– आशिष निनगुरकर
प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने नुकतेच करण जोहरच्या ‘नादानियां’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे, ज्यामध्ये तो श्रीदेवीची धाकटी मुलगी अभिनेत्री खुशी कपूरसोबत दिसत आहे. हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तरुण प्रेमातील निरागसता आणि प्रामाणिकपणा दाखवतो.
करण जोहरच्या धमटिक एंटरटेनमेंटचा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या चित्रपटात इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर ‘नादानियां’ चित्रपटातून शौना गौतम यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले असून त्यांनी यापूर्वी करण जोहरला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
खरंतर सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय पण हा चित्रपट थिएटरला प्रदर्शित करण्याऐवजी त्याने ओटीटीचा पर्याय निवडला. ओटीटी माध्यमात सर्वात अग्रस्थानी असलेल्या नेटफ्लिक्सवर ‘नादानियां’ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. हा संपूर्ण चित्रपट तरुणाईची गोष्ट मांडणारा आहे. तरुणाईचा चित्रपट असल्याने कॉलेजमध्ये घडणार्या अनेक गोष्टी यात ठासून भरलेल्या आहेत. आजच्या पिढीच्या युवकांची प्रेमाची भाषा सांगणारा हा चित्रपट आहे.
हा चित्रपट रोमान्स, विनोद आणि भावनांनी भरलेला आहे. शौना गौतम दिग्दर्शित या चित्रपटात इब्राहिम अली खानसोबत खुशी कपूर, दिया मिर्झा, महिमा चौधरी, अर्चना पूरन सिंग, सुनील शेट्टी, अपूर्व मखीजा आणि आलिया कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची लांबी १ तास ५९ मिनिटे आहे. आजची तरुणाई किती उथळ आणि हट्टी आहे हे पदोपदी जाणवते. लाथ मारेल तिथे पाणी काढेन या उक्तीप्रमाणे ही तरुणाई आपल्या गोष्टी एकेक मांडत असते, पण जेव्हा वास्तवतेची जाणीव होते तेव्हा काहीतरी हरवल्यासारखे वाटते.
जीवनात येणारे अनुभव चांगले-वाईट असतात. त्यात तरुणाईच्या काळात मोरपंखी दिवसात गुलाबी स्वप्नं पाहणारी ही पिढी कशी प्रेमाच्या जाळ्यात अडकते व पुढे त्याचा कसा परिणाम होतो हे या चित्रपटातून दिसते. आपण मित्रांना दिलेल्या पैजेसाठी एखाद्याचे आयुष्य कशाप्रकारे मार्गी लावतो व समोरच्याला त्याचा पत्तादेखील नसतो हे यातून मांडले आहे. त्यामुळे हा सिनेमा आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करतो, असे म्हणायला हरकत नाही.
चित्रपटाची कथा पिया जयसिंग (खुशी कपूर) आणि अर्जुन मेहता (इब्राहिम अली खान) यांच्याभोवती फिरते. एका गैरसमजामुळे पिया तिच्या मैत्रिणींशी खोटे बोलते आणि अर्जुनला तिचा भाड्याचा प्रियकर बनवते. हळूहळू त्यांच्यातील जवळीक वाढते, पण त्यांची कहाणी पुढे काय वळण घेते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. चित्रपटात किशोरवयीन प्रेम, कौटुंबिक भावना आणि आधुनिक नातेसंबंधांचे वेगवेगळे कोन दाखवले आहेत.
खुशी कपूर प्रत्येक चित्रपटात चांगली होत आहे आणि तिने तिचे पात्र चांगले साकारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तिला अजूनही तिच्या अभिनयात आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. इब्राहिम अली खानचे पदार्पण चांगले झाले असून त्याला अजूनही त्याच्या एक्सप्रेशन्स आणि डायलॉग डिलिव्हरीवर अधिक मेहनत घ्यावी लागेल असे वाटते. सहाय्यक कलाकारांमध्ये दिया मिर्झा, महिमा चौधरी, अर्चना पूरन सिंग, सुनील शेट्टी, अपूर्व मखीजा आणि आलिया कुरेशी यांनी छोट्या पण दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
शौना गौतमचे दिग्दर्शन ठीक आहे, पण पटकथेत काही त्रुटी आहेत. काही ठिकाणी अनावश्यक नाट्य कथेला कमकुवत करते, तथापि चित्रपटात आजच्या पिढीची प्रेमकथा आणि त्यांच्या आव्हानांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात ताजेपणा आहे, पण काही दृश्ये काढून टाकली असती तर चित्रपट अधिक आकर्षक होऊ शकला असता.
दिग्दर्शनाव्यतिरिक्त जर आपण छायांकन आणि संपादनाबद्दल बोललो तर अनेक फ्रेम्स सुंदर दिसतात आणि संपादन स्पष्ट आहे, परंतु जर काही दृश्ये लहान केली असती तर चित्रपट अधिक मनोरंजक होऊ शकला असता. चित्रपटाचे संगीत ठीकठाक आहे. खरंतर रोमँटिक चित्रपटात संगीताला विशेष महत्त्व असते, परंतु या चित्रपटातील गाणी मनाचा ठाव घेत नाहीत.
सहसा रोमँटिक भावना व्यक्त करण्यासाठी संगीत सर्वात जमेची व भक्कम बाजू असते, पण इथे ही गोष्ट स्पष्टपणे गहाळ दिसत आहे. असे एकही गाणे नाही जे संस्मरणीय असेल किंवा कथेला अधिक प्रभावी बनवेल. जर तुम्हाला हलकाफुलका रोमँटिक चित्रपट आवडत असेल आणि नवीन पिढीतील नातेसंबंधांची गतिशीलता पाहायची असेल, तर हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. परिपूर्ण चित्रपट असण्याची शक्यता नसली तरी खुशी आणि इब्राहिमची केमिस्ट्री आणि हलक्याफुलक्या विनोदी गोष्टींमुळे हा चित्रपट एकदा बघण्यासारखा आहे.
-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)