-अरविंद जाधव
जयवंत दळवी यांच्या नाटकांतून त्यांनी मानवी मनाच्या तळाचा शोध घेतला आहे. पात्रांच्या प्रवृत्तीभेदातून माणसाच्या अंतरंगात काय चालू आहे हे त्यांनी निरखून पाहिल्याचे दिसून येते. बॅरिस्टर, सूर्यास्त, महासागर, संध्याछाया, नातीगोती, सावित्री, मुक्ता, पर्याय, कालचक्र अशा कितीतरी नाटकांचा विचार करता येईल. आपल्या नाटकाचा आगळा विषय, नाटकातील पात्रे प्रत्येकाला आपल्या आसपास वावरणारी वाटावीत अशी असल्याने अधिक जवळची वाटतात. तंत्रापेक्षा मानवी जीवनमूल्ये, समाजभिमुखता, सामाजिक-राजकीय व सांस्कृतिक पर्यावरणाचा आलेख त्यांच्या कलाकृतीतून मांडण्यात आल्याचे दिसते.
पुरुष नाटक रंगभूमीवर आलं तेव्हा ते वादग्रस्त ठरले, रंगयात्रा-या वि. भा. देशपांडे संपादित ग्रंथात जयवंत दळवी याविषयी म्हणतात, प्रयोगानंतरही पुरुष हे नाटक बरेच वादग्रस्त ठरले. वेगवेगळ्या संदर्भात. बौद्ध, आंबेडकरवादी मंडळींना वाटले की ‘सिध्दार्थ’ दुबळा दाखवला आहे, स्रीमुक्तीची चळवळ करणार्यांना वाटले की, स्त्रियांनी चळवळ करू नये असे मला सुचवायचेय. दुर्दैवाने जी मंडळी खरंतर या नाटकाच्या बाजूने उभी राहायला हवी होती त्यांनीच या नाटकाला विरोध केला.
अनेकांना नाटकाच्या शेवटी अंबूने योजलेला उपाय पसंत पडला नाही. यावरून लक्षात येते की लेखक समाज परिवर्तनाच्या, बदल होण्याच्या भूमिकेतून लिहीत असतो ती भूमिका ओळखता आली पाहिजे; विचार-प्रवृत्ती-प्रवाह भेद संघर्षातून परिवर्तनाकडे नेणारे असू शकतात आणि म्हणूनच ४० वर्षांनंतरही या नाटकाचा विषय आज तितकाच जवळचा सत्यान्वेषी आहे. नाटकाचे निवडक ५० प्रयोग करून जयवंत दळवींना आदरांजली वाहता यावी म्हणून हा नाट्यनिर्मात्यांचा प्रयास.
या नाटकाचं कथानक थोडक्यात असं. अंबिका या संस्कारक्षम मुलीची ही गोष्ट आहे, ती स्वावलंबी, स्वतंत्र विचारांची शिक्षिका. ती शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी झटत असते. वडील अण्णासाहेब आपटे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व आई ताराबाई पहिल्या नवर्याने सोडल्याने अण्णासाहेबांनी पुनर्विवाह केला.
सतत दडपणाखाली असणारी संयमी, तरीही व्यवहारज्ञान असणारी तर अंबिकाचे सिध्दार्थ या दलित तरुणाबरोबर प्रेमसंबंध आहेत, ते लग्नही करणार आहेत. तो आंदोलने करतो, मोर्चे काढतो, नथू अंबिकाची मैत्रिण श्रीमंत व्यावसायिकाची पत्नी त्याच्या मनाविरूध्द कधी वागत नाही, त्याला नेहमी खूश ठेवण्याचा ती प्रयत्न करीत असते. कारण दुसर्या स्त्रीकडे त्याचे लक्ष जाऊ नये म्हणून केश-वेशभूषाही करते. ती अंबिकाच्या स्रीवादी विचारांना पाठबळ देणारी आहे.
पुरुष नाटकातील लेखक जयवंत दळवी यांनी मांडलेले विचार हा प्रत्येक काळाला लागू पडावा असा कालातीत विचार आहे. प्रत्येक काळातील पुरुष त्याची उन्मत्त प्रवृत्ती बदलणारी असृू शकते काय? हा मोठा प्रश्न आहे. दळवींनी या नाटकाद्वारे पुरुषी प्रवृत्तीविषयक भाष्य केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त, गांधीवादी अण्णासाहेब यांनी पत्नीला सतत नवर्याने टाकले तरी मी विवाह केल्याची भाषा करणे, उद्योगपती बापूराव पत्नी नथूला मर्जीप्रमाणे वागवणे, सिध्दार्थ दलित कार्यकर्ता अंबिकावर होणार्या अत्याचारानंतर त्याची दिसून येणारी दांभिकता आणि साखर कारखान्याचा चेअरमेन सत्ता पैशांच्या जोरावर मस्तवाल झालेला गुलाबराव जाधव असो. सर्व काळातील अशा पुरुष वृत्ती-प्रवृत्ती असतातच. त्यांचे स्वरूप मात्र बदललेले असते.
या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. दळवींच्या कथा, कादंबरी, नाटकांचे अनेकदा माध्यमांतर झाले आहे. तसे या नाटकाचे माध्यमांतर होऊन त्याचा हिंदी सिनेमा झाला व तो गाजला. २२ सप्टेंबर १९८२ ला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आधीच्या या नाटकातील व्यक्तीरेखा ज्यांनी ज्यांनी उभ्या केल्या त्या आजच्या कलाकारांना दिशादर्शक म्हणता येतील.
यातील संवादात अंबिका म्हणते, ‘कायद्याने प्रश्न सुटत नाहीत, कायदा हातात घेऊन प्रश्न सुटत नाहीत, मग प्रश्न कधी सुटणार?’ अण्णासाहेब म्हणतात, ‘माझी अख्खी हयात सभ्य राजकारणात गेली, या नवीन राजकीय गुंडगिरीचा अनुभव नाही मला’… ‘बलात्काराचे गुन्हे असतात, त्यांनाच मंत्रीपद दिलं जातं’. संवाद वास्तववादी, प्रक्षोभक पण अन्यायाला वाचा फोडणारे प्रबोधनात्मक आहेत.
सध्या रंगभूमीवरील ‘पुरुष’ नाटकातील व्यक्तीरेखा तो काळ उभा करतात हे नाकारता येत नाही. कारण नाटकाच्या दोन्ही अंकांतील कलाकारांनी घेतलेली मेहनत दिसून येते. स्फोटक विषय असणार्या नाटकाचे प्रयोग करण्याचे धाडस टीमने केल्याचे दिसते. अनुपमा तापमोगे यांची ताराबाई दडपणात जगणे, पापभिरू असणे व तसे व्यक्त होणे भावणारे वाटते. मथू साकारणार्या अनुपमा परांजपे नवर्याची मर्जी सांभाळणारी पण अंबिकाला सहयोग देणारी सहज उभी केली आहे.
स्पृहा जोशीने मध्यवर्ती भूमिका असलेली अंबिका बिनधास्तपणे साकारली आहे. दोन्ही अंकांतील तिने भूमिकेचा तोल सावरलेला दिसतो. अतिशय एकात्मतेने नाटकाच्या विचाराला पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. निषाद भोईर सिध्दार्थ हा दलित कार्यकर्ता उभा करताना त्याच्या अचूक संवादासह बोलघेवडेपणाचा असणारा, विचारांशी निगडित आवाजाची जरब काही अंशी उणेपणाची तरीही अभिनयातील सहजता लक्षवेधी, अविनाश नारकर हे अण्णासाहेब भूमिका जगलेत.
त्या काळातील गांधीवादी विचारसरणीचा शिक्षक त्यांचे विचार आचरणासह संवाददेहबोलीतून उभे करताना घेतलेली मेहनत सुप्रसिद्ध नट असतानाही जाणवते. (नाहीतर अलीकडे थोडे वलयांकित असले तरी भलताच आत्मविश्वास!) शरद पोंक्षे यांच्या अभिनयाची शैली पात्राला जिवंत करणारी असे मोघमच कुणी म्हणत नाही? त्यांचा गुलाबराव खलत्वाच्या रूपात यथोचित उभा ठाकतो. त्यांच्या आवाजातील धुमारा, ग्राम्य बोली सुरुवातीला नाना पाटेकरांचा प्रभाव वाटला मात्र तसे नव्हते.
गरजेनुसार आवाज पठडी सांभाळत निखळ अभिनय दिसून आला. दुसर्या अंकात अंबिकासह दृश्यात गुलाबराब मद्यप्राशन करतो तेव्हा त्यांना खरोखर ठसका लागला होता. त्यावेळी अंबिका-स्पृहा दोन वेळा तुम्हाला पाणी देऊ का, असं म्हटल्यावर या मद्यात गोम आहे, असं म्हणून प्रसंगावधान साधल्याने प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी अतिशय अध्ययनशील कालपरत्वे कथेला सुयोग्य वळणावर ठेवले आहे, मात्र थोडसं ट्रिम केलंय.
प्रदीप पाटील यांचे नेपथ्य कालसुसंगत मात्र महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांचे फोटो भिंतीवर अतिशय दूर अंतर ठेवून लावलेले दिसले. (विचार वेगळे तरी महापुरुषांचे योगदान समान पातळीवर!) विजय गवंडे यांचे संगीत व ताम्हाणे यांची प्रकाशयोजना साजेशी आहे. समाज-राजकारणातील भीषण वास्तव चिंतनशील आणि मनाला भिडणारे हे नाटक संवेदनशील, सुहृदयी मनाच्या मशागतीसाठी पाहावे.