्याच्या विरहाने माणसे कासावीस होतात. पर्यावरणाचा पिता खरे तर हा पाऊस आहे.

वळवाचा पाऊस आठवला की मला शाळेत शिकलेली शंकर पाटील यांची ‘वळीव’ ही कथा हमखास आठवते. एप्रिल-मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात जीवाला गारवा देणारा आणि अनेकांची धांदल उडवणारा हा पाऊस तसा कुणाला न आवडणारा. कारण कित्येकांचे नुकसान करूनच तो गेलेला असतो. अचानक डोक्यावर पांढर्‍या शुभ्र ढगांच्या रांगा आणि अचानक कलत्या वेळेला हा दंगाखोर पाऊस वादळ-वार्‍यासह, गारपीट करून नाहीसा होतो. तरीही पाऊसकाळाची त्याने दिलेली ही चाहूलही या काहिलीत हवीशीच वाटते. कारण नंतर काही काळातच पाऊसकाळ आनंदाचे गाणे घेऊन या धरेवर अवतरतो. तेव्हा आपोआपच मानवी भावनांना कल्पनेचे, पंख फुटतात आणि आपसूक ओठावर खानोलकरांच्या ओळी तरळू लागतात.

‘ये रे घना, येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’ खरेच पाऊस मनाला न्हाहू घालतो का? याचे उत्तर व्यक्तीसापेक्षच असते. परंतु पाऊस आनंदाचे गाणे घेऊन अवतरतो. हा काळ नितांत सुंदर, विलीभनीय असतो. पाऊस आवडत नाही असा माणूस विरळाच. पाऊस-पाणी हा द्वंद्व समास म्हणून तर माणसाच्या जीवनात महत्वाचा. पावसाची हूल आणि भूल जीवघेणी असते. पाऊस जसा मनाला न्हाऊ घालतो; तसाच तो अनेकांच्या डोळ्यात पाणीही आणतो. त्याच्या विरहाने माणसे कासावीस होतात. त्याची चुकलेली वाट पाहण्यात आभाळाकडे लागलेले डोळे किती करुण भासतात? पावसाच्या प्रतीक्षेत असणार्‍या शेतकर्‍याचे डोळे पाहिले म्हणजे त्याच्या डोळ्यात दाटलेला हा करुणेचा पाऊस मनाला कासावीस करून जातो.

- Advertisement -

सात जूनला मृगाची चाहूल लागते आणि आपले मन पावसाळी गाणे गाऊ लागते. नुकतेच नांगरून पडलेले शेत पावसाच्या वाट पहात असते. आजूबाजूला पावशाचा आणि कोकिळेचा घनव्याकूळ स्वर त्याच्या आगमनासाठी आतुरलेला असतो. वर्षा ऋतूच्या पाउलखुणा आभाळाच्या भाळावर दिसू लागतात. आणि इंद्रधनुष्याची उधळण करत हलक्या मखमली पावलाने त्याचे आगमन होते. या पावसाच्या गर्भातच सृजनाची चाहूल असते.

नित्यनूतनता हा तर मानवी जीवनाचा आणि या सृष्टीचा चैतन्यधर्मच. त्यामुळे पुन्हा ही धरा नव्या नवतीचे तेज लेवून हिरवी शाल पांघरते…मानवी जीवनाला प्रवाहित, आनंदी आणि समृद्ध करणारा हा काळ असतो. पावसाचे किती तरी रूपे. प्रत्येकाच्या मनात पावसाची कोणती ना कोणती तरी आठवण असते. हा पाऊस प्रत्येकाच्या वयानुसार त्यांना साद घालत असतो, लुभावणारा असतो. शेतकर्‍यांच्या आणि कलावंताच्या मनातील पावसाची रूपे किती तरी वेगळे; परंतु हे मन वेगळे असले तरी पाऊसकाळात माणसाचे मन मात्र भिजलेले असते. अशा भिजलेल्या मनातूनच, भूमीतूनच सर्जनाची फुले उमलतात आणि माणसाचे मन पाऊसगाणे गाऊ लागते. या गानात लहानापासून मोठ्यापर्यंत सहभागी झालेले असतात. येरे पावसा ते येरे घनापर्यंतची ही पाऊसगाणी आठवली म्हणजे पावसाच्या नाना तर्‍हा विविध रूपे आपल्याला दिसू लागतात. आणि आपल्या मनात हा बालपणीचा पाऊस फेर धरून नाचू लागतो.

- Advertisement -

पाऊस आणि कवी, पाऊस आणि चित्रकार यांचे नाते मला नेहमीच कुतुहलाचे, औत्सुक्याचे वाटत आलेय. या पावसाने सर्वांनाच झपाटलेले दिसते. त्यात आपल्या संतांपासून ते आजच्या आधुनिक कवीपर्यंतची कवीमंडळी आहेत. त्यांच्या कवितेतून हे पाऊसगाणे मानवी जीवनात वाहात आलेय. मानवी जीवनाची सुफल आणि विफल गाथा लिहिली जाते ती पावसाच्या अस्तित्वाने. पाऊस पडल्यावर दुथडी वाहणारी नदी. या नदीच्या दोन्ही तीरावर झालेली समृद्धीची उगवण हे रूप मानवी जीवनाला श्रीमंत करणारेच असते. म्हणूनच जन्म-आणि मृत्यूच्या या दोन्ही तीरांना सांधणारा हा पाऊस म्हणजे जीवनाचे प्रतीकच! पावसाच्या आगमनाने धरती सचेतन होते.

आकाश-भूमी, पशु-पक्षी-डोंगर झाडे अशा सर्वाना सुखावणारे पावसाचे रूप. त्याचा विरह जीवघेणा असतो. असा हा चैतन्यदायी पाऊस रुसला. कोपला तर? तुकोबांनी याचे फार सुंदर वर्णन केलेय. ‘भेदे मंद झाल्या मेघवृष्टी । आकांतली कापे सृष्टी । सृष्टीचे हे पाऊसवियोगी रूप कुणाला आवडेल? ज्या पावसावर आपली कृषीसंस्कृती स्थिरावली आहे, अशा संस्कृतीची लय बिघडते तीही पावसाच्या वियोगानेच. माणसांचे भरणपोषण, पावसाच्या लयीवर अवलंबून असते. ‘पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे । आपल्या दैवे पिके भूमी’, असे तुकोबांनी म्हटलेले आहेच. तेव्हा ही लय बिघडली की मानवी जीवनाचीच लय बिघडते. माणसाचे अस्तित्व जसे पंचतत्वाने सिद्ध झालेय तसेच त्याचा विलयही या पंचतत्वाच्या असंतुलनानानेच होत असतो. यात थोडेही अधिक उणे चालत नाही. पावसाचे अति कोसळणे, सूर्याने अधिक तेजाने प्रकाशने, समुद्राने आपली मर्यादा सोडणे. अतिवृष्टी, महापूर, अशी अनेक उदाहरणे आज आपण अनुभवतो आहोत. माणसाने या सृष्टीचक्रात केलेला हस्तक्षेप कधी कधी जीवघेणे रूप घेऊन प्रकटतो. अलीकडे घडलेल्या काही घटना पाहिल्या म्हणजे याची प्रचीती आल्याशिवाय रहात नाही.

अलीकडे पाऊस कमी पडतोय. अशी एक सार्वत्रिक ओरड आपण ऐकत असतो. ते काही अंशी खरेही आहे. काही वर्षापूर्वी बारमाही वाहणार्‍या नद्या गावाचे भूषण असायच्या. नदीशिवाय गावाची कल्पनाही करता येत नाही. प्रत्येक गावाला हमखास एक नदी असते. या नद्यांचे अगणित प्रवाह मुख्य नद्यांना मिळतात. आज अशा अनेक नद्या कुठे लुप्त झाल्या ते कळत नाही? त्यांचे पात्र कोरडेठाक दिसते. नदी म्हणजे आपल्या समृद्धीचे, आपल्या संस्कृतीचे प्रतीकच. पाऊस पडून गेल्यानंतर नदीला आलेला पूर आणि त्या काठाला येणारा तो भारलेला आवाज म्हणजे जीवनाचेच गीत असते. असे गीत आज हरवलेय? कुठे हरवले ते? नदीचा स्वर अचानक क्षीण का झाला? याचे उत्तर शोधले पाहिजे. ज्या काही थोड्या फार नद्या आज प्रवाहित आहेत त्यांचा जीव माणसांनी कोंदटून टाकलाय.

या नदीत आपण काय काय टाकतो? अलीकडेच मी पैठणला गेलेलो. गोदावरीत उतरलो तेव्हा तिचे पाणी हिरवेगार शेवाळलेले. डबके झालेली गोदावरी. कुणी केली तिची ही अवस्था? आजूबाजूला मी पहात होतो. माणसे तिच्यात काय काय टाकत होती. त्यात अस्थी,राख तर होतीच; पण त्याच्यासोबत मृत माणसांचे अंथरून-पांघरूनही नदीनेच पोटात घ्यायचे ? गोदावरीचे हे केविलवाणे रूप कासावीस करून गेले. नदी असे सर्व काही पोटात घेत आज यातून मुक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहे..कापली जाणारी झाडे आपणास दिसतात. पण नदीचे हे रूप तिच्यात उतरल्याशिवाय कळत नाही. नदीचा आक्रोश, तिचा स्वर ऐकता आला पाहिजे. जीवन प्रवाही राहायचे असेल तर नदी खळखळून हसली पाहिजे. हे ऋतुचक्र नदीच्या साक्षीने, पावसाच्या समेवरच सुरू असते. ‘क्षरला सागर । गंगा ओघी मिळे । आपणची खेळे आपणासी । असे हे पावसाचे लयबद्ध गाणे सुरूच असते. ते अखंड ठेवायचे असेल आणि आपल्याही ओठावर सदैव हे गाणे फुलायचे असेल तर पंचतत्वाची लय जपली पाहिजे.

लेखक – अशोक लिंबेकर 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -