-तुषार चांदवडकर
दुसेर म्हणजे नांगरणी करताना बैलाच्या मानेवर ठेवतात ते जू होय. किशोर सानप सर लिहितात, परिस्थितीच्या दुसेरीखाली. हे केवळ सूचकच नव्हे तर अनेकार्थसूचक असे शीर्षरूप प्रतीक, कवीने संग्रहाच्या शीर्षस्थानी वापरले आहे. परिस्थितीच्या दुसेरीखाली याचे अनेक अर्थ संभवतात.
गावखेड्यातल्या शेतीत हाडाची काडं करूनही कास्तकार मायबापांना दु:ख, दैन्य, अस्मानी सुलतानी संकटे, कौटुंबिक समस्यांशी झुंजणे, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मायबापांच्या दारुण आत्महत्या, दुबार पेरणी, सालाबादप्रमाणे अवतरलेला ओला तर कधी सुका दुष्काळ, जनावरांची ससेहोलपट, जमिनीच्या पोटातच उधळी लागून कालबाह्य झालेली कणगी पेव-संस्कृती, अन्नदाताच अन्नान्नदशा होऊन मृत्युपंथी लागल्याची स्थिती अशा भयंकर विपन्नावस्थेत जीवन जगण्याच्या पेचात सापडलेली कृषी संस्कृती आणि गावगाड्यांची जीवन पंढरी याच्या जीवघेण्या परिस्थितीचे वर्णन या काव्यसंग्रहात आहे.
पावसाचा लहरीपणा आणि त्या लहरीपणातून शेतकर्याला सोसावा लागणारा जीवघेणा त्रास कवी कानमाती कवितेतून व्यक्त करतो. तुझ्या नावाने सांडायला डोळ्यांच्या डोहात आता नावालाही थेंब नाही, असे परखडपणे सांगून कवी मात्र आम्ही आता फास वगैरे नाही रे घेणार, हा सकारात्मक आशावाद व्यक्त करतो. बाप मेल्यानंतर वाटणी केली जाते. मग माय कुणाकडे? ती कोणाच्या वाट्यात तर भाऊ भावाकडे बोट दाखवतो मग अशा वेळी मायेच्या मनाची अवस्था स्पष्ट करताना कवीने वापरलेली प्रतिमा अस्वस्थ करते.
मायही एकच. ती कोणाच्या वाट्यात? तर भाऊ-भावाकडे बोट दाखवी मायचे डोळे बाप गेलेल्या वाटेकडे जत्रेतल्या भिरभिर्यागत माय गरगरते कापसाचा शेवटचा वेचा झाल्यावर होणार्या नख्यांसारखी बोचकारते स्वतःला. रूप अरूपाचे या काव्यसंग्रहामध्ये अशोक सोनवणे यांची माय (गोधडी) ही कविता महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजली. गोधडीची शिवण आणि मायच्या आयुष्याची ठेवण या दोघांची वीण अतिशय ताकदीने या कवितेत सोनवणे सरांनी मांडली आहे.
या काव्यसंग्रहामध्ये मात्र बापाची प्रतिमाही वारंवार व्यक्त होते. आंतर पिकासारखा चेष्टेचा विषय झाला बाप, दुबार पेरणीची उसनी उभारी झाला बाप या टांगटा झाला बाप कवितेतील ओळी बापाचा आणि शेतीचा जो अनन्य संबंध आहे तो अधोरेखित करतो.
गहाणगाठ्याच्या कागदपत्रांवर बापाच्या अंगठ्याचे उमटलेले ठसे, भिजल्या घरांमध्ये चूल पेटत नाही आणि फास घेतलेले गाव कवीला बघवत नाही किंवा घन येतात आभाळी जळ पडतच नाही पेरा वाटे करावासा मन धजतच नाही. ही एकूण शेतकर्याच्या आणि ग्रामीण जीवनातील भयानक अशी परिस्थिती कवीला अस्वस्थ करते आणि ही अस्वस्थता व्यक्त करताना ग्रामीण विशेषत: खानदेशातील अस्सल शब्द ही संवेदना अधिक गडद करतात.
लानीची पात (मळणीसाठी अंथरलेली कणसे), उफनपाटी, पेरा, कणगी, वरंडी, पळह्याचं, बैलखुटा, निमबटाई, औतफाटा, चाचात, निझूर, दूरी, पर्तन, भोत यांसारखे शब्द लक्षवेधी आहेत. परिस्थितीची दुसेरी ही केवळ शेतीच्या बाबतीतच नाही तर समाजामध्ये निर्माण झालेल्या विसंवादाच्या दुहेरी ताणालादेखील अविष्कृत करते. त्यामुळे टिटवीला खड्या मारू नको हे सांगताना आई सहिष्णुता आणि पशूपक्षी प्रेमाने थोडी भीती घालायची.
आता मात्र खुल्या गोळ्या चालतात आणि संवेदना गोठत चालल्या पाहून कवीला वाटू लागते की आपली केव्हाही टिटवी होऊ शकते आणि हा संवाद कवीला आजूबाजूच्या अनेक घटनांतून मांडावासा वाटतो. मग लगोरी खेळ पाहून कवीच्या मनात येते की, आयुष्याच्या लगोरी खेळात शेवटचा थर ठेवण्यापूर्वी नियतीच्या हातातला चेंडू पाठीवर येऊन आदळणार, बाद करायला. असा आंधळा भास सुरू झालाय वारंवार. आई आणि बाई ही रूपेदेखील या काव्यसंग्रहात लक्षवेधी ठरतात.
कवीच्या अनेक आठवणींची साखळी या कवितांच्या रूपाने या काव्यसंग्रहात ध्वनीत होते. या कविता संग्रहाची पाठराखण करताना रणधीर शिंदे लिहितात की, शेती जीवन आणि त्यावर अवलंबून असणार्या शेतकरी जाणिवेचे विश्व अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. शेती जीवनाच्या पडझडीमुळे या कवितेस शेतकर्यांच्या कैफियतसुराचा फलक प्राप्त झाला. एका अर्थाने शेतकरी कुटुंबाच्या विझल्या घराची आणि उदास शिवाराची ही कविता आहे. शेतकर्याचे जीवन एका अर्थाने ‘दुसरेपणा’च्या जोखडाचे जीवन आहे.
बदललेल्या परिस्थितीत शेतकर्याचे स्थानांतरण असहाय्य अशा दुय्यमत्वात झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या या ‘दुसरेपणा’च्या जीवनानुभवाची ही कविता आहे. सोनवणे यांच्या कविताविश्वामागे लगतच्या भूतकाळातील स्मृतींचा भरगच्च आठव आहे. या स्मृती कालौघात विरत चालल्या आहेत. वर्तमान हा त्यांच्याशी संवादी नाही, तो विसंवादी आहे. या दुहेरी ताणातून त्यांची कविता निष्पन्न झालेली आहे. एकंदरीत हरवलेल्या भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर शेती जीवनाच्या वर्तमान पडझडीची रूपे मांडणारी ही कविता आहे.