घरफिचर्ससारांशरणजितसिंह डिसले, महाराष्ट्राचा ‘फुनसुख वांगडू’

रणजितसिंह डिसले, महाराष्ट्राचा ‘फुनसुख वांगडू’

Subscribe

ग्रामीण भागातील त्यातही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये संशोधन करुन तंत्रस्नेही शिक्षण देण्याची क्षमता आहे, हे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सिद्ध केले आहे. युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्‍या सात कोटी रुपयांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारसाठी त्यांची निवड झाली. अतिशय सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील या मराठमोळ्या ‘फुनसुख वांगडू’ने जगभरात महाराष्ट्राची शान वाढवली आहे. पण, राज्यात त्यांच्यासारखे अनेक ‘डिसले’ गावो-गावी, खेड्यापाड्यांवर शिक्षणाचे कार्य करत आहेत, त्यांचाही शोध घेण्याची वेळ यानिमित्ताने आली आहे.

सरकारी शाळा म्हटल्या की त्यांच्याकडे बघण्याचा द़ृष्टीकोन नकारात्मक झाला आहे. या नकारात्मक विचारांच्या काटेरी वाटेवर सुगंधी फुलांचा वर्षाव करुन काट्यांनाही उल्हासित करणारे विचारवंत आजही आपल्या देशात, राज्यात आहेत. तसे म्हटले तर प्रगल्भ विचारवंत घडवण्याचे खरे सामर्थ्य हे हाडाच्या शिक्षकांमध्येच असते. काळाबरोबरच शिक्षणाच्या पद्धती बदलत गेल्या आणि तंत्रस्नेही शिक्षणाला महत्व प्राप्त झाले. काळाबरोबर न बदलणारे शिक्षक या गतीचक्रातून बाहेर फेकले गेले. त्यामुळे शिक्षणामध्ये ग्रामीण व शहरी असा मोठा भेदभाव निर्माण झाला. परंतु, ग्रामीण भागातील त्यातही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये संशोधन करुन तंत्रस्नेही शिक्षण देण्याची क्षमता आहे, हे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सिद्ध केले आहे. युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्‍या सात कोटी रुपयांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारसाठी त्यांची निवड झाली. अतिशय सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील या मराठमोळ्या ‘फुनसुख वांगडू’ने जगभरात महाराष्ट्राची शान वाढवली आहे. पण, राज्यात त्यांच्यासारखे अनेक ‘डिसले’ गावो-गावी, खेड्यापाड्यांवर शिक्षणाचे कार्य करत आहेत, त्यांचाही शोध घेण्याची वेळ यानिमित्ताने आली आहे.
बार्शी तालुक्यातील (जि.सोलापूर) साकत या छोट्याशा गावातून रणजितसिंह डिसले यांचा जीवनप्रवास सुरू झाला. माढा तालुक्यातील परितेवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून डिसले हे 2009 मध्ये रुजू झाले. अर्थात, नोकरी मिळाल्याचा आनंद होताच. या आनंदाच्या भरात त्यांनी शाळा गाठली. मात्र, येथे त्यांचे सगळे अवसानच गळून पडले. कारण उद्याच्या भारताची पिढी घडविताना विद्यार्थीरुपी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे स्वप्न उरी घेऊन आलेल्या रणजितसिंह यांनी पडझड झालेल्या शाळेच्या वर्गखोलीत अक्षरश: शेळ्या बांधलेल्या बघितल्या. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करुन मुलांना शिक्षण देण्याचा त्यांनी निश्चय केला. पण तरीही मुले शेतातील कामावर, गुरांच्या मागेच जात होती. तेव्हा रणजितसिंह डिसले यांनी मुलांना घरी जाऊन तर कधी वेळप्रसंगी अगदी शेतामध्ये जाऊनही गाडीवर बसवून शाळेत आणले. शाळा कंटाळवाणी वाटायला नको म्हणून पहिले सहा महिने त्यांनी पुस्तकाला साधा हातही लावू दिला नाही. मोबाईल व लॅपटॉपच्या साह्याने त्यांनी मुलांना गाणी, गोष्टी, कार्टून यामध्ये रमवून ठेवले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शाळेमध्ये गोडी वाटू लागली. आणि ज्या शाळेची जागा जनावरांनी घेतली होती तेथे तब्बल आठ महिन्यांनंतर वर्ग भरण्यास सुरुवात झाली.

- Advertisement -

ग्रामीण भागातील शिक्षक आजही पुस्तकी शिक्षणावर जास्त भर देत असल्याने विद्यार्थ्यांना ते कंटाळवाने वाटते. अनेक शिक्षकांना तर साधा ई-मेल पाठवता येत नाही. ट्विटर, इन्स्टाग्राम हे त्यांच्या गावी असण्याचे काही कारणच नाही. असे शिक्षक मग तंत्रस्नेही पिढी घडवणार तरी कसे? त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा किंवा तंत्रज्ञान याबद्दल न्यूनगंड तयार व्हायला लागतो. या तुलनेत शहरी भागातील विद्यार्थी हे फक्त राहणीमान आणि तंत्रज्ञानाची भाषा अवगत करुन आत्मविश्वासाने बोलण्यामुळे कधी-कधी बाजी मारतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खेळात प्राविण्य मिळवण्याचे कौशल्य मोठ्या प्रमाणात दिसून येतात. नाशिकची ‘सावरपाडा एक्सप्रेस’ अर्थात आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हीदेखील एका आदिवासी पाड्यावरुन आलेली होती. तिला प्रशिक्षक अर्थात गुरू चांगले मिळाले आणि तिच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर धावण्याचे स्वप्न साकार झाले, ते केवळ एका शिक्षकाच्या जिद्दीमुळे! त्यामुळे केवळ पारंपारिक शिक्षणावर वेळकाढूपणा करण्याची आता अनेकांना सवय जडली आहे. परंतु, रणजितसिंह डिसले हे फक्त शिक्षणापर्यंत मर्यादित राहिले नाही तर जगातील आठ देशांचा अभ्यास करुन तेथील नागरिकांना नेमके काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना एक भयानक पण आश्वासक असे वास्तव लक्षात आले. भारत-पाकिस्तान, इराण-इराक, इस्त्राईल-पॅलेस्टाईन आणि अमेरिका-उत्तर कोरिया या आठ देशांमध्ये कायम अशांतता व एकमेकांच्या विरोधात माथी भडकविण्याचे काम संधीसाधू व्यक्ती व गटांकडून होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर रणजितसिंह डिसले यांनी ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा प्रोजेक्ट राबवला. याअंतर्गत त्यांनी या आठ देशांतील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांची ‘पीस आर्मी’ तयार केली आहे. या देशांमध्ये ज्या-ज्या वेळी तणाव निर्माण होईल, त्यावेळी हे विद्यार्थी एकमेकांशी संपर्क साधून त्या देशातील जनजीवनाविषयी व सर्वसामान्य लोकांच्या भावनांविषयी जाणून घेतात आणि प्रसारमाध्यमातून येणार्‍या खोट्या बातम्यांचा पर्दाफाश करतात. अगदी अलिकडे पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी चर्चा करुन दोन्ही देशांतील जनभावना जाणून घेतल्या. तेव्हा वास्तव काही वेगळेच आणि प्रसारमाध्यमातून काही भलतेच जनतेसमोर आणले जात असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. जगाच्या जाणिवा आपल्या विद्यार्थ्यांना कळल्या पाहिजेत, हा विचारच खूप मोठा म्हणावा लागेल.
आंतरराष्ट्रीय घडामोडी हा जीवनाचा एक भाग होऊ शकतो. पण जगाशी ‘कनेक्ट’ व्हायचे असेल तर त्या जगाची भाषा आपल्याला समजायला पाहिजे, हेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज समजले पाहिजे यासाठी रणजितसिंह सरांनी प्रयत्न सुरू केले. विद्यार्थ्यांना घरी, वाट्टेल तिथे शिक्षण घेता यायला हवे म्हणून त्यांनी क्यूआर कोडची निर्मिती केली. त्याचाही इतिहास फार रंजक आहे. डिसले सर एका दुकानात गेल्यावर त्यांना ही सुपिक कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी असा एक कोड तयार करुन बघितला. यामध्ये पाठाचा आशय डिजिटल स्वरुपामध्ये साठवला. म्हणजे जर तो धडा असेल तर त्याचा व्हिडीओ फॉरमॅट आणि कविता ऑडिओ फॉरमॅटमध्ये असल्याने मुलांना मोबाईलमध्ये अगदी सहजरित्या ऐकायला मिळतील. महाराष्ट्रातील या अभिनव प्रयोगामुळे खांडवी (मुलींची) शाळेचे नाव जगभरात पोहोचले. मायक्रोसॉफ्टने याची दखल घेतली. बालभारतीने या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या इयत्तांची पुस्तकेही क्यूआर कोडच्या फॉरमॅटमध्ये बनवली आहेत.

जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक ही किमया साध्य करु शकतो तर इतर शिक्षकांचे काय? त्यांच्या अभिनव कल्पनांना खुले व्यासपीठ मिळावे म्हणून राज्याचा शिक्षण विभाग ‘शिक्षणाची वारी’ उपक्रम चालवतो. यातही अनेक कल्पना समाजासमोर मांडण्याचे काम शिक्षक करतात. परंतु, या सर्वांपासून दूर राहून अहोरात्र शिक्षणाचे कार्य करणारे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावचे शिक्षक केशव गावित हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतील. 365 दिवस आणि 14 तास शाळा चालवणारे गावित यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे 300 पर्यंत पाढे तोंडपाठ आहेत. त्यामुळे गणित सोडवण्यात त्यांची हातोटी निर्माण झाली. इंग्रजीवर त्यांना प्रभूत्व मिळाले आणि सर्वाधिक महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जाण्याचा ‘मूडच’ होत नाही, हे या शिक्षकांचे यश म्हणावे लागेल. केशव गावित असतील किंवा रणजितसिंह डिसले यांच्यासारखे अनेक ‘फुनसुख वांगडू’ या महाराष्ट्रात जन्माला आले आहेत. त्यांचा शोध घेऊन राज्य सरकारने शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. फक्त राजकारण करण्यासाठी अवघे आयुष्य खर्ची घालणार्‍या व्यक्तिंनी उज्ज्वल भविष्य घडवणार्‍या शिक्षकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. चांगले कार्य करणार्‍या शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे धारिष्ठ्य दाखवले पाहिजे. शिक्षकांनीही काळाची पावले ओळखून तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण द्यायला सुरुवात करावी, असे प्रयोग झाले तरच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढेल.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -