घरफिचर्ससारांशआचरेकर प्रतिष्ठानची ‘रंगवाचा’ सृजनशीलता!

आचरेकर प्रतिष्ठानची ‘रंगवाचा’ सृजनशीलता!

Subscribe

कोरोना काळात सगळे नाट्यव्यवहार पुन्हा एकदा अनिश्चित वेळेपर्यंत ठप्प झाले आहेत. अशा या अस्वस्थतेने भारलेल्या दिवसांत वाळवंटात पाणी सापडावं तसा ‘रंगवाचा’ या रंगभूमीविषयक नियतकालिकाचा अंक घरपोच मिळाला. कोरोनाच्या या निष्फळ काळात खर्‍या अर्थाने जे रचनात्मक काम झालं, त्याचा दस्तावेज म्हणजे हा कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचा नाटकाला वाहिलेल्या नियतकालिकाचा ताजा एकांकिका विशेषांक होय. ‘रंगवाचा’च्या विशेषांकातल्या तीस एकांकिकांपैकी निमंत्रित मान्यवर लेखकांनी लिहिलेल्या एकांकिका वाचल्यास अनेक अपेक्षा बव्हंशी पूर्ण करतील, अशा ताज्या रचना रंगकर्मींना करून पाहण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा जोर पहिल्या लाटेपेक्षा अधिकच विध्वंसक आहे. जिथे शासनाने पहिल्या लाटेतच आपल्या नाट्यक्षेत्राला आणि पर्यायाने अवघ्या मनोरंजन सृष्टीला शेवटच्या प्राधान्याने वागविलं होतं, तिथे आताच्या या अधिक प्राणघातक लाटेत आधीपेक्षा सुधारलेलं प्राधान्य आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा बाळगणंच व्यर्थ होतं. साहजिकच, सगळे नाट्यव्यवहार पुन्हा एकदा अनिश्चित वेळेपर्यंत ठप्प झाले आहेत. अशा या अस्वस्थतेने भारलेल्या दिवसांत वाळवंटात पाणी सापडावं तसा ‘रंगवाचा’ या रंगभूमीविषयक नियतकालिकाचा अंक घरपोच मिळाला. कोरोनाच्या या निष्फळ काळात खर्‍या अर्थाने जे रचनात्मक काम झालं, त्याचा दस्तावेज म्हणजे हा कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचा नाटकाला वाहिलेल्या नियतकालिकाचा ताजा एकांकिका विशेषांक होय.

गेल्या डिसेंबर महिन्यात याच सदरातून लिहिताना ‘एकांकिका’ या नाट्यप्रकाराविषयी, तिच्या आजवरच्या प्रवासाविषयी आणि सद्यस्थितीविषयी उपलब्ध शब्दमर्यादेत काही मुद्दे मांडले होते. एक सुजाण नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेत बालरंगभूमी जी भूमिका बजावत असते, तशीच भूमिका एक प्रगल्भ रंगकर्मी घडविण्यात एकांकिका स्पर्धांची आहे. ‘एकांकिका’ हा एक लघु पण तितकाच सघन नाट्याविष्कार आहे. तेव्हा त्यांचं सादरीकरण फक्त शहरी महाविद्यालयीन स्पर्धांपुरतं मर्यादित असणं, हे काही अंशी मारक आहे. नाही म्हणायला मुंबईच्या अमर हिंद मंडळासारख्या काही संस्था जरूर आहेत, ज्यांनी खुल्या गटातील रंगकर्मींना एकांकिकेचा फॉर्म हाताळून पाहण्यासाठी रंगमंच उपलब्ध करून दिला. तळकोकणातील कणकवलीमध्ये वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान गेली कित्येक वर्षे एकांकिका महोत्सवाचे आयोजन यशस्वीरित्या करते आहे.

- Advertisement -

दरवर्षी एक लेखक निवडून त्याच्या निवडक एकांकिकांचे प्रयोग सादर करण्यासाठी महाराष्ट्रातील मान्यवर संस्थांना तिथे पाचारण केले जाते. त्याशिवाय, शालेय आणि खुल्या गटात घेतल्या जाणार्‍या एकांकिका स्पर्धा ह्या या संस्थेच्या दरवर्षीच्या उपक्रमांचा भाग आहेत. दरवर्षी डिसेंबर ते जानेवारीच्या महिन्यात पार पडणार्‍या या उपक्रमांत यावेळेस कोरोनाने खोडा घातला. परिणामी, या स्पर्धांचं आयोजन दुर्दैवाने रद्द करावं लागलं. प्रत्यक्ष रंगभूमीवर एकांकिकेचे प्रयोग होऊ शकले नाहीत. त्याची रुखरुख वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या धुरीणांना स्वस्थ बसू देईना. गेली त्रेचाळीस वर्षे सलग सुरू असलेला हा उपक्रम खंडित होऊ देणं कुणालाच पटत नव्हतं. प्रत्यक्ष स्पर्धेची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी एकांकिका लेखन स्पर्धा जाहीर केली.

‘बॅरिस्टर नाथ पै एकांकिका लेखन स्पर्धा, 2020’ असं या स्पर्धेचं नामकरण केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोरोना काळासारख्या माणसांमध्ये शिथिलता आणणार्‍या काळातही या लेखन स्पर्धेला अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठा प्रतिसाद मिळाला. कोरोना काळात गिळून टाकणार्‍या अस्वस्थतेला भिडत अनेक स्पर्धक आणि मान्यवर निमंत्रित लेखकांनी आपली सृजनशीलता उपयोगी आणली आणि नव्या कोर्‍या ताज्या एकांकिकांचं लेखन केलं. कोरोना काळात व्यापून राहिलेल्या अस्वस्थतेला प्रत्येकाने आपल्या परीने दिलेली ही एक ठोस प्रतिक्रिया आहे, असं मला या निमित्ताने आवर्जून म्हणावंसं वाटतं. या निमित्ताने लिहिल्या गेलेल्या एकांकिकांचे आशय, विषय, दर्जा आणि गुणवत्तेविषयी बोलण्यासाठी ही जागा नव्हे, याचं मला पूर्ण भान आहे. सद्यस्थितीत इतकं सारं ताजं नाट्यलेखन इतक्या लोकांकडून लिहून होतंय, हीच मनाला उभारी देणारी खूप मोठी बाब आहे.

- Advertisement -

तरीही, हा सगळा उत्साह, व्यक्त होण्याची असोशी पुरेशी समजून घेतल्यानंतर आता कुठल्याही लेखनाची महत्ता ज्या निकषांवर जोखली जाते, त्यांपैकी एक म्हणजे लेखनाचा घाट, त्याविषयी थोडंसं बोलावंसं वाटतं. अलिकडे बहुतांशी एकांकिका हा प्रकार लेखकाने त्याची भडास काढण्यासाठी वेठीला धरल्यासारखा जाणवतो. भडास म्हटली की ती अस्ताव्यस्त वाहत येते किंवा अस्ताव्यस्त वाहते म्हणून ती भडास असते. मेंदूत घोळत असलेले विषय, खटकणारं आसपासचं राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण, जगण्यातले विरोधाभास, जवळजवळ अशक्य वाटणार्‍या कल्पना ज्याला आपण फँटसी म्हणून स्वीकारावं असं, कागदावर उतरवायचं.

एकाच पात्राच्या तोंडी पानपानभर संवाद लिहायचे. असं बर्‍याच एकांकिकांमध्ये खूपदा वाचलंय. अर्थात, सन्माननीय अपवाद वगळले, तर एकांकिकेलासुद्धा क्राफ्टिंग असणं गरजेचं आहे, याची जाणीव दुर्मीळ झाल्यासारखी वाटते. क्राफ्टिंग इज ए डिफरंट आर्ट ऑलटुगेदर ! अ‍ॅबसर्डिटी, जगावेगळ्या फँटसीज, सामाजिक, लोकाभिमुख, बक्षिसपात्र आणि इतर बरंच….कुठलाही आशय विषय असो, तो मांडताना एक प्रकारची सूचकता असावी, लिखाणातला घाट हवा, एक लोकविलक्षणपणा हवा. अर्थात, एकांकिका या माध्यमाला धरून असलेली ही माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. ती सर्वमान्य असेल किंवा असावीच असा माझा दुराग्रह अजिबातच नाही. फार तर एक पर्सनल चॉईस म्हणूया.

‘रंगवाचा’च्या विशेषांकातल्या तीस एकांकिकांपैकी निमंत्रित मान्यवर लेखकांनी लिहिलेल्या एकांकिका वाचल्यास उपरोक्त अपेक्षा बव्हंशी पूर्ण करतील अशा ताज्या रचना रंगकर्मींना करून पाहण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. उल्लेख करायचा झाला तर चं. प्र. देशपांडेंची ‘खुल्लम खुल्ला’, प्राजक्त देशमुखची ‘लाल’, इरफान मुजावर यांची ‘जन्नत-उल-फिरदोस’, दत्ता पाटीलची ‘दगड आणि माती’ आणि विजयकुमार नाईक यांची ‘मोहोळ’ या एकांकिका माझ्या व्यक्तिगत पसंतीला उतरल्या. या एकांकिकांचा आशय विषय काय आहे याची चर्चा इथे मी करणार नाही. त्या ऐवजी समस्त रंगकर्मींना ‘रंगवाचा’ या नियतकालिकाचे सभासद होऊन अंक मिळवून या तीस एकांकिका प्रत्यक्ष वाचण्याचं आणि उद्याची वेळ आपल्या बाजूने असलीच, तर त्यांचे प्रत्यक्ष प्रयोगही करण्याचं आवाहन नाट्यरसिकांच्या वतीने मी या सदरातून करतो आहे.

गेलं दीड वर्ष कोरोना काळ हा जणू आपली परीक्षाच घेतो आहे. नाटक हे मुळातच करून पाहण्याचं माध्यम आहे. तसं करून पाहण्यालाच सध्या अराजकीय स्वरूपातील बंदी घालण्यात आली आहे. हा बंदीवास केव्हा संपेल आणि हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी पुन्हा एकदा गजबजून उठेल, याची वाट पाहण्याशिवाय हातात काही उरलेलं नाहीय. या भयाण शांततेचा परिणाम आपल्या सृजनशीलतेवर होईल आणि एकतर आपण पूर्णत: ग्रासले तरी जाऊ किंवा राखेतून उठणार्‍या फीनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा झेप घेऊ. ती झेप घेण्यासाठी आधी पंखांत जे बळ असायला हवंय, तेच या विशेषांकात एकांकिका लिहिणार्‍या समस्त लेखकांनी दाखवून दिलंय. ‘रंगवाचा’ने पुरवलेली ही रसद सध्या तरी खूपच मोलाची आहे. त्यासाठी त्यांचे अनेक आभार !

समीर दळवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -