Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश श्रवणहानी टाळण्यासाठी संशोधन!

श्रवणहानी टाळण्यासाठी संशोधन!

Subscribe

एका विशिष्ट वयानंतर अंदाजे ४० टक्के लोकांना काही प्रमाणात कमी ऐकू यायला लागते. हे प्रमाण ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असले तरी जेव्हा लोक त्यांच्या ४० ते ५० च्या दशकात असतात तेव्हा किंवा त्याहीपेक्षा खूप लवकर सुरू होऊ शकते. हा काळजीचा मुद्दा आहे. कारणे काहीही असोत त्यावर उपाय शोधणे महत्त्वाचे! बरे होण्याच्या पलीकडे जाण्याआधी वापरता येतील अशी व्यवहार्य तंत्रे शोधण्याचा संशोधक प्रयत्न करीत आहेत.

–सुजाता बाबर

सामान्यत: शुद्ध-स्वर ऑडिओमेट्री वापरून श्रवण कमी झाल्याचे निदान केले जाते. एखाद्या व्यक्तीला वेगवेगळ्या ध्वनी स्तरांवर शुद्ध स्वर ऐकवला जातो. ती व्यक्ती खूप शांत होण्याआधी ज्या स्तरावरचा आवाज ऐकू शकते ती आवाजाची पातळी यातून समजते. या स्तराला श्रवणसीमा म्हटले जाते. जर श्रवणसीमा खूप जास्त असेल म्हणजे स्वर ऐकण्यासाठी टोनची पातळी तुलनेने तीव्र असणे आवश्यक आहे. अशा वेळी श्रवणयंत्र वापरायला सांगितले जाते. असे असले तरी वय-संबंधित श्रवणहानी कालांतराने विकसित होते. हे वय आता ४० ते ५० झाले आहे. या वयात अनेकांना रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि इतर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांसारख्या गोंगाटाच्या वातावरणात बोलणे समजण्यात अडचणी येऊ लागतात. या श्रवणविषयक अडचणी बहुतेक वेळा अधिक लक्षणीय श्रवण कमी होण्याचे पूर्वसूचक असतात.

- Advertisement -

श्रवणविषयक समस्या लवकर ओळखण्यासाठी संशोधक अतिरिक्त निदान साधने विकसित करीत आहेत जी रुग्णाच्या श्रवणातील सूक्ष्म पैलूंना पकडण्यासाठी अधिक चांगली आहेत. ही उपकरणे काही शारीरिक चिन्हे सूचित करतात. जसे एखादी व्यक्ती गोंगाटाच्या वातावरणात उच्चार ओळखण्याचा जास्त प्रयत्न करीत आहे हे जर यशस्वीरित्या ओळखले तर मोजता येण्याजोगे शारीरिक संकेत नवीन रुग्णांमध्ये आणि श्रवणहानी झालेल्या रुग्णांमध्ये चांगले मूल्यांकन करण्यासाठी डॉक्टरांना मदत करतात. भूतकाळातील अभ्यासांनी प्रयत्नपूर्वक ऐकताना उद्भवणार्‍या भिन्न शारीरिक प्रतिक्रियांवर प्रकाश टाकला आहे. एक म्हणजे डोळ्याच्या बाहुलीच्या आकारात बदल. हे बदल प्युपिलोमेट्री वापरून मोजले जाऊ शकतात. आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आकलनविषयक कार्य करते तेव्हा डोळ्याच्या बाहुलीचा आकार वाढतो. जसे की अनेक संख्या लक्षात ठेवताना. गेल्या दशकातील संशोधन सांगते की जेव्हा व्यक्ती प्रयत्नपूर्वक बोलणे ऐकत असते तेव्हा डोळ्याच्या बाहुलीचा आकार वाढतो.

डोळ्याच्या बाहुलीच्या आकाराचे मोजमाप करण्यात समस्या म्हणजे ती प्रकाशातील बदलांसाठी अतिशय संवेदनशील असते. आपले वातावरण उजळ होते तेव्हा डोळ्याची बाहुली लहान होते. डोळ्याच्या बाहुलीच्या मापनावर कॅमेर्‍याचा बाहुलीशी असणार्‍या सापेक्ष कोनाचाही परिणाम होतो. जसे एखादी व्यक्ती डावीकडे किंवा उजवीकडे पाहते तेव्हा बाहुलीचा आकार बदलला नसला तरी बदललेला दिसतो. या सगळ्या गोंधळामुळे श्रवण चाचणीदरम्यान रुग्णाच्या डोळ्याच्या बाहुलीचा आकार मोजणे योग्य नसते. यामुळे हर्मन आणि एम. एरिक कुई यांनी प्रयत्नपूर्वक ऐकणे शोधण्यासाठी पर्यायी धोरण शोधले आहे.

- Advertisement -

प्राण्यांमधील श्रवणविषयक कॉर्टेक्स (ध्वनीला प्रतिसाद देणारा मेंदूचा भाग) तपासणार्‍या संशोधनात आढळले की जेव्हा प्राणी त्यांची हालचाल कमी करतात तेव्हा श्रवणविषयक कॉर्टेक्स आवाजासाठी अधिक संवेदनशील बनते. अशा प्रकारे डोळ्यांच्या हालचाली कमी होणेदेखील उच्च श्रवणविषयक संवेदनशीलतेशी संबंधित असू शकते. या गृहितकाची चाचणी घेण्यासाठी हर्मन आणि कुई यांनी १८ ते ३५ वयोगटातील २६ व्यक्तींची तपासणी केली. अधिक प्रयत्नांनी ऐकत असताना या सहभागींच्या डोळ्यांच्या हालचाली कमी झाल्या की नाही हे निर्धारित करणे त्यांचे उद्दिष्ट होते. प्रयोगशाळेत आलेले सहभागी साऊंड बूथमध्ये आरामशीर खुर्चीवर बसले. त्यांनी आपले डोके हनुवटीवर विश्रांतीमध्ये ठेवले, ज्यामुळे व्यक्तीचे डोके स्थिर होण्यास मदत होते आणि संगणक मॉनिटरच्या समोर बसले. त्यांनी हेडफोन घातले होते. त्यावर संभाषण ऐकवले. सहभागींनी संगणकाच्या स्क्रीनवर कुठे पाहिले हे निर्धारित करण्यासाठी आय ट्रॅकर, कॅमेरा-उपकरण वापरले जे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांचा मागोवा घेऊ शकते.

वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये सहभागींनी हेडफोन्सच्या सेटवर वाक्ये आणि बोलणे ऐकले. प्रत्येक चाचणीमध्ये त्यांनी समोरील स्क्रीनवर काहीतरी वेगळे पाहिले. जसे स्थिर बिंदू, हलणारे बिंदू, अनेक हलणारे ठिपके किंवा रिकामा स्क्रीन. त्यांचे लक्ष केंद्रित करण्याचे ठिकाण किंवा वस्तू बदलून ते काय पाहत आहेत याला महत्त्व न देता सहभागींच्या डोळ्यांच्या हालचालींमध्ये बदल झाले आहेत की नाही हे त्यांना पाहायचे होते. सहभागींना संगणकाच्या स्क्रीनवर त्यांना आवडेल तिथे पाहण्यास सांगितले. काही वेळा मागील आवाज कमीत कमी ठेवण्यात आला, जेणेकरून सहभागींना काय बोलले आहे हे समजण्यासाठी थोडेच प्रयत्न करावे लागतील, तर काही वेळा मागील आवाज तीव्र ठेवले जेणेकरून उच्चार समजून घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. सहभागींच्या डोळ्यांच्या हालचाली नोंदवल्या.

विश्लेषणात हर्मन आणि कुई यांनी डोळ्यांच्या हालचालींच्या दोन भिन्न पैलूंवर लक्ष केंद्रित केले. नजर स्थिरीकरण कालावधी आणि टक लावून पाहणे हे ते दोन पैलू होय. स्थिरीकरणामध्ये व्यक्तीचे डोळे दिलेल्या वस्तू किंवा बिंदूवर किती काळ स्थिर राहतात हे मोजले, तर दुसर्‍यात व्यक्तीने स्क्रीनवर किती वेळा आपली नजर हलवली हे मोजले. यात आढळले की ऐकण्याच्या अधिक परिश्रमाच्या परिस्थितीत म्हणजेच पार्श्वभूमीच्या आवाजाचे प्रमाण अधिक असताना अधिक अनुकूल ऐकण्याच्या परिस्थितीच्या तुलनेत व्यक्तीच्या डोळ्यांची हालचाल कमी होते आणि दीर्घ स्थिरीकरण कालावधीमध्ये परावर्तित होते.

विविध दृश्य सादरीकरण परिस्थितीसाठी ऐकण्याचे प्रयत्न करताना डोळ्यांच्या हालचाली कमी होतात. वेगवेगळ्या परिस्थितीत ऐकण्यासाठी सहभागी किती प्रयत्न करत आहेत हे ठरवण्यासाठी डोळ्यांच्या हालचालींच्या नोंदीचे महत्त्व आहे हे यातून सिद्ध होते. भविष्यात क्लिनिकल सेटिंग्समध्ये श्रवणहानी शोधण्यासाठी नवीन चाचण्या तयार करण्यासाठी प्रयत्नपूर्वक ऐकण्याचा हा उपाय वापरला जाऊ शकतो. अभ्यास दर्शवितो की ऐकण्याचा प्रयत्न डोळ्यांच्या हालचाली कमी होण्याशी संबंधित आहे.

ऐकण्याच्या प्रयत्नांतर्गत डोळ्यांच्या हालचालींमध्ये होणारे बदल डोळ्याच्या बाहुलीच्या आकारातील बदलांशी कसे संबंधित आहेत हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. कदाचित दोन्ही उपाय ऐकण्याच्या प्रयत्नांचे वेगवेगळे पैलू पकडतात. उदाहरणार्थ अधिक स्वयंचलित विरुद्ध अधिक ऐच्छिक शारीरिक प्रयत्न. हे ऐकण्याच्या प्रयत्नांना अधिक व्यापकपणे समजण्यास मदत करतील.

पुढच्या अभ्यासात हर्मन आणि कुई डोळ्यांच्या हालचालींमधील घट कमी करण्याच्या पद्धतींचा शोध घेतील. यामुळे अशा कपातीला प्रोत्साहन देणार्‍या आव्हानांचा चांगल्या प्रकारे अंदाज लावता येईल. याशिवाय ते डोळ्यांच्या हालचाली आणि प्रयत्नपूर्वक ऐकणे यामधील दुवा शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, जेणेकरून ते ऐकण्याच्या प्रयत्नांमधील फरक ओळखू शकतील आणि त्याचा उपयोग करून घेऊ शकतील. प्रयत्नपूर्वक ऐकणे श्रवणहानीशी नेहमीच जोडले जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ ते अस्खलितपणे बोलत नसलेल्या भाषेतील बोलणे ऐकताना किंवा वाक्यरचनात्मकदृष्ठ्या जटिल किंवा अस्पष्ट वाक्यांवर प्रक्रिया करताना लोक जास्त प्रयत्नपूर्वक ऐकू शकतात.

जेव्हा श्रवणयंत्राने उपचार केले जातात तेव्हा डोळ्यांच्या हालचालींमुळे ऐकण्याचा प्रयत्न कमी होतो का हे तपासण्याचा पुढील प्रयत्न असेल. कारण यामुळे एखाद्या व्यक्तीला त्यांच्या श्रवणयंत्राचा किती फायदा होतो याचे मूल्यांकन करता येईल. सुरुवातीला फक्त तरुण निरोगी प्रौढांच्या डोळ्यांच्या हालचालींची तपासणी केली. पुढे वृद्ध लोकांच्या तपासण्या महत्त्वाच्या आहेत. कारण यांच्यासाठी हा नवीन दृष्टिकोन सर्वात उपयुक्त असू शकतो.

- Advertisment -