– नारायण गिरप
ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे अर्थात रावसाहेब बोराडे यांचे 11 फेब्रुवारीला निधन झाले. निधनसमयी ते 84 वर्षांचे होते. त्यांना दोन आठवड्यांपूर्वीच राज्य शासनाचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला होता. 55 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली ‘पाचोळा’ ही त्यांची कादंबरी प्रचंड गाजली होती. रा.रं. बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर 1940 रोजी लातूर जिल्ह्यातील काटगाव या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना गाव सोडावे लागले.
माढा, बार्शी, सोलापूर, औरंगाबाद अशा शहरातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मराठीमध्ये एम.ए.केले. 1963 साली बोराडे, विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1971 पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणार्या औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत राहिले. त्यांनी परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातही प्राचार्य म्हणून काम पाहिले होते. 2000 साली त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती. 2000-2004 या काळात महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.
रावसाहेब रंगराव बोराडे हे मराठी साहित्यातील कृतिशील आणि सामाजिक बैठकीचे व्रत जोपासणारे ग्रामीण साहित्यिक होते. त्यांची लेखणी गेल्या 69 वर्षांपासून अव्याहतपणे ग्रामीण समाजमनाची बदलती आंदोलने साकारते आहे. बोराडे हे दीर्घकाळ विविध स्वरूपाचे लेखन करत होते. कथा, कादंबरी, नाटक आणि समीक्षा या प्रकारात त्यांनी वैशिष्ठ्यपूर्ण साहित्यनिर्मिती केलेली दिसून येते. 1970-72 नंतरचा ग्रामीण महाराष्ट्र हा त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या ‘पाचोळा’ कादंबरीने ग्रामीण जीवनाचे वेगळे दर्शन घडविले. 1957 साली मॅट्रिकला असताना बोराडे यांची ‘वसुली’ ही कथा प्रसिद्ध झाली तर 1962 साली पदव्युत्तर मराठीच्या अंतिम वर्षाला असताना ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला आणि रा.रं.बोराडे यांनी मागे वळून न पाहता मराठी साहित्यास फार मोठे योगदान दिले.
‘मळणी’, कणसं आणि कडबा, नातीगोती, माळरान, राखण, हरिणी इत्यादी कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यात फजितगाडा, खोळंबा, ताळमेळ, गोंधळ, हेलकावे, अगं अगं मिशी, या विनोदी कथासंग्रहांचाही समावेश आहे. त्याचबरोबर ‘पाचोळा’, सावट, आमदार सौभाग्यवती, चारापाणी, रहाटपाळणा, इथं होतं एक गाव, वळणाचं पाणी, नामदार श्रीमती, मरणदारी, रिक्त अतिरिक्त, राजसा, लेक माझी, आयुष्याच्या संध्याकाळी, गर्भ आदी कादंबर्या प्रकाशित झालेल्या असून महानुभाव, कथा एका तंटामुक्त गावाची, करायला गेले माकड, इ.विनोदी कादंबर्याही प्रकाशित झाल्या आहेत. याशिवाय चूक भूल घ्यावी द्यावी, कशात काय अन फाटक्यात पाय, पिकलं पान, विहीर, पाच ग्रामीण नाटिका, हसले गं बाई फसले, बंधमुक्ता, चोरीचा मामला, मी आमदार सौभाग्यवती, मलाच तुमची म्हणा, आदी नाटकेही प्रसिद्ध झालेली आहेत. ज्यात एकांकिका, वगनाट्य यांचाही समावेश आहे. आम्ही लेकी कष्टकर्यांच्या, शाळेला चाललो आम्ही, संकल्पाचे दारी, हरवलेली शाळा, पोपट उडाला भुर्रर इत्यादी बालसाहित्य प्रकाशित आहे. एवढेच नाही तर तिळा तिळा डिकी उघड, शेवटचा प्रश्न, एकदा असं झालं, अनुबंधाची पेरणी आदी अनुभवकथन करणारी पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.
रा.रं.बोराडे यांच्या लेखनाचे वैशिष्ठ्य म्हणजे ग्रामीण जीवनस्तरावर बदलत गेलेली समाजव्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेले नातेसंबंधाचे नवे आयाम होय. स्वत: मराठवाड्यातील बहुजन-कष्टकरी वर्गातील माणूस, त्यांचा जगण्याचा संघर्ष, त्यांच्या पारंपरिक अस्तित्वासमोर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह, त्याच्यासमोर उभा होत गेलेला नवा सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक संदर्भाचा पट हे त्यांच्या लेखणीचे केंद्रस्थान आहे. ग्रामीण संवेदनेशी जोडलेली नाळ याच संवेदनशील जाणिवेतून झालेले भोवतालचे संस्कार, ग्रामीण माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष,1960 नंतर निर्माण झालेल्या ग्रामीण साहित्य चळवळीतील प्रत्यक्ष सहभाग आणि शेतकरी संघटनेशी अप्रत्यक्ष संबंध यामुळे त्यांची लेखणी बांधिलकीचे तीव्र समाजभान घेऊन व्यक्त होते. मानवी संबंधांचा शोध गाव आणि शहराच्या पार्श्वभूमीवर नवनव्या दृष्टिकोनातून घेताना गाव नि शहर यामधील भौतिक अंतर, त्या अंतराचा गावाच्या जगण्यावर होत गेलेल्या दृश्य- अदृश्य परिणामांमुळे निर्माण झालेले अभौतिक अंतर यामुळे बोराडे यांची लेखणी अस्वस्थ होत गेलेली दिसते. ही अस्वस्थता चित्रित करताना ती प्रकर्षाने ग्रामीण स्त्रीच्या अस्तित्वाच्या संघर्षाची साक्षीदार होते.
स्वाभाविकपणे त्यामुळेच ‘पाचोळा’तील पार्वती किंवा ‘नामदार श्रीमती’मधील सुमित्रा आपल्या भोवतालच्या पारंपरिक चौकटी मोडून आपली दखल घ्यायला भाग पाडतात. महाराष्ट्रातच नव्हे तर मराठी भाषा जाणणार्या भारतभरातील विविध प्रांतात त्यांचा वाचकवर्ग विखुरलेला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे भारतीय भाषांत तसेच इंग्रजीत अनुवाद झाले आहेत. त्यात ‘पाचोळा’ या कादंबरीचा समावेश आहे.‘पाचोळा’ही कादंबरी मराठीतील अभिजात कादंबर्यात समाविष्ट होते. मराठीतील वाचकप्रिय ‘टॉप टेन’ कादंबर्यातही तिची गणना केली जाते. साध्या, सोप्या मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी बोराडे आग्रही होते. ते म्हणतात, सर्वसामान्यांना कळेल अशी सोपी, अर्थपूर्ण भाषा प्रसारमाध्यमांनी वापरली पाहिजे. वाचक, श्रोता, प्रेक्षक बदलत आहे, त्यांच्या गरजाही बदलत आहेत, हे लक्षात घेऊन भाषाही बदलली पाहिजे. 30 वर्षे प्राचार्य म्हणून काम करीत असताना प्रशासकीय जबाबदार्यांच्या जोडीला लेखक म्हणून आणि महाविद्यालयीन तरुणांमधील सृजनक्षमतेला पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीही रा.रं.बोराडे यांनी निष्ठेने सांभाळली. ‘ग्रामीण आत्मकथन शिबिर’, ‘विद्यार्थी-विद्यार्थिनी नवलेखक शिबिर’, ‘लोककला कौशल्य विकास शिबिर’ यासारख्या शिबिरांच्या आयोजनाबरोबरच मान्यवर साहित्यिकांच्या प्रत्यक्ष भेटींमधून विद्यार्थ्यांमधील सृजन जाणिवा त्यांनी समृद्ध केल्या.
कोणत्याही साहित्य संमेलनाची निवडणूक लढवायची नाही असा निश्चय रा.रं.बोराडे यांनी अगदी उमेदवारीच्या काळातच केला होता. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते वंचित राहिले. त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे चाहते गेले अनेक वर्षे त्यांच्यामागे ससेमिरा लावत होते. तथापि त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक प्रदान केले जावे, अशी त्यांची भूमिका होती. राज्य शासनाने बोराडे यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली, त्याचवर्षी आपल्या कारकिर्दीत त्यांनी सरकारी गोदामात सडत पडलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित केली.
खेड्यापाड्यातील ग्रंथालयांना या योजनेचा फायदा झाला. दुर्लक्षित वाचकांनाही पुस्तके मिळाली. ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांनी आपल्या कामाचा अमीट ठसा उमटविला. साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि शासनाच्या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर बोराडे यांनी आपली पुस्तके पुरस्कारासाठी पाठवणे बंद केले. देण्याची क्षमता माणसात निर्माण होते तेव्हा घेण्याची लालसा त्याने सोडावी, अशी या संदर्भात त्यांची भूमिका होती. त्याउलट त्यांनी स्वत:तर्फे आणि ते संस्थापक अध्यक्ष असलेल्या ‘शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान’ या संस्थेच्या वतीने ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ सुरू केला. त्यांच्या वाढदिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी शेतकर्यांच्या जगण्याचे वास्तव चित्रण करणार्या एका सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीला हा पुरस्कार दिला जातो.
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने रा.रं.बोराडे यांच्या साहित्याचा हिंदी-इंग्रजी अनुवाद केला आहे. ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद, शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश, नाशिक येथे विखे पाटील प्रतिष्ठान व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, जळगाव येथे सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अशा अनेक सन्मानांसह ‘मळणी’, ‘पाचोळा’, ‘पाच ग्रामीण नाटिका’, ‘चोरीचा मामला’, ‘कणसं आणि कडबा’ या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार,‘पाचोळा’ कादंबरीस भैरुरतन दमाणी पुरस्कार, मराठवाडा गौरव पुरस्कार, जयवंत दळवी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, ‘चारापाणी’स मराठवाडा साहित्य परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार, साहित्य वैभव पुरस्कार, फाय फाऊंडेशन पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आहेत)