Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश ‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं !

‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं !

कोरोना वाढत आहे, माणसं मरत आहेत अन् त्याचवेळी ‘Resign Modi’ ही मोहीम जोर धरत आहे! जग मोठं विचित्र आहे. त्याहीपेक्षा माणसाच्या मनातला स्वार्थ जास्त विचित्र आहे. माणसं असा विचार कसा करू शकतात, असे प्रश्न अलीकडच्या घटना पाहिल्यानंतर सहज निर्माण होतात! हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर जीवावर उदार होऊन रात्रं-दिवस सेवा करतात, तर काही हॉस्पिटलमध्ये मात्र ह्या निमित्तानं पेशंटला राजरोसपणे लुटलं जातं. प्रमुख पक्षाचे नेते रेमडेसिवीरसारख्या औषधाचं स्मगलिंग करतात. माणसं मेली तरी चालतील; पण सरकार बदनाम झालं पाहिजे, यासाठी नाही नाही ती कुटिल कारस्थानं करतात. देशाचं सरकार खुद्द विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्याला तुम्ही औषध दिली, तर कारवाई करू, अशी चक्क धमकी देतात? हे आजवर या देशात कधी घडलं नव्हतं ! आणि विशेष म्हणजे त्यांच्या अंधभक्त मंडळींना यात काहीही आक्षेपार्ह वाटत नाही!

Related Story

- Advertisement -

परवाच एका व्यक्तीनं आपला कोरोना बेड दुसर्‍याला दान केल्याची आणि आपण शहीद झाल्याची खळबळजनक बातमी नागपूरमधल्याच एका भाजप कार्यकर्तीने ‘गणपती दूध पिला’च्या स्टाईल वर ठोकून दिली. ती पद्धतशीरपणे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पसरवण्यात आली. एक खास टोळी त्यामागं अत्यंत कुटिल हेतूनं काम करत होती, हे आता अगदी स्पष्ट झालं आहे.

त्या आडून संघाची व्यक्ती, संघाची शिकवण, संघाचा त्याग वगैरे वगैरे थापा पद्धतशीरपणे लोकांच्या गळी उतरविण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करण्यात आला. एखाद्या व्यक्तीच्या मरणाचे असे आपल्या स्वार्थासाठी धिंडवडे काढणारी जमात जगाच्या पाठीवर दुसरी नसावी, असं समजायला हरकत नाही.

- Advertisement -

खरं तर नियमाप्रमाणे आपला बेड असा परस्पर दुसर्‍याला दिला जाऊ शकत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. त्या हॉस्पिटलमधील संबंधित व्यक्तीनं ते स्वतःच जाहीर केलं. शिवाय असं काही घडलंच नाही हेही त्यांनी सांगितलं. आणि अशा अवस्थेतील व्यक्ती स्वतःच्या पायानं चालत येऊ शकत नाही किंवा बाहेरही जाऊ शकत नाही, हेही स्पष्टपणे सांगितलं.

पण ही गोष्ट अनावधनानं झाली असं आपण मान्य केलं, असं आपण थोड्यावेळासाठी मान्य केलं तरी, आता पितळ उघडं पडल्यानंतर निदान असल्या पाताळयंत्री लोकांनी माफी मागायला नको का? किंवा मनोमन खंत वाटायला नको का? पण नाही. त्यानंतर देखील ह्या कोडग्या लोकांनी त्यावर तर्कशुद्ध चर्चा करणार्‍या लोकांनाच, नीच, हलकट म्हणून शिव्या घालायला सुरुवात केली. एका व्यक्तीच्या मरणाची टवाळी कशी काय करता, म्हणून गळे काढायला सुरुवात केली. त्यातल्या महिला असोत को पुरुष, सामान्य माणूस असो की पत्रकार प्रत्येकानं चिकित्सा करणार्‍यांनाच पुन्हा दोषी धरलं. त्यांनाच फासावर चढवायला सुरुवात केली. ही बाबच किळस आणणारी आहे. उबग आणणारी आहे. हे लोक खरंच मूर्ख आहेत का? त्यांच्यात खरंच एवढी साधी माणुसकी शिल्लक नसावी का? जराही विवेक नसावा का? की ही सारी मंडळी सामूहिक दृष्टीनं मनोरुग्ण झालेली आहेत?

- Advertisement -

आपल्या सामाजिक मनोविकृतीचं आणखी एक ठळक उदाहरण आहे. 2019 मधील निवडणुकीच्या नेमक्या तोंडावर मिल्ट्री जवानांच्या ताफ्यावर आरडीएक्सचा हमला झाला. अतिशय कडक बंदोबस्तात जवानांचा ताफा निघाला होता. मोठ्या संख्येत जवान जात असताना सर्वत्र बंदोबस्त होता. साधे चिट पाखरूदेखील आसपास फिरकू नये, अशी अवस्था असताना, एक खासगी गाडी अचानक येते काय, जवानांच्या गाडीवर आदळते काय आणि 44 जवानांचा राजरोस जीव घेते काय? हे सारंच धक्कादायक! सारंच अकल्पित! सारंच संतापजनक!

अशावेळी एखादा सुज्ञ आणि जागरूक लोकांचा देश असता, तर गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांना राजीनामा द्यावा लागला असता! एखादा संवेदनशील प्रधानमंत्री असता, तर लाजेनं मान खाली गेली असती. सार्‍या देशानं सरकार आणि सरकारच्या प्रमुखाला धारेवर धरलं असतं! त्याची लाज, शरम काढली असती. हे सरकार खुद्द आपल्या सैनिकांचं देखील रक्षण करू शकत नाही, तेव्हा यांना त्वरित सत्तेतून हाकलून लावा, अशी मागणी सार्‍या देशात उठायला लागली असती. विरोधकांनी आणि जनतेनं देखील या घटनेवरून सरकारला लाथाडलं असतं! तोंडात शेण घातलं असतं..!

पण आपल्या देशात नेमकं उलट झालं! आमचे महान 56 इंची पराक्रमी पंतप्रधान त्याच गोष्टीचं भांडवल करून मत मागत होते! आम्ही मतदार पण असे खुळे की त्यांना भरभरून मतं देखील दिली. ज्याला सत्तेतून हाकलायला हवं होतं, त्यालाच लोक डोक्यावर घेऊन नाचू लागले. विशेष म्हणजे तेवढं आरडीएक्स तिथवर कसं आलं, असा लॉजिकल प्रश्न विचारणार्‍यांनाच उलट देशद्रोही, पाकिस्तानी वगैरे ठरवण्यात आलं. विशेष चीड आणि शंका येण्यासारखी बाब अशी की एवढ्या मोठ्या गंभीर घटनेची अजूनही नीट चौकशी झालेली नाही. धागेदोरे अजूनही हाती सापडलेले नाहीत! याचा अर्थ नेमका कसा लावायचा?

याचाच अर्थ असा की, या देशातील मतदारांना उल्लू बनवणं फार सोपं आहे. एकीकडे लग्नात, इतर समारंभात 25/50 लोकांची मर्यादा घातली जाते. लोक रस्त्यावर दिसले तर पोलीस निर्दयपणे धुलाई करतात; पण दुसरीकडे निवडणुकीत मात्र लाखोंच्या सभा होतात. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती ‘माझ्या सभेत एवढी गर्दी पाहून मी गहिवरून आलो’ अशी फुशारकी मारते. निवडणूक आयोगदेखील बिस्किटासाठी लोळण घेणार्‍या भूमिकेत वावरताना दिसतो. किंवा हजार, दोन हजार लोकांनी देशभर कोरोना पसरवला अशी नीच मोहीम चालवणारी इलेक्ट्रॉनिक माध्यमेदेखील खुद्द कुंभमेळा आणि त्यातील लाखो लोकांचे फोटो टीव्हीवर अभिमानानं दाखवतात. जराही लाज वाटत नाही. याचाच अर्थ असा, आम्ही माणूस म्हणवून घेण्याचा आपला अधिकार हरवून बसलो आहोत. आपली संवेदना जिवंत राहिली नाही. आम्ही बर्‍यापैकी सैतान होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहोत आणि म्हणूनच आपल्यासारखेच नेतेही आपण निवडून देत आहोत.

पण आता सैतानाचा त्रास लोकांना जाणवायला लागला. कोरोना आता अगदी दारापर्यंत आल्याची चाहूल आता सर्वांनाच लागली. आमदार, खासदार, कलाकार आणि सरकारची चापलुसी करणारे पैसेवाले मीडियाकर्मी देखील आता त्या विळख्यात सापडू लागले आहेत. अशावेळी तुमचा पैसा, तुम्ही ज्यांची दलाली करता ते नेते तुम्हाला काहीही कामी येत नाहीत, याची जाणीव हळूहळू त्यांनाही व्हायला लागली. मात्र, इमानदारीनं पत्रकारिता करणार्‍या लोकांचे जास्त हाल आहेत. तसे इमानदार असलेल्या सर्वांचेच हाल आहेत; पण समजा शेवटी कोरोनानं गाठलंच तर त्यांना आपण जमेल तेवढं इमानदार राहून आपला धर्म पाळला, याचं समाधान नक्कीच त्यांना संकटातून बाहेर येण्याची उर्मी देईल. लढण्याची हिंमत देईल! निदान मेल्यानंतर सभ्य समाज तरी त्यांच्यासाठी मनोमन श्रद्धांजली अर्पण करील!

जिवंतपणी खाल्लेलं शेण मेल्यानंतर देखील कुणी आपल्या तोंडात घालू नये, याची जरी आपण काळजी घेतली, तरी मला वाटते पुरेसं आहे!

वाल्याचा वाल्मिकी झाला होता. अनेक डाकूंचं देखील हृदय परिवर्तन झाल्याचं जगाला माहीत आहे. त्यांनी सामूहिक समर्पण केल्याच्याही घटना कमी नाहीत.

तेव्हा, निदान या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरी काही लोकांचं हृदय परिवर्तन होईल, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे ? तूर्तास एवढंच!

- Advertisement -