ससंमोहन : वास्तव, शक्यता आणि मर्यादा

संमोहन म्हणजे जादू. संमोहनाने कोणतीही गोष्ट साध्य करता येते? अनैतिक कृत्यदेखील संमोहनातून साध्य होतात? मनाने दुर्बल असणारेच लोकच संमोहित होतात. इतरांच्या मनातील जाणता येतं किंवा गुपितं काढून घेता येते. इतकेच नाही तर संमोहनातून अनैतिक कृत्यही राजेरोसपणे करता येते, असे गैरसमज सध्या कमालीचे वाढले आहेत. कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात तर अशा गैरसमजांमध्ये मोठीच भर पडली आहे. इतकेच नाही तर संमोहन करुन विनयभंग केल्याच्या तक्रारीदेखील काही पोलीस ठाण्यांत अलिकडे दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संमोहनशास्त्र नक्की काय आहे, या शास्त्राचे वास्तव काय आणि मर्यादा कोणत्या आहेत याचा उहापोह..

संमोहनविद्या, मोहीनीविद्या, त्रिकालविद्या, मेस्मेरिझम, हिप्नॉटिझम अशा स्थलकालपरत्वे वेगवेगळ्या नावांनी प्रचलित असलेले ‘संमोहन शास्त्र’ हे अंधश्रद्धाळू भीती व अशास्त्रीय गैरसमज यामुळे नेहमीच गूढ वाटत राहिले आहे. संमोहन हे फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. भारतीय योगशास्त्र, तिबेटीयन अध्यात्म तसेच प्राचीन इजिप्त, पार्शियन, ग्रीक आणि रोमनसंस्कृतीमध्ये एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीच्या मनावर नियंत्रण ठेवून विविध व्याधी निवारण केल्याचे उल्लेख आढळतात. संमोहन प्रक्रियेबद्दल विशेषत: भारत, तिबेट आणि ग्रीक संस्कृतीत प्रमुख उल्लेख आढळतात. आधुनिक वैज्ञनिक काळात व्हिएन्नामधील डॉ. अ‍ॅन्टन मेस्मर (1733-1895) यांनी सर्व प्रथम संमोहनाला शास्त्रीय आणि लोकप्रिय बैठक दिली. त्याकाळी संमोहनाला ‘मेस्मेरिझम’ असे त्यांच्याच नावाने उल्लेखिले गेले. डॉ. मेस्मर लोहचुंबकाच्या सहाय्याने संमोहन स्थिती निर्माण करुन मनोविकार बरे करीत असत. नंतर डॉ. जेम्स ब्रेड (1795-1860) या इंग्लिश डॉक्टरांनी सिद्ध केले की व्यक्तीला संमोहीत करण्यासाठी लोहचुंबक किंवा हस्तावलंबनाची आवश्यकता नाही. त्यांनी मेस्मेरिझमऐवजी हिप्नॉस या ग्रीक निद्रादेवतेच्या नावावरुन हिप्नॉसिस किंवा संमोहन (एक प्रकारची कृत्रिम निद्रा) ही संज्ञा रुढ केली.

डॉ. ब्रेडच्या पद्धतीचा वापर करून भारतातील कोलकाता येथील प्रसिद्ध डॉ. जेम्स एसडैली(1808-1859) यांनी संमोहनाद्वारे भूल निर्माण करून हजारो शस्रक्रिया यशस्वी पार पाडल्या. प्रा. चार्कोट(1825-1893) यांच्या मतानुसार संमोहन स्थिती उन्मादाचेच रूप आहे आणि केवळ उन्मादी व्यक्तींनाच संमोहित करता येते असे मानले गेले होते. परंतु नॅन्सी स्कूल ऑफ हिप्नॉटिझमचे डॉ. बर्नहम (1840-1919) यांनी ही धारणा चुकीची ठरविली. त्याचबरोबर व्यक्तीची इच्छा असेल तर कुठल्याही व्यक्तीला संमोहित करता येते आणि संमोहनाचे मूळ हे केवळ ‘सूचना’ आहे असे सिद्ध केले. आज ‘संमोहन हे केवळ सूचनांचेच शास्त्र आहे या तत्वानेच जगभरात संमोहन व संमोहन उपचार केले जातात. डॉ. सिग्मंड फ्राईड (1856-1939) यांनी संमोहनाबद्दल अध्ययन करुन मानसशास्त्रावर अधिक सखोल माहिती सादर केली. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सैनिकांवरती युद्धामुळे निर्माण झालेले तणाव, भीती, मानसिक आघात संमोहनाच्या आधारे प्रभावीपणे घालविताआले आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात संमोहनद्वारे विविध लाभ घेण्याची व्याप्ती वाढली आणि ती दिवसेंदिवस वाढतच राहिली.

आज सर्व शिकलेल्या व्यक्ती संमोहन हे मानवी मनाच्या संबंधात प्रचंड सामर्थ्य असलेले मोलाचे शास्त्र आहे हे जाणून आहेत. विज्ञानाची कासधरून प्रगत झालेल्या सर्वच देशांत संमोहनशास्त्राला मान्यता मिळालेली असून तेथे शिक्षण, कला, क्रीडा, व्यावसायीक, औद्योगिक तसेच मानवीयसंबंध,मानसिक स्वास्थ्य व आपापल्या क्षेत्रातील कार्यक्षमता वृद्धी यासारख्या सर्वच क्षेत्रांत संमोहनशास्त्राचा आवश्यकतेप्रमाणे व नियमितपणे वापर केला जात आहे. खरे तर संमोहन म्हणजे, संमोहनकर्त्याच्या सूचनेनुसार किंवा स्वयंसूचनांनी एखाद्या व्यक्तीची किंवा तिच्या मनाची सूचना ग्रहण करण्याची, त्यानुसार वागण्याचीअथवा काल्पनिक अनुभव घेण्याची स्थिती.

संपूर्ण शरीर आणि बाह्यमन शिथिल करून अंतर्मनाची सूचना ग्रहण करण्याची क्षमता वाढविणे आणि त्यानुसार प्रतिसाद मिळविणे अशीही संमोहनाची व्याख्या करता येईल. संमोहन ही मानसिक प्रक्रिया असल्याने मनाचे मूलभूत कार्य आपल्याला समजून घ्यावे लागेल. संमोहन शास्त्रानुसार मानवी मनाचे दोन भाग असतात. बाह्यमन आणि अंतर्मन.

आपल्या जागेपणात बाह्यमनाचे काम चालते. विचार करणे, तर्कवितर्क करणे, अर्थ लावणे आणि निर्णय घेणे ही अतिशय महत्त्वाचे कामं बाह्यमनाद्वारे होत असतात. तर अंतर्मन म्हणजे आतलं मन. अंतर्मनाचे काम म्हणजे बाह्यमनाकडून येणार्‍या सूचनांना प्रतिसाद देणे. अंतर्मन हे स्मृतींचे, माहितीचे आणि अमर्याद क्षमतांचे भांडार आहे. आपल्या जीवनाप्रतीच्या चांगल्यावाईट समजुती, धारणा, सवयी या अंतर्मनात असतात. आपल्या व्यक्तीमत्वातील गुणदोष हेदेखील आपल्या अंतर्मनात असतात. आपल्या शारीरिक-मानसिक स्वास्थ्य आणि समस्या यांची मुळंदेखील आपल्या अंतर्मनातच असतात. गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार अंतर्मनातील या गोष्टींचा वापर होत असतो. बाह्यमनाकडून आलेल्या सूचनांना प्रतिसाद अंतर्मनातील याच गोष्टींच्या आधारे मिळत असतो.

जेव्हा आपल्याला व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल, आपल्या क्षमता वाढवायच्या असतील किंवा निर्माण झालेल्या समस्या पूर्णपणे काढून टाकायच्या असतील व स्वास्थ्य सुधरावयाचे असेल तर सूचना अंतर्मनात पोहचणं अत्यंत गरजेचे आहे. आणि त्यात जर बाह्यमनाची विचार करण्याची क्षमता अडथळा ठरत असेल तर संमोहनाचा उपयोग करावा लागतो. कारण संमोहन प्रक्रियेत बाह्यमनाची चिकित्सा करण्याची क्षमता स्तब्ध करून, शांत करून किंवा खूप कमी करून सूचना थेट अंतर्मनात पोहचविण्याची ताकद असते. आणि म्हणूनच तर संपूर्ण जगात संमोहन प्रक्रिया वर्षानुवर्षे इतकी महत्वपूर्ण मानली जाते. संमोहन अवस्थेतील व्यक्ती झोपी गेल्याप्रमाणे दिसते, परंतु त्या अवस्थेत ती सूचनांचे योग्य पालन करते किंवा प्रतिसाद देते. यामुळेच संमोहनात आणि नैसर्गिक झोपेत फरक करता येतो. कारण सूचनांचे पालन नैसर्गिक झोपेत होताना दिसत नाही आणि संमोहनावस्थेत ते दिसते.

संमोहित व्यक्ती जागेपणी करेल त्यापेक्षा संमोहन अवस्थेत संमोहनकर्त्याच्या सूचनांचं पालन जास्त प्रमाणात करते, म्हणजे संमोहित व्यक्तीची सूचना ग्रहण करण्याची क्षमता वाढलेली असते. म्हणजेच संमोहनावस्थेत व्यक्ती झोपत नाही, तर अधिक जागी जागरूक असते. सूचना ग्रहण करण्याची एकाग्रता, क्षमता त्यावेळी सर्वोच्च असते.

संमोहनात जाण्यासाठी चार महत्वाच्या अटी आहेत.

पहिली अट: संमोहनात जाणार्‍या व्यक्तीची स्वत:ची इच्छा असावी. व्यक्तीच्या प्रामाणिक इच्छेशिवाय या जगातला कुठलाही संमोहनकर्ता तुम्हाला संमोहित करूच शकत नाही. जर कुणी न सांगता किंवा मर्जीविरूद्ध एखाद्या व्यक्तीला संमोहित करू शकतो असा दावा करत असेल तर ते खोटे आहे. असे कदापि शक्य नाही.

दुसरी अट : संमोहनात जाणार्‍या व्यक्तीला संमोहनकर्त्याची भाषा कळावी कारण संमोहन हे सूचनांचे शास्त्र आहे.

तिसरी अट : संमोहनात जाणारी व्यक्ती बहिरी नसावी कारण सूचना या मौखिक असतात आणि डोळे बंद केल्यानंतर संमोहनकर्त्याच्या सूचना ऐकायला येणे ही सर्वात मोठी गरज असते.

चौथी अट: संमोहनात जाणारी व्यक्ती वेडसर नसावी. कारण वेड्या व्यक्ती सूचनांवर एकाग्र होण्याच्या व सूचनांचे आकलन होण्याच्या परिस्थितीत नसतात.

खरंतर आज तंत्रज्ञान, इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांना ज्ञानाचा खजिना खुला झालाय. त्यामुळे संमोहनाची विज्ञाननिष्ठ माहिती,तथ्ये आता जवळपास प्रत्येकालाच माहिती झालीत. तरीही काही अवैज्ञानिक व अंधश्रद्धाळू समज गैरसमज शिल्लक राहू नये आणि संमोहन ही शुद्ध वैज्ञानिक, शास्रीय आणि उपयुक्त प्रक्रिया म्हणून सहज अंगिकारली जावी,संमोहनाचा अधिकाधिक व्यक्तींना लाभ व्हावा म्हणून आपण संमोहनाबद्दलच्या समज-गैरसमजांबद्दल चर्चा करू या.

असत्य : संमोहनकर्त्याकडे काही जादुई शक्ती असते.

सत्य : संमोहनकर्त्याकडे कोणतीही जादुई शक्ती नसते. मात्र संमोहनासाठी आवश्यक असलेले कौशल्य,ज्ञान,अभ्यास, भाषासमृद्धी आणि समयसूचकता जरूर असते.

असत्य : जे लोक सहज प्रकारे संमोहित होतात, ते मनाने दुर्बल असतात.

सत्य : सहज संमोहित होण्यासाठी सूचना ग्रहण करण्याची क्षमता, एकाग्रता हवी असते. केवळ उत्तम एकाग्रता,कल्पकता, इच्छाशक्ती,उत्कृष्ट बुद्धिमत्ता व सूचना ग्रहणक्षमता असलेल्या व्यक्ती सहज व तात्काळ संमोहन अवस्थेत जातात.
उलट मूर्ख,चंचल,अतिचिकित्सक,दुबळ्या मनाच्या आणि घाबरट व्यक्तींना संमोहित करणे अवघड आणि वेळ घेणारे असते.

असत्य: संमोहन अवस्थेतून बाहेर येणे किंवा आणणे खूप अवघड असते. किंवा संमोहनकर्त्याने संमोहित व्यक्तीला तसेच सोडून निघून गेल्यास ती व्यक्ती त्याच अवस्थेत अडकून पडते.

सत्य : संमोहन अवस्था ही अर्धजागृती अर्धनिद्रीस्तावस्था असते. जसे आपण जागेपणातून झोपी जातो आणि झोपेतून जागे होतो. अगदी तितक्याच सहजतेने व्यक्ती सूचनेनुसार किंवा स्वत:च्या मर्जीने संमोहनावस्थेतून बाहेर येतेच. त्यामुळे असे कधीही होत नाही, की संमोहित व्यक्ती सामान्य अवस्थेत आली नाही. आणि संमोहन कर्ता संमोहित व्यक्तीला सोडून गेला तरी ती व्यक्ती आपल्या इच्छेनुसार संमोहित अवस्थेतून हवी तेव्हा बाहेर येऊ शकते किंवा जास्तीत जास्त ती झोपी जाऊन थोड्या वेळाने फ्रेश होऊन जागी होते.

असत्य : संमोहनाद्वारा गुन्हेगारी अथवा अनैतिक कृत्ये करता येतात किंवा करून घेता येऊ शकतात.

सत्य : आपले संस्कार, नीतीमूल्ये, संस्कृतीची शिकवण हे सर्व आपल्या अंतर्मनात असते. त्यामुळे व्यक्तींच्या अंतर्मनातील खर्‍या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीविरुद्धच्या कोणत्याही गोष्टी ती व्यक्ती संमोहित अवस्थेतही करू शकत नाही. त्यामुळे उत्तम संस्कार, नीतीमूल्ये, संस्कृतीची शिकवण पाळणार्‍या नैतिक व विवेकी व्यक्तीला संमोहित करून नादी लावणे, पळवून नेणे, चोरी करणे, लुबाडणे किंवा अश्लिल कृत्य करणे अथवा करवून घेणे हे अशक्य आहे.

असत्य : संमोहनशक्तीने इतरांच्या मनातील जाणता येतं किंवा गुपितं काढून घेता येतात.

सत्य : अजिबात नाही. जी माहिती सांगणं असुरक्षित आहे असं व्यक्तीला वाटतं ते संमोहनाच्या कोणत्याही अवस्थेत तिचं अंतर्मन व्यक्त करत नाही. मात्र त्या व्यक्तीला आठवत नसेल आणि तिची इच्छा असेल तर मग निश्चितपणे ती माहिती संमोहनाद्वारे माहीत करून घेता येते.

मित्रांनो, मानसिक ताणतणाव, संघर्ष, स्पर्धा, घटलेली कार्यक्षमता आणि मनोशारीरिक व्याधी ही आज प्रत्येकाची गंभीर समस्या बनली आहे. आपआपल्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळविणारे खेळाडू, अभिनेते, नेते, अधिकारी, लेखक, विचारवंत, उद्योजक आरोग्य टिकविण्यासाठी उच्चप्रतीची कामगिरी करण्यासाठी संमोहनाचा नियमित वापर करतात.

संमोहन शास्राचा वापर व लाभ घेऊन आपण खालील बदल घडवू शकतो.

अ)वाईट सवयी आणि व्यसनं सोडू शकतो : धुम्रपान, तंबाखू, दारु पिणं, नखं खाणं इतर व्यसनं आणि सवयी.

ब)भावनिक समस्यांवर नियंत्रण मिळवू शकतो. जसे सगळ्या प्रकारच्या मानसिक भीती, काळजी-चिंता-अस्वस्थता, मानसिक नैराश्य, ताण-तणाव. राग चिडचिड, द्वेष-हेवा, लाजाळूपणा, न्यूनगंड, अहंगंड, प्रेमभंग निराशावादी मनोवृत्ती, एकलकोंडेपणा, आळस, कंटाळा

क) विधायक भावना व विधायक दृष्टीकोन निर्माण करू शकतो : आत्मविश्वास, मनःशांती, मनमोकळेपणा नेतृत्वगुण, हजरजबाबीपणा, सक्रीयता, उत्साही, आनंदी, धैर्य, संतुलित भावना, महत्वाकांक्षा, स्थिरवृत्ती, चाणाक्षपणा, निर्भयता, आशावादी, प्रेम, उत्कटता, मायाळूपणा.

ड) विद्यार्थ्यांसाठी उपयुक्तता : अभ्यासातील गोडी निर्माण करणे, एखाद्या विषयाविषयी वाटणारी भीती घालवणे, अभ्यासाचा कंटाळा घालवणे, एकाग्रता वाढवणे, परीक्षेचं टेंशन, भीती घालवणे

इ) शारीरिक मानसिक कौशल्य वाढवू शकतो : कार्यक्षमता, खेळाडूंचा परफॉर्मन्स सुधारणं, संघटन कौशल्य, मानसिक संतुलन, वकृत्व, गायन, गायन ड्रायव्हिंग, पोहणे, हस्ताक्षर सुधारणे, सृजनशीलता-निर्मितिक्षमता, लेखन-काव्य, सर्व प्रकारची कौशल्ये

फ) लैंगिक समस्यांवर नियंत्रण मिळवा : लैंगिकतेबद्दल चुकीचे विचार, समजुती व माहितीमुळे निर्माण झालेल्या मानसिक लैंगिक समस्यांवर उपाय.

मुळात संमोहन हा विषय गुढता आणि दुसर्‍या व्यक्तीवर नियंत्रण मिळवणे, या दोन गोष्टींमुळे दीर्घकाळ भीतीदायक आणि वादग्रस्त राहिला आहे. मात्र सर्वप्रथम संमोहनशास्राचे वास्तव हे आहे की कुणालाही मर्जीविरूद्ध किंवा परवानगी शिवाय संमोहीत करताच येत नाही. शिवाय संमोहनावस्थेत संमोहीत व्यक्ती जिचे संस्कार, जीवनाची नीतीमूल्ये सज्जन,सन्मार्गी व विवेकी आहेत, त्या संस्कारांच्या, नीतीमूल्यांच्या व विवेकाच्या विरोधातील सूचना अजिबात स्वीकारत नाही किंवा तशी वागत नाही. उलट अशा सूचना दिल्या जात असतील तर त्या व्यक्तीचे अंतर्मन त्या व्यक्तीला संमोहनावस्थेतून तात्काळ जागे करते व स्वत:चे रक्षण करते. या तथ्यांबद्दल तसेच संमोहनाच्या क्षमता आणि मर्यादांबद्दल संमोहीत होऊ इच्छिणार्‍या व्यक्तीला स्पष्ट जाणीव देणे व जागृती करणे हे जबाबदार संमोहनकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे. अन्यथा अनेक विचित्र व अविवेकी गैरसमज संमोहनशास्राच्या अत्यंत उपयुक्त आणि फायद्याच्या चिकित्सामूल्यास दुर्लक्षित करून अंधश्रद्धाळू गैरसमज वाढविण्यास कारण ठरतात. अर्थात जनतेच्या मनातील संमोहनाबद्दलची अंधश्रद्धाळू भीती व अशास्रीय गैरसमज सातत्याने दूर करत राहणे ही जबाबदारी समाजासाठी चांगले कार्य करू इच्छिणार्‍या संमोहनकर्त्याची असते.

सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक गुन्हेगारी व संवेदनशील प्रकरणात संमोहनशास्राच्या संदर्भाने उल्लेख आला की सांगावेसे वाटते की, असे कृत्य केवळ गुन्हेगारी किंवा विकृत मनोवृत्तीची व्यक्तीच करू शकते. कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणे अत्यंत निंदनीय व चुकीचे असते आणि असे करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र असते. संमोहनशास्र हे भावनांवर विवेकी पद्धतीने नियंत्रण करणे शिकवते. त्यामुळे अंधश्रद्धेतून निर्माण होणारे समाजातील अनेक गुन्हे आणि विकृती रोखण्यास हे शास्त्र अधिकाधिक प्रभावी ठरत आले आहे. संमोहन हे अत्यंत पवित्र, मन:शांती देणारे, जगण्यातील आत्मविश्वास वाढविणारे शास्त्र आहे. राग, दु:ख, भीती आणि अपराधीपणाच्या भावना दूर करून अपयश, व्यसने, आत्महत्या किंवा बिघडलेल्या मनस्थितीतील अन्य गुन्हे रोखण्यास मोलाचे सहकार्य करणारे शास्त्र आहे. प्रत्येक व्यक्तीला एक जबाबदार, प्रगल्भ, विवेकी आणि संतुलित जीवन जगण्यास मदत करणारे संमोहनशास्त्र हे कायम उपयुक्त सिद्ध होत राहिले आहे आणि राहील.

–डॉ. शैलेंद्र गायकवाड