घरफिचर्ससारांशबुवाबाबांना वेळीच ओळखा!

बुवाबाबांना वेळीच ओळखा!

Subscribe

सतत विज्ञानाच्या विरोधी भाषा बोलणारे हे भोंदू, लबाड लोक, चोरलेल्या तत्वज्ञानाचा, अध्यात्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी मात्र विज्ञानाच्या अत्याधुनिक साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. प्रचंड दैवी शक्ती अंगात असल्याचा दावा करणारे हे तथाकथित अवतारी पुरूष, दुसर्‍याच्या तत्वज्ञानाचा प्रचार, प्रसार करून, स्वतःची शेखी मिरवतात. प्रवचन, प्रार्थना, कर्मकांड, कथाकथन, कीर्तन करण्याकरीता विज्ञानाने शोधलेले मोठमोठे ध्वनिक्षेपक यंत्र, दृकश्राव्य साधने वारतात. प्रचंड दैवी शक्तीचे वरदान असलेले आपले गुरू, महाराज, स्वामी हे, विज्ञानाच्या साधनांचा वापर का करतात? स्वतःमधील दैवीशक्तीच्या साहाय्याने ते, ही साधने का निर्माण करत नाहीत?

-डॉ. ठकसेन गोराणे


बुवाबाजीच्या दुष्टचक्रातून लोक इच्छा असली तरीही, सुटका करून घेऊ शकत नाहीत. कारण गुरुची इच्छा, आदेश हेच त्यांचे सर्वस्व असते. तीच जीवनाची गरज असल्याचे ते समजतात. दैव, नशीब, प्राक्तन अशा कल्पनांवर ठाम विश्वास असणारा मोठा वर्ग समाजात आहे. विशेषतः कनिष्ठ व उच्च मध्यम वर्गातील समाज मोठ्या संख्येने अशा भोंदूंच्या कच्छपी लागलेला, आहारी गेलेला आहे असे दिसते. इच्छा असूनही अज्ञानामुळे तसेच दहशतीमुळे हे अनुयायी बाहेर पडू शकत नाहीत. अंधश्रद्धेतच हा वर्ग बेगडी आयुष्य कंठत राहातो. वास्तवातले जग हे केवळ माया आहे, मिथ्या आहे आणि कुणीही न पाहिलेले परब्रम्ह, स्वर्ग, जन्नत हेच सत्य आहे. आपले मोक्षाचे, मुक्तीद्वार तेच आहे. खरी सुखं तिथेच मिळणार आहेत. तेथे पोहचणे हेच आपले ध्येय आहे. मात्र यांच्यासारख्या महान गुरुंच्या मदतीशिवाय तेथे कुणीही स्वतंत्रपणे पोहोचू शकत नाही. अनुयायांची अशी भावना बळकट करण्यात, भोंदूबुवा यशस्वी झालेले असतात. त्यामुळे, गुरूंशिवाय आपल्याकडे तरणोपाय नाही अशी अनुयायांची पक्की भावना होते. कारण तेच तेच सतत कानी पडत असते. म्हणून ते पटत जाते. मनात बिंबत जाते.

- Advertisement -

सतत विज्ञानाच्या विरोधी भाषा बोलणारे हे भोंदू, लबाड लोक, चोरलेल्या तत्वज्ञानाचा, अध्यात्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी मात्र विज्ञानाच्या अत्याधुनिक साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. प्रचंड दैवी शक्ती अंगात असल्याचा दावा करणारे हे तथाकथित अवतारी पुरूष, दुसर्‍याच्या तत्वज्ञानाचा प्रचार, प्रसार करून, स्वतःची शेखी मिरवतात. प्रवचन, प्रार्थना, कर्मकांड, कथाकथन, कीर्तन करण्याकरीता विज्ञानाने शोधलेले मोठमोठे ध्वनिक्षेपक यंत्र, दृकश्राव्य साधने वारतात. प्रचंड दैवी शक्तीचे वरदान असलेले आपले गुरू, महाराज, स्वामी हे, विज्ञानाच्या साधनांचा वापर का करतात ? स्वतःमधील दैवीशक्तीच्या साहाय्याने ते, ही साधने का निर्माण करत नाहीत? स्वतःच्या आजारपणात मोठमोठ्या दवाखान्यामध्ये का भरती होतात? कोरोनासारख्या जागतिक संकटाबाबत सुरूवातीच्या काळात प्रार्थना, दुवा, होम-हवन, यज्ञ, जपतप मंत्रजप, विविधप्रकारचे काढे, मंतरलेले पाणी असे अनेक दैवी उपचार करण्यासाठी यातली अनेक मंडळी सरसावली होती. जवळपास सर्वच तथाकथित आध्यात्मिक आखाड्यातील अवतारी मंडळी, चढाओढीने पुढे येऊ पाहात होती. पण कोरोनाने सर्वांना आहे तिथेच थांबवले. शिवाय सरकारनेही योग्यवेळी अफवांविरोधी कायद्याचा बडगा उगारला.

कोरोनावर लस शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी शर्थीचे प्रयत्न अद्याप चालू ठेवलेले आहेत. आता यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र त्यांचे कौतुक, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे विचार अद्याप कोणत्याही तथाकथित अवतारी अवलीयाला का सुचले नाहीत? असे अनेक साधे,साधे प्रश्न अनुयायांना का पडत नाहीत? भोंदूबुवाच्या नादी लागल्याने चिकित्सक बुद्धीच लोप पावली. त्यामुळे विचार करण्याचा प्रश्नच उरत नाही. मग तो विचारणे तर दूरच राहिले.

- Advertisement -

विविध धर्मातील प्रेषित,गुरु,पाद्री, मौलवी हे अध्यात्माच्या नावाखाली भोंदूगिरी करीत असतात. मात्र, व्यवस्था परिवर्तनाबाबत ही मंडळी ब्र शब्द उच्चारत नाही. आकाशाला गवसणी घालायला निघालेली महागाई, समाजातील बिकट होत चाललेले आरोग्याचे बिकट प्रश्न, बेकारी, वाढते व्यसन, शेतकरी आत्महत्त्या, दुष्काळ, गरीबांच्या शिक्षणाची हेळसांड, विविध प्रकारचीविषमता,अत्त्याचार, भ्रष्टाचार इ.कळीच्या, ज्वलंत सामाजिक व इतर क्षेत्रातील प्रश्नांशी यांना काहीच देणेघेणे नसते. अपवादात्मक परिस्थितीत अतिशय जुजबी काम केल्याचा गवगवा मात्र मोठ्या दिमाखाने ते करतात. प्रत्येक धर्मातील अशी ही सर्व परमपूज्य, कल्याणकारी महाराज, प्रेषित, मुल्ला-मौलवी, पाद्री, गुरू, अवतारी बुवा, विदेही अवलिया, महान विभूती अशी विशेष लेबले स्वतःला लावून, मिरवणारी धूर्त, लबाड मंडळी आहेत. समाजाला, अनुयायांना फसवून, भूलथापा मारुन, बेमालूमपणे स्वतःचे प्रचंड साम्राज्य, सामर्थ्य, संपत्ती आणि सर्व प्रकारची भौतिक सुख-सुविधांची साधने स्वतःसाठीच जमवतात. ह्या सर्व घबाडाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यात अधिकाधिक बरकत, भर घालण्यासाठी सर्व प्रकारच्या विघातक शक्ती, संरक्षण यंत्रणा सोबत बाळगतात. त्यामुळे त्यांची, एक प्रकारची प्रचंड दहशत समाजात निर्माण झालेली असते. त्यांच्या विरोधात, सामान्य व्यक्तीचं काय, मोठमोठे समाजसमूहसुद्धा उभे राहू शकत नाहीत. त्यांचे काहीच करू शकत नाहीत.

त्यांच्या भोंदूगिरीवर, दहशतीवर प्रचलीत कायद्यांनुसार अंकुश ठेवण्यात आणि बेकायदेशीररित्या, बेहिशेबी व परिश्रमाशिवाय जमा केलेल्या संपत्तीवरही टाच आणण्यास, अनेकवेळा शासनही कचरते. कारण अनेक राजकारणी आणि सनदी अधिकारी अशा तथाकथित आध्यात्मिक दरबारात लिन होत असतात. स्वतःमधील अपराधीपणाच्या भावनेचे दमन करण्यासाठी तसेच स्वतःचा आर्थिक वा तत्सम भ्रष्टाचार लपविण्यासाठी त्यांना हा मार्ग सोयीचा वाटतो.

देवा-धर्माच्या, अध्यात्माच्या नावाने चालणारी भोंदूगिरी, बुवाबाजी हा बुवाबाजीच्या अनेक प्रकारांतील अत्यंत घृणास्पद, संतापजनक, किळसवाणा, घातक आणि भयानक प्रकार आहे. समाजात भोंदूगिरी निर्माण होऊन, ती फोफावण्यास जसे भोंदू लोकजबाबदार आहेत तसेच, ह्या भोंदूंचा कावेबाजपणा ओळखण्यात अनुयायी वर्गही कमी पडतो, असे म्हणावे लागते. बहुसंख्य लोकांची मानसिकता धार्मिक असते आणि बुवांची खरी शक्ती ही माणसाच्या धार्मिक मानसिकतेतच असते. प्रवचन, कीर्तन, सत्संग यातून आध्यात्मिक कल्याणाचा दावा करणार्‍या बुवांचा धार्मिक अभ्यास चांगला असतो. बहुतेकांची बोलायची, मांडणीची पद्धत ठराविक साच्याची असते. उदारणार्थ ….मी सनातन पुरुष आहे. ईश्वराला आदी आणि अंत नसतो. मलाही नाही. मी तुम्हाला प्रेमाची दीक्षा द्यायला आलो आहे. आपल्या सर्वांच्यात परमात्मा निवास करतो. गुरुकृपेने मला साक्षात्कार झाला असल्याने मी आत्मज्ञानी आहे आणि त्यामुळेच त्या परमात्म्याला ओळखतो. निराकार परब्रम्ह परमेश्वर सृष्टीतील कणाकणात वसत आहे. परमात्मा दिसत नाही. जन्म घेत नाही. नष्ट होत नाही. तो अनंत आहे. त्याला जाणून घ्या. त्याची भक्ती इतकी करा की, तो प्रसन्न होईल. तुम्हाला मोक्षाप्रती नेईल.

आकर्षक व्यक्तिमत्व असेल तर बुवाबाजी अधिक सुलभतेने चालते. पण त्या वाचून काही अडत नाही. भगवी, हिरवी कफणी, पांढरे वस्त्र कमंडूलू, मणी, शंख,कवड्या, उदी, काळे दोरे, बिब्बा, लिंबू ,सुई, खडावा, पादुका, नारळ, मूर्ती, भंडारा, अंगारा, हळदी- कुंकू, त्रिशूल, चिमटा अशा अनेक वस्तू बुवा, जवळ बाळगतात. त्यामुळे एक प्रकारचा भ्रम, धार्मिक भावना बाळगणार्‍या बहुसंख्यकांच्या मनात तयार होतो. स्वतःचा एक खास शिष्य परिवार कुठलाही बुवा बाळगून असतो. हे शिष्य, त्याचे नातेवाईक, मित्र, शेजारी, यांमध्ये बुवांचे रसभरीत वर्णन करतात. नेमका हा कावेबाजपणा लोकांच्या लक्षात येत नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -