Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश धर्ममार्तंडांपुढे शिक्षण निष्प्रभ!

धर्ममार्तंडांपुढे शिक्षण निष्प्रभ!

Subscribe

शिक्षण घेतलेल्या समाजातच माणसं धर्म, जातीच्या नावाखाली माणसांच्या जीवावर उठली आहेत. धर्म म्हणजे प्रेम, धर्म म्हणजे माणूसपणाची पेरणी, धर्म म्हणजे मानवतेचा विचार, मात्र आज खर्‍या धर्माचा विचार हरवत चालला आहे. धर्माच्या नावाखाली माणसं संघर्षाच्या परिसीमा गाठत आहेत. समाजमनात द्वेषभावना वाढत आहे. धर्माच्या खर्‍या विचाराची कास धरत प्रवास करण्याऐवजी धर्ममार्तंडांचा विचार मस्तकावर अधिराज्य करीत आहे. शिक्षणाचा आणि सद्सद्विवेकबुद्धीचा अभाव असलेली माणसं समाजमनावर अधिराज्य करीत आहे. पदवी घेऊनही सद्सद्विवेकाची वाट चालण्याची शक्ती शिक्षणाने मस्तकात भरली नाही. त्यामुळे शिक्षणातून मूलभूत मूल्यांची पेरणी करण्याचे राहून गेले आहे हे सतत जाणवत राहते.

देशातील वाढते द्वेषमूलक वातावरण कमी करायचे असेल तर त्यासाठी धर्म आणि राजकारण परस्परापासून विलग करण्याची गरज आहे. राजकारणात धर्माचा वापर थांबवणे आवश्यक आहे. ज्ञान आणि शिक्षणाच्या अभावामुळे निर्माण होणारी अप्रगल्भता न्यायालय कशी कमी करणार? अशी निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान नोंदवली. देशातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीत सुधारणा करावयाची असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. समाजमनात जोवर शहाणपण, विवेक निर्माण करण्याचा प्रयत्न होत नाही तोवर समाजातील संघर्ष, भेदाभेद, धर्म, जात, पंथापथांतील द्वेषभाव संपुष्टात येणार नाही. प्रगत समाज व समृद्ध राष्ट्राच्या निर्मितीच्या दृष्टीने शिक्षणाचे मोल जगातील अनेक विचारवंतांनी मान्य केले आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण अधिक महत्त्वपूर्ण मानायला हवे.

या निरीक्षणाचा मतितार्थ जाणून घेतला तर शिक्षणात काम करणार्‍या मनुष्यबळाची जबाबदारी किती वाढली आहे हे सहजतेने लक्षात येईल. शिक्षण हे व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनाच्या उन्नतीचे साधन आहे आणि समाज व राष्ट्राच्या प्रगतीचे प्रभावी साधन आहे. समाजात जे वाईट घडत आहे त्याला शिक्षणच कारणीभूत आहे असे मान्य करावे लागेल. चांगले जर शिक्षणाने घडत असेल तर वाईटपणाची जबाबदारी कशी नाकारता येईल? शिकलेली माणसं जेव्हा विचारशून्यतेने वागतात तेव्हा शिक्षणाचा काय उपयोग, असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. चांगला समाज हा चांगल्या माणसांमुळे घडत असतो. चांगला समाज घडविण्यासाठी शिक्षणसंस्थांचा उदय झाला आहे म्हणून पूर्वी शाळांना जीवन शिक्षण विद्या मंदिर असे संबोधले जात होते. शिक्षणाचे मोल लक्षात घेता शिक्षणावर होणारा खर्च हा खर्च न मानता गुंतवणूक मानली जाते, मात्र आज ती गुंतवणूक वाया जात नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

- Advertisement -

शिक्षण घेतलेल्या समाजातच माणसं धर्म, जातीच्या नावाखाली माणसांच्या जीवावर उठली आहेत. धर्म म्हणजे प्रेम, धर्म म्हणजे माणूसपणाची पेरणी, धर्म म्हणजे मानवतेचा विचार, मात्र आज खर्‍या धर्माचा विचार हरवत चालला आहे. धर्माच्या नावाखाली माणसं संघर्षाच्या परिसीमा गाठत आहेत. समाजमनात द्वेषभावना वाढत आहे. धर्माच्या खर्‍या विचाराची कास धरत प्रवास करण्याऐवजी धर्ममार्तंडांचा विचार मस्तकावर अधिराज्य करीत आहे. शिक्षणाचा अभाव, सद्सद्विवेकबुद्धीचा अभाव असलेली माणसं समाजमनावर अधिराज्य करीत आहे. पदवी घेऊनही सद्सद्विवेकाची वाट चालण्याची शक्ती शिक्षणाने मस्तकात भरली नाही. त्यामुळे शिक्षणातून मूलभूत मूल्यांची पेरणी करण्याचे राहून गेले आहे हे सतत जाणवत राहते. कोणत्याही देशातील शिक्षणाची व्यवस्था प्रभावी व परिणामकारक काम करीत असेल तर त्या देशाला प्रगतीची झेप घेणे फारसे अवघड नसते. शिक्षणाचा विचार व्यापकतेने मानवी मस्तके घडविण्याच्या दृष्टीने केला नाही तर ते शिक्षण कुचकामी ठरते हे खरेच, पण त्याचा दुष्परिणाम राष्ट्राच्या विकासावर होतो हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे समाजातील संघर्षाला शिक्षण आणि ज्ञानाचा अभाव हेच सर्वात महत्त्वाचे कारण आहे. त्यात मूलभूत सुधारणा घडवून आणल्याशिवाय आपल्याला विकासाच्या नव्या वाटा चालणे शक्य नाही.

मानवाच्या जीवन विकासातील धर्माचे स्थान कोणीच नाकारणार नाही. मानवी जीवनाच्या सुखासाठी माणसं जेव्हा एकत्र येतात, ती एकत्रित समूहाची जीवन पद्धती म्हणजे धर्म आहे, असे सांगितले जाते. महाभारतात म्हटले आहे की, धारणात् धर्म मित्याहःधर्मो धारयती प्रजा. ज्या आचारविचाराने लोक एकत्र येतात त्याला धर्म म्हणतात. प्रत्येक व्यक्तीने आपल्या धर्माचे आचारविचार पालन करताना स्वत:वर काही बंधने घालणेदेखील महत्त्वाचे असते. आपल्या धर्माचे पालन करताना इतरांना त्रास होणार असेल तर तो विचार समाज उन्नतीचा नाही. त्यासाठी माणसाची सद्सद्विवेकबुद्धी अधिक महत्त्वाची आहे. माणसाने धर्माचा विचार काळानुरूप करायला हवा. समाज हा नेहमीच परिवर्तनशील असतो असे मानले जाते, मात्र कोणत्या आचारविचारात परिवर्तन करायचे आहे याचा नेमकेपणाने विचार करण्याची गरज आहे.

- Advertisement -

विचाराच्या मुळाशी जाऊन जाणून घेण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती ज्ञानाधिष्ठित असायला हवी. ज्ञानासाठी सत्याची वाट चालण्याची अनिवार्यता आहे. सत्याचा प्रवास म्हणजे ज्ञानाची वाट आहे. ती ज्ञानाची वाट चालली तरच माणूसपणाच्या सुयोग्य वाटेने प्रवास करणे शक्य आहे. खरंतर प्रत्येक धर्मातील साधना ही सत्याच्या वाटेसाठी आहे. सत्याचा शोध लागला की धर्माची गरज उरत नाही. धर्म हा सत्याच्या दिशेचा प्रवास आहे. त्यामुळे व्यक्ती कोणत्याही धर्मातील असली तरी सत्याचा शोध लागायला हवा. तसे घडले तर मनामनात सामावलेल्या द्वेषभावनेचा अंत होत जातो. त्यामुळे सत्याच्या वाटेने घेऊन जाण्याऐवजी अनेकांना असत्याचा प्रवास हा अधिक हितावह वाटतो. समाजात शहाणपण पेरण्याची गरज आहे. प्रत्येक धर्म माणसाच्या कल्याणाचे गीत गात आहे. ते गीत धर्मातील माणसांचे आहे असे नाही तर ते अवघ्या मानवजातीचे आहे. त्यामुळे साने गुरुजी म्हणाले होते की, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.

संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागताना जो जे वांछील तो ते लाभो प्राणिजात, असे म्हटले आहे. यात कोणत्याही धर्माशी नाते असलेली प्राणीजात असे अपेक्षित नाही. जगाच्या पाठीवर जे म्हणून प्राणीजात आहे त्या सर्वांची मनोकामना पूर्ण होवो ही भावनाच मुळी सत्याच्या अंतिम शोधानंतरची वृत्ती आहे. त्यामुळे शिक्षणातून सत्याच्या शोधापर्यंतचा प्रवास घडविण्याची गरज आहे. एकदा का सत्याचा शोध लागला की कोणत्याही धर्माचा आणि व्यक्तीची द्वेषभावना मनात उरत नाही. भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र यांनी दाखवलेली वाट सत्याची आहे. भगवान येशू, महंमद पैगंबर, महावीर, नानक यांसारख्या अनेक संत, प्रेषितांनी दाखवलेली वाट सत्य धर्माची होती. जगातील सर्वच धर्मांचे धर्मग्रंथ सत्याची वाट दाखवतात. दुर्दैवाने धर्मग्रंथातील विचारात मोडतोड करून धर्माच्या नावाखाली धर्ममार्तंडांनी समाजापर्यंत वेगळे काही पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचा स्वतःचा स्वार्थ आहे. स्वत:च्या खोट्या प्रतिष्ठेचा विचार सामावलेला आहे. त्यामुळे स्वत:चे दुकान चालविण्यासाठी व्यवस्थेतील काही लोक धर्माचा चुकीचा अर्थ सांगत जातात.

त्यामुळे विनोबा तर जीवनाचा अर्थ सांगताना लिहितात, जीवनम् सत्यशोधनम्. त्यामुळे शिक्षणाने सत्याची वाट दाखविणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येईल. वर्तमानात शिक्षणाचा विचार अधिक गंभीरपणे करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तो विचार केवळ कोणी एकाने करून चालणार नाही, तर त्यासाठी शिक्षणाचे जे स्तंभ आहेत त्या सर्वांनीच तो विचार केला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रयोगशील प्राचार्य आणि ज्येष्ठ विचारवंत मधुसुदन कौंडिण्या यांनी म्हटले आहे की, चालक आणि शासक यांच्या बाबतीत माझा भ्रमनिरास झाला आहे. पालकदेखील टाकूनिया भार इतरावरी, असे म्हणत बेफिकीर झाला आहे, मात्र स्नातक आणि शिक्षक यांच्याविषयी मी आशावादी आहे किंवा तोच एकमेव आशेचा किरण आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे असे मानले जाते, मात्र अशा वेळी जीवन शिक्षणात व्यतीत केल्यानंतरही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावरच त्यांना आशा वाटत आहे. कारण शिक्षक परिवर्तनाचे विचार पेरत असतात आणि विद्यार्थी त्या विचाराची वाट चालत असतात. ती वाटच समाज व राष्ट्राचे उत्थान घडविणारी आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निरीक्षणाचा विचार करण्याची गरज आहे. आज विचार करीत परिवर्तनाची वाट चालली नाही, तर उद्याचे भविष्य अंधाराचे असेल यात शंका नाही.

जगाच्या पाठीवर धर्मावर अंधश्रद्धा ठेवणारा धर्मनिष्ठेचा मार्ग हा नेहमीच आत्मघाताचा ठरलेला आहे. धर्मावर विवेकी श्रद्धा असायला हवी. परंपरा, रूढी काळाच्या ओघात बदलायलाच हव्यात. त्या अधिक विज्ञानवादी असायला हव्यात. जग जसे बदलत आहे त्याप्रमाणे काळासोबत राहण्याची गरज आहे. जगाच्या पाठीवर अविवेकी धर्मनिष्ठ माणसं ही नेहमीच विज्ञाननिष्ठा आणि समतानिष्ठतेचे शत्रू आहेत. विषमतेला जोपासण्यासाठी धर्ममार्तंडांनी जात, पात, धर्माचा बागुलबुवा उभा केला आहे. अशा पद्धतीने वाट चालणे हे त्यांच्या हिताचे असते. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी मांडलेला विचार हा खर्‍या धर्माचा आहे. त्यांनी समाजात परिवर्तन करण्यासाठी खर्‍या धर्माचा विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. आज धर्ममार्तंडांना आणि स्वहित जोपासणार्‍यांना विवेकानंदांचा धर्म विचार मान्य होत नाही. त्या धर्मात समाज व राष्ट्राचे उत्थान आहे. जो धर्माचा प्रचारक दुसर्‍या धर्म आणि माणसांबद्दल नकारात्मकता पसरवत द्वेषभावना पेरतो त्या माणसाला स्वत:च्या खर्‍या धर्माचा शोध लागला नाही असेच म्हणावे लागेल. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके शिकणे आणि शिकवणे नाही तर ज्ञानाच्या निर्मितीपर्यंत पोहचण्याचा प्रवास घडविणे आहे. आपले शिक्षण ज्ञानाच्या कक्षा रूंदावताना दिसत नाही. त्यामुळे समाजाचा प्रवास उलटा सुरू झाल्याचे दिसत आहे.

- Advertisment -