बळीराजाची व्यथा मांडणारा रौंदळ

‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटांतून प्रस्थापित व्यवस्थेला झुगारून अन्यायाविरोधात बंड केल्याने अभिनेता भाऊसाहेब शिंदे याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तोच भाऊसाहेब आता बळीराजाचं दु:ख मांडण्यासाठी ‘रौंदळ’ चित्रपट घेऊन येतोय. इथल्या प्रस्थापितांना भिडणार्‍या आणि राजकारण्यांना नडणार्‍या तसेच एक लढा पुकारणार्‍या माणसाची गोष्ट म्हणजे ‘रौंदळ.’ शेतकर्‍यांच्या वस्तुस्थितीची जाणीव करून देणारा हा सिनेमा जबराट अनुभव देतो, असेच म्हणावे लागेल.

–आशिष निनगुरकर

शेतकरी माल पिकवण्यासाठी व तो टिकवण्यासाठी वर्षभर मेहनत घेत असतो, परंतु पिकवलेली गोष्ट विकणे त्याच्या हातात नसते. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये ही समस्या सातत्याने शेतकर्‍यांना भेडसावत आहे. या परिस्थितीचे प्रभावीपणे चित्रण व बाजारभावावर ‘रौंदळ’ चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. राजकीय मनमानीला नडणारा आणि शेतकर्‍यांवरील अन्यायाला वाचा फोडणारा भाऊसाहेब शिंदे यांचा रांगडा अवतार ‘रौंदळ’मधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटच्या निर्मिती संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी ‘रौंदळ’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवींद्र आवटी, संतोष आवटी, कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केले आहे. चित्रपटात भाऊच्या जोडीला नेहा सोनावणे आहे. चित्रपटातील ‘मन बहरलं…’ हे प्रेमळ गीत काही दिवसांपूर्वीच रसिकांच्या भेटीला आले असून या गाण्याला संगीतप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. आजवर ग्रामीण बाजाचे बरेच चित्रपट रिलीज झाले असले तरी या चित्रपटाचा बाज खर्‍या अर्थाने महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध दूरवर पसरवणारा असल्याची जाणीव रसिकांना होईल असे दिसते. सत्य घटनेवर आधारलेल्या या कथेत गावातील वास्तव घटनांसह इतरही बर्‍याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

ऊस कारखान्यात घालण्यासाठी शिवाचे वडील जीवाचं रान करतात, परंतु शिवा ज्या गावात राहत असतो तिथल्या लोकांनी आपल्या वडिलांना मतदान न केल्यामुळे बिट्टूशेठ बिथरलेला असतो. हाच राग ठेवून तो आठ दिवस शिवाच्या वडिलांचा ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उतरवून घेत नाही. इथून मग शिवाचं जे तांडव सुरू होतं, ते अन्याय-अत्याचार्‍यांचा रौंदळ करूनच संपतं. ‘रौंदळ’ची कथा-पटकथा दिग्दर्शक गजानन नाना पडोळ यांचं आहे. पडोळ यांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. विषयाचं गांभीर्य आणि त्याची हाताळणी पडोळ यांनी अतिशय चांगली केली आहे. ते स्वतः शेतकरी असल्यामुळे विषयाचं गांभीर्य त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळेच अनेक प्रसंग अगदी खरेखुरे वाटतात. अत्याचाराखाली पिचलेला शिवा आणि त्याचं गाव याची होरपळ पूर्वार्धात पाहायला मिळते, तर उत्तरार्धात शिवानं उघडलेला तिसरा डोळा पाहायला मिळतो. डॉ. विनायक पवार यांचे संवाद आकर्षक आहेत. जिथं पिकतं तिथं विकत नाही, या म्हणीमागचे जे झारीतले शुक्राचार्य आहेत, ते या चित्रपटात पाहायला मिळतात.

दिग्दर्शकानं हे सगळे बारकावे चांगले टिपले आहेत. शिवा आणि बिट्टूशेठ यांच्यामधील हाणामारीचा चित्रपटामधील दोन वेळचा दृश्यक्रम हायलाईट म्हणावा लागेल. उसाच्या फडात आणि चिखलात झालेला राडा अतिशय उत्तम चित्रीत झालाय. चित्रपटाचा क्लायमॅक्स तर सुन्न करणारा आहे. आपल्यावर झालेल्या प्रत्येक अत्याचाराचा शिवा बदला घेताना दाखविण्यात आला आहे. चित्रपटाच्या शेवटी नायकानं केलेल्या साखरेचा वापर कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकणारा आहे. चित्रपटाचा विषय गंभीर असल्यामुळे तो टोकाचा सीरियस होऊ न देण्यासाठी चित्रपटामध्ये शिवाचा प्रेमाचा ट्रॅकही आहे. त्यामुळे मग ओघानं संगीत आलंच. चित्रपट प्रेक्षकाभिमुख करण्यासाठी ही गोष्ट चांगली आहे. डॉ. विनायक पवार यांची अर्थपूर्ण गीतं आणि त्याला तेवढ्याच ताकदीनं हर्षित अभिराज यांनी दिलेलं सुश्राव्य संगीत कौतुकास्पद आहे. हिरव्यागार शेताच्या पार्श्वभूमीवर ही सुरेल गाणी पाहणं हा निश्चितच आनंददायी प्रकार आहे. ‘रौंदळ’ जमलाय तो कलाकार-तंत्रज्ञांच्या कामगिरीमुळे. भाऊ शिंदेनं शिवाची भूमिका त्याच्या नेहमीच्या शैलीत चोख निभावली आहे.

भाऊसाहेब शिंदेने साकारलेला नायक आजवर मराठी चित्रपटांमध्ये पाहिलेल्या नायकापेक्षा खूप वेगळा आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना हा चित्रपट प्रेक्षकांना बरेच काही देऊन जाईल. या चित्रपटात यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, संजय लाकडे, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकार आहेत. सुधाकर शर्मा, डॉ. विनायक पवार, बाळासाहेब शिंदे यांनी लिहिलेल्या गीतरचना वैशाली माडे, सोनू निगम, जावेद अली, गणेश चंदनशिवे, स्वरूप खान, दिव्या कुमार, हर्षित अभिराज यांनी गायल्या आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेता साऊंड डिझायनर महावीर साबन्नावरने चित्रपटाचे सिंक साऊंड आणि डिझाईन केले आहे. डीओपी अनिकेत खंडागळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून फैझल महाडिक यांनी एडिटींग केले आहे. विक्रमसेन चव्हाण या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक आहेत. रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत दिले असून नेहा मिरजकर यांनी कोरिओग्राफी केली आहे. समीर कदम यांनी मेकअप, सिद्धी योगेश गोहिल यांनी कॉस्च्युम, मोझेस फर्नांडिस यांनी फाईट सीन्स, गजानन सोनटक्के यांनी कला दिग्दर्शनचे काम पाहिले आहे. मंगेश भीमराज जोंधळे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी चोख बजावली असून डीआय वॉट स्टुडिओमध्ये, डीआय कलरीस्ट श्रीनिवास राव यांनी, व्हिएफएक्स सुपरवायजिंग सतीश येले यांनी तर अ‍ॅानलाईन एडिटींग माही फिल्म्स लॅबचे विक्रम आर. संकपाळे यांनी केले आहे.

‘रौंदळ’च्या पोस्टरवर एक रांगडा गडी पाहायला मिळतो. पांढर्‍या रंगाचा चेक्स शर्ट, डाव्या हातात कडं, खांद्यावर गाडीचा टायर काढण्यासाठी वापरली जाणारी रक्तानं माखलेली टॉमी, वाढलेली दाढी आणि चेहर्‍यावर जखम झालेल्या अवस्थेतील भाऊसाहेब पोस्टरवर आहे. यावरून या चित्रपटात धडाकेबाज फायटिंगदेखील पाहायला मिळणार आहे. यावरून भाऊसाहेब पुन्हा एकदा काहीशा हटके भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाल्याची जाणीव होते. काही दिवसांपूर्वी पोस्टर रिलीज केल्यानंतर काहीशा रावडी लूकमधील भाऊसाहेब ‘रौंदळ’मध्ये नेमकं कशा प्रकारचं कॅरेक्टर साकारणार आहे याबाबत उत्सुकता वाढली होती आणि त्या सर्व अपेक्षा हा चित्रपट उत्तमरीत्या पूर्ण करतो. शेतकर्‍यांचे वास्तव दुःख मांडणारा आणि एका गहन विषयाला वाचा फोडणारा हा चित्रपट भव्य वाटतो. हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णयदेखील धाडसाचा आहे. त्याचे कौतुक करायला हवे. ग्रामीण वस्तुस्थितीची जाणीव करून देणारा हा चित्रपट व पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शक गजानन पडोळ यांनी आपल्याला हवा तो विषय प्रेक्षकांपर्यंत नेमका पोहचवला आहे. प्रेक्षकांनी याचे स्वागत करायला हवे.

–(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)