घरफिचर्ससारांशपती-पत्नीच्या नातेसंबंधातील प्रवास : पुन:श्च हनिमून

पती-पत्नीच्या नातेसंबंधातील प्रवास : पुन:श्च हनिमून

Subscribe

अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी अभिनित फिर से हनिमून हे नाटक लॉकडाऊनच्या आधी हिंदीतून रंगभूमीवर आलं होतं. पुन:श्च हनिमून या शीर्षकाने ते आता मराठी रंगभूमीवरून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शीर्षकावरून यात एका विवाहित जोडप्याची प्रणय कथा रेखाटलेली असणार असा प्रथमदर्शनी समज होणं अगदी स्वाभाविक आहे. पुन:श्च हनिमून मात्र पती-पत्नीच्या नातेसंबंधातील प्रवास आहे. असं असलं तरी हे नाटक मानसिक स्वास्थ्यावर प्रामुख्याने भाष्य करतं.

पती आणि पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाकं. या चाकांना गंज लागू नये म्हणून प्रेमाचं, भावनेचं, आदराचं, मान-सन्मानाचं वंगण आवश्यक असतंच. वरवर सुखी-समाधानी दिसणारी अनेक जोडपी प्रत्यक्षात तशी असतातच असं नाही. त्यांच्याही नातेसंबंधात बरीच उलथापालथ होत असते. समाजात वावरताना मात्र हॅपिली मॅरीडचा दिखावा केला जात असतो. काही गोष्टी स्वीकाराव्या आणि काही तडजोडी कराव्या लागलेल्या असतात. बरेचदा तर नातं टिकविण्यासाठी धडपड केली जाते.

पुन:श्च हनिमून ही अशाच एका जोडप्याची कथा आहे. पडदा उघडतो तेव्हा विजांचा कडकडाट आणि पावसाचा आवाज ऐकू येतो. एक मध्यमवयीन जोडपं धापा टाकत येतं. आपण चुकलोय, हा त्यांच्यातील पहिला संवाद. क्षणभर ते आपल्या वैवाहिक संबंधांबाबत कबुली देत आहेत असाच समज होतो, मात्र पुढच्याच वाक्यात ते रस्ता चुकले आहेत हे स्पष्ट होतं. लग्नाला १० वर्षे उलटल्यानंतर हनिमून साजरा केलेल्या माथेरानमधील ड्रीमलॅड हॉटेलमध्येच ते पुन्हा हनिमूनसाठी आले आहेत.

- Advertisement -

तो सुहास देशपांडे. एक लेखक. त्याच्या पहिल्या कादंबरीला पुरस्कार मिळालेला, पण पुढे फारसं काही लिहू न शकलेला किंवा लेखनाला सुरुवात करून ते पूर्ण करू न शकलेला. त्याच्या लेखन प्रवाहाला बसलेली ही खीळ म्हणजे रायटर्स ब्लॉक. त्याने नव्याने लेखन करावे म्हणून पुन:श्च हनिमूनची कल्पना सुचवणारी ती त्याची पत्नी. एका दूरदर्शन वाहिनीवर सूत्रसंचालिका म्हणून काम करणारी सुकन्या देशपांडे.

त्यांना हवी असलेली पहिल्या हनिमूनची तीच रूम मिळत नाही. इथपर्यंतचा प्रवास काहीसा अपेक्षित असाच,पण पुढे रंगमंचावर जे काही घडत जातं ते प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. त्या दोघांना त्यांची हॉटेलमधील रूम त्यांच्याच घरासारखी वाटायला लागते. वर्तमानातील प्रसंग घडत असताना भूतकाळातील पात्र, प्रसंग त्यात डोकावू लागतात. त्यातून या जोडप्याचं वैवाहिक नातं, दोघांची व्यक्तिमत्त्व उलगडत जातात.

- Advertisement -

नाटकाचा आशय, विषय आणि एकूणच सादरीकरण नावीन्यपूर्ण आहे. हलक्या फुलक्या मनोरंजक पद्धतीने एका गंभीर विषयाला हात घातला आहे. अनेक प्रसंग विवाहित जोडप्यांना आपले स्वत:चे वाटतील असे आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर मधेमधे येत राहणारे सुकन्याच्या आईचे फोन आणि ते आल्यानंतर सुहासचे गेला एक तास, असे म्हणत वैतागणे तसेच सुहासच्या पॉर्न फिल्म पाहण्याचा उल्लेख याचे देता येईल.

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेत संदेश कुलकर्णी यांनी कमालच केली आहे. एक साधी वाटणारी गोष्ट अर्थपूर्ण संवादांसह एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाते हे लेखनाचे, रंगमंचावर तिचे कल्पकतेने केले गेलेले सादरीकरण हे दिग्दर्शनाचे, तर यातील पात्र समोर जिवंत करणे हे अभिनयाचे निर्विवाद यश आहे. कसदार लेखन, दर्जेदार दिग्दर्शन की दमदार अभिनय नेमके कशाचे कौतुक करावे, असा प्रश्न पडावा इतके ते या तिन्ही आघाड्यांवर खरे उतरले आहेत. त्यांना तितकीच तोलामोलाची साथ अमृता सुभाष यांनी दिली आहे. या दोघांचा अभिनय तोडीस तोड झाला आहे. प्रेयसी, पत्नी, पत्रकार, अवखळ मुलगी अशा विविध छटा अमृता सुभाष यांनी अभिनयातून सशक्तपणे दाखवल्या आहेत. त्यांच्या आवाजात कभी तन्हाईयों में हमारी याद आयेगी. काळीज चिरून जातं

मंगेश काकड (मॅनेजर, थेरपिस्ट, बॉस) आणि कौशल जोबनपुत्र (पब्जी, कॅमेरामन, स्पॉट बॉय, मेकअपमन, उनाड मुलगा, एजंट) या दोघा कलाकारांना यात एकापेक्षा अधिक पात्रे साकारायची होती. ती कामगिरी त्यांनी अतिशय उत्तमरीत्या पार पाडली आहे.

एकाच वेळी वर्तमानकाळ आणि भूतकाळ दोन्ही दाखवायचे असल्याने भिंतीवरील बिनकाट्यांचे घड्याळ तसेच सायक्लोरामाचा वैशिष्टपूर्ण वापर याद्वारे मीरा वेलणकर यांनी नेमके आणि सूचक नेपथ्य उभे केले आहे. आशुतोष परांडकर यांची प्रसंगानुरूप बदलणारी प्रकाश योजना प्रभावी झाली आहे. नरेंद्र भिडे यांचे संगीत आणि श्वेता बापट यांची वेशभूषा उल्लेखनीय आहे.

स्क्रिप्टीझ क्रिएशन आणि रंगाई निर्मित पुन:श्च हनिमून एकदा पाहून समाधान होणार नाहीच. ते पुन:श्च एकदा पाहावे असे पाहणार्‍या प्रत्येकाला नक्कीच वाटेल.

–श्रीराम वाघमारे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -