घरफिचर्ससारांशआता तो येईल...

आता तो येईल…

Subscribe

आता तो येईल…
…म्हणजे येण्यापूर्वी तो त्याच्या पध्दतीने यथास्थित नेपथ्यरचना करील.
लॉकडाउन उठलं की दादरच्या फूलबाजारात भक्तीमार्गातले लोक जसे सोशल डिस्टन्सिंग न पाळता एकमेकांना खेटून गोळा होतात तसे आभाळात मोकाट काळे ढग गोळा करील.
जायंट किलरचं डिपॉझिट जप्त करावं तसं बघता बघता सूर्याला झाकोळून टाकेल.
सत्ताधीश पक्षाकडून तिकिटाची प्राप्ती झालेल्या उमेदवाराने आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवावा तसा अंदाधुंद पालापाचोळा उडवेल.
प्रतिभा हरवलेल्या आणि प्रतिभा मुरवलेल्या अशा दोन्ही कवीलेखकांच्या प्रतिभेला सिनेमातल्या नायकाने नायिकेला काढावं तसं घुसळून काढेल.
वादळ वगैरे त्याचे मित्र पक्ष. मध्येच आपलं उपद्रवमूल्य वाढवण्यासाठी त्यांच्याकडे युतीसाठी हात पुढे करील.
तो तसा सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत कारकुनी काम करणारा कुणाचा चाकर नाही. महाभारतातल्यासारखं एकवीस दिवसांची वैधता पाळून युध्द करणारा योध्दाही नाही. तो मस्टरवर सही न करता त्याला हवं तेव्हा येईल आणि कार्ड न पंच करता त्याच्या मनात येईल तेव्हा निघून जाईल.
तो संततधार धरील, हाहाकार माजवील, कुणाला तारील, कुणाला बुडवील, जळणार्‍या सुंभांना विझवून आपला पीळ तसाच ठेवील.
एखाद्या मध्यरात्री सगळे झोपेत असताना तो मुंबईच्या जीवनवाहिन्या असलेल्या लोकल वगैरे बंद करण्याची घसघशीत सुपारी घेतल्यासारखं वागेल. कधी पाण्याचा साठा संपत आल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या आतल्या पानात डावीकडे छापून येतील, पण तरीही तो मनीलॉन्ड्रिंग करून पळून गेलेल्या भामट्यांसारखा बरेच दिवस पोबारा करील.
तो कधी वळीव असेल, कधी मुसळधार असेल, कधी पिरीपिरी असेल, कधी भुरभुरता असेल, पण सर्वांवर, सर्वांच्या सभासमारंभांवर स्वत:चं खास प्रेशर ठेवण्यात मात्र तो यशस्वी होईल.
तो स्फोटक आवाज काढत विजा चमकवील, अख्खी इलेक्ट्रिसिटी गुडूप करून कुणाच्या स्मार्ट सिटीचं मॉडेल उघडं पाडून दाखवील तर नद्यानाल्यांवर उताणा पडून धरणांची दारं उघडायला लावील.
तो ऑफिसला निघालेल्यांना ऐन वेळी दांडी मारायला लावील. एखाद्याला अर्ध्या रस्त्यातच खिंडीत गाठेल. एखाद्याला बहाणा, निमित्त, सबब सगळं काही मिळवून देईल.
तो सामना अनिर्णित ठेवण्यापेक्षा खेळपट्टीच निसरडी करून टाकेल. डकवर्थ-लुईसला बेरोजगार करून सोडेल. क्रिकेटप्रधान देशात बॅट आणि बॉल कोरडा ठेवील. चेंडूची चमक उडू न देण्याची तसदी घेईल.
कधी तो झुंडीचं मानसशास्त्र समजावून सांगण्यासाठी आडदांड हातातली छत्रीही उलटी करून दाखवील. कधी एखाद्या शोषितपीडित छत्रीच्या अंतरंगात कुत्सितपणे ठिबकेल.
कधी तो हमरस्त्यातल्या डबक्यात साठून साथीच्या आजारांचा अनुयायी बनेल. कधी तो पिण्याच्या पाण्यातून स्वत:ची प्रतिमा गढूळ करील.
कधी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊनसुध्दा त्याचा पत्ता नसेल. कधी वेधशाळेच्या अंदाजालाही तो वरच्या वर शेंडी लावील.
कधी तो इवले इवले रेनकोट भिजवेल, कधी स्लीक मोबाइल भिजवेल, कधी बिडीकाडीचे लायटर भिजवेल. कधी गरमागरम भजीचं झाड हॉटेलोहॉटेली रूजवेल.
कधी पावसाळी लग्नांच्या शालूचा काठ लडबडवेल. कधी गालांवरच्या चंद्रांचा मेकअप पुसून टाकेल.
कधी बावन्न पत्त्यांचे बैठे खेळ खेळायला लावेल. कधी अपेयपानाबरोबर अभक्ष्यभक्ष्यणाचं निमंत्रण देईल.
कधी तो अधिकृत घरातलं सिलिंग खाली आणेल, कधी तो नाल्यावरची अनधिकृत इमारतच खाली आणेल. कधी तो कुणाच्या गर्वाचं घरच खाली आणेल.
मग तो नेत्याला कोरडं ठेवून त्यावर अधिक व्यासाची छत्री धरणार्‍या बॉडीगार्डला भिजवेल. कधी वयोवृध्द नेत्याला भर पावसात ओलेतं करून हरणारी निवडणूक जिंकून देईल.
कधी सणासुदीच्या दिवसांचं कोटकल्याण करून टाकेल. कधी दवाखान्याबाहेर ठेवलेली छत्री गायब करून टाकेल.
आता खरंच कोणत्याही क्षणी येणार्‍या गनिमासारखा तो येईल. विरोधी विचाराला ट्रोल केल्यासारखा येईल.
आल्यावर लगेच तो नालेसफाईची परीक्षा घेईल. सत्तेतल्यांना जबाबदार धरायला लावील. विरोधकांच्या हातात सालाबादप्रमाणे कोलीत देऊन जाईल.
अशा पध्दतीने तो चिंब पावसातही भिजलेल्या काड्यापेटीची ज्वलनशीलता कायम ठेवील, वर्षानुवर्षं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -