घरफिचर्ससारांशबक्सरमधील रामरेखा घाट 

बक्सरमधील रामरेखा घाट 

Subscribe

रामायण काळापासून बक्सर येथील गंगा नदीच्या काठावरील रामरेखा घाट प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भगवान रामाने राक्षसी त्राटिका हिचा वध केला होता. या वधामुळे रामाला स्त्री हत्येचे पातक लागले. या पातकापासून मुक्त होण्यासाठी श्रीरामाने गंगेच्या पवित्र जलात स्नान केले आणि गंगेच्या काठावर असलेली गंगेची माती आणि वाळू यापासून शिवलिंग तयार केले. त्या शिवलिंगाला गंगाजलाने अभिषेक करू लागले, पण शिवलिंगाची माती पाण्यात विरघळू लागली. त्यामुळे रामाने ते शिवलिंग आपल्या हातात धरले.

-विजय गोळेसर 
रामायण यात्रा दर्शनच्या पाचव्या भागात आपण भदोही येथील सीता समाहिता मंदिराची माहिती घेतली. माता सीता याच ठिकाणी धरणीमातेच्या कुशीत विसावली ते हे ठिकाण. आज आपण श्रीराम आणि लक्ष्मण यांनी बालपणी विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात जेथे धनुर्विद्येचे प्राथमिक धडे गिरवले तसेच जेथे त्राटिकासह अनेक राक्षसांचा वध केला त्या परिसराचे दर्शन घेणार आहोत.
विश्वामित्र ऋषी हे राम, लक्ष्मण यांचे पारंपरिक गुरू होते, असे वाल्मीकी रामायणातील बालकांड या भागात सांगितले आहे. विश्वामित्र हे रामायणकाळी थोर ब्रह्मर्षी म्हणून मान्यता पावलेले होते. ब्रह्मदेवाला प्रिय असलेल्या सात ऋषींत त्यांची गणना ह्या काळात झालेली आहे. विश्वामित्र आणि अन्य ऋषी करीत असलेल्या यज्ञांत विघ्न आणणार्‍या राक्षसांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विश्वामित्र हे राजा दशरथाकडे आले आणि दशरथाने राम व लक्ष्मण ह्या आपल्या दोन पुत्रांना त्या कामासाठी त्यांच्यासह पाठविले, असे रामायणाच्या बालकांडात (१८-२१) सांगितले आहे. गंगेच्या काठावर सध्या जेथे बक्सर आहे तेथे त्यांचा आश्रम होता.
बक्सर नाव कसे पडले?
पुरातत्त्व उत्खननातील अवशेषांनी बक्सरचा संबंध मोहंजोदारो आणि हडप्पा या प्राचीन संस्कृतींशी जोडला आहे. हे ठिकाण प्राचीन इतिहासात सिद्धाश्रम, वेदगर्भपुरी, करुष, तपोवन, चैत्रथ, व्याघ्रसार, बक्सर या नावानेही ओळखले जात असे. बक्सरचा इतिहास हा रामायण काळापूर्वीचा आहे. बक्सर हा शब्द ‘व्याघ्रसार’ या शब्दापासून बनला आहे असे म्हणतात. ऋषी वेदशिराचा वाघाचा चेहरा ऋषी दुर्वासांच्या शापाचा परिणाम, पवित्र कुंडात स्नान केल्यावर पुनर्संचयित करण्यात आला. त्यालाच नंतर ‘व्याघ्रासार’ असे म्हणू लागले.
पौराणिक कथेनुसार भगवान राम आणि ८० हजार संतांचे कौटुंबिक गुरू ऋषी विश्वामित्र यांचा पवित्र गंगा नदीच्या काठावर आश्रम होता. बक्सर  जिल्ह्यात हे ठिकाण आहे. ‘बक्सरची लढाई’ या नावाने इतिहासाच्या पुस्तकात ओळख झालेलं बक्सर बिहारमध्ये पटनापासून १२४ किमी अंतरावर आहे. येथे गंगेच्या एका काठाला उत्तर प्रदेश तर दुसर्‍या काठाला बिहार आहे.
रामाने केला त्राटिका वध 
विश्वामित्र ऋषी आणि त्यावेळचे अन्य ऋषी यज्ञात वारंवार विघ्ने उत्पन्न करणार्‍या राक्षसांच्या त्रासाने व्यथित झाले होते. विश्वामित्र आणि अन्य ऋषी करीत असलेल्या यज्ञात विघ्ने आणणार्‍या राक्षसांपासून संरक्षण मिळविण्यासाठी विश्वामित्र हे राजा दशरथाकडे आले आणि दशरथाने राम व लक्ष्मण ह्या आपल्या दोन पुत्रांना त्या कामासाठी त्यांच्यासह पाठवले. या ठिकाणी भगवान रामाने प्रसिद्ध राक्षसी त्राटिकाचा (ताडिका) वध केला होता. ते ठिकाण सध्याच्या बक्सर शहराच्या परिसरात  येते असे म्हटले जाते.
पूर्वी या भागाला ‘चरित्रवन’ असे म्हणत असत. येथेच गुरू विश्वामित्र यांचा आश्रम होता. विश्वामित्र ऋषींनी भगवान राम आणि त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण यांना बक्सर येथे धनुर्विद्या शिकवली, असे रामायणात म्हटले आहे. या प्रसंगाची आठवण करून देणारे मंदिर येथे आहे.
बक्सरचा रामरेखा घाट 
  रामायण काळापासून बक्सर येथील गंगा नदीच्या काठावरील रामरेखा घाट प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भगवान रामाने राक्षसी त्राटिकाचा वध केला होता. या वधामुळे रामाला स्त्री हत्येचे पातक लागले. या पातकापासून मुक्त होण्यासाठी श्रीरामाने गंगेच्या पवित्र जलात स्नान केले आणि गंगेच्या काठावर असलेली गंगेची माती आणि वाळू यापासून शिवलिंग तयार केले. त्या शिवलिंगाला गंगाजलाने अभिषेक करू लागले, पण शिवलिंगाची माती पाण्यात विरघळू लागली. त्यामुळे रामाने ते शिवलिंग आपल्या हातात धरले.
रामाने जेव्हा शिवलिंगावरचा हात बाजूला केला तेव्हा त्याच्या हाताच्या रेषा शिवलिंगावर उमटल्या आणि पावलाची निशाणी गंगा काठावर उमटली. याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले आहे. ज्या घाटावर प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग पूजा केली त्या घाटाला रामरेखा घाट म्हणतात. आजही येथील शिवपिंडीवर हाताच्या रेषा आणि जमिनीवर रामाची पावलं उमटलेली पाहता येतात. बक्सर रेल्वे स्टेशनपासून हे स्थान २ किमी अंतरावर आहे.
दोन वेळा राम येथे आले 
बक्सर येथील गंगा किनार्‍यावरील रामरेखा घाट प्रसिद्ध असण्याचे आणखी एक कारण म्हणजे प्रभू रामचंद्रांनी दोन वेळा या स्थानाला भेट दिली होती, असे म्हणतात. त्राटिका वधानंतर स्त्री हत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी श्रीरामांनी येथे गंगास्नान केले होते आणि सिंहासनावर आरुढ झाल्यानंतर प्रभूराम येथे यज्ञ करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या बाणाच्या टोकाने यज्ञभूमीच्या सीमारेखा कोरल्या होत्या, असे सांगितले जाते. त्यामुळे रामरेखा घाट तेव्हापासून प्रसिद्ध आहे.
बक्सरचे दक्षिण भारतीय पद्धतीचे नौलखा मंदिर
बक्सर येथे श्रीराम-लक्ष्मण यांनी त्राटिका राक्षसीचा वध केला. या प्रसंगाची आठवण करून देणारे नौलखा मंदिर येथे आहे. हे मंदिर विष्णू आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामाचे मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय पद्धतीचे आहे. येथील सर्व पुजारी आणि व्यवस्थापन तामिळनाडूतील ब्राह्मणांचे आहे. मंदिराचे प्रवेशद्वार दाक्षिणात्य गोपुरमसारखे आहे. प्रवेशद्वारावर आणि मंदिरात सर्वत्र अनेक रंगीत मूर्ती आहेत. येथे आल्यावर आपण दक्षिण भारतात आल्यासारखे वाटते.
मंदिरात प्रवेश केल्यावर डावीकडे शिशमहल नावाची मोठी इमारत आहे. येथे काचेचा भव्य महाल उभारण्यात आला आहे. जमिनीपासून उंच छतापर्यंत काचा आणि आरसे बसवले असून त्यावर रामायणातील अनेक प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. हा शिशमहल अतिशय भव्य आणि सुंदर आहे. येथील रामायणातील चित्रं इतकी सुंदर आहेत की ते पाहण्यास पूर्ण दिवसही कमी पडतो. बक्सर येथे येणारा प्रत्येक भाविक आणि पर्यटक या मंदिराला अवश्य भेट देतो. कारण या शहराचे प्रमुख आकर्षण राम-लक्ष्मण यांचे हे मंदिर आहे.
अहिल्येचा उद्धार 
भगवान रामाच्या चरणांच्या स्पर्शानेच गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिला दगडातून मानवी शरीर प्राप्त झाले आणि मोक्ष प्राप्त झाला, असेही म्हटले जाते. ते ठिकाण सध्या अहिरौली म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण बक्सर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. कानवलदाह पोखरा ज्याला व्याघ्रासार म्हणूनही ओळखले जाते ते या भागातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. ब्रह्म पुराण आणि वराह पुराण यांसारख्या प्राचीन महाकाव्यांमध्ये बक्सरचे प्राचीन महत्त्व सांगितले आहे.
सीताराम उपाध्याय म्युझियम 
बक्सरमधील दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे सीताराम उपाध्याय म्युझियम. या संग्रहालयात राम आणि सीतेशी संबंधित अनेक वस्तू जपून ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे मौर्य आणि कुषाण या राजांच्या काळातील सुमारे १५०० पेक्षा अधिक प्राचीन अवशेष, मातीची भांडी, नाणी, पांडुलिपी इत्यादींचे जतन केले आहे. इ. स. १९७९ मध्ये हे म्युझियम सुरू झाले असून प्राचीन भारताचा अमूल्य ठेवा येथे पाहायला मिळतो.
नाथजी मंदिर बक्सर   
बक्सर येथे गंगा नदीच्या काठावर नाथजी मंदिर आहे. गंगेच्या काठावर अनेक घाट आणि मंदिरं आहेत. विविध पर्वात हजारो भाविक येथे गंगा स्नानासाठी येतात.
ब्रह्मेश्वर नाथ मंदिर 
येथे ब्रह्मेश्वरनाथ नावाचे शिव मंदिर आहे. तुलसीदास या मंदिरात आले होते, असे म्हणतात. श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची गर्दी होते.
युद्धभूमी बक्सर 
प्राचीन काळापासून बक्सर हे संतांचे स्थान, पुराणानुसार देव आणि दानवांचे युद्धक्षेत्र आणि आधुनिक इतिहासात परकीय आक्रमणे आणि देशवासीय यांच्यातील लढाऊ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मुघल काळात हुमायून आणि शेरशाह यांच्यातील ऐतिहासिक युद्ध १५३९ मध्ये चौसा येथे लढले गेले. सर हीटर मुनरो यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याने २३ जून १७६४ रोजी मीर कासिम, शुजा-उद-दौला आणि शाह आलम-द्वितीय यांच्या मुस्लीम सैन्याचा पराभव केला. कटकौलीचे मैदान बक्सर शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर आहे. कटकौली येथे ब्रिटिशांनी उभारलेले दगडी स्मारक आजही या लढ्याची साक्ष देते.
कसे जावे?
बिहार राज्यातील ३८ जिल्ह्यांपैकी बक्सर हा एक जिल्हा आहे. पटणापासून बक्सर १२७ किमी अंतरावर तर मुगलसराय रेल्वे स्टेशनपासून ९१ किमी अंतरावर आहे. वाराणसीपासून रस्तेमार्गाने बक्सर १२० किमी अंतरावर आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -