-संजीव साबडे
ही गोष्ट आहे 77 वर्षांपूर्वीची. सालं होतं 1947 आणि तारीख होती 17 जुलै. देशात स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलं होतं. स्वातंत्र्य प्रत्यक्ष मिळायला जेमतेम 28 दिवस होते. पावसाळ्याचा मोसम होता, पण त्या दिवशी पाऊस मात्र पडत होता. गुरुवारचा दिवस असला तरी प्रत्यक्षात गटारी अमावास्या होती. त्यानंतर चार महिने अनेक जण मांसाहार करत नाहीत, मद्यपानही करत नाहीत. मात्र गटारी अमावास्या असल्याने तेव्हाच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील रेवसमार्गे आपल्या जवळच्या गावांकडे जाणारी चाकरमानी व इतर मंडळी प्रवासाला निघाली होती.
बहुसंख्य लोक परळ, लालबाग आणि गिरगावातले. बहुतेक सर्वांनी बोटीचं तिकीट काढलं होतं. आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी करून आलेले कोकणातील भाविकही त्यात होते. ते सारे जण ज्या बोटीने प्रवास करणार होते तिचं नाव होतं रामदास. ही अवाढव्य आकाराची बोट 1936 साली बांधण्यात आली होती. बोटीचं वजन होतं 406 टन. लांबी 179 फूट आणि रुंदी 29 फूट. खरं तर हे मोठं जहाजच. पण त्याचा सर्वत्र उल्लेख बोट असाच आहे. एक हजार प्रवासी वाहून नेण्याची त्याची क्षमता होती.
भारतीय कंपनीचं हे जहाज असल्याने कोकणातील व मुंबईच्या लोकांना त्याचा अभिमान होता. आपली आगबोट असं त्याचं वर्णन केलं जाई. सकाळी साडेआठ वाजता हे जहाज निघालं. त्यावेळी आकाश निरभ्र होतं. पावसाची अजिबात शक्यता नव्हती आणि समुद्रही खवळलेला नव्हता. शांत समुद्रात रामदास जहाजचा प्रवास होणार होता. प्रवासाचं आधी तिकीट काढलेले आणि आयत्या वेळी घुसलेले असे 700 हून अधिक प्रवासी त्यात होते. रेवसपर्यंतचा प्रवास दीड तासाचा.
म्हणजे आपण 10 वाजता रेवसला पोहोचू, अशी सर्वांची खात्री होती. काही जण आपापसात गप्पा मारत होते, कोणी विशाल समुद्राकडे बघत गाणी वा भजनं म्हणत होते. लहान मुलांना प्रवासात बोट लागू नये, म्हणून काही जण त्यांना झोपवू पाहत होते. रेवसला उतरल्यावर अनेकांना पुढे बसने वा चालत आपापल्या गावी जायचं असल्याने काहींनी जेवणाचे, न्याहरीचे डबे सोबत आणले होते. त्यांची सकाळची न्याहरी बोट किनार्यावरून पुढे सरकताच सुरू झाली होती.
बोट मुंबईच्या किनार्यावरून निघाली त्याला जेमतेम अर्धा तास झाला होता. रामदास जहाजाने 9 किलोमीटर अंतर पार केलं होतं. जहाजात 48 खलाशी होते. शिवाय 4 अधिकारी, हॉटेलचे 18 कर्मचारी आणि 673 प्रवासी होते.आणखी 35 जण आयत्या वेळी तिकीट न काढताच जहाजात शिरले होते. कंपनीच्या माहितीनुसार रामदास जहाजामध्ये 778 जण होते. मुंबईच्या समुद्रात आजही अनेक छोटी बेटं आहेत. त्यापैकी गल नावाचं एक बेट आहे.
रामदास जहाज त्या बेटाच्या जवळ आलं आणि अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. मोठं वादळ यावं तशा मोठ्या लाटा समुद्रात दिसू लागल्या. रामदाससारख्या प्रचंड आकाराच्या प्रवासी जहाजाला त्यापासून काहीच धोका नव्हता. पण पावसाचा जोर वाढला आणि अक्राळ विक्राळ लाटा थैमान घालू लागल्या. जहाजच्या डेकवर पाणी साचू लागलं. रामदास जहाजही हिंडकळू लागलं…
… आणि एका क्षणी हे अवाढव्य आकाराचं जहाज एका बाजूला कलंडलं. तोपर्यंत शांत असलेले प्रवासी घाबरू लागले, लोक इथं तिथं धावू लागले. काही जण लाईफ सेव्हिंग जॅकेट्स शोधू लागले. प्रवासी खूप जास्त आणि ही जॅकेट्स मात्र फारच कमी होती.
काही जण एकमेकांच्या हातातून जॅकेट खेचण्याचा प्रयत्न करत होते. काहींनी जॅकेट्सह समुद्रात उड्या मारल्या तर काही जणांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जॅकेट नसतानाही खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. जहाजाचे कॅप्टन शेख सुलेमान आणि मुख्य अधिकारी प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण कोणीही त्यांचं ऐकण्याच्या तयारीत नव्हते. तेव्हा खूपच भीषण लाट आली आणि तिच्या वेगामुळे जहाज गल बेटाच्या काश्याच्या खडकावर जाऊन आदळलं. त्यातून सावरणं जहाजाच्या चालकांना अवघड होत होतं. तरीही त्यांचे निकराचे प्रयत्न सुरू होते. इतक्यात सुमारे 40 फूट उंचीची लाट जहाजावर जाऊन कोसळली आणि त्यानंतर प्रचंड मोठं रामदास जहाज दिसेनासंच झालं.
जहाज बुडत असताना आणखी काहींनी उड्या मारल्या तर जहाज पाण्याखाली गेल्याने काही जण तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. शक्य होतं ते पोहून जीव वाचवण्याची धडपड करत होते, तर ज्यांना पोहता येतं नव्हतं, ते तिथंच बुडून मरण पावले. समुद्र शांत होऊ लागला असताना रेवस बंदरातील दोन बोटी पाण्यात दिसू लागल्या. त्यातील मच्छीमार व खलाशांना मोठ्या अपघाताचा अंदाज आला. शक्य होतं त्यांना या खलाशांनी वाचवून किनार्यावर नेलं.
काही मृतदेह समुद्रात तरंगत असल्याचे त्यांना दिसत होते. पण जिवंत असलेल्या आणि जीव वाचवू पाहणार्यांना हे खलाशी मदत करत होते. पण मुंबई किनार्यावर मात्र रामदास जहाज बुडाल्याची कुणकुणसुद्धा लागली नव्हती. ते जहाज रेवसहून प्रवासी घेऊन केव्हा येतंय, याची मुंबईत वाट पाहणं सुरू होतं. काहींच्या सांगण्यानुसार दुपारी तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे संध्याकाळी पाचच्या सुमारास रामदास बोट बुडून अनेक जण मेल्याची बातमी मुंबईत सर्वत्र पसरली.
ज्यांचे नातेवाईक, कुटुंबीय, मित्र या जहाजात होते, त्यांच्या नातेवाईकांची मुंबईत भाऊच्या धक्क्यावर गर्दी झाली. केवळ त्यांच्या नव्हे तर सर्व मुंबईकरांच्या डोळ्यात पाणी होतं. रामदास जहाजातील 778 पैकी 690 जण समुद्रात बुडून मरण पावले. त्यांचे मृतदेह किनार्यावर आले वा आणले, तेव्हा अनेकांनी हंबरडा फोडला. काही नातेवाईकांना या पाण्यात बुडून फुगलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार कसे करावेत, हेच कळत नव्हतं. भारतीय समुद्री प्रवास इतिहासातील हा सर्वात मोठा अपघात. आतापर्यंतच्या एकाही बोट वा जहाज अपघातात इतके लोक मरण पावलेले नाहीत.
परदेशात टायटॅनिक बोट 1912 साली बुडाली. त्यात 1500 प्रवासी बुडून मरण पावले होते. रामदास बोटीचा अपघातही टायटॅनिकसारखाच म्हणता येईल. चित्रपटामुळे टायटॅनिक अपघात सर्वांना ज्ञात आहे, रामदास बोट बुडून जवळपास 700 जण बुडाले ही माहिती मात्र सर्वांना नाही. अभ्यासातही कुठे त्याचा उल्लेख नाही. या अपघाताच्या 20 वर्षे आधी तुकाराम आणि जयंती नावाच्या दोन बोटी एकापाठोपाठ रायगड जिल्ह्यातील समुद्रातच बुडाल्या होत्या. त्या बोटीतील अनुक्रमे 300 व 250 लोक मरण पावले होते, असं सांगण्यात येतं.
टायटॅनिकच्या दुर्घटनेवर चित्रपट निघाला, तसा रामदास बोटीवर हिंदी चित्रपट निघू शकला असता. यापुढे निघाला तरी लोकांना आवडेल. त्यात स्वातंत्र्य आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, भारतीयाने ब्रिटिश बोट कंपनीला दिलेलं आव्हान आहे, गटारीसारखा आगळावेगळा ‘उत्सव’ आहे, पंढरपूरच्या वारकर्यांची भजनं आहेत, जवळपास हजारो प्रवाशांचा माहोल आहे, घरी जाण्याची हुरहूर आहे, खवळलेला समुद्र आहे, महाकाय जहाजाची जलसमाधी आणि त्यानंतरचे मृत्यू, कारुण्य असं खूप काही आहे. एखादी प्रेमकथाही असेलच त्यात. अक्षय कुमार, अजय देवगण, विकी कौशल यांना ही मसालेदार कथा कळली, तर नक्कीच चित्रपट निघू शकेल. कुणी तरी सांगा हो त्यांना!