निसर्गत्व

Subscribe

बाळ जन्माला आलं की, सर्वांनाच उत्सुकता असते ‘तो’ आहे का ‘ती’ हे बघण्याची. बाळ मोठं होत जातं तसतसं त्याच्या मनोशारीरिक जाणिवा विस्तारत जातात. त्याच्या शरीरात बदल होत जातो. परंतु कधी- कधी असंही होतं की, आपल्या घरात जन्माला आलेले मूल हे ‘ती’ किंवा ‘तो’ नूसन ‘ते’ आहे हे जेव्हा समजतं तेव्हा त्या व्यक्तीवर नको ती बंधणे लादली जातात. त्यातून त्याची होणारी घुसमट ही भयानक वेदनादायी असू शकते. त्याच्या ‘निसर्गत्वा’चा आदर करुन त्याला माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य दिलं जावं इतकंच..!

प्रसंग 1:
रिया आणि रविचे नुकतेच लग्न झाले होते. लग्नाला 15 दिवस होत नाही तर यांचं भांडण थेट कोर्टात दाखल घटस्फोटासाठी. अर्थात कारणही तसेच होते. रविच्या मते रिया पूर्णत: स्त्री नव्हती. खरे तर ही बाब रियाच्या घरच्यांच्या लक्षात आलेली होती. जेव्हा रिया 12 वर्षांची झाली तेव्हा ना तिला सामान्य मुलींप्रमाणे ऋतूचक्र सुरू झाले ना तिच्या वक्षभागाला उभार आला. ती पूर्णत: स्त्री नाही याची जाणीव तिच्या घरच्यांना झाली आणि तिच्या पाठीवर असणार्‍या भावंडाचा आणि ‘घर की इज्जती’चा विचार करता त्यांनी तिचे लग्न रविशी लावून दिले.. नव्हे रविची फसवणूकच केली.

प्रसंग 2:
सागर हा साधारण तिशीतला मुलगा. परंतु 13-14 व्या वर्षापासूनच त्याला साड्या घालायची भारी हौस. बायकांसारखे नटणे, कपडे घालणे हे त्याला जाम आवडायचे. पण ‘तू मुलगा आहेस… असा काय बायल्यांसारखा वागतोस’ असं म्हणून त्याला सतत हिणवलं जातं. ही त्याच्या मनाची घालमेल पुढेही चालूच राहिली. आज तो उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन नोकरीही करतो. परंतु त्याच्या मनातील ती सुप्त इच्छा आजही त्याला खुणावते.. स्त्री होण्याची. आज तो ट्रान्सजेंडर होण्याच्या तयारीत आहे. परंतु ट्रान्सजेंडर झाल्यावर माझ्या घरचे मला स्वीकारतील का? माझ्यावर आई बाबांची जबाबदारी आहे. समाज काय म्हणेल? हे सगळं खरं असलं म्हणून मी माझ्या भावना मारत जगायचं का? हे आणि असे असंख्य प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभे होते.

- Advertisement -

प्रसंग 3:
प्रतिभा अ‍ॅथलेटिक आहे, इतर मुलींपेक्षा तिच्यात शारीरिक क्षमता काहीशी जास्तच दिसते. प्रत्येक वेळी ती अव्वल असते. पण काही महिन्यांपासून तिच्या मनात प्रचंड घालमेल सुरू होती.. काय करावे आणि कुणाला बोलावे हेच तिला उमजत नव्हते. त्याचा थेट परिणाम तिच्या खेळावर झाला. पण आता तिचे खेळाकडे लक्षच नसायचे. ती नेहमी एका कोपर्‍यात जाऊन शून्य नजरेने विचार करत बसायची.. तोंड लपवून रडायची.. तिच्या जवळच्या मैत्रिणीला हे लक्षात आले. तिने प्रतिभाची सहानुभूतीने विचारपूस केली. तेव्हा तिच्या लक्षात आले की ती लिंग बदलाच्या प्रश्नाशी झगडतेय. शरीरातील या बदलामुळे आता ती खेळांच्या स्पर्धांसाठी आवश्यक असणारी मेडिकल टेस्टही द्यायला नकार देते. परिणामी ती मोठ्या स्पर्धांना मुकत होती.

हे तीनही प्रसंग प्रातिनिधीक आहेत. यातील पात्रांची नावे बदलण्यात आली आहेत. या तिन्ही प्रसंगांतून मला काय मांडायचे आहे याची आपणांस कल्पना आलीच असेल. होय आज आपण एलजीबीटी (लेसबीन, गे, बायसेक्यूअल, ट्रान्सजेंडर) समुहाबद्दल बोलणार आहोत. समुपदेशक या नात्याने या प्रकारच्या क्लायंटचे समुपदेशन करायची वेळ माझ्यावर बर्‍याचदा आली आहे. त्यातून हा अनुभव लिहीत आहे. आजवर आपण स्त्री किंवा पुरूष हे फक्त बाह्यांगावरुन ठरवत आलो. परंतु त्यापलीकडेही एक टप्पा आहे. तो म्हणजे सायकॉलॉजीकल जेंडर.. मानसशास्त्रीय लिंग भावना.. कुठलीही व्यक्ती निसर्गत्व घेऊन आलेली असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात एक्स आणि वाय गुणसूत्राचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असते. त्यातून त्या व्यक्तीची शरीररचना व मानसिकता ठरत असते.

- Advertisement -

माझ्या परिचयात अनेक व्यक्ती आहेत ज्या ट्रान्सजेंडर झालेल्या आहेत. ज्यांना त्यांच्या लैंगिक भावभावना, त्यांचे आविष्कार हे जन्माने दिलेल्या शारीरिक लैंगिक ओळखीशी परके वाटतात, अशा सर्व व्यक्तींसाठी ‘ट्रान्सजेंडर’ हे व्यापक वर्णन लागू होते. त्यांच्यासाठी ‘तृतीयप्रकृती’ हा भारतीय परंपरेतील शब्दप्रयोग अधिक सुजाण आहे. यात पुरुषाचे शरीर, पण स्त्रीत्वाकडे स्वाभाविक ओढ वाटणारे मोडतात, तसेच स्त्रीच्या शरीरात पुरुषी भावनांचा कोंडमारा होणारेही. या दोन्ही वर्गांत शारीरिक लैंगिक ओळखीशी त्यांचा लिंगभाव (जेंडर) जुळत नसला, तरी लिंगभावानुसार त्यांची स्वप्रतिमा ही स्त्री वा पुरुष या दोन गटांपैकीच एक असते. यापैकी अनेकजण आधुनिक वैद्यकीय उपचारांनी-हार्मोन्स उपचार वा लिंगबदल शस्त्रक्रिया- हे द्वंद्व सोडवतात. आज बर्‍याच ट्रान्सजेंडरनी स्वत:ला न्याय दिला आहे. त्यांना स्वत्वाची जाणीव झाली. आता ती माणसे स्वत:साठी जगतायत. हे लिहिताना माझ्या समोर कोणतीही संस्कृती किंवा धर्म नाही. तर निसर्गाने जी आपली जडणघडण केली त्याला स्वीकारणे हा या मागचा मूळ हेतू आहे. वरील तिन्ही प्रसंग प्रतिकात्मक आहेत.

बर्‍याच घरांमध्ये हे द्वंद्व सुरू असते. जेव्हा आपल्या घरात जन्माला आलेले मूल हे ‘ती’ किंवा ‘तो’ नूसन ‘ते’ आहे हे जेव्हा समजते तेव्हा त्या मुलावर नको ती बंधणे लादली जातात. त्याचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेतला जातो. अशा प्रसंगी अशा व्यक्तींना समजून घेण्याची गरज असते. मानव हा समाजशील प्राणी आहे. कुटूंब ही त्याची पहिली सामाजिक संस्था असते. जी त्याच्या मानसिक, भावनिक, शारीरिक गरजा पूर्ण करत असते. ह्याच कुटूंबाकडून जेव्हा समजून घेतले जात नाही, अशावेळी संबंधित व्यक्ती नको त्या मार्गाला जातात. घर सोडतात. प्रसंगी यांचे त्यांच्या मनाविरुद्ध लैंगिक शोषणही केले जाते. म्हणूनच गरज आहे तो आपला दृष्टिकोन बदलण्याची. त्यांना स्वीकारण्याची.

ज्यांना निसर्गाने बनवले तसेच स्वीकारण्याची. त्याचे निसर्गत्व न स्वीकारणे म्हणजे आपण त्या व्यक्तीचा नव्हे तर निसर्गाचाच अपमान करतो.

निसर्गाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यासाठी निसर्गत्वही बहाल केले आहे. त्याच निसर्गत्वाचा आदर करावा. माणसाला माणूस म्हणून जगू द्यावं. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच खरे सत्य. चला तर मग आजपासून स्त्रीत्व आणि पुरूषत्व या पलीकडेही एक तत्व आहे, त्याचा स्वीकार करुया.. ते तत्व म्हणजे निसर्गत्व !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -