घरफिचर्ससारांशवाल्मिकी, हनुमान आणि रावण!

वाल्मिकी, हनुमान आणि रावण!

Subscribe

वाल्मिकी मुनी यांचे सगळ्यात प्रसिद्ध असे महाकाव्य म्हणजे रामायण. वाल्मिकींना आद्यकवीसुद्धा म्हटले जाते. रामायण हे महाकाव्य त्याग, समर्पण, शौर्य, प्रेम, सात्त्विकता, पराक्रम, आदर याचं एक उत्तम प्रतीक मानलं जातं. रामायण हे महाकाव्य अल्पकाळात प्रसिद्ध झालं. त्यात दोन तत्त्ववेत्त्यांचा (वाल्मिकी आणि रावण) तुलनात्मक तात्त्विक उहापोह कथारूपाने मांडण्याचा वाल्मिकी यांनी प्रयत्न केला आहे. रामायणात वाल्मिकींनी रावणाला महान पंडित म्हटले आहे. एवढेच नव्हे तर राम लक्ष्मणाला रावणाकडून अमूल्य ज्ञान अर्जन करण्याचा सल्ला देतो, असे रामायणात नमूद करून रावणाच्या ज्ञानाचा वाल्मिकींनी यथोचित आदरच केला आहे.

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते। ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम॥ १२-१२॥

मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. ॥ १२-१२ ॥

- Advertisement -

इथे गीतेतील श्लोक नमूद करण्याचे एकमेव कारण म्हणजे कर्मफलत्यागातून प्राप्त होणारी मनःशांती ही सर्वात श्रेष्ठ आहे. वाल्मिकी यांचे तत्त्वज्ञान कर्मफलाची अपेक्षा न ठेवता कार्य करत रहाणे तसेच आसक्तीवर मनोनिग्रहाने विजय मिळवणे व त्यातून प्राप्त होणार्‍या शाश्वत सुखाच्या व ज्ञानाच्या मार्गाकडे मानव समाजाला नेणारे आहे. मर्यादापुरुषोत्तम श्रीराम हे हिंदू संस्कृतीतील एक आराध्य दैवत आहे, जे त्यागाचं मूर्तिमंत रूप आहे. अर्थात शांतीचे प्रतीक आहे. जवळपास तीनशेच्यावर रामायणे लिहिली गेली आहेत. यात वाल्मिक मुनी यांनी लिहिलेले रामायण हे सर्वात प्रसिद्ध आहे. वाल्मिकी मुनींचा काळ इस पूर्व पहिल्या शतकातला मानला जातो. अर्थात रामायण हे साहित्य त्याच शतकातले मानले जाते. सर्वप्रथम ऋषी आणि मुनी ह्यातला मूळ फरक समजून घेऊ. मुनी म्हणजे तत्त्वज्ञानी, जे मूळ अध्यात्म शास्त्राला गोष्टी रूपाने शब्दबद्ध करण्याचे काम करत, तर ऋषी हे तपश्चर्या करून आध्यत्मिक शास्त्रात विस्तृत संशोधन करण्याचे काम करून मनुष्याचे जीवन अधिकाधिक कसे सुखी होईल यासाठी कार्यशील असत.

वाल्मिक मुनी यांचे तत्त्वज्ञान

- Advertisement -

वाल्मिकी यांचे तत्त्वज्ञान हे कर्म फलत्यागाला सर्वाधिक महत्त्व देणारे होते. कर्मफलाची अपेक्षा ही मनुष्य जीवनात आसक्ती निर्माण करते आणि हीच आसक्ती मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे. भगवान श्रीराम, हनुमान, भरत, लक्ष्मण, सीता ह्या रामायणातल्या त्यागमूर्ती वाल्मिक मुनींच्या तत्त्वज्ञानाला पूर्ण न्याय देणारी पात्रे आहेत. वाल्मिक मुनीच्या तत्त्वज्ञानानुसार आसक्तीवर जर विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी त्याग भावना जोपासणे गरजेचे आहे. कारण त्याग भावनेतूनच मनुष्याला परम सुख किंवा मनःशांती मिळते.

श्रीराम हे राजे असूनही एकपत्नीत्व, राजभोगाचा त्याग, मर्यादाशील आचरण, प्रजेसाठी स्वसुखाचा त्याग असे गुरुतुल्य व्यक्तिमत्व होते. म्हणूनच त्यांना हनुमानासारखा ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणारा, आपल्या राजाप्रति अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान, निरोगी असा दास लाभला. भरताने राज्य मिळूनही त्याचा त्याग केला तर सीता व लक्ष्मण हे वनात श्रीरामाबरोबर त्याग भावनेनेच राहिलेत. त्यांनीही राजसुखाचा त्याग केला. या सर्व पात्रांमध्ये एक त्यागभावना होती आणि हेच वाल्मिक मुनींच्या तत्त्वज्ञानामागचे मूळ सार आहे जे त्यांनी रामायण या महाकाव्यात कथास्वरूप शब्दबद्ध केले आहे. त्याकाळी हे तत्त्वज्ञान उत्तर भारतात वैदिक विचारधारा माणणार्‍या गणात अतिशय लोकप्रिय होते. भौतिक सुख हे क्षणिक आहे, तर आध्यात्मिक सुख हे शाश्वत व चिरंतर आहे.

पंडित रावण यांचे तत्त्वज्ञान
पंडित रावण यांचे मूळ स्थान हे श्रीलंका. आजच्या राजकीय, सामाजिक विचारधारेत डावे आणि उजवे असे दोन विचारप्रवाह आहेत तसेच त्या काळातही दोन भिन्न विचारप्रवाह होते. वाल्मिकी यांची विचारधारा त्यागातून आसक्तीवर विजय मिळवून शाश्वत सुख साध्य करणे या तत्त्वज्ञानावर आधारित होती, तर पंडित रावण यांची विचारधारा ही भोगातून आसक्तीवर विजय मिळवून शाश्वत सुख साध्य करणे या तत्त्वज्ञानावर आधारित होती.

वाल्मिक मुनींनी वैदिक तत्त्वज्ञानाचा अंगीकार केला होता तर पंडित रावण यांनी तांत्रिक तत्त्वज्ञानाचा अंगीकार केला होता. दोघांच्याही तत्त्वज्ञानामागील साध्य एकच होते, परंतु साध्य करण्यामागच्या तात्त्विक विचारधारा आणि मार्ग भिन्न होते. वैदिक मार्गाने मोक्ष मिळवणे हे कष्टप्रद जरूर आहे, पण तोच मार्ग सर्वोत्तम व ब्रह्मतेज प्राप्त करून देणारा आहे अशी वाल्मिक मुनींची ठाम विचारधारा होती, तर आसक्तीवर त्यागमार्गाने विजय प्राप्त करण्यापेक्षा ज्या गोष्टीची आसक्ती आहे तिचा पुरेपूर उपभोग घेऊन तिच्यातले स्वारस्य नष्ट झाले की सहज आसक्तीवर विजय मिळवता येतो व शाश्वत सुखाची प्राप्ती होते ही पंडित रावण यांची तांत्रिक विचारधारा व मार्ग होता अथवा या तांत्रिक तत्त्वज्ञानाचे ते पुरस्कर्ते होते.

वैदिक तत्त्वज्ञानात प्राणायाम करताना अंतरकुंभक केले जाते, तर तांत्रिक मार्गात बहिरकुंभक. वैदिक मार्गात आसनस्थिरता, मनस्थिरता ही सरावाने आणि लक्ष ठरावीक ठिकाणी केंद्रित करून साधनेद्वारे साध्य केली जाते, तर तांत्रिक मार्गात मनाची एकाग्रता ही मनाला गुंगी आणणार्‍या काही विशिष्ट द्रव्यांचे सेवन करूनही साध्य केली जाते. तांत्रिक मार्गाचे महाअघोर भगवान शिवशंकर हे आराध्य दैवत आहेत म्हणून आजही महाशिवरात्रीच्या दिवशी दुधातून भांग प्रसाद म्हणून देण्याची प्रथा आहे. कौल, अघोर इतर हे तांत्रिक मार्ग अवलंबणारे पंथ आहे. तांत्रिक मार्गात सुरा, मांस आदी तामस द्रव्य, पदार्थ भक्षण करणे मान्य आहे, पण वैदिक मार्ग केवळ सात्त्विक पदार्थच भक्षण करण्यावर ठाम आहे, तर सुरा, मांस, नशा आणणार्‍या आदी पदार्थांचे सेवन हे निशिद्ध मानतो.

पंडित रावण यांची ग्रंथसंपदा

पंडित रावण हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यात ‘रावणसंहिता’ (हिंदू ज्योतिषशास्त्रावर आधारित) हा प्रमुख ग्रंथ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रावणसंहितेतही व्याधी निवारण्यासाठी अनेक हनुमानाचे मंत्र नमूद केले आहेत. ‘अर्क प्रकाशम’ (सिद्ध औषधी), क्रियाकालगुणोत्तर तंत्र ह्या ग्रंथाचा एक भाग रावणकुमार तंत्र (रावणप्रोक्तबालचिकित्सासूत्र) हे लहान बालकांवरील उपचार व औषधी यासाठी समर्पित आहे. नाडीपरीक्षा यात शरीरातील रक्तवाहिन्यांबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. रावणभाष्य (कपिल मुनींच्या सांख्य शास्त्रावर आधारित तत्त्वज्ञान), कातींदी (वैशेषिक शास्त्रावर आधारित तत्त्वज्ञान), शिवतांडव स्तोत्र (महादेवाला प्रसन्न करण्यासाठी गायलेले स्तोत्र) अशी अनेक ग्रंथसंपदा ही रावण निर्मित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कणाद मुनींचे वैशेषिक शास्त्र व कपिल मुनींचे सांख्य शास्त्र जे हिंदू संस्कृतीतील शास्त्रे आहेत ते देव मानत नाही, तर शास्त्र मानतात. पंडित रावण हे संगीतातही प्रवीण होते. त्यांनी त्यावरही ग्रंथ लिहिला आहे. रावण वीणा वादनात निष्णात होते. रावण अनेक विषयांत प्रवीण असल्यामुळे त्यांना दशानन म्हणून संबोधले गेले आहे. रावण यांचा सहा शास्त्रे आणि वेदांचाही गाढा अभ्यास होता. रावण यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू बिभीषण यांनी लंकेचा राजा म्हणून पदभार सांभाळला. बिभीषण यांनी मात्र वैदिक विचारमार्गाचा अंगीकार केला.

आद्यकवी वाल्मिक मुनी यांचे साहित्य

वाल्मिकी मुनी यांचे सगळ्यात प्रसिद्ध असे महाकाव्य म्हणजे रामायण. वाल्मिकींना आद्यकवीसुद्धा म्हटले जाते. रामायण हे महाकाव्य त्याग, समर्पण, शौर्य, प्रेम, सात्त्विकता, पराक्रम, आदर याचं एक उत्तम प्रतीक मानलं जातं. रामायण हे महाकाव्य अल्पकाळात प्रसिद्ध झालं. त्यात दोन तत्त्ववेत्त्यांचा (वाल्मिकी आणि रावण) तुलनात्मक तात्त्विक उहापोह कथारूपाने मांडण्याचा वाल्मिकी यांनी प्रयत्न केला आहे. रामायणात वाल्मिकींनी रावणाला महान पंडित म्हटले आहे. एवढेच नव्हे तर राम लक्ष्मणाला रावणाकडून अमूल्य ज्ञान अर्जन करण्याचा सल्ला देतो, असे रामायणात नमूद करून रावणाच्या ज्ञानाचा वाल्मिकींनी यथोचित आदरच केला आहे. वाल्मिकींचे तत्त्वज्ञान आणि कथेचा सर्वात गोडवा हा की त्यांनी कथा अगदी जिवंत केली आहे. त्याद्वारे रामायण केवळ एक महाकाव्य नसून एक सत्य कथाच प्रतीत होते.

रावण ज्ञानी होतेच, परंतु त्यांनी निवडलेला तांत्रिक मार्ग हा वाल्मिकींच्या वैदिक मार्गाएवढा प्रभावी नव्हता. अर्थातच रामायण अल्पावधीतच प्रसिद्ध झाले व एकप्रकारे वाल्मिकींच्या तत्त्वज्ञानाचा विजय झाला. तंत्रशास्त्रात अपेक्षित सिद्धी लवकर प्राप्त होतात, परंतु योग्य गुरू न मिळाल्यास त्यात जीविताला धोकाही उद्भवू शकतो, मात्र वैदिक मार्ग जरी खडतर व संथ वाटत असला तरी त्यात जीविताला कुठल्याही प्रकारे हानी पोहचत नाही. हरित ऋषी म्हणतात, ‘श्रुतिश्च वेदानी तंत्रानी’ अर्थात वैदिक आणि तांत्रिक हे दोन्हीही मोक्षप्राप्तीचेच मार्ग आहेत. एक श्वेत तर एक कृष्ण मार्ग मात्र दोन्हींचाही शेवट एकाच ठिकाणी नेणारा मोक्षाकडे.

रावण संहितेतही हनुमानाचे व्याधी निवारण्याचे मंत्र आहेत व रामायणाताही हनुमान हे महत्त्वाचे पात्र आहे. त्यामुळे प्रथम हनुमान या पात्राला वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजण्याचा प्रयत्न करूया.

हनुमान एक वैज्ञानिक चिकित्सा

हनुमान, मारुती, पवनसूत, महाबली, चिरंजीवी आदी नावांनी ओळखले जाणारे हिंदू संस्कृतीतील एक महान दैवत आणि रामायण ह्या कथेतील एक अविभाज्य असे पात्र आहे. रामायण कथा भगवान श्रीराम आणि त्यांचे परम भक्त हनुमान यांच्या प्रेमभाव आणि अतुलनीय पराक्रम यांनी परिपूर्ण आहे. आज संपूर्ण भारतात असंख्य हनुमानाची मंदिरे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ह्या ग्रहाची साडेसाती असताना संकट निरसनासाठी हनुमानाची भक्ती केल्याने संकटे दूर होतात असाही समज भारतीय जनमानसात दृढ आहे. भारतातील अनेक ठिकाणे ही हनुमानाचे जन्मस्थाने म्हणून ओळखली जातात. उदा. चुरू (राजस्थान), हंपी (कर्नाटक), अंजनेरी (नाशिक, महाराष्ट्र) आदी. ह्याच हनुमानाचा आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करू अथवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा करू.

वायूपुत्र हनुमान
हनुमानाला वायूपुत्र किंवा पवनसूतसुद्धा म्हटले जाते. म्हणजेच वायूचा (पवन, हवा) मुलगा (पुत्र, सूत). हनुमान हे वानराचेच एक रूप आहे. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला असता असे लक्षात येते की वानराचा मुख्य आहार म्हणजे विविध वनस्पती, त्यांची पाने, फळे इत्यादी. अर्थातच भरपूर रेशायुक्त अन्नाचा त्यांच्या आहारात समावेश असतो. रेशायुक्त आहार हा पचनास मदत करतो, परंतु अतिरेशायुक्त अन्नसुद्धा पचायला अवघड असते. वानराच्या आतड्यात जे रसायन पचनासाठी तयार होते ते अतिरेशयुक्त अन्नसुद्धा सहज पचवते. उत्तम पचनक्षमता असल्यामुळे वानरात निसर्गतःच वात दोषाचे दमण होते आणि त्यामुळे इतर दोषही नियंत्रित राहतात. वानरात वातदोषाचे दमण करण्याची निसर्गदत्त देणगी असते. त्यामुळे साहजिकच वानराला वायूपुत्र म्हटले गेले आहे ते प्रतीकात्मक आहे.

सूर्याला गिळायला जाणारा बाल हनुमान

हनुमान लहान असताना सूर्याला गिळायला जातो. त्यावेळेस राहूची आई सिंहिका आडवी येते आणि हनुमानाला गिळते. त्यानंतर हनुमान सिंहिकेची टाळू फोडून बाहेर येतो. त्यानंतर इंद्र वज्राने प्रहार करतो व हनुमानाला सूर्य गिळण्यापासून परावृत्त करतो.

सूर्य हा उष्णतेचा मुख्य स्रोत आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर असे लक्षात येते की आपल्या शरीराचे तापमान नियंत्रण जर उत्तम असेल तर आपण सुदृढ व निरोगी आयुष्य जगू शकतो. आपले मानवी शरीराच्या ३७ अंश ह्या तापमानाला सर्व अवयव हे उत्तम प्रकारे काम करतात. आपले शरीर स्वतःहून हे तापमान नियंत्रण करण्याचे काम करत असते. ह्या क्रियेला होमिओस्टासिस म्हणतात. होम म्हणजे घर आणि स्टॅसिस म्हणजे नियंत्रित करणे. बाह्य तापमान जसे बदलते त्याप्रमाणे आपल्या शरीराचे आतील तापमानात जे बदल होतात, ते नियंत्रित करण्याचे काम शरीर स्वतः करत असते. आपल्या शरीरात ही क्रिया प्यारा सिंपथेटिक चेतासंस्थेद्वारे पार पाडली जाते. मेंदूच्या मध्यभागी हायपोथॅलॅमस नावाची एक अंतस्त्रावी ग्रंथी असते जी विशिष्ट संप्रेरक स्त्रवते व तापमान नियंत्रणाचा प्रयत्न करते.

उदा. ज्यावेळेस आपण थंडीत जातो त्यावेळेस बाहेरील तापमान कमी असते आणि ही सूचना मेंदूला शरीराचे सेन्सर देतात. त्यानुसार हायपोथॅलॅमस ऍसिटीलकोलिन नावाचे संप्रेरक सोडते जे आपल्या त्वचेखालील वाहणार्‍या रक्तवाहिन्यांचे स्नायू आकुंचन पावतात व नसांचा प्रवाहमार्ग संकुचित होतो. ह्या क्रियेद्वारे आपले शरीराच्या आतील उष्णता बाहेर जाण्यास विरोध करते व आतील तापमान संतुलित करण्याचा प्रयत्न करते. मेंदू शरीराच्या नसांना चेता पेशींद्वारे विद्युत प्रवाहित व खंडित करते. ज्यामुळे आपण कुडकूडतो. या क्रियेमुळे पेशींच्या आत मायटोकाँड्रिया नावाचे जे ऊर्जा निर्मितीचे केंद्र असते तिथे अडनोईन ट्राय फोस्पेटचे अडनोईन डाय फोस्पेटमधे रूपांतर होते. म्हणजे फोस्पेटच्या तीन अणूपैकी एक अणू मुक्त होतो व या क्रियेत उष्णता निर्माण होते. हादेखील शरीराचा आतलं तापमान वाढवून नियंत्रित करण्याचा स्वयंचलित प्रयत्न असतो.

आता ज्यावेळेस आपण भरउन्हात जातो त्यावेळेस बाह्य तापमान हे जास्त असते. साहजिकच शरीराला आतील तापमान नियंत्रित करण्याची आधीच्या उलट जबाबदारी असते. आपली त्वचा ही सूचना मेंदूपर्यंत पोहचवते आता यावेळेस हायपोथॅलॅमस ऍसिटीलकोलिन या संप्रेरकाद्वारे त्वचेखालील नसा स्नायू विस्तारित करते व घर्म ग्रंथी स्त्रवण्यास उदयुक्त करते. ह्या क्रियेद्वारे आपल्याला घाम येतो आणि ह्या घामावर जेव्हा हवा लागते तसे शरीराचे तापमान कमी होते. ही क्रिया वाहनांच्या रेडिएटरप्रमाणेच काम करते.

ही जी तापमान नियंत्रित करण्याची शरीराची स्वयंचलित क्रिया शरीराच्या नियंत्रणाबाहेर गेली की शरीरातील अवयवात अनियमितता निर्माण होते व व्याधी उत्पन्न होतात. इथे ही गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे की वानरात ही तापमान नियंत्रित होण्याची स्वयंचलित क्रिया अत्यंत प्रभावीपणे काम करते किंवा वानराला लाभलेली ही एक निसर्गदत्त देणगीच आहे. हनुमानाने सूर्याला गिळायला जाणे हे अशा प्रकारे प्रतीकात्मक आहे. आपण नियमित व्यायाम केला की आपली ही तापमान नियंत्रित करण्याची शरीराची स्वयंचलित यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे काम करते. आपले शरीर सुदृढ व निरोगी बनते. व्यायामशाळेत त्यामुळे हनुमानाचा निरोगी व सुदृढ शरीराची देवता म्हणून प्रतिमा अथवा मूर्ती प्रस्थापित करण्याची एक प्रथा आहे. हनुमान औषधी वनस्पतीयुक्त पर्वत उचलून आणतो, म्हणजेच निकोप सुदृढ शरीर राखण्यासाठी साक्षात औषधी वनस्पतीयुक्त पर्वतच एकप्रकारे भक्ताला मिळाला आहे.

हनुमानाचे व्याधी निवारण करण्यासाठीचे तांत्रिक मंत्र अनेक तांत्रिक ग्रंथांत आढळून येतात. रावण संहितेतही हनुमानाचे व्याधी निवारण्यासाठीचे मंत्र दिले आहेत. रावण हा तंत्रशास्त्र मानणार्‍यांचा पुरस्कर्ता होता, तर वाल्मिक मुनी हे वेद शास्त्र  मानणार्‍यांचे पुरस्कर्ते होते. आज जसे विचारात डावे आणि उजवे असे गट आहेत तसेच वेद आणि तंत्रशास्त्र अशा मार्गांचा अंगीकार करणारे गट पूर्वी होते व काही प्रमाणात आजही आहेत. वेद आणि तंत्रमार्ग उद्देश एकच पण मार्ग भिन्न आहेत म्हणून हरित ऋषी म्हणतात, ‘श्रुतीश्च वेदानी तंत्रानी’. हनुमान हे वानराच्या निसर्गत: अंगीभूत गुणांचे प्रतीक आहे. स्वयंचलित तापमान नियंत्रित करण्याची जी नैसर्गिक देणं वानराला आहे तीच सूर्याला गिळायला जाणे म्हणजे अशी प्रतीकात्मक आहे.हनुमानाला अणूएवढे सूक्ष्म होता येते व ब्रह्मांडाएवढे मोठे होता येते.

त्रिदोशांचे दमण व शरीराचे प्रभावी तापमान नियंत्रण हे मनाला स्थिरता प्रदान करतात. अध्यात्मात सुदृढ व निरोगी शरीरामुळे प्राणावर नियंत्रण मिळवणे सहज साध्य होते. मनाची चंचलता कमी होते व मन एकाग्र होण्यास मदत होते. ही मनाची सुशूप्त अवस्था म्हणजेच अणूएवढे सूक्ष्म होण्याची क्रिया. गुरू गोरक्षनाथांनी आपल्या ‘सिद्ध सिद्धांत पद्धती’ ह्या ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे पिंड (शरीर) आणि ब्रम्हांडाची रचना एकच आहे. आपल्या शरीराचे यथोचित ज्ञानाने आपल्याला ब्रह्मांडाच्या ज्ञानाची प्राप्ती होते. हनुमानाला अणूएवढे होता आले आणि त्यामुळे त्याला ब्रम्हज्ञानही प्राप्त झाले अथवा ब्रह्मांडाएवढे होता आले.

आपले जुने ग्रंथ हे ज्ञानाने परिपूर्ण आहेत. फरक एवढाच की ज्ञानाची ही गंगा प्रवाहित ठेवण्यासाठी गोष्टीरूपाने हे ज्ञान शब्दबद्ध केले आहे. थोडक्यात वाल्मिकी यांनी रामायण या महाकाव्याद्वारे वैदिक पद्धत आणि रावणाची तांत्रिक पद्धत याची एकप्रकारे तुलना केली आहे, परंतु वाल्मिकी आणि रावण आपापल्या मार्गात श्रेष्ठ होते. आता हेच ग्रंथ डिकोड करण्याची वेळ आली आहे, पण तुम्ही त्यामागचं सार समजलात तर तुमचा देवाच्या धर्माच्या नावाने फायदा घेतला जाऊ शकत नाही.

तात्पर्य, राम हे वैदिक विचारधारेचे प्रतिनिधित्व करणारे एक पात्र आहे, तर खरे युद्ध हे वाल्मिकी आणि रावण यांच्या साधनेच्या भिन्न आचरण पद्धती व तत्त्वज्ञानातील आहे.

–प्रशांत कळवणकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -