Homeफिचर्ससारांशFarmer Indebtedness : शेतकर्‍याचा कर्जबाजारीपणा

Farmer Indebtedness : शेतकर्‍याचा कर्जबाजारीपणा

Subscribe

भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात वावरतो आणि कर्जातच मरतो, असे भारतीय शेतकर्‍यांविषयी खेदाने म्हटले जाते. म्हणजेच कर्जबाजारीपणा हा अनेक शेतकरी कुटुंबांच्या मागे लागलेला असतो. असे अनेक कुटुंबांमध्ये दिसून येते. अनेक शेतकर्‍यांवर लहान मोठ्या कर्जाचा भार असल्याचे दिसून येते. शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणा हा घटक शेती विकासातील एक मोठा अडसर ठरू पाहत आहे. हा कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

-प्रा. डॉ. कृष्णा शहाणे

शेतकरी वर्ग हा विविध कारणांसाठी कर्ज काढताना दिसून येतो. त्या कर्जाचा अनुत्पादक कारणासाठी वापर केला तर उत्पादनात वृद्धी न होता फक्त कर्जाचा भार वाढत राहतो. म्हणजेच या कर्जात व्याजाचा समावेश होऊन कर्जाच्या रकमेत वाढ होत जाते. यासाठी काढलेल्या कर्जाचा वापर शेतीमध्ये पिकांसाठी किंवा शेती मशागतीच्या इतर कामांसाठी करणे महत्त्वाचे आहे. शेतकरी ज्या विविध कारणांसाठी कर्ज काढतात त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे पूर्वीचे कर्ज माफ होण्यासाठी अनेक शेतकरी नवीन कर्ज काढतात.

त्याचा वापर शेती उत्पादन वृद्धीसाठी होऊ शकत नाही. तसेच विविध नैसर्गिक संकटांनी भारतीय शेतीला घेरलेले आहे. त्यात अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, गारपीट, वादळे, महापूर, चक्रीवादळे, टोळधाड यांसारख्या संकटात शेतातील पिके सापडली म्हणजे शेतीचा तो पूर्ण हंगाम वाया जातो आणि शेतकरी पूर्णपणे विस्थापित होतो. पिकांप्रमाणे शेतकरीदेखील आर्थिक दृष्टीने आडवा होतो आणि त्याला उभे राहण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही.

भारतीय शेतीमध्ये फारच कमी शेतकर्‍यांचे धारण क्षेत्र मोठे व किफायतशीर असल्याचे दिसून येते, पण बहुसंख्य शेतकर्‍यांचे धारण क्षेत्र हे सीमांत अथवा अत्यंत लहान असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशी जमीन ही बिनकिफायतशीर असते अथवा फायद्याची नसते. त्यामुळे अशा जमिनीवर केलेली शेती क्वचितच फायदेशीर ठरते. यातून शेतकर्‍यांना नाईलाजाने कर्ज काढण्याचा विचार करावा लागतो.

फार मोठ्या प्रमाणावरील मान्सूनचा अनियमितपणा, सिंचनाच्या सोयींचा अभाव, विविध सोयींची अनुपलब्धता यामुळे शेतकरी तरुणांना बेकारीला सामोरे जावे लागते, पण कुटुंबातील महत्त्वाचा आणि अनिवार्य खर्च तर करावाच लागतो. त्यामुळेदेखील कर्ज काढण्याकडे शेतकरी कुटुंबाचा कल दिसून येतो.

तसेच एकत्र कुटुंब पद्धती ही आजही ग्रामीण भारताची ‘शान’ आहे. असे असले तरी या पद्धतीत कुटुंबासाठी पैसा कमवण्याची जबाबदारी घरातील कर्त्या पुरुषावर मुख्यत्वेकरून येऊन पडते. त्यामुळे इतर सदस्य पैसा कमावण्यासाठी खटाटोप करतीलच किंवा प्रयत्न करतीलच असे नाही. त्यामुळेदेखील उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी कर्जाकडे वळण्याच्या प्रयत्नात शेतकरी असतो.

ग्रामीण भागातील अनेक वाद आणि भांडणे आज कोर्टात आहेत. यात प्रामुख्याने जमिनीचे वाद, भाऊबंदकीचे वाद, गावातील इतर वाद यांचा समावेश होतो. या विविध न्यायालयीन खटल्यांवर फार मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. कोर्टात वाद असताना काम करण्याची उमेद कमी होऊ शकते. त्यामुळे शेती मशागतीत लक्ष लागत नाही.

असे झाल्यास शेतीचे उत्पादन व उत्पन्न कमी होते व नाईलाजाने कर्ज घेण्याशिवाय इतर कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. ग्रामीण भागात अनेक सण, समारंभ, यात्रा, उत्सव तसेच इतर धार्मिक विधी किंवा त्या गावातील परंपरागत कार्यक्रम, चालीरीती यासाठीदेखील भारतात मोठा खर्च केला जातो. सहाजिकच हा खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची उभारणी ही कर्ज काढून केली जाते.

ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण कमी दिसून येते तसेच व्यावसायिक शिक्षण अत्यंत कमी प्रमाणावर असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील नागरिकांचा आर्थिक दर्जा बेताचा असल्यामुळे आणि ग्रामीण भागात शिक्षणाच्या फारशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे शिक्षणाची संधी ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा तरुणाला मिळेलच असे सांगता येत नाही.

त्यामुळे तरुण सुशिक्षित नसतील तसेच उच्च शिक्षित झालेले नसतील किंवा तांत्रिक शिक्षण तरुणांनी घेतलेले नसेल तर उद्योग क्षेत्रात तरुणांना शिरकाव करता येत नाही किंवा एखाद्या कंपनीत कामगार म्हणूनदेखील कामास संधी मिळताना अनेक अडचणी येतात. यामुळे उत्पन्नाचे मार्ग मर्यादित राहतात. यातूनच शेती मशागतीसाठी पैशांची आवश्यकता भासली तर त्यासाठी कर्ज काढावे लागते.

अनेक राष्ट्रीयकृत बँकांकडे शेतकरी, ग्रामीण आणि शहरी नागरिक कर्ज मिळवण्याचा महत्त्वाचा स्त्रोत म्हणून पाहतात. बर्‍याच बँकांचा शेतीसाठी कर्जे देताना नकारात्मक दृष्टिकोन असतो. नानाविध कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील कर्ज उपलब्ध होईलच असे नाही. यासाठी शेतकर्‍यांना अनेक चकरा बँकेत माराव्या लागतात. कर्ज नको पण अर्ज आवरा, असे म्हणण्याची वेळ येते. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

आज ग्रामीण भागात शहरांच्या मानाने रोजगाराच्या संधी अत्यंत कमी असल्याचे दिसते. शेतीची दयनीय अवस्था झालेली आहे. औद्योगिक वसाहती ग्रामीण भागात अत्यंत कमी दिसून येतात, तर सेवा क्षेत्राचा ग्रामीण भागात अभाव आहे. यामुळेच रोजगार मिळवताना अनंत अडथळे येतात. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या कामासाठी कर्ज काढले जाते.

मित्र, नातेवाईक, हितचिंतक, आप्तेष्ट, सावकार, सराफी पेढीवाले यांच्याकडून कर्ज घेण्याकडे जास्त कल असतो. कारण या ठिकाणाहून मिळणारा पैसा किंवा कर्ज विनाविलंब मिळतेे. त्यामुळे शेतकरी या घटकांकडून जास्त व्याजदराचा विचार न करता कर्जे घेतो. बँकांकडून कर्ज काढताना विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागतो. ती येथे करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणावर वाढतो. शेतीच्या विकासासाठी घेतलेल्या कर्जाचा वापर उत्पादक कार्यासाठी करावा. या कर्जाचा वापर हा उत्पादक कार्यासाठी होईलच असे सांगता येत नाही.

शेतकर्‍यांची अशी कर्जे काढताना होणारी ससेहोलपट होता कामा नये. यासाठी विविध बँकांनी शेतकरी बांधवांना कर्जे देताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. कागदपत्रांची पूर्तता करताना होणारा त्रास कसा कमी होईल त्याकडे बँकांनी लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. मुळात हा कर्जबाजारीपणा कमी होणे हे शेती विकासासाठी महत्त्वाचे व आवश्यक आहे.

-(लेखक कृषी क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)