घरफिचर्ससारांशप्रतिबिंब आणि प्रतिमा

प्रतिबिंब आणि प्रतिमा

Subscribe

नार्सिससला गेल्या जन्मीसारखा पुन्हा तोच आणि तसाच जलाशय दिसला. त्या तशाच जलाशयात त्याला त्याचं तसंच प्रतिबिंब दिसलं. हल्ली त्याने नाक्यावरच्या जंक फूडच्या स्टॉलच्या बरोबर समोर असलेली जिम लावली आहे. वेळ मिळाला की अधूनमधून त्या जिममध्ये जात असल्यामुळे ह्यावेळी झालं काय की त्याला त्याचं स्वत:चं प्रतिबिंब नाही म्हटलं तरी कमनीय दिसलं. साहजिकच, गेल्या जन्मीपेक्षा ह्या जन्मी तो आपल्या प्रतिबिंबाच्या जास्तच प्रेमात पडला. गेल्या जन्मीही लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट, ह्या जन्मीही लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट. आपल्या प्रतिबिंबाकडे तो एकटक पहात राहिला.

म्युनिसिपालिटीने पावसाळ्याआधीची नालेसफाईची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे जलाशय स्वच्छ होतं. परिणामी, प्रतिबिंबही गढुळ दिसत नव्हतं. नार्सिससच्या स्वत:च्या प्रतिबिंबावरचं प्रेम वाढीस लागण्यास तेही एक कारण होतं.

- Advertisement -

प्रतिबिंब अचल, अविचल, अगदी स्थिर होतं. नार्सिसससुध्दा काठावर घट्ट रोवलेल्या पुतळ्यासारखा ताठच्या ताठ होता. प्रतिबिंबासोबतचं त्याचं हे प्रणयाराधन खूप वेळ मूकपणे चालू राहिलं, पण ह्या मुकेपणाला शेवटी प्रतिबिंब कंटाळलं…आणि जलाशयातून नार्सिससशी बोलू लागलं.

‘अरे, किती काळ माझ्या डोळ्यात डोळे मिसळून तू मला असा पहात राहणार…तासन्तास अशा अवस्थेत राहशील तर ह्या जलाशयाच्या काठावरचे लोक तुला बेरोजगार समजतील…आपल्या गेला जन्मी ठीक होतं, ह्या जन्मी तू कुठली हायफंडू नशापाणी केली आहेस की काय असाही कुणाला संशयही येईल.‘

- Advertisement -

प्रतिबिंबाने नार्सिससशी ही मचमच केली खरी, पण ह्यावेळचा नार्सिसस बदललेला होता. त्याला प्रेमात पडणं कळत होतं. पण नाकातोंडात पाणी जाईपर्यंत प्रेम करण्यातला अव्यवहार त्याच्या कधीच लक्षात आला होता.

ह्यावेळी नार्सिसस मुकाट ऐकतो आहे हे पाहून प्रतिबिंबाने पुन्हा आपली मचमच सुरू केली.

‘हे असं माझ्याकडे…म्हणजे पर्यायाने तुझ्याच प्रतिबिंबाकडे पहात राहण्याचे काय साइड इफेक्ट तू गेली कित्येक वर्ष भोगतो आहेस ते तुझं तुला तरी कळलं आहे का?‘

प्रतिबिंब नार्सिससवर चांगलंच तडकलं. तडकताना ते भेगाळलेल्या भुईसारखं दिसलं. मात्र नार्सिससने आपली समाधी सोडली नाही. कुणीतरी आपलं कित्येक काळानंतर असं समुपदेशन करतो आहे हे पाहून त्याला बरं वाटलं.

‘अरे वेड्या, आपल्याच प्रतिबिंबाकडे अनिमिष नेत्रांनी पहात राहण्याचा विक्रम तुझ्या नावावर नोंदवला गेला असेल कदाचित, पण त्यामुळे समाजात तुझी कोणती प्रतिमा उभी राहिली आहे ह्याची तुला कल्पना आहे का?‘

प्रतिबिंबाने मागच्या जन्मीच्या त्या घटनेबाबतचा नेमका फीडबॅक नार्सिससपुढे ठेवला.

‘प्रतिमा?…कोणती प्रतिमा?‘ नार्सिससने चमकून विचारलं.

‘आपल्या मागच्या जन्मी कुणाच्याच प्रतिमेचं कुणाला काही पडलेलं नव्हतं…कुणाची प्रतिमा कशी का असेना, समाज खपवून घेत होता,‘

प्रतिबिंबाच्या शब्दांचे बुडबुडे सुरूच होते.

नार्सिससला फक्त प्रतिबिंब माहीत होतं. प्रतिबिंबाच्या प्रेमात पडणं माहीत होतं. त्याला त्यावर काही व्यक्त व्हावं असं वाटत नव्हतं.

‘…हं तर काय…प्रतिमेचं काय…माझी कसली प्रतिमा?‘ नार्सिसस भाबडेपणाने म्हणाला.

‘तुझी मागच्या वेळची स्वत:च्याच कोषातली प्रतिमा एक अख्खा जन्म निघून गेला तरी तशीच आहे…एखादा आत्ममग्न कवी कवितेबाहेरही तसाच आत्ममग्न राहावं तसं तुझं झालं आहे…तू तुझ्या प्रतिमेचा बळी ठरला आहेस बळी…सगळा समाज, अख्खं जग तुला म्हणतंय तसं.‘

प्रतिबिंबाने गेल्या जन्मीचा होता नव्हता तो सगळा राग नार्सिससवर काढला.

पण नार्सिसस ढिम्म राहिला. प्रतिबिंबाकडे तसाच बघत तसाच अचल, तसाच अविचल.

‘अरे, तू तसाच जन्मोजन्मी शुंभासारखा काय बघत राहिला आहेस माझ्याकडे?…ही कोणती तुझी सवय?…हे कोणतं तुझं व्रत?‘

प्रतिबिंब पुन्हा फणकारलं.

नार्सिससने तरीही आपली नजर प्रतिबिंबावरून ढळू दिली नाही. तो तसाच राहिला…ढिम्मच्या ढिम्म.

‘इतकं कानीकपाळी ओरडूनही तुझ्यावर काहीच फरक पडत नाही का रे?‘

नार्सिससवर खरंच काही फरक पडला नाही. त्याने त्या प्रश्नाचं कसलंही उत्तर दिलं नाही. त्याच्या चेहर्‍यावर कसलं प्रश्नचिन्ह उमटलं नाही. तो खजिल झाला नाही. तो ओशाळला नाही. तो त्याच्या आत्ममग्नतेपासून किंचितही ढळला नाही.

‘मागच्या काळात सगळ्यांनी तू लाडाचा म्हणून तुझं ते खपवून घेतलं…आता तुला माहीत नसेल,पण लोक तुला हॅशटॅग चालवून ट्रोल करतील.‘

प्रतिबिंबाने नार्सिससला सावध केलं.

‘मग करू दे ना कुणाला करायचं असेल त्यांना मला ट्रोल…‘ बर्‍याच काळानंतर नार्सिससने तोंड उघडलं.

प्रतिबिंब चकित झालं, नार्सिससला म्हणालं, ‘…म्हणजे ट्रोल होणं काय असतं हे तुला कळतंय तर!‘

नार्सिससने होकारार्थी मान हलवली.

‘अरे, पण मग इतका वेळ तू माझ्या प्रश्नांची उत्तरं का देत नव्हतास?‘

प्रतिबिंब चिडलं होतं.

‘अडचणीच्या वेळी कुणी कितीही अडचणीचे प्रश्न विचारले तरी त्यातल्या एकाचंही उत्तर देऊ नये हे मला माहीत आहे,‘ नार्सिसस थंडपणे म्हणाला.

‘त्यामुळे काय होतं?‘ प्रतिबिंबाला नार्सिससच्या अक्कलहुशारीचं कौतुक वाटलं.

‘त्यामुळे आपल्या प्रतिमेचं संवर्धनच होतं,‘ नार्सिसस ढिम्मपणे म्हणाला.

‘कधी शिकलास तू हे नार्सिसस?‘ प्रतिबिंबाने विचारलं.

‘ मागच्या जन्मी कसा शिकणार!…ह्याच जन्मी शिकलो… ‘ नार्सिसस उत्तरला.

आता प्रतिबिंबाचं काहीच म्हणणं नव्हतं. ते शेवटच्या फेरीत प्रचंड मतांनी पिछाडीवर पडलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -