Homeफिचर्ससारांशरामायण यात्रा दर्शन ॥जानकी जन्मस्थान, पुनौराधाम॥ 

रामायण यात्रा दर्शन ॥जानकी जन्मस्थान, पुनौराधाम॥ 

Subscribe

रामायणात अयोध्येइतकेच महत्त्व बिहारमधील सीतामढीजवळच्या पुनौराधाम या स्थानाला आहे. श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या आहे हे सर्वांना माहीत आहे, परंतु श्रीरामांची अर्धांगिनी सीतामाई यांची जन्मभूमी पुनौराधाम असल्याचे अनेकांना ठाऊक नाही. बिहारमध्ये सीतामढी या जिल्ह्याच्या स्थानापासून ५ किमी अंतरावर ‘पुनौराधाम’ किंवा ‘जानकी कुंड’ नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी सीतेचा जन्म झाला होता अशी श्रद्धा आहे. खरं म्हणजे आजपर्यंत हे ठिकाण तसे दुर्लक्षितच होते. स्थानिक भाविकांशिवाय इकडे फारसे कुणी फिरकत नव्हते, परंतु श्रीरामजन्मभूमीचा प्रश्न ऐरणीवर आल्यापासून सीतामढी पुनौराधाम हे स्थानही भाविकांच्या आणि पर्यटकांच्या यादीत अग्रभागी आले आहे.

-विजय गोळेसर 
  केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी रामायण सर्किट योजनेत अयोध्या तर प्रमुख केंद्र आहेच. याशिवाय केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने रामायण सर्किट योजनेत ९ राज्यांतील १५ स्थानांची निवड केली आहे. यामध्ये बिहारमधील ‘सीतामढी’, ‘बक्सर’ आणि ‘दरभंगा’ या स्थानांचा समावेश केला आहे. या योजनेंतर्गत ही सगळी शहरं रेल्वे, सडक आणि हवाई मार्गाने एकमेकांशी जोडण्यात येतील. सीतामातेचा जन्म सर्वसामान्य बालिकेप्रमाणे झाला नव्हता, तर ती बालिका एका घटात अवतीर्ण झाली होती, असे म्हणतात. यासंदर्भात एक आख्यायिका ‘वृहद विष्णु पुराण’ नावाच्या ग्रंथात सांगितली आहे.
त्रेतायुगात एकदा जनक राजाच्या मिथिला नगरीत सलग १२ वर्षे पाऊस न पडल्याने मोठा भीषण दुष्काळ पडला. तेव्हा पर्जन्याची देवता असलेल्या इंद्राला प्रसन्न करण्यासाठी खुद्द जनक राजाला आपल्या राज्याच्या भूमीत नांगर चालवण्याचा सल्ला राजगुरूंनी दिला. त्याप्रमाणे हल्लीच्या सीतामढीजवळ पुनौरा नावाच्या ठिकाणी जनक राजाने जमीन नांगरली. जनकराजा जमीन नांगरत असताना त्याला जमिनीत एका मातीच्या पात्रात नवजात कन्या मिळाली, हीच सीतादेवी!
जनक राजाला जमीन नांगरताना मातीच्या पात्रात लहान बालिका मिळाल्यामुळे या भागाचे नाव प्रथम ‘सीता मढई’, नंतर ‘सीता मही’ आणि कालांतराने ‘सीतामढी’ असे झाले. नांगराच्या फाळाला ‘सीत’ म्हणतात आणि मातीच्या पात्राला ‘मढई’ म्हणतात त्यावरून हे नाव दिले असावे. ज्या ठिकाणी जमीन नांगरताना जनक राजाला सीता मिळाली त्याच जागेवर सीतेच्या विवाहानंतर जनक राजाने एक मंदिर बांधले आणि त्यात श्रीराम आणि जानकी यांच्या प्रतिमांची स्थापना केली अशी लोककथा आहे.
त्यानंतर अनेक वर्षांनी या प्रदेशावर घनदाट जंगल उगवले. अनेक शतके हा भाग दाट अरण्यात अज्ञात राहिला. सुमारे ५०० वर्षांपूर्वी अयोध्येतील एक संत बीरबलदास यांनी आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर हे स्थान व येथील सीता-राम प्रतिमा शोधून त्यांची पुनर्स्थापना केली आणि त्यांची नियमित पूजाअर्चा सुरू झाली.
 प्राचीन काळी सीतामढी तिरहुतचा भाग होता. मुस्लीम शासक येईपर्यंत मिथिलेच्या कर्नाट वंशाच्या लोकांचे राज्य येथे होते.  इंग्रज भारतात आल्यावर हा भाग प्रथम बंगाल आणि नंतर बिहार राज्यात गेला. इ. स. १९०८ मध्ये तिरहुतचा मुजफ्फरपूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ११ डिसेंबर १९७२ रोजी सीतामढी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
वृहद विष्णु पुराणानुसार ज्या ठिकाणी जनक राजाने पाऊस पाडण्यासाठी ‘हल-कर्षण-यज्ञ’ करून जमीन नांगरली तेच सीतेचे अवतीर्ण होण्याचे ठिकाण आहे. सध्या या ठिकाणी सीता जन्मभूमी नावाचे प्रशस्त मंदिर आणि या मंदिराजवळच ‘उर्विजाकुंड’ नावाचा अतिशय विशाल तलाव आहे. जनक राजाच्या मिथिला राज्याच्या जनकपूर या राजनगरापासून पश्चिमेला ३ योजने म्हणजे २४ मैल अंतरावर हे ठिकाण आहे. सीतामढी तसेच पुनौरा भागात रामायण काळात आणि त्यानंतरही हजारो वर्षे घनदाट अरण्य होते. प्राचीन काळी या परिसरात पुंडरिक ऋषींचा आश्रम होता. त्यावेळी या भागाला ‘पुण्यअरण्य’ असे नाव होते. त्याचे पुढे ‘पुण्यरसा’, ‘पुण्य उर्विज’ आणि आता ‘पुनौराधाम’ असे नामांतर झाले आहे.
 जानकी जन्मस्थली या मंदिराच्या महंतांचे प्रथम पूर्वज सिद्ध पुरुष होते. त्यांनीच वृहद विष्णु पुराणातील वर्णनानुसार नेपाळमधील जनकपूरपासून पुनौराधामपर्यंतचे अंतर प्रत्यक्ष मोजून या स्थानाचा शोध लावला आणि हीच राजा जनकाची ‘हल-कर्षण-भूमी’ असल्याचे सिद्ध केले. याच ठिकाणी लक्ष्मणा नदीच्या काठावर एका वृक्षाखाली बसून त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. पुढे येथे त्यांचा मठ उभारण्यात आला. गुरूपरंपरेनुसार हा मठ आजही येथे आहे. सीतामढी येथे ‘उर्विजा जानकी’ या नावाने दरवर्षी श्रीराम नवमी आणि विवाह पंचमी या दोन प्रसंगी मोठे उत्सव साजरे केले जातात. यावेळी आशिया खंडातील सर्वांत मोठ्या जनावरांच्या मेळाव्याचे आयोजन केले जाते.

सीतामढी येथील प्रमुख आकर्षण 

जानकी जन्मस्थान मंदिर 
सीतामढी हे जानकीचे जन्मस्थान म्हणून रामायणकाळापासून प्रसिद्ध आहे. सीतामढी रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर ‘माँ जानकी जन्मस्थली’ नावाचे जानकी जन्मस्थान मंदिर आहे.  मंदिराचा परिसर अतिशय भव्य आणि सुशोभित आहे. मंदिरात सर्वत्र रामायणातील प्रसंग चित्रित केले आहेत. मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मंदिराप्रमाणेच सीतामढीजवळचे पुनौराधाम येथील श्रीजानकी माता जन्मस्थान मंदिर सर्व हिंदू भाविकांना वंदनीय आहे.
उर्विजा कुंड तलाव 
मंदिर परिसरात १००-१२५ फूट अंतरावर ‘उर्विजा कुंड’ नावाचा एक मोठा तलाव आहे. तलावाभोवती भरपूर झाडी लावण्यात आली आहेत. तलावाभोवती पायी फिरण्यासाठी वॉकिंग वे बांधला आहे. निसर्गरम्य वातावरण आणि सुयोग्य व्यवस्थापनामुळे या मंदिरात आल्यावर मनाला मानसिक शांततेचा अनुभव येतो.
उर्विजा तलावाजवळ आणखी एक अतिशय प्रशस्त आणि शोभिवंत मंदिर आहे. येथे राजा जनक, त्याची पत्नी सुनयना, लहानगी सीता, उर्मिला आणि इतर लहान मुलं आहेत. या दोन्ही मंदिरांशिवाय अनेक लहान मोठी मंदिरं आहेत. सीतामढी परिसरात पुनौराधाम आणि जानकी कुंड, हलेश्वर महादेव मंदिर, पंथ पाकड, बगही मठ देवकुली आदी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.
कसे जावे ? 
 बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यात सीतामढीपासून ५ किमी अंतरावर पुनौराधाम स्थान आहे. पटणापासून सीतामढी १३९ किमी अंतरावर आहे. येथे रेल्वे स्टेशनप्रमाणेच बसेसही उपलब्ध आहेत. निवास आणि भोजनाची सर्व प्रकारची सुविधा सीतामढी येथे उपलब्ध आहे.
(क्रमश 🙂