घरफिचर्ससारांशश्रीमान योगी...५६ वर्षांचा प्रवास !

श्रीमान योगी…५६ वर्षांचा प्रवास !

Subscribe

आज १९ फेब्रुवारी. शिवजयंती. त्याच बरोबर रणजीत देसाई लिखित ‘श्रीमान योगी’ या कादंबरीच्या प्रकाशनास यंदा ५६ वर्षे पूर्ण झाली. तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांनी रणजीत देसाई यांना एकदा आवर्जून बोलावून घेतलं. आणि त्यांना विनंती केली.. शिवचरित्र लिहिण्याची. यांच्या विनंतीला मान देऊन रणजित देसाई यांनी या शिवचरित्रास हात घातला. शिवाजी महाराजांची जीवनकथा लिहिण्यासाठी चरित्र की कादंबरी.. असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. पण त्यांनी जाणीवपूर्वक कादंबरी हा फॉर्म निवडला. चरित्र लिहिताना तेथे कल्पना विलासाचे स्वातंत्र्य नसते. प्रत्येक बाब पुराव्यानिशी सादर करावी लागते. रणजित देसाई यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की, ते या शिवकथेत इतिहास, दंतकथा, आख्यायिका हे सर्व काही वापरणार आहेत.

–सुनील शिरवाडकर

ही कादंबरी लिहिताना एक गोष्ट रणजीत देसाई यांच्या लक्षात आली. ती ही की, दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अधिकृत व चांगले एकही चरित्र उपलब्ध नाही.(ही परिस्थिती आजही आहे).जी पुस्तके.. किंवा चरित्र आहेत,ती जास्त करुन भक्तीभावाने लिहिलेली आहेत. कादंबरीचे लेखन करताना त्यांनी जी पुस्तके अभ्यासली त्यांची यादी कादंबरीच्या शेवट दिली आहे. त्यात मराठीतील बहुतेक सर्व ऐतिहासिक पुस्तके..बखरी.. चरित्र.. पोथ्या तर आहेतच, पण विविध शब्दकोश आहेत. चरकसंहिता आहे.. कौटिल्याचे अर्थशास्त्र आहे..२५-३० इंग्रजी ग्रंथ आहेत. म्हणजेच साधारण दीडशे ग्रंथ त्यांनी डोळ्याखालून घातले.

- Advertisement -

तत्कालीन भौगोलिक परिस्थिती डोळ्यासमोर उभी रहाण्यासाठी त्यांनी शिवकालीन गड कोटांना म्हणजे शिवनेरी, राजगड, रायगड, पन्हाळा यांना भेटी तर दिल्याच..पण अनेक तीर्थक्षेत्रे, विजापूर, गोवळकोंडा, आग्रा यासारख्या राजधानीच्या शहरांनादेखील भेटी दिल्या. शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रवाद आहेत. त्याकाळातील वैद्यकीय माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना बेळगावचे त्यांचे डॉक्टर करंबेळकर यांनी माहिती दिली. त्याचबरोबर त्यांना नांदेडचे वैद्यराज काशिनाथराव बोर्डे यांनी मदत केली. ढाल तलवारीबद्दल तर सर्वांना माहिती असतेच पण इतर काही शस्त्रे.. दांडपट्टा, विटा, बोथाटी ही शस्त्रे नेमकी कशी वापरतात ह्यासाठी त्यांना कोल्हापूरच्या महाकाली तालमीमधील लोकांनी प्रात्यक्षिके दाखवली.

मुंबई, दिल्ली, विजापूर, बडोदा येथील विविध वस्तुसंग्रहालयातून त्यांना जुन्या महत्त्वाच्या वस्तू पहायला मिळाल्या..त्यांचे उपयोग..माहिती सर्व काही मिळाले. आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार हेब्बर यांनी ‘श्रीमान योगी’चे मुखपृष्ठ तयार केले. या कादंबरीचं लेखन करत असताना वि.स.खांडेकर आणि आचार्य अत्रे यांचे लाभलेले आशीर्वाद रणजीत देसाई यांना खूप मोलाचे वाटले. कादंबरीचे लेखन चालू असताना त्यांना नरहर कुरुंदकरांनी काही मार्गदर्शक सूचना करणारे प्रदीर्घ पत्र पाठवले. हे पत्र म्हणजे शिवकालीन परिस्थितीचा घेतलेला सविस्तर आढावाच आहे. हे पत्र म्हणजेच श्रीमान योगीची २५ पानी प्रस्तावना. श्रीमान योगी एवढीच वाचनीय असलेली ही प्रस्तावना त्या कालखंडाचा अभ्यास करणार्‍यांसाठी खूपच उपयुक्त आहे. त्यात कुरुंदकरांनी कौटिल्याच्या राजनीतीवर सविस्तर चर्चा केली आहे आणि हे दाखवून दिले की शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना तिचेच पालन केले आहे.

- Advertisement -

कादंबरीच्या सुरुवातीला रणजित देसाई शिवाजी महाराजांचे मोठेपण थोडक्यात अधोरेखित करतात. त्यात ते म्हणतात..
इतिहास वाचत असताना त्यात दिसणारे शिवाजी महाराजांचे रुप पाहून थक्क व्हायला होते. इतका अष्टपैलू, अष्टावधानी, संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, चारित्र्यसंपन्न जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे कठीण. प्रजेचे ऐहिक कल्याण करण्याची जबाबदारी राजावर असते हे तो कधीच विसरला नाही. पण त्यासाठी त्याने प्रजेवर नवीन कर लादले नाहीत. मी शत्रूशी शत्रू म्हणून वागलो..मित्रांना दगा दिल्याचे दाखवा, असे त्यांचे आव्हान होते. नवे किल्ले बांधणे, वीरांचे कौतुक आणि पंडितांचा सन्मान या सर्व बाबतीत दक्ष असणारे महाराज इतिहासात ठायी ठायी आपणास दिसतात. पुरंदरच्या तहाने धुळीस मिळालेले राज्य त्यांच धुळीतून परत उठवून त्याला सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषाला साधले याची इतिहासात नोंद आहे. आणि एवढे करुनही त्याचे रुप एकाकीच भासते. असामान्य गोष्टी साध्य करुनही त्यांची सुखदु:खे सामान्य माणसाचीच राहिली. ती त्यांना एकट्यालाच भोगावी लागली.

रणजीत देसाई यांनी शिवाजी महाराजांविषयी लिहिताना हेच त्यांचे माणूसपण रेखाटले आणि यामुळे ते मनाला अधिक भावते. आणि म्हणूनच इतक्या वर्षांनंतरसुध्दा ‘श्रीमान योगी’ या कादंबरीची वाचकप्रियता जराही कमी झाली नाहीये..ती केवळ एक कादंबरी न राहता तिला एका ग्रंथाचे मोल प्राप्त झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -