Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश प्रवाहाबाहेरच्या सिनेफॅक्टरीचा दिग्दर्शक

प्रवाहाबाहेरच्या सिनेफॅक्टरीचा दिग्दर्शक

रामूने 1989 मध्ये तेलुगूमध्ये ‘शिवा’ बनवल्यावर त्याचं हिंदीकरण केलं. हिंदी पडद्यावर प्रवाहासोबत वाहणा-या कथानकांचे विषय सुरू असताना प्रवाहाबाहेरचेच नाही तर प्रवाहाच्या विरोधात जाणारे सिनेमे राम गोपाल वर्माने बनवायला घेतले होते. शिवाने दक्षिणेकडची बॉक्स ऑफीसची गणितं मोडीत काढली. सिनेमातल्या हिरो आणि व्हिलनची व्याख्या त्याने बदलून टाकली. शिवामध्ये चित्रपटाच्या अर्ध्याअधीक भागापर्यंतची खलनायक भवानीची चर्चा होते. सामान्य देहयष्टी असलेला हडकुळा भवानी (रघुवरन) पडद्यावर दिसतो तोच सिगारेट पेटवण्याच्या माचीस काडीच्या धुरकट अंधारलेल्या खोलीतल्या प्रकाशात....व्हीलन खतरनाक, वाईट, दुष्ट, क्रूर, हिंसक असायला तो तसा दिसायलाच हवा. असं नाही. रामूने खलनायकाचा काळाकुट्ट रंग बदलून तो ग्रे शेडमध्ये आणला. राम गोपाल वर्माचा 7 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या चित्रपटांवर टाकलेला प्रकाशझोत...

Related Story

- Advertisement -

माणसाच्या मनात आधीपासूनच हिंसा असते, असूया, द्वेष, राग, हतबलता असते, मात्र समाजमूल्य आणि कायद्यामुळे त्याच्यातील हा नकारात्मक वेदना दाबल्या जाते, असं लेखक तेंडुलकरांचं म्हणणं होतं. राम गोपाल वर्मालाही असंच वाटत असावं. त्यामुळेच सत्याच्या पटकथा लेखनासाठी त्यातील पहिली पसंती विजय तेंडूलकरचं होते, तो विषय नंतरचा…त्याआधी ‘शिवा’ हिंदीतही हिट झाल्यावर वर्माची दखल घेणं हिंदी पडद्याला भागचं होतं. रस्त्यावरच्या टोळ्यांची हाणामारी त्याआधी एन चंद्राच्या ‘अंकुश’मध्येच दिसली होती, त्याहून खूप आधी मेरे अपनेमध्ये असाच विषय गुलजारांनी हाताळला होता. मात्र त्यावर तत्कालीन मानवी मूल्यांचा प्रभाव होताच.

रामूने मानवी मूल्यांना सरळ सरळ निकालात काढलं, हा विद्रोह आधीच्या सिनेमांसारखा शब्दबंबाळ नव्हता, कमीत कमी संवादातून रामूने तो पडद्यावर उभा केला. सत्याच्या कथानकावर चर्चा करण्यासाठी सौरभ शुक्लाच्या घरी बैठक होती. रामगोपाल वर्मा, अनुराग कश्यप आणि सौरभ तिघांवर गोविंद निहलानींचा प्रभाव होता. त्यामुळे विजय तेंडूलकरांनी सत्याचं कथानक लिहावं असं ठरलं, मात्र काही कारणाने तो विषय बारगळला अखेर सौरभ आणि अनुरागनेच ‘सत्या’ लिहिला, संकल्पना आणि दिग्दर्शन रामूचं होतंच. सत्याला भारतातील पहिल्या सर्वकालीक सर्वश्रेष्ठ पहिल्या 100 चित्रपटात स्थान मिळालं. गुन्हेगारीपटांच्या टोळीयुद्धावर त्याआधी विधू विनोद चोप्राने परिंदा बनवला होता. मात्र रामूने आपल्या फॅक्टरीत अशाच प्रवाहाबाहेरच्या सिनेमांची रिळांवर रिळं रचली.

- Advertisement -

रामूच्या चित्रपटांमध्ये कॅमेरामॅनच्या जागेवर रामू थेट प्रेक्षकाला बसवतो. शिवामध्ये भवानीची माणसं नागार्जुनचा पाठलाग करतात त्यावेळी सायकलवर छोट्या मुलीला घेऊन जिवाच्या आकांताने पळणारा नागार्जुन बस पकडतो. या प्रसंगाचा कॅमेरा बसच्या मागच्या चाकात बसवलेला असतो. रामूच्या द्रोही, सत्या आणि भूतमध्येही असेच प्रयोग असतात. द्रोहीमध्ये कॅमेरा बारच्या सिलिंग लाईट्सचा वेध घेतो, तर भूतमध्ये लिफ्ट खाली वर सरकणार्‍या अंधाराच्या पोकळीत कॅमेरा बसवला जातो, लिफ्टचा आवाज आणि जिन्यामुळे भयपटाची खोली वाढते. पोलीस पटातही रामूने स्वतःला सिद्ध केलं. सत्यानं तिकिटबारीवर मोठं यश मिळवलं होतं. समीक्षक आणि फिल्म फेस्टीव्हलमध्येही सत्याचं कौतुक झालं होतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या असतानाच त्याने मनोज वाजपेयीला घेऊन शूलच्या कथानकावर काम सुरू केलं. शूलचं दिग्दर्शन ईश्वर निवासचं होतं. तर कथानक स्वतः रामूनं लिहलं होतं. संवाद अनुरागचे असल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता होती. मुख्य भूमिकेसाठी मनोज वाजपेयीचं नाव पक्कं झाल्यावर खलनायक ठरत नव्हता. सयाजी शिंदेचा मराठी रंगभूमीवरचा झुलवा मनोजने पाहिला होता. त्यानेच सयाजीचं नाव सुचवलं आणि सयाजी शिंदेनं बच्चू यादव साकारला, त्यासाठी सयाजीला स्क्रीन पुरस्कार मिळाला होताच.

त्याआधी हिंदी पडद्याची सुरुवात रामूने रंगिलापासून केली. रंगिलाची कथा प्रेमत्रिकोणाची होती. त्याआधी लव्ह ट्रँगलवर खोर्‍याने ओढता येतील इतके सिनेमे बनवले होते, यश चोप्रांची त्यावर हुकमी सत्ता होती. रंगिलाची कथा आधीच्या प्रेमपटांपेक्षा वेगळी ठरली. फिल्मफेअरसाठी रंगिलाला जवळपास सर्वच कॅटेगरीत नाव मिळालं. याच वर्षी यश चोप्रांचा दिलवाले दुल्हनिया…रिलिज झाल्याने पुरस्कार यश चोप्रांच्या खात्यात जमा झाले. परंतु रामूचं वेगळंपण अधोरेखित झालं. मात्र रामू ओळखला गेला तो विशेष करून गुन्हेगारीपटांसाठीच. मुंबईतल्या गुन्हेगारीपटांचं चित्रण त्याच्या प्रमुख चित्रपटांमध्ये होतं. मुंबईतलं गुन्हे विश्व हा उद्योग असतो, त्याचं स्वतःचं एक व्यवस्थापन असतं, त्यावर आधारीत कंपनी रामूच्याच तालमीत बनवला गेला. अनुराग कश्यपने रामूच्या तालमीतील गुन्हेगारीपट ‘गॅग्स ऑफ वासेपूर’सारखे पुढे आणखी भेसूर केले. मधल्या काळात दौड बनवून रामूने चित्रपट समीक्षकांचा रोष ओढवून घेतला होता. दौडचं कथानक वेगळं होतं. मात्र मांडणी सरधोपट होती. रंगिलात रामू आणि ए. आर. रेहमान एकत्र आले होते.

- Advertisement -

परंतु दौडमध्ये हा प्रयत्न सपशेल फसला. दौडची हाताळणी घाईत आणि पटकथेवर पुरेसं काम न करता झाल्याचं रामूने स्पष्ट केलं होतं. दौडमधली ब्लॅक कॉमेडी हाताळण्यात अपयश आल्याचे राम गोपाल वर्माने कबूल केलं होतं. चित्रपट करताना तो पूर्णपणे समांतर, कलात्मक का निव्वळ व्यावसायिक करायचा असा गोंधळ होता. त्याचाच परिणाम शोलेचा रिमेक करण्यात झाला. हिंदी पडद्यावर शोलेची जागा अढळपदावरची आहे. जीपी सिप्पींच्या शोलेला हात लावण्याचं सत्तरच्या दशकापासून आजतागायत कुणीही केलेलं नाही. रामूने ते केलं. भारतातील प्रेक्षकांच्या मनात शोलेचं एक स्थानक आहे. त्याला रामूने धक्का लावता कामा नये, असं मत हिंदी चित्रपटातील जाणकारांनी व्यक्त केलं होतं. ते खरंही होतं. शोलेचा रिमेक राम गोपाल वर्माकी आग…असा बनवल्याने आग लागो त्या रिमेकला, असाच सूर हा सिनेमा पाहून परिक्षकांनी व्यक्त केलं, तर गब्बरची व्यक्तीरेखा तांबे या नावाने साकारणार्‍या आणि मूळ शोलेचा एक महत्वाचा भाग असलेल्या अमिताभने रामूच्या या रिमेकच्या आगीत उगाच उडी घेतल्याची खंतही व्यक्त केली होती. असं असलं तरी रामूच्याच फॅक्टरीतल्या सरकारने अमिताभ आणि रामगोपाल वर्माचे सूर पुन्हा यशस्वीपणे जुळवले.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राम गोपाल वर्मा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासमवेत ताज हॉटेलमध्ये पाहाणीसाठी गेल्यावर टीकाकारांची झोड उठली. त्यानंतर रामूने या दहशतवादी हल्ल्यावर नाना पाटेकरला घेऊन चित्रपट केला. त्यावेळी चित्रपटाचा विषय अतीशय गंभीर आणि वेदनादायक असल्याने चित्रपटाचा मुहूर्त म्युझिक लाँच सोहळा असलं काहीही करता कामा नये, असा मोलाचा सल्ला त्याला नानाने दिला होता. नानावर झालेल्या मी टू प्रकरणातील आरोपानंतरही या विषयावर हिंदी चित्रपटातील दिग्गजांनी जाणीवपूर्वक कुठलंही मत व्यक्त न करता शांत बसणे पसंत केल्यावरही रामूने नाना असं काही वागेल असं वाटतं नसल्याचं म्हटलं. नाना रागीट, हेकेखोर किंवा स्पष्टवक्ता आहे. मनात येईल ते बेधडक बोलणारा नक्कीच आहे. पण तो मला वाटत नाही, त्याने असलं काही केलं असेल असं त्याने माध्यमांसमोर सांगितलं. प्रस्थापित कलाकारांसोबत काम करण्याचं रामूने टाळलंच होतं.

म्हणूनच त्याच्या फॅक्टरीत बनलेल्या चित्रपटात उर्मिला, मनोज वाजपेयी, नाना असे कलाकारच होते. रामू हिंदी पडद्यावरच्या कुठल्याच कोंडाळ्या रमत नाही. त्याच्या सिनेमांचं स्वतःचं असं तत्वज्ञान आहे. समकालीन सिनेमांच्या कुठल्याही प्रवाहात तो अडकत नाही. तो बॉक्स ऑफीसच्या गणितांचा विचार आजही करत नाही. जी गोष्ट मला पटते, माझ्यावर परिणाम करते, ज्याला मी कथाकार, दिग्दर्शक म्हणून न्याय देऊ शकतो अशीच कथा मी निवडतो, असं रामगोपाल वर्मा सांगतो. म्हणूनच तो कुठल्याही एका पठडीत अडकत नाही. त्यामुळेच त्याच्या फॅक्टरीत लव्ह के लिए कुछ भी करेगा सारखा विनोद पडद्यावर साकारला जातो, त्याच कॅमेर्‍यातून तो रक्तचरित्र, कौन, अब तक छप्पन किंवा शूलसारखे वेगळ्या पद्धतीचे चित्रपट त्याच्याच फॅक्टरीत बनतात, राम गोपाल वर्माने हिंदी पडद्याला सिनेमातील वैविध्य त्या वेळी दिलं ज्यावेळी त्याची गरज होती. निव्वळ व्यावसायिक दिशेने जाणार्‍या चित्रटसृष्टीला रामूने आपल्या बाजूने वळवण्यात भाग पाडलं.

- Advertisement -