Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नात्यातच विवाहबाह्य संबंध!

नात्यातच विवाहबाह्य संबंध!

Subscribe

अनेक प्रकरणात हे लक्षात येते की कुटुंबातील कोणत्याही विवाहित व्यक्तीचे वैवाहिक आयुष्य जर ठिकठाक नसेल, त्यातून त्यांना सुख, समाधान, शांतता लाभत नसेल तर ते पर्यायी नातेसंबंध ज्याला आपण विवाहबाह्य अनैतिक संबंध म्हणतो त्याकडे आकर्षित होतात. परंतु हे संबंध कुटुंबातीलच, नात्यातीलच स्त्री अथवा पुरुषाशी प्रस्थापित केलेले असतात. अतिशय संवेदनशील, स्फोटक अशी ही प्रकरण असतात आणि हेच संबंध उघड झाल्यावर यामध्ये त्या दोन व्यक्तींचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचाच कसोटीचा प्रसंग असतो.

आपण जेव्हा कुटुंबाचा विचार करतो तेव्हा अनेक प्रेमाची, मजाक मस्तीची, जिव्हाळ्याची, आदराची, आपुलकीची नाती आपल्या डोळ्या समोर उभी राहतात. बहीण-भाऊ, आत्या, मावशी, मामा- मामी, काका -काकू, जावा-भावा, दीर-भावजय, आजी-आजोबा, आई -वडील, सुना, जावई, भाचा- भाची, पुतणे-पुतण्या यासारखे असंख्य नातेसंबंध कुटुंबाची खरी ओळख असतात. या सर्व नात्यांशिवाय कुटुंबाला मजा नाही. एकत्र असोत वा कोणत्याही कारणास्तव विभक्त असोत, पण सण-वार, लग्न कार्य, सुख-दुःख प्रसंगी सगळे एकत्र येणे, एकमेकात मिसळणे, आपसातील मतभेद विसरून खेळीमेळीने राहणे यातच खरे समाधान असते आणि अनेक कुटुंबात ते पाहायलादेखील मिळते. परंतु कौटुंबिक समुपदेशन करीत असताना अनेक प्रकरणे अशी येतात ज्यामध्ये कुटुंबातील या नातेसंबंधांना, त्यातील मर्यादांना, त्यातील मानपानाला फाटा देऊन, सामाजिक, नैतिक, कौटुंबिक बंधन झुगारून आपापसात अनेक प्रकारचे अनैतिक संबंध प्रस्थापित केलेले आढळतात. कुटुंबातील या व्यक्ती विवाहित असोत वा अविवाहित त्यांनी आपण कोणत्या नातेसंबंधांमध्ये एकत्र आहोत, आपण एकमेकांचे कोण लागतोय, कुटुंबातील आपले स्थान, ओळख काय आहे, आपले आणि समोरच्याचे वय काय आहे, नातं काय आहे, याचा विचार न करता घरातच त्या व्यक्तीशी प्रेम संबंध अथवा वेगळीच जवळीक ठेऊन शारीरिक, भावनिक, मानसिक गुंतवणूक केलेली दिसते.

अनेक प्रकरणात हे लक्षात येते की कुटुंबातील कोणत्याही विवाहित व्यक्तीचे वैवाहिक आयुष्य जर ठिकठाक नसेल, त्यातून त्यांना सुख, समाधान, शांतता लाभत नसेल तर ते पर्यायी नातेसंबंध ज्याला आपण विवाहबाह्य अनैतिक संबंध म्हणतो त्याकडे आकर्षित होतात. परंतु हे संबंध कुटुंबातीलच, नात्यातीलच स्त्री अथवा पुरुषाशी प्रस्थापित केलेले असतात. अतिशय संवेदनशील, स्फोटक अशी ही प्रकरण असतात आणि हेच संबंध उघड झाल्यावर यामध्ये त्या दोन व्यक्तींचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचाच कसोटीचा प्रसंग असतो. अशा प्रकारच्या नातेसंबंधामध्ये असलेल्या स्त्री अथवा पुरुषाशी समुपदेशनादरम्यान चर्चा केली असता त्यांच्या असे निर्णय घेण्यामागील काही उद्देश आपल्या लक्षात येतात. वास्तविक स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घराबाहेरदेखील प्रेमप्रकरण अथवा संबंध आम्ही निर्माण करु शकलो असतो. परंतु त्यामध्ये जास्त जोखीम आहे, घराबाहेरील व्यक्ती आपला गैरफायदा घेऊ शकते, बदनामी होऊ शकते, धोका देऊ शकते. प्रामुख्याने महिलांच्या बाबतीत घराबाहेर पडणे शक्य नाही, घरातून खूप बंधन आहेत, पण त्यामुळे आमची घुसमट होते, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी नव्हतो, आम्हाला आधाराची गरज होती आणि आहे यासारखी कारणे सांगितली जातात. कुटुंबातील अथवा घरातील सदस्यांसोबत रिलेशनशिपमध्ये राहणे योग्य वाटते, कारण घरातील व्यक्तीला आपली सगळी परिस्थिती इत्यंभूत माहिती असल्याने, दोघांनाही आम्ही चांगले ओळखत असल्याने, एकमेकांवर विश्वास असल्याने, अनेक वर्षांचा परिचय असल्याने, दोघांच्या सुख दुःखाची पुरेपूर जाणीव आम्हाला असल्याने आम्हाला सुखद वाटते. एकमेकांचे विचार, उणिवा, चांगले वाईट अनुभव घेऊन आमचे नातेसंबंध अधिक दृढ झाले आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांजवळ सर्वार्थाने येणे पसंद केले असेही सांगितले जाते. घरातील व्यक्ती रिलेशन शिपमध्ये असेल तर, सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट घटनांमध्ये सोबत राहाते, आपल्याला जबाबदारी म्हणून सांभाळून घेते, असेही मतप्रदर्शन अनेक महिला करतात. दोघांनाही एकमेकांचे सर्व नातेवाईक, कुटुंबातील लोक, मित्र मैत्रिणी माहिती असल्यामुळे आम्ही आपापसात त्या पद्धतीने समझोता करुन राहतो, गैरसमज कमी होतात, एकमेकांना पुरेशी स्पेसदेखील आम्ही देऊ शकतो.

- Advertisement -

आमच्या नात्यामुळे आम्हाला कुटुंबातील इतर कोणालाही त्रास द्यायचा नाही, पण आमचे नाते असेच कायमस्वरूपी टिकून ठेवायचे आहे जे घरच्यांना कधीच मान्य होणार नाही. हे नातं आम्ही कोणालाच सांगू शकत नाही, पण याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये अशा मतावर हे स्त्री-पुरुष ठाम असतात. घराबाहेरील कोणावर विश्वास ठेवणे अशक्य आहे, बाहेर कोणीही आपल्याला समजून घेत नसतं जो तो स्वतःचा स्वार्थ पाहतो. घरातच ठेवलेले संबंध सुरक्षित वाटतात. घरातील व्यक्तीसोबत असलेले संबंध त्याच्याशी असलेल्या खर्‍या नात्यामुळे पटकन कोणाच्या लक्षात येत नाहीत, डोळ्यात येत नाहीत. पण आमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा समसमान असल्याने त्या आम्ही पूर्ण करु शकतो आणि त्यात आम्हाला चुकीचं काही वाटत नाही. आम्ही कोणावर अन्याय करतोय असं आम्हाला वाटतं नाही. आम्ही ज्या सुखापासून वंचित आहोत ते मिळवण्यासाठी आम्ही एकमेकांना जवळ केलं त्यात गैर काय, असा विचार यामध्ये दिसतो.

अनेक प्रकरणात असेही लक्षात येते की कौटुंबिक नात्यातील अनैतिक संबंध हे कोणा एकाकडून दुसर्‍यावर जबरदस्तीने लादले गेलेले आहेत. मानसिक टॉर्चर करुन, दबाव आणून, ब्लॅकमेल करुन अथवा धमक्या देऊन कुटुंबातील महिलांना अथवा पुरुषांनासुद्धा लैंगिक त्रास दिला जातोय. स्वतःची गरज भागविण्यासाठी आपल्याच जवळच्या नात्यातील स्त्री अथवा पुरुषाचा अशा प्रकारे गैरवापर करणारे समोरच्याचीदेखील पिळवणूक करुन त्याला चुकीच्या मार्गाने वागायला प्रवृत्त करीत आहेत. याबद्दल कुटुंबातील कोणाला सांगितले तर ते विश्वास ठेवणार नाहीत, अथवा आपल्यालाच दोष देतील, आपली बदनामी होईल, कुटुंबात कलह निर्माण होतील, चांगले नातेसंबंध दुरावतील या भीतीमुळे शांत राहून असे अन्याय सहन केले जात असल्याचे सांगितले जाते. कोणत्यातरी आर्थिक अडचणीपोटी, कर्जबाजारीपणातून बाहेर येण्यासाठी, राहायला निवारा मिळण्यासाठी, आमिषापोटी, गरजेपोटी, स्वतःची पैशाची, अन्न, वस्त्र यासारख्या उदरनिर्वाहाची अथवा अन्य गरज कुटुंबातील एखादी व्यक्ती भागवते आहे म्हणूनदेखील मजबुरीमध्ये इच्छा नसताना पण अशा संबंधांचा स्वीकार संबंधितांनी केलेला दिसतो. कुटुंबातील एखादी महिला अथवा मुलगी जिला कोणाचा पाठिंबा अथवा खंबीर आधार नाही अशा महिलांचा वापर स्वतःच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी, वासना पूर्ण करण्यासाठी करुन त्याबदल्यात तिच्या आर्थिक गरजा भागवणे असे चित्र बहुतांश पाहायला मिळते. अर्धवट अपुरे शिक्षण, व्यावहारिक तसेच सामाजिक अनुभवाची कमतरता, सतत परावलंबी असणे, नोकरी उद्योग व्यवसाय यातील कोणत्याही कामाचा अनुभव नसणे त्यासाठी आवश्यक ते कौशल्य नसणे अशा विचित्र परिस्थितीमध्ये अडकलेली महिला स्वतःचे शोषण करुन घेताना दिसते. आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची हिंमत, धमक न ठेवता, त्यातून सकारात्मक मार्ग न काढता अशा तात्पुरत्या मदतीसाठी, खोट्या सहानुभूतीसाठी स्वतःच्या तत्वांशी, मूल्यांशी तडजोड महिलांनी का करावी? स्वतःचे संपूर्ण आयुष्य अशा भविष्यहीन नात्यामागे का वाया घालवावे याचा विचार होणे आवश्यक आहे. (क्रमश:)

  • लेखिका – मीनाक्षी जगदाळे (फॅमिली कौन्सिलर)
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -