घरफिचर्ससारांशरेषा धूसर झाल्या आणि गडबड झाली

रेषा धूसर झाल्या आणि गडबड झाली

Subscribe

प्रत्येकालाच रोज वेगवेगळ्या भूमिका पार पाडायच्या असतात. घरात असतानाही आणि घराच्या बाहेर पडल्यावरही. त्यातही पत्रकार म्हटल्यावर तर समाजात मिसळल्याशिवाय काहीच शक्य नाही. बंद एसी खोलीत बसून पत्रकारिता कधीच केली जाऊ शकत नाही. त्यासाठी समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये मिसळावे लागतेच. समाज घटकांचे प्रश्न, अडचणी, सुख, दुःख, समस्या, आनंदाचे मार्ग सगळंच माहिती करून घ्यावे लागते. त्याशिवाय आपल्या लिखाणात नेमकेपणा येऊ शकत नाही. अर्थात हे सगळं करताना आपण तटस्थ राहणेच अपेक्षित असते. आपण कोणाच्या बाजूने नाही आणि कोणाच्या विरोधातही नाही. समाजासाठी जे चांगले आहे त्याला पाठिंबा दिला पाहिजे. पण समाजहिताच्या विरोधात असलेल्या गोष्टींना, निर्णयांना कडाडून विरोधही केला पाहिजे. आम्हाला तरी पत्रकारिता करताना आणि माध्यमांमध्ये काम करताना या क्षेत्रातील ज्येष्ठांनी हेच शिकवले. समाजात मिसळतानाही ठराविक अंतर कायम ठेवायचे असते. एक रेष कायम घालून घ्यायची असते. ती रेष ओलांडायची नसते. पण अलीकडे सोशल मीडियामुळे सगळ्या रेषा धूसर झाल्या आहेत. पत्रकारांकडूनही जाणते किंवा अजाणतेपणी रेषा ओलांडल्या जाऊ लागल्या आहेत आणि तिथेच गडबड झाली.

राजकारणी, राजकीय नेते अत्यंत हुशार, चतुर असतात. कधी, कोणाचा कसा वापर करून घ्यायचा, कोण कधी कसा आपल्या उपयोगी पडेल, हे त्यांच्या इतके स्मार्टपणे इतर कोणालाही कळूच शकत नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही अर्थ दडलेला असतोच. आणि असा अर्थ दडलेला असेल तरच त्या राजकारण्याला भवितव्य असते. नाहीतर राजकीय नेता असो की नेत्या, त्यांना लांबचा पल्ला गाठता येणारच नाही. सोशल मीडियामुळे आभासी जगात सगळेच एकमेकांचे ‘फ्रेंड’ झाले आहेत. आता या आभासी जगात पत्रकार म्हणून वावरतानाही पत्रकारांना पुन्हा ती रेष आखून घ्यावीच लागेल. जग आभासी असले तरी त्यावर आजूबाजूच्या समाजाचे अगदी बारीक लक्ष असते. आभासी जगात कोणी जर आपले कौतुक करत असेल तर त्याकडे सजगपणे बघितले पाहिजे.

- Advertisement -

त्यातही कौतुक करणारी व्यक्ती राजकारणी असेल तर मग जास्तच बारीक नजरेने बघितले पाहिजे. कोणती निवडणूक येऊ घातली नाही ना, आपले कौतुक करून आपल्याकडून काही वेगळाच फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात नाही ना, हे आपण आपल्यालाच विचारले पाहिजे. आता समोरच्या व्यक्तीने आपल्याबद्दल काय म्हणावं, यावर आपले नियंत्रण असू शकत नाही. पण निदान अशा गोष्टींना शेअर करून, रिट्विट करून त्यांच्या जाळ्यात ओढले जाणार नाही, याची खबरदारी आपणच घेतली पाहिजे. पुन्हा एकदा, ती रेष लक्षात ठेवली पाहिजे. ही झाली आदर्श पद्धत. पण वास्तवात तसे होताना दिसत नाही. सोशल मीडियात सगळ्याच रेषा ओलांडल्या जातात आणि कळत नकळतपणे आपण कोणाच्या तरी पालखीचे भोई होऊन बसतो.

सोशल मीडिया मॅनेजमेंट हा नवा उद्योग आता बर्‍यापैकी स्थिरस्थावर झाला आहे. अनेक जण या नव्या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यामध्ये अनेक पत्रकारही आहेत. पण इथेही पुन्हा सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि पत्रकारिता यामध्ये एक रेष आखून घेतली पाहिजे. पत्रकारिता करता करता आणि कोणासाठी मॅनेजमेंट तर करत नाही ना, हे बघितले पाहिजे. उदाहरण बघूया. एक पत्रकार पती-पत्नी आहेत. एका मोठ्या माध्यम समूहात पती पत्रकार म्हणून कार्यरत आहे. तर पत्नीचा सोशल मीडिया मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. पत्रकारितेत असल्यामुळे पती महाशय वेगवेगळ्या राजकारण्यांना भेटत असतात आणि पत्नी यापैकीच काही राजकारण्यांचे सोशल मीडिया मॅनेजमेंट बघते. वरवर बघितले तर हे सर्वसामान्य वाटते. त्यात काहीही गैर नाही. पण तसे नसते.

- Advertisement -

तुम्ही ज्या क्षेत्रात वार्तांकन करत आहात, तिथे कोणीही तुमचा मित्र नाही आणि कोणी शत्रूही नाही. पुन्हा आधी म्हटल्याप्रमाणे तटस्थता आलीच. मग एखादा राजकारणी किंवा पक्ष चुकीचा निर्णय घेत असेल तर पत्रकार म्हणून त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. पण ज्यांचे वार्तांकन आपण करणार, तेच जर आपल्या घरातील व्यवसायाचे ग्राहक असतील तर लेखणी धारदारपणे चालणारच नाही आणि तशी ती चालतही नाही. गुडी गुडी बातम्या दिल्या जातात. मग एका कामातून दुसरे, दुसर्‍यातून तिसरे काम मिळत जाते. या सगळ्यामध्ये खरी पत्रकारिता मागे पडते, संपते आणि उरतं फक्त पब्लिक रिलेशन. आपल्या व्यवसायातील ग्राहकाची प्रतिमा निर्मिती. कारण परत एकदा जी रेष आखली होती ती पुसली गेली.

काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील एका मोठ्या नेत्याने चांगले उदाहरण दिले होते. मागे एकदा देशातील केंद्रीय मंत्रिमंडळातील एका नेत्याने आपल्या घरी काही पत्रकारांना रात्रीच्या भोजनासाठी बोलावले होते. राजकीय नेते अधूनमधून पत्रकारांना बोलावत असतातच. जेवणाआधी गप्पा मारत असताना जेवणाला उशीर झाला. तिथे आलेला एक पत्रकार सतत आपल्या घड्याळात बघत होता. मंत्रिमहोद्यांना ही बाब लक्षात आली. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले, पण नंतर न राहवून त्यांनी तुम्ही सारखे घड्याळाकडे का बघत आहात, असे त्या पत्रकाराला विचारले. त्यावेळी त्या पत्रकाराने सांगितले की, साहेब, माझे घर इथून लांब आहे आणि मला घरी जाण्यासाठी शेवटच्या बसची वेळ होत आली आहे. ती बस चुकली तर मी घरी जाऊ शकणार नाही. बस चुकू नये म्हणूनच मी सारखं घड्याळात बघतोय.

हे उदाहरण पत्रकारांचे वास्तव आहे. अनेकवेळा मोठमोठे नेते, मंत्री, मुख्यमंत्री पत्रकारांना भेटतात, त्यांच्याशी कधी कधी फोनवरून बोलतात. सार्वजनिक कार्यक्रमात ओळख देतात. पण हे सगळे करत असताना आपण एका माध्यम समूहाचे प्रतिनिधित्व करीत आहोत, समाजासाठी उपयुक्त अशा एका व्यावसायिक क्षेत्रात आहोत, तरीही सामान्य नागरिक आहोत, हे पत्रकारांनी विसरून चालणार नाही. आपण आणि सत्ताधारी यांच्यामध्येही पुन्हा एक रेष आखून घ्यायलाच हवी. सत्तेच्या झगमगाटात वाहत न जाता आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. अनेक वर्षांपासून अनेक पत्रकारांनी याच पद्धतीने काम केले म्हणून पत्रकारांबद्दल समाजात आदर निर्माण झाला. विश्वासार्हता एका रात्रीत अजिबात मिळाली नाही. अनेक पत्रकारांनी त्यासाठी अपार मेहनत घेतली.

आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. रेषा धूसर झाल्या आहेत. पत्रकारिता, पब्लिक रिलेशन, सोशल मीडिया, ध्रुवीकरण या सगळ्याची सरमिसळ झाली आहे. आपल्या पुढ्यात बातमी म्हणून जे काही येतंय, तेच क्रॉस चेक करण्याची आणि त्यामागे काय घडामोडी असू शकतात हे आपापल्या पद्धतीने तपासण्याची वेळ वाचकांवर आली आहे. सध्या तरी इतकंच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -